P.P. Anandyogeshwar Nilkanth Maharaj (P.P. Bhau Maharaj Karandikar) (1931-2004)
P.P. Anandyogeshwar Nilkanth Maharaj (P.P. Bhau Maharaj Karandikar) (1931-2004)
February 1, 2025 at 05:47 PM
*"आत्मशोध"- ।। नमो गुरवे वासुदेवाय ।।* सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - १ नमो गुरवे वासुदेवाय (पूर्वार्ध) मी जेव्हा लंडनला गेलो होतो तेव्हा तिथल्या काही लोकांना "।।नमो गुरवे वासुदेवाय।। हा मंत्र रोज एका डायरीमध्ये लिहा", असं सांगितलं. त्या लोकांमध्ये काही गुजराथी, दक्षिण भारतीय, तसेच काही इंग्लिश लोकही होते. त्यातल्या एका हुशार तरुणाने मला सांगितलं की, "तुम्ही जर मला ह्या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला, आणि त्याचं महत्व पटवून दिलं, तरच मी हा मंत्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे लिहीन आणि माझ्या ओळखीच्या अनेक लोकांना लिहायला सांगेन." तेव्हा मला ह्या मंत्राचा अर्थ इंग्लिश आणि गुजराथीत सांगणं भाग पडलं प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे काय आहेत? संबंध विश्वामध्ये महाराजांचा संचार कसा काय चालतो? त्या संचाराची दिशा काय आहे? त्याची भाषा काय आहे? आपल्या संचारामधून भक्तांना ते काय शिकवण देतात? ह्या सगळ्याचं पुरेसं ज्ञान भक्तांना व्हायला पाहिजे. साक्षात ब्रह्मरूप दिव्यदृष्टी काय आहे? विश्वरूप काय आहे? ह्या विश्वामध्ये काय तेज साठवलेलं आहे? हे सर्वांना कळेल अशा सोप्या भाषेत कोणीतरी सांगायला पाहिजे. म्हणून मी हा प्रयत्न करणार आहे. क्रमशः सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - २ ||नमो गुरवे वासुदेवाय|| (पूर्वार्ध) कोणत्याही मानवाला नेहमी सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावं लागतं. सगुणात्मक रूप जर नीट न्याहाळता आलं नाही, तर निर्गुणात्मक काय आहे, त्यातला खरा आनंद काय आहे हे कोणालाही कळणार नाही. देह हा नुसता हाडामांसाचा गोळा नाही. हा देह कोणी बनवला? त्याचं कार्य काय आहे? आणि ते कार्य समजल्यानंतर त्याची कार्यपद्धती काय असावी? हे समजणं अतिशय आवश्यक आहे. जे सत्पुरुष देहरुपात वावरत होते त्यांना ह्याचा प्रत्यय आला. त्यांना आपल्या देहाचं कार्य काय आहे हे कळलं. हा देह निश्चित तऱ्हेने कशासाठी धारण झाला आहे हे त्यांना कळलं. असं अंशात्मक रूपात का होईना, पण ते ज्ञान तुम्हा-आम्हाला व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर आपल्या गुरूंच्या ऋणातून आपण अतिअल्प प्रमाणात तरी मुक्त होऊ शकतो. तसा प्रयत्न करता आला तर आपल्या जीवनाचं बरंचसं सार्थक होईल. ||नमो गुरव वासुदेवाय|| हा जप रोज लिहीत जा असं मी सगळ्यांना सांगतो कारण त्यात प्रचंड ताकद आहे. आपल्या गुरुचे नाम, गुरुतत्व आणि त्याचा कार्यकारणभाव आपणा सर्वाना माहीत असला पाहिजे. वर्तमानपत्रातील एखादी बातमी आपण वाचतो आणि विसरून जातो. आपण अनेक सिनेमे पाहतो, गाणी ऐकतो, पण असा क्वचित एखादा सिनेमा, एखादं गाणं असेल कि जे वर्षानुवर्षं आपल्या लक्षात राहतं. ह्या सगळ्या सहज विसरण्यासारख्या गोष्टी आहेत. पण तरीही आपण त्या बघतो, ऐकतो. बघणं, ऐकणं आणि हातानी कृती करणं ह्यात फरक आहे. आणि म्हणून माझ्या मनात अशी कल्पना आली की, आपल्या गुरूंचं नाव रोज किमान अकरा वेळा आपण लिहावं आणि दुसऱ्यांना लिहायला सांगावं. कारण उत्तम आध्यत्मिक बैठक साधण्यासाठी जी मन:स्थिती प्राप्त व्हायला हवी, ती होण्यासाठी प्रथम कर्म हातून घडले पाहिजे. कर्माला प्राधान्य आहे. Wise men rule the planets, while fools obey them. प प स्वामी महाराजांनी एका भक्ताची संपूर्ण पत्रिका बदलली. निसर्गामध्ये जो वाईट प्रभाव आहे, त्याला चांगलं वळण देऊन उत्तम तऱ्हेने प्रवाहित करणं हे सत्पुरुषांच्या हातात आहे. आणि म्हणून पुरुषार्थाला किंमत आहे, कर्माला प्राधान्य आहे. क्रमशः सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ३ ||नमो गुरवे वासुदेवाय|| (पूर्वार्ध) मनुष्य मानवदेह रूप धारण करून आलेला आहे, परंतु संपूर्ण विश्वाचं तेज सामावून घेण्याची त्याची क्षमता आहे, ताकद आहे, शक्ती आहे. त्या शक्तीनुरूप तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत त्या तेजाचा प्रभाव पोचविण्याचं कार्य ज्या विभूती करत असतात त्यांना गुरु असं म्हणतात. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. गुरु हा शब्द तत्त्वज्ञानाने अतिशय भरलेला आहे. श्रीगुरुचरित्रातील एका अध्यायात गुरु ह्या शब्दाचं विश्लेषण केलेलं आहे. 'ग' म्हणजे काय 'र' म्हणजे काय, उकाराचा अर्थ काय, हे सारं त्यात सांगितलेलं आहे. प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सप्तशती गुरुचरित्रामध्ये सुद्धा गुरु ह्या दोन अक्षरांचं महत्व सांगितलं आहे. ह्या विश्वामध्ये जो तेजाचा प्रभाव आहे, साक्षात्काराचा प्रभाव आहे, Environment which controls the way of Human life, त्या प्रभावाचा अर्थ सांगणारी हि दोन अक्षरं आहेत. संपूर्ण विश्वाचं तेज आणि तत्वज्ञान ह्या दोन अक्षरांमध्ये भरलेलं आहे. ते तेजच जणू काही माझ्यामध्ये सामावलेलं आहे; किंबहुना तेच माझ्या अंतरात्म्यातील खरं रूप आहे, अशी जाणीव, असा प्रतिध्वनी ज्या शब्दाच्या उच्चाराने होतो, तो शब्द आहे 'गुरु' 'ग' ह्या अक्षरामध्ये ब्रह्माची ताकद सामावलेली आहे. 'उ'कार जो आहे, रेफा जो आहे, त्याच्यामध्ये जे जे पाप आहे त्याचं दहन करण्याची क्षमता आहे, त्याचप्रमाणे 'उ' ह्या अक्षरात विष्णूचं अव्यक्त रूप सामावलेलं आहे. म्हणून 'ग' ह्या अक्षरातील ब्रह्माच्या शक्तीला 'उ'कार लाभल्यावर तिथं अव्यक्त रूपामध्ये विष्णूचं अस्तित्व येतं. "रेफा : पापस्य दाहकम।" ह्या उक्तीप्रमाणे पापाचं , अनिष्टतेचं दहन झाल्यावर उकारात्मक असं विष्णूचं अव्यक्त रूप 'गुरु' च्या माध्यमातून व्यक्त रूपात येतं. गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे. तत्वज्ञान आहे. ते तेज, प्रभाव तत्व आणि तत्वज्ञान ज्या मानवी देहामध्ये सामावलेलं आहे तो मानवी देह त्या तेजाचं, तत्वाचं प्रतिनिधित्व करून त्याचं दर्शन व प्रदर्शन घडवू शकतो. अशा त्या देहापुढे मी नतमस्तक होत आहे, हा 'नमो गुरवे' ह्या दोन शब्दांचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे त्या साक्षात्कारी देहासह त्या तत्वांचा माझ्यामध्ये जो प्रादुर्भाव आहे, त्या माझ्यातील सुप्तशक्तीला, त्या माझ्यातील तेजाला मी प्रथम वंदन करीत आहे. ते तेज माझ्यासारख्या दिसणाऱ्या मानवामध्ये आहे. माझ्या वासुदेवामध्ये आहे. 'गूरु ह्या शब्दाचा अर्थ लागला की प प स्वामीमहाराज तुमच्यापासून वेगळे राहतच नाहीत. महाराजांना शरण जा. प्रेमाने महाराजांना आपलंसं करा. राग, लोभ हे महाराजांना कळतच नाहीत हे लक्षात ठेवा. महाराजांना कळतं ते फक्त निरागस प्रेम. ते तुमच्या देहातून त्यांना कळत असतं ते तुम्ही द्या. मग जीव जावो अथवा राहो. परमपूज्य गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ४ ||नमो गुरवे वासुदेवाय|| (पूर्वार्ध) 'गुरू' शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे गुरुत्वाकर्षण. संबंध विश्वामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम चालू आहे म्हणूनच आज तुम्ही जगतो आहोत. गुरुत्वाकर्षण हे तत्व अदृश्य रूपात आहे. पुष्कळशा वेळी काही घटना घडतात, की ज्यांचा कार्यकारणभाव नाही - Which can be called as mechanism, which can not be processed with any kind of material that can be seen with naked eyes. आपल्याला कधीतरी काही भास होतात, मनाला काहीतरी वाटतं. ते गुरुत्वाकर्षण होय. you feel it when it touches the material. आपला equilibrium साधला पाहिजे. समतोल पाहिजे, तसा तो जीवनामध्य सिद्ध झाला पाहिजे. संपूर्ण पृथ्वीचा, संपूर्ण विश्वाचा समतोल राखण्याचं कार्य हे तत्व करीत असतं. ज्या देहाच्या माध्यमातून हे तत्व साधलं जातं, त्यालाच 'गुरू' म्हणतात. ज्यांच्याकडे गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा प्रादुर्भाव आहे, त्या देहाच्या माध्यमातून त्या शक्तीच्या, प्रभावाच्या योगे आपल्या भक्तांकडून जो सत्कर्म करून घेतो, त्या देहधारी पुरुषाला सत्पुरुष म्हणतात. सद्गुरुंच्या बरोबर जर का तुमचं सातत्याने अनुसंधान असेल, त्यांच्या स्थानाशी तुमचा संपर्क असेल तर ह्या गुरुमध्ये जो अर्थ सामावलेला आहे, तो तुमच्या लक्षात येईल. काही वेळेला शरीराने अनुसंधान शक्य नसतं, परंतु श्वाशोस्वासाच्या माध्यमातून जरी असलं तरी तो अर्थ तुमच्या ध्यानात येईल. ह्याकरिता महाराजांचं सतत नाम लिहा, नियमाने लिहा, असं मी सांगत असतो. it all the times gives you a feeling that there is some power, some energy that sounds like the mechanism of equilibrium. ह्याबाबत एक उदाहरण येथे सांगण्यासारखं आहे. एका गृहस्थाचं माझ्याशी आणि आपल्या महाराजांशी नियमाने, सतत अनुसंधान आहे. कोणत्याही सद्गुरुंच्या स्थानी पहाटे ३.३० ते ४.०० वाजताची वेळ हि अत्युंत जागृत समजली जाते. अशा वेळेला त्या गृहस्थांना स्वप्न पडलं, की ते श्रीगुरुचरित्राचं पारायण करीत आहेत. पहिल्या काही ओळी वाचल्या आणि त्यांना श्री दत्तात्रयांचं दर्शन घडलं. ते पुढे वाचत राहिले. थोड्याच वेळात त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घडलं. वास्तविक मी हे सांगू नये, पण विषयाच्या संदर्भात सांगणं भाग आहे कि, आणखी काही ओळी वाचल्यावर त्यांना भाऊ दिसले आणि त्यांनी त्या गृहस्थाला एक मंत्र दिला. त्या गृहस्थांनी तो मंत्र पहाटे जाग येताच ताबडतोब लिहून काढला. सकाळी ते गृहस्थ मला भेटायला आले. त्यावेळी मी श्री दत्तात्रयांची पूजा करत होतो. बसल्या जागीच मी त्यांना एक मंत्र म्हणून दाखवला. ते गृहस्थ म्हणाले, "भाऊ, तोच मंत्र मी लिहून आणला आहे". तो मंत्र मी माझ्या पूर्वायुष्यात कधीच म्हंटला नव्हता. आतासुद्धा मला तो नीट आठवत नाही. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे कळावं म्हणून हे उदाहरण सांगितलं. परमपूज्य सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ५ नमो गुरवे वासुदेवाय (पूर्वार्ध) 'गुरवे' ह्या शब्दाचा अर्थ आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध करण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं. त्या माध्यमाचं मार्गदर्शन सत्पुरुष देत असतात. प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्यासारखे जे सत्पुरुष आहेत त्यांच्याशी, त्यांच्या स्थानाशी जर भक्तांचं अनुसंधान असेल तर पुष्कळशी न उलगडणारी त्या भक्ताला आपोआप उलगडायला लागतात. नियमाने जर नामस्मरण चालू असेल तर भक्ताला जपाचं ज्ञान प्राप्त होतं. आपण जेव्हा मनोमन किंवा सामुदायिकरीत्या प्रकट नामस्मरण करीत असतो त्या त्या वेळेला नामामध्ये काय शक्ती आहे ह्याचा प्रत्यय आणि अनुभव आपल्याला येत असतो, आणि म्हणूनच अधिकाधिक भक्त प्रतिष्ठान वर येऊन, महाराजांच्या चरणाशी बसून नामजपाचा, नामस्मरणाचा आनंद घेत असतात. आपलं अंतर्याम किती शुद्ध आहे, पवित्र आहे किंवा अपवित्र आहे हे जाणून घेऊन त्याला पावित्र्य देण्यासाठी किंवा त्याचं पावित्र्य कायम राखण्यासाठी नामस्मरणाची गरज भासते. शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवणारं जे द्योतक आहे, त्याचंच नाव 'साक्षात्कारी नाम' आहे. गुरुप्रती श्रद्धा, निष्ठा हि दृढ असावी लागते. गुरुविषयी कळकळ असावी लागते. तळमळ असावी लागते. आयुष्यात अजाणतेपणी आपण काही ना काही चुका करत असतो. कधी कधी आपलं पापकर्म आडवं येत असतं. त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. आपले षडरिपू आपल्याला छळत असतात. पण अशा वेळी सद्गुरुंच्या तेजाने षडरिपूंवर मात करता येते. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की, "आता तू शस्त्र हातात घे. समोर शत्रुपक्षात कोण आहे ह्याचा विचार करू नकोस. ह्या धर्मयुद्धात जय झाला तरी श्रीकृष्णार्पणमस्तु आणि पराजय झाला तरी श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा मन:स्थितीमध्ये तुझ्या हातून जे कर्म घडेल त्याचंच नाव खरा धर्म." धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. सत्याला अनुसरून वागलं पाहिजे. त्याकरिता सद्गुरुंच्या चरणी अखंड लीनता असावी. तळमळ असावी. ती जर नसेल तर गुरु समोर असूनही आपल्याला दिसणार नाहीत. 'गुरु' ह्या शब्दात 'उ'कारात्मक असं जे विष्णूचं रूप आहे ते साक्षात अविष्कार रूपामध्ये गुरूच्या देहात सामावलेलं आहे. गुरुमध्ये असलेलं हे तत्व इतकं प्रभावी असतं की, त्याचा प्रादुर्भाव होऊन त्या देहात आणि त्याच्या सानिध्यात एक ताकद, एक शक्ती निर्माण झालेली असते. अशा शक्तीनिशी, अशा तेजाबरोबर, अशा प्रभावासह आणि 'रेफा: पापस्य दाहकम' ह्या तत्वानुसार जो एक देह कित्येक वर्षांपूर्वी निर्माण झाला त्या देहाचं नामकरण करण्यात आलं 'वासुदेव' सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ६ नमो गुरवे वासुदेवाय (पूर्वार्ध) प प वासुदेवानंद सरस्वती हे देहरुपात होते. तुम्ही आम्ही जसे देहबंधनात आहोत, तसेच श्री स्वामी महाराजही देहबंधनात होते. आपल्यासारखं त्यांनाही देहकर्म सुटलेलं नव्हतं. तरीही 'नमो' आणि 'गुरवे' ह्या दोन शब्दांच्या तत्वज्ञानासहित त्यांचा देह वावरत होता. देहकर्माच्या व्यापारात राहूनही आम्हाला महाराजांकडून ते तेज मिळावं, तो प्रभाव जाणवावा आणि त्या योगेच आम्हाला आमच्या देहकर्माचा विसर पडावा, म्हणून 'नमो गुरवे वासुदेवाय' द्या मंत्रातील 'वासुदेवाय' ह्या शब्दाची योजना आहे. महाराजांच्या देहाला खूप आजार सोसावा लागला. अनंत कष्ट सहन करावे लागले. अशा आजारपणाच्या काळात त्यांनी स्वतःची आतडी शरीराच्या बाहेर काढून स्वच्छ केली. तुमच्याआमच्या कल्याणासाठी तो देह शुद्ध, शुचिर्भूत केला आणि कायम ठेवला - कारण जर देह नसेल, material नसेल, माध्यम नसेल तर या तत्वाचा तुम्हाआम्हाला अनुभव येणार नाही. अनुभूती मिळणार नाही आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्ष यमराज समोर येऊन उभे राहिले तेव्हा श्री स्वामी महाराजांनी त्याला रोखून धरलं. 'नमो गुरवे' हे तत्वज्ञान त्यांनी साक्षात श्री दत्त्तमहाराजांकडून आत्मसात केलं होतं. त्याचा त्यांनी शेवटच्या क्षणी उपयोग केला, कारण त्यांना समाजासाठी थांबायचं होतं. देहावर योग्य ते संस्कार होणं आवश्यक होतं. त्यासाठी अमावास्या टाळून प्रतिपदेची प्रतीक्षा करणं जरुरीचं होतं म्हणून त्यांनी यमराजाला रात्रभर थांबवून ठेवलं आणि त्या रात्रभरात त्यांनी स्वतःच्या देहावर संस्कार करून तो देह समाजोपयोगी होईल असा तयार केला. दुसऱ्या दिवशी आर्द्रा नक्षत्र धारण केलं. आर्द्रा नक्षत्र हे शिव नक्षत्र आहे. त्याच्यायोगे त्या देहावर वेगळं तेज चढलं आणि म्हणून १९१४ साली देह विसर्जित करूनही श्री स्वामी महाराज आजही देहरुपात आहेत. ते सर्वानाच दिसत नाहीत. परंतु त्यांचा स्पर्श जाणवतो, त्यांचा वास जाणवतो, आणि त्यांचं अस्तित्व जाणवतं. ज्या भक्तांनी श्री स्वामी महाराजांशी जवळीक साधलेली आहे त्यांना ते प्रत्यक्ष देहरुपातसुद्धा दर्शन देतात. असं देहरूप दर्शन प पू नानामहाराज तराणेकर ह्यांना घडलेलं आहे. श्री स्वामी महाराज हे त्यांचे गुरू. आपल्या गुरूंनी प्रत्यक्ष आपल्यासमोर यावं ह्या उदात्त आणि तीव्र भावनेपोटी प पू नानामहाराजांनी श्री गुरुचरित्र सप्ताह केले. प्रथम साधे सप्ताह केले. नंतर अन्नग्रहण न करता केवळ पाणी पिऊन केले आणि त्यानंतर पाणीसुद्धा न पिता त्यांनी सप्ताह केले. ह्या सप्ताहांच्या वेळी श्री स्वामी महाराज येणारच ह्याची खात्री बाळगून ते महाराजांना बसण्यासाठी पाट मांडून ठेवीत. अशा पद्धतीने अनेक सप्ताह केल्यानंतर एक दिवस प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज छाटी परिधान करून, हातात दंड कमंडलू धारण करून तिथं प्रत्यक्ष उपस्थित झाले. प पू नाना महाराजांची आणखी एक हकीकत सांगतो. एकदा दादरच्या वास्तव्यात त्यांची तब्येत बिघडली म्हणून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासण्यासाठी स्टेथस्कोप त्यांच्या छातीला लावला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण श्री नानामहाराजांच्या श्वासोच्छवासातून ।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। ह्या नामजपाचा ध्वनी अखंडपणे ऐकू येत होता. आपल्या सद्गुरुंच्या श्वासोच्छवासाच्या स्पंदनांनी त्यांचा देह इतका भरून गेला होता कि 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशी त्यांची अवस्था झाली होती. अशी अवस्था तुमची-आमची व्हायला हवी. त्याकरिता चांगले विचार निर्माण व्हायला हवेत. द्वेषभावना नष्ट व्हायला हवी. एकदा तुमच्या देहाला शुद्धता मिळायला लागली की 'सत' म्हणजे अविनाशी जी स्पंदने आहेत त्यांचा प्रादुर्भाव तुमच्यामध्ये आपोआप व्हायला लागेल. श्री स्वामी महाराज देहरूप होते. आपण ही देहरूप आहोत. तेव्हा श्री स्वामी महाराजांचा श्वासोच्छवास, जो त्यावेळेस चालू होता, तिथं आपल्या देहाच्या माध्यमातून जाऊन भिडलं पाहिजे. तो श्वास तुम्ही आत्मसात करायला शिकलं पाहिजे. तो श्वासोच्छवास आणि तुमचा श्वासोच्छवास ह्यांचं एकत्रीकरण होऊन एकप्रकारचा एकसंध अविष्कार निर्माण होईल आणि त्यायोगे श्री स्वामी महाराज काय सांगत आहेत, काय बोलत आहेत हे तुमच्या देहातच तुम्हाला कळू लागेल. त्यांचं प्रगल्भ ज्ञान, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची शक्ती, त्यांचा प्रभाव ह्या सर्वांसहित जो त्यांचा देह होता त्या देहाच्या श्वासोच्छवासाची स्पंदने माझ्यात समरसून जावीत म्हणून 'नमो गुरवे वासुदेवाय' हा मंत्र लिहायला हवा. सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ७ (नमो गुरवे वासुदेवाय उत्तरार्ध प्रारंभ) आतापर्यंत मी आपल्याला 'नमो गुरवे वासुदेवाय' ह्या जपाचा ऐहिक अर्थ सांगितला, मंत्र लिहिताना आपल्याला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या आत्मज्ञानाशी संबंधित आहेत. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला एक पवित्र कर्तव्य करायचं असतं म्हणजे, माझा हा जो श्वासोच्छवास चालू आहे कोणाच्या कृपेमुळे चालला आहे ह्याची सतत जाणीव ठेवायची असते. ती जाणीव सतत राहावी म्हणून मी प्रत्येकाला 'नमो गुरवे वासुदेवाय' हा मंत्र लिहायला सांगतो. ' नमो गुरवे' ह्या दोन शब्दांमध्ये तत्व आहे ते अदृश्य रूपातील तत्व प्रत्यक्ष दृश्य रूपात करून दाखविण्याची क्षमता माझ्या सद्गुरूंच्यामध्ये आहे. माझ्या श्री स्वामी महाराजांमध्ये आहे, म्हणून 'नमो गुरवे' ह्या शब्दांपुढे मी 'वासुदेवाय' लिहितो आहे. संपूर्ण विश्वामध्ये जे तेज आहे त्याचा प्रादुर्भाव श्री स्वामी महाराजांच्या देहात झाला होता. 'वासुदेवाय' हा शब्द लिहिताना श्री स्वामी महाराजांचं संपूर्ण चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांच्या अलौकिक वैराग्याची जाणीव होते. संपत्तीविषयी अनासक्तीचं नव्हे तर तिटकारा वाटणं, त्या संपत्तीत अडकून न बसणं ह्याला वैराग्य म्हणायचं. श्री स्वामी महाराजांच्या पायाला चुकून नाणं लागलं तरी ते अंघोळ करीत असत. संपत्ती जवळ असूनही ज्याला मनाने वैराग्य प्राप्त झालं आहे, त्याला वैराग्यसंपन्न म्हणतात. तसे आपले श्री स्वामी महाराज होते. ते जसे वैराग्यसंपन्न होते तसेच आत्मज्ञानी होते. सर्व षड्रिपूंना एकवटून, देहाचा विसर पडून खरा 'मी' कोण आहे आणि ह्या देहाचा आत्म्याशी आणि जीवात्म्याशी काय संबंध आहे, ह्याचा त्यांनी अभ्यास केला, चिंतन केलं. आपला देह जीवात्म्याशिवाय राहू शकत नाही आणि जीवात्म्याचं कार्य देहाशिवाय घडू शकत नाही. पण श्री स्वामी महाराजांनी ह्या सृष्टीचा कर्ता करविता कोण आहे ह्याचं संशोधन करण्यासाठी देहाचा त्याग केला. 'वासुदेवाय' ही अक्षरं लिहिताना, त्याचा अन्वयार्थ लावताना तीन दृष्टीने विचार करायला हवा. कर्म, उपासना आणि ज्ञान. माझा वासुदेव हा साक्षात वेदान्त आहे. साक्षात वेदपुरुष आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान हि वेदाची तीन अंग आहेत. तो कर्माने श्रेष्ठ आहे. उपासना होती म्हणून त्याने कर्म टाकलं नाही. कर्माबरोबरच उपासना करणारा माझा वासुदेव आहे. कर्म आणि उपासना साधल्यावर त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञानवंत झाले, पण त्यांनी ते ज्ञान आपल्याबरोबर नेलं नाही. अनेक स्तोत्रांच्याद्वारे, अनेक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी ते समाजासाठी ठेऊन दिलं. कारण त्यांना समाज शुद्ध करायचा होता. समाजात जे षडरिपूंच थैमान माजलं होतं ते त्यांना शांत करायचं होतं. म्हणून कर्म, उपासना, ज्ञान हे जिथे एकत्र आले त्या वेदपुरुषाला, त्या प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना मी नमस्कार करतो. सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ८ 'नमो' ह्याचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे 'कर्म'. नमो लिहिताना कर्माचा विचार आपोआप व्हायला पाहिजे. 'गुरवे' हा शब्द लिहिताना उपासनेचा विचार व्हायला पाहिजे आणि 'वासुदेवा'चं नाव लिहिताना आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश पसरायला पाहिजे. सर्व सत्पुरुषांना - श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती, त्याचप्रमाणे माणिक प्रभू, साईबाबा, स्वामी समर्थ ह्या सर्वांना आपण दत्तरूप म्हणतो. एखाद्या संसारी सत्पुरुषालाही दत्तरूप म्हणतो. जो साक्षात आहे, सिद्ध आहे आणि जे दृश्यरूप आहे त्याचंच नाव दत्त आहे. जो देहावतारी, देहधारी मनुष्य, साक्षात्काररूपाने, दृष्टांतरूपाने किंवा प्रत्यक्षपणे तुमच्यासमोर परमात्मस्वरूप सिद्ध करू शकतो त्याचं नाव 'दत्त' आहे. म्हणून प प वासुदेवानंद सरस्वती हे दत्तावतारी होते. He took birth to prove something different than what you know. सद्गुरू म्हणजे अध्यात्मिक शक्ती अखंड निर्माण करणारं यंत्र होय असं श्री रामदास स्वामी सांगतात. त्या शक्तीचा उपयोग करून साधक आपलं अंत:करण अंतरात्म्याशी स्थिर करू शकतो. सद्गुरू आपली शक्ती देण्यास केव्हाही असतात. परंतु घेणारा शिष्य त्यासाठी तयार असावा लागतो. ।।नमो गुरवे वासुदेवाय।। हा मंत्र लिहिताना आपल्या आयुष्यात काय केलं ते क्षणार्धात आपल्या डोळ्यसमोर उभं राहिलं पाहिजे. श्री स्वामी महाराजांनी आयुष्याची साठ वर्ष समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केली. देह झिजवला. हा देह कधीतरी नष्ट होणार आहे. अशा ह्या नश्वर देहाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे, ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मरणाचं स्मरण सतत राहिलं पाहिजे,. श्री स्वामी महाराजांना सतत मृत्यूचं स्मरण होतं, पण त्याच भय कधीच नव्हतं. मरणाला, देह नष्ट होण्याला, देह विसर्जनाला ते कधीच घाबरले नाहीत. अलोट सामर्थ्य त्यांच्यापाशी वसत होतं. त्यांचं कर्तृत्व अफाट होतं आणि समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं होतं, म्हणून ते मृत्यूला कधी घाबरले नाहीत, इतकंच नव्हे तर ते मृत्यूला आनंदाने सामोरे गेले. ज्याच्या हातून पुरुषार्थ घडतो असा कर्तृत्ववान पुरुषच मृत्यूला हसत हसत सामोरा जातो. माणसाचं वैभव त्याच्या कर्तृत्वात आहे. मनुष्य देहरूपाने जरी अस्तित्वात नसला, त्याचा देह जरी पंचत्वात विलीन झाला असला तरीसुद्धा त्याच्या दिव्यत्वाची प्रचिती समाजाला यायला पाहिजे. श्री स्वामी महाराजांनी देह विसर्जित केल्यानंतर कित्येक वर्ष लोटली तरी त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला अजूनही येते आणि स्फूर्तिदायक ठरते. खरं तर, स्वामी महाराज गेलेलेच नाहीत. 'ओम सद्गुरू प्रतिष्ठान' या नावाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचं रूपांतर संस्थेमध्ये झालं. सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - ९ ज्यांच्या मध्ये सारा समाज सामावलेला आहे असे ते साक्षात्कारी सद्गुरू श्री स्वामी महाराजांचं ह्या इथं 'ओम सद्गुरू प्रतिष्ठान' वर वास्तव्य आहे.. त्यांचा इथं अखंड वास आहे. देहधारी असतानाच ज्यांच्या देहाचं रूपांतर परमेश्वरी रूपामध्ये झालं, अशा साक्षात्कारी दत्तावतारी सत्पुरुषाचं, त्या परमेश्वरी शक्तीचं हे घर आहे, म्हणून त्या सत्पुरुषाचं हे मंदिर झालं. ह्या स्थानाशी तुमचं नियमाने अनुसंधान असेल तरच महाराज तुमच्याशी अनुसंधान साधतील. मृत्यू म्हणजे तरी शेवटी काय आहे? जीवाचं आणि शिवाचं जे नातं आहे त्याचंच नाव मृत्यू आहे. जीव आणि शिव जेव्हा एकत्र येतात त्यावेळी अतिशय पवित्र आनंदमय असा सोहळा होतो. तो मृत्यू होय. असा आनंद सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर प्रत्येक भक्ताने 'नमो गुरवे वासुदेवाय' हा जप लिहिला पाहिजे. श्री स्वामी महाराज जेव्हा देहाच्या माध्यमातून वावरत होते, तेव्हा त्या माध्यमातून, त्या हृदयातून, त्या श्वासातून, त्या हातातून, त्या चरणातून आणि ते चरणकमल जिथं जिथं गेले तिथल्या पुनीत झालेल्या मातीतूनसुद्धा त्यांच्या देहातील तेज आणि प्रभाव त्यांनी समाजाला प्रदान केला. त्याचा प्रत्यय आजही आपल्याला येतो. ज्यांचं मन मलिन असतं, ज्यांच्या मनामध्ये निरनिराळ्या विचारांचा गलबला चालू असतो, त्यांना मृत्यूविषयी साशंकता, संशय असतो. विचारांच्या गलबल्यामुळे षडरिपूंचं संतुलन टिकून राहूच शकत नाही. अश्या व्यक्तींना मृत्यू अचानक येऊ शकतो. अशा प्रकारे मृत्यू येऊन देह गेल्यानंतर, त्या देहातून जी स्पंदनं, गेली अनेक वर्ष चालू असतात, ती स्पंदनं दुसऱ्यांना क्लेशकारक होतात. त्याउलट सत्पुरुषांच्या देहविसर्जनानंतर त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती येते. आपला देह असताना जेवढी पावित्र्याची, तेजाची प्रचिती आली नसेल त्यापेक्षा जास्त आपला देह सोडल्यानंतर यावी. आपल्या पश्चातसुद्धा समाजाला आपला उपयोग व्हावा ह्याकरिता श्री स्वामी महाराज आणि त्यांचं जीवन हे एक मार्गदर्शक तत्व आपल्यासमोर आहे. त्या तत्वरूप स्वामी महाराजांना, त्या श्री वासुदेवानंद सरस्वतींना मी नमस्कार करतो. आपले सद्गुरू काय आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, ह्याचं पूर्ण आकलन आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. स्वतः श्री स्वामी महाराजांनी साक्षात श्री दत्त महाराजांची आळवणी केली की, मला तुमच्यासारखं करा. तशीच आळवणी आपण श्री स्वामी महाराजांकडे करायला हवी. सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांची अमृतवाणी - १० जीवनामध्ये आम्ही सतत रडगाणं गात राहतो. कधीच चांगला सूर लावत नाही. असं होता काम नये. जीवनाच्या गाण्यामध्ये समाधानाचे तरंग उठायला हवेत. वास्तविक कोणताही जीव जन्माला येणं हे एक पापच आहे. Anything takes place through crash, creates crashes for ever. मानवाचा पुनर्जन्म जरी अनावश्यक असला तरी त्याच्याएवढे आवश्यक material पृथ्वीतलावर दुसरं नाही म्हणून तो आवश्यक आहे. ह्या देहाचं जे कार्य आहे ते देह करीतच राहणार, पण आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आत्म्याच्याही पलीकडे जाऊन शुन्यात्मक अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. आत्मा, प्राणात्मा, जीवात्मा, परमात्मा आणि पलीकडे असणारं, ब्रह्माण्डाच्या पलीकडे असणारं विश्व ह्याची उकल होण्यासाठी देह प्राप्त झालेला आहे. स्वतःला जेव्हा आपण पूर्ण विसरतो तेव्हा त्या अवस्थेला Bliss असं म्हणतात. you have to be one with the universe. संपूर्ण विश्वाशी आपल्याला एकरूप होता येतं आणि तिथंच ब्रह्मानंदाला सुरुवात होते. परमेश्वरी शक्तीचं आकलन होऊन ती प्राप्त करून घेणं म्हणजेच ब्रह्मानंदाचं आकलन होणं. ती महान शक्ती ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. प्रत्येक मानवामध्ये आहे. प्रत्येक भक्ताच्या अंतर्यामी ती ताकद आहे, पण ती ताकद आहे ह्याचा तुमचा तुम्हालाच विसर पडलेला आहे. तुमच्या डोक्यात नको त्या विचारांचा फापटपसारा भरलेला असल्यामुळे, आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा तुम्हाला अजिबात विसर पडतो. आपली आत्मशक्ती काय आहे आणि मायावीरूप कसं आहे हे जाणून घेण्यासाठी तरी संपूर्ण चोवीस तासातील फक्त दोन मिनिटं तुम्ही मनन केलं तरी तुम्हाला अनुभव येईल. षडरिपूंचं थैमान कमी करून आपल्या आत्मशक्तीचं आपल्याला दर्शन होण्यासाठी, आपण त्या साक्षात्कारी, दत्तावतारी प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांपुढे नतमस्तक होऊया.. ।।नमो गुरवे वासुदेवाय।। सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर ।।नमो गुरव वासुदेवाय।। उत्तरार्ध पूर्ण
🙏 1

Comments