Daily Jandut
February 20, 2025 at 09:23 AM
मोठी बातमी: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपद-आमदारकीही जाणार?
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना न्यायालयाने (Court) मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे (Tukaram Dighole) यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.
माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा
1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.