
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 17, 2025 at 02:03 AM
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.
श्रीक्षेत्र गरुडेश्वरच्या मुक्कामात एक श्री.शास्त्रीबुवा श्रीस्वामीमहाराजांजवळ बसून वेदान्त श्रवण करीत असत.संस्कृत भाषेबद्दल त्यांना फार अभिमान वाटत असे.त्यामुळे प्राकृत भाषेला ते अत्यन्त कमी लेखीत असत.श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ प्राकृत भाषेत असल्यामुळे त्या ग्रंथाबद्दल त्यांना थोडसुद्धा आदर वाटत नसे.श्रीक्षेत्र गरुडेश्वरला श्रीस्वामीमहाराजांच्या सहवासात व सत्संगतीत राहून ज्यावेळी अनेक ब्राह्मण भक्तमंडळी श्रीगुरूचरित्राची पारायणे करीत असताना ते पाहात असत त्यावेळी या गोष्टीचे श्री.शास्त्रीबुवांना फार नवल वाटत असे.पुढे श्रीस्वामीमहाराजांच्या महासमाधीनंतर हे श्री.शास्त्रीबुवा आपल्या घरी परत गेले.दोन वर्षांनंतर त्यांची पत्नी फारच आजारी पडली.श्री.शास्त्रीबुवांनी आपल्या सौ.मंडळींना नाना तऱ्हेने औषधोपचार आणि मांत्रिक व तांत्रिक उपचारही केले, परंतु कोणत्याच उपचाराने त्यांना गुण येईना.त्यामुळे श्री.शास्त्रीबुवा हताश झाले होते.
अशा स्थितीत त्यांनी शेवटी श्रीस्वामीमहाराजांच्या चरणी अनन्यभावाने आपल्या सौ.मंडळींना बरे वाटण्यासाठी उपाय सुचवावा म्हणून प्रार्थना केली.ज्या दिवशी त्यांनी श्रीस्वामीमहाराजांच्या चरणी प्रार्थना केली त्याच दिवशी श्रीस्वामीमहाराज त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना असे म्हणाले की," श्रीगुरुचरित्र हो आहे? आम्ही उपनिषदे वाचणारे ! या साध्या प्राकृतग्रंथात हो काय आहे?" श्रीस्वामीमहाराज असे म्हणून ज्यावेळी मंदस्मित करीत स्वप्नातून अदृश्य झाले त्यावेळी श्री.शास्त्रीबुवांची निद्रा भंग पावली.ते उठून बसले व त्यांनी आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लावूनपाहिला.ज्याक्षणी श्रीस्वामीमहाराजांच्या वाक्यातील गूढार्थाचा प्रकाश त्यांच्या बुद्धीला ज्ञात झाला त्याक्षणी त्यांना आपली चूक कळून असली त्यामुळे श्रीस्वामीमहाराजांनी आपली सौ.मंडळी बरी होण्याचा व संकटातून सुटण्याचा मार्ग आपणास दाखवून दिला अशी त्यांची खात्री झाली. त्यानंतर आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना आपल्या पत्नीकडे लक्ष ठेवावयास सांगून त्यांनी श्रीक्षेत्र गरुडेश्वरचा रस्ता धरला.
श्री.शास्त्रीबुवा मुखाने " दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। " असे भजन करीत श्रीक्षेत्र गरुडेश्वरला पोहोचले.तेथे गेल्यावर श्रीस्वामीमहाराजांच्या समाधीसमोर साष्टांग नमस्कार घालून त्यांनी अत्यंत शरणागतीपूर्वक त्यांची क्षमा मागून प्रार्थना केली व दुसऱ्याच दिवशी श्रीगुरुचरित्राच्या पोथीची पूजा करून सप्ताहाला प्रारंभ केला.दोन वर्षांपूर्वी श्री.शास्त्रीबुवांनी श्रीस्वामीमहाराजांच्या संगतीमध्ये बरेच दिवस काढलेले होते.खरे तर श्रीस्वामीमहाराजांच्या दिव्य संगतीचा अमृतस्पर्शच त्यांना झाला होता.त्यामुळे श्री.शास्त्रीबुवांना श्रीगुरुचरित्र वाचता-वाचता दिव्य आनंदाचा लाभ होऊ लागला.त्यांच्या सर्व वृत्ती श्रीगुरुमय होऊ लागल्या.त्यांच्या देहाची स्मृती क्षणाक्षणाला नष्ट होऊ लागली.अशा अवस्थेतच श्री.शास्त्रीबुवांचा श्रीगुरुचरित्र सप्ताह संपला.ते सप्ताहाचा प्रसाद घेऊन घरी आले.त्यांची पत्नी घराच्या दारातच त्यांचे स्वागत करावयाला उभी होती.
उपरोक्त सर्व कथा सूक्ष्मपणे वाचली म्हणजे श्रीगुरुचरित्राचा अपरंपार महिमा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
श्रीगुरुदेव दत्त.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
❤️
🙇♀️
13