Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 11, 2025 at 12:31 AM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.* +:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+: *२००.ब्रह्मचिंतन* जें वासुदेवाख्य अव्यय । तें परब्रह्म मीच होय । ऐसा जयाचा निश्चय । तो मुक्त होय अन्य बद्ध ।।१।। मीच परब्रह्म असे । ब्रह्माहून वेगळा नसे । ब्राह्मणें कीजे उपासन असें । ब्रह्मभाव धरू न ।।२।। मीच परब्रह्म निश्चीत । अबाध्य असंग चिद्रूप निश्चित । प्रयत्नानें असें चिंतीत । राहतां मुक्त होतसे ।।३।। जें सर्वोपाधिशून्य । जें निरंतर चैतन्य । तें मी ब्रह्म न अन्य । वर्णाश्रम मग कैचे ।।४।। मी ब्रहा असें जाणतां । तया ये सर्वात्मता । तन्मुक्तीला आड देवता । न येती आत्मा त्यांचाही हो तो ।।५।। माझ्याहून देव भिन्न । असें करितां उपासन । तया न होय ब्रह्मज्ञान । पशुसमान हो तो देवा ।।६।। मी आत्मा नच अन्य । ब्रह्मच मी शोकशून्य । सच्चिदानंद मी धन्य । नित्यमुक्तस्वभाव मी ।।७।। असें आपणा ब्रह्म मानून । सतत वागे तया न । दुष्कृत आणि दुष्कृतापासून । आपत्ती जाण न होतीं ।।८।। आपणा ब्रह्म मानून । राहावें सुखे करून । मी ब्रह्म आहें असे चिंतन । हो कां क्षणभर ही बरा ।।९।। तें महापातका निवारी । जेवीं अंधकारारी । सर्वांधकारा निवारीं । म्हणोनि ब्रह्मचिंतन करावें ।।१०।। अज्ञानामुळें ब्रह्मापासून । आकाश झालें बुद्बुदा समान । वायू झाला आकाशापासून । वायूपासून तेज झालें ।।११।। उदक झालें तेजापासून ।। पृथ्वी झाली उदकापासून । व्रीहियवादिक पृथ्वीपासून । झालें उत्पन्न अज्ञानामुळें ।।१२।। पृथ्वी विरतां उदकांत । उदक विरे तेजांत । तेज विर वायूंत । वायु आकाशात विरतसे ।।१३।। आकाश विरे अव्याकृत मायेंत । तें विरें शुद्ध ब्रह्मांत । त्याहूनि अन्य न उरत । तें ब्रह्म मी हरी विष्णु ।।१४।। यन्मायेनें कर्तृत्व भोक्तृत्वादिक । तो अच्युत अनंत गोविंद मी एक । तोच मी हरी आनंदरूपक । अज अमृत अशेष मी ।।१५।। नित्य निर्विकल्प निर्विकार । सच्चिदानंद अव्यय मी पर । पंचकोशातींत परमेश्वर । अकर्ता अभोक्ता असंग मी ।।१६।। लोहचुंबकापरी माझे जवळ । इंद्रियादिकांचा होतो खेळ । मी आदिमध्यांती मुक्त केवळ । स्वभावशुध्द मी बद्ध नसें ।।१७।। मी ब्रह्माचि न संसारी । मी मुक्त हें चिंतिजे अंतरी । हैं चिंतन न घडें तरी । वाक्य उच्चारी जें हें नित्य ।।१८।। या अभ्यासानें भ्रमरकीटवत् । ब्रह्मभाव होय निश्चित । संशय सोडूनी सतत । करावा निश्चित अभ्यास ।।१९।। हें ध्यान करितां एक मास । ब्रहाहत्येचाही होतो नाश । एक वर्ष करिता हा अभ्यास । मिळती खास अष्टसिद्धि ।।२०।। यावज्जीव अभ्यास करितां । आंगी वाणे जीवन्मुक्तता । मी देह न प्राणेंद्रियें तत्त्वतां ही दृढता होय तयाधी ।।२१।। मी न मन न बुद्धि न चित्त । मी न अहंकार न भूमी न पय । मी न तेज न मी वात । मी न आकाश सर्वथा ।।२२।। मी न शब्द न स्पर्श न रस । मी न गंध न रूप खास । मी नोहे हा मायाविलास । मग संसारभास मज कैचा ।।२३।। साक्षिस्वरूपें केवळ । मी शिवची निर्मळ । मिथ्या जगज्जाल । होउनी मृगजळयत् राहे ।।२४।। ज्ञानें माझे ठायींच तें विरे । मग एकचि ब्रह्म मी उरें । शेखीं अनंत मीच न दुसरें । तोच मी सर्वेशसर्वशक्ति ।।२५।। मी आनंद सत्य बोध पुरातन । ऐसें असें हें ब्रह्मचिंतन | हा प्रपंच मिथ्या म्हणून । सत्याद्वय ब्रह्म मीचि एक ।।२६।। या विषयी वेदांत प्रमाण । गुरु स्वानुभव तिसरा जाण । मी ब्रह्म न संसारी ब्रहाभिन्न । मी न देह सनातन केवळ मी ।।२७।। एकची अद्वय ब्रह्म । येथें नसे नाना भ्रम । हें कळावया ब्रह्मचिंतनक्रम । कथिला भ्रम निरसावया ।।२८।। इति श्री . प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं ब्रह्मचिंतनं संपूर्णम् ।।
🙏 ❤️ 🙇‍♀ 11

Comments