
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 19, 2025 at 12:34 PM
दत्त महाराजांचे आपल्या भक्तांकडे नित्य अगदी बारीक लक्ष असते ,केवळ भक्तच नाहीत तर त्यांच्या मुलाबाळांचा योगक्षेम उत्तम चालला आहे ना हे ते आवर्जून पाहत असतात . आता इथे प्रश्न असा आहे कि असं काही वावगं वाटल्यास किंवा काही गरज असल्यास महाराज सांगत असतील का ? तर योग्यता असल्यास प्रत्यक्ष सांगतात आणि काहींना अप्रत्यक्ष सांगणे अथवा सूचित करणे मात्र अवश्य होते .
काही प्रत्यक्ष सूचित करण्याची उदाहरणे पाहता थोरल्या महाराजांची नृसिंहवाडी भेट पाहता येईल . वेषभूषेवरून थोरल्या महाराजांचे विषयी किंतु उत्पन्न होऊन पाणी घालू दिले नाही आणि तसेच थोरले महाराज घाट चढून वर येऊ लागले . त्याच वेळी गोविंदस्वामी महाराज वरती पोथी वाचत होते ,त्यांना दत्त महाराज म्हणाले, पोथी वाचण्याचे सोडून खाली काय चालले आहे ते पहा . लगेच पोथी वाचन थांबवून गोविंदस्वामी महाराज खाली घाटावर आले आणि आपला दंड थोरल्या महाराजांचे हाती देऊन त्यांना पाणी घालण्याकरता घेऊन गेले ,
दुसरे उदाहरण म्हणजे नारायणस्वामी महाराजांचे . आपल्या दोन्ही कन्यांना एका आप्तांकडे ठेऊन नारायणस्वामी महाराज नृसिंहवाडीला दत्त महाराजांचे सेवेत होते . एक दिवस दत्त महाराज नारायण स्वामी महाराजांना म्हणाले कि मुलांचे संगोपन जसे माता पित्याकडून होते तसे आप्त स्वकीयांकडून होतेच असे नाही तेव्हा दोन्ही मुलींना इथे आपलेपाशी घेऊन यावे . इथे गोविंद स्वामी महाराज आणि नारायण स्वामी महाराज हे अधिकारी होते त्यामुळे दत्त महाराज आणि त्यांचा थेट संवाद झाल्यास वावगे वाटणार नाही पण इतर अनेकांना महाराज कसे सूचित करत असतील ?
दत्त महाराज माध्यम रूपाने अनेकदा आपला मनोदय व्यक्त करतात ,याचे उदाहरण म्हणजे गर्ग मुनींनी कार्तवीर्याला केलेले मार्गदर्शन ,किंवा गुरुचरित्रात मांडीवर फोड झालेल्या बादशहाला झालेले मार्गदर्शन हे ह्याचेच उदाहरण आहे . अलर्काला वाटेत साधू कुठे भेटतील हे सांगणारा मार्गदर्शक कोणाच्या इच्छेने हे सांगत होता ? मनाचे कारक आणि बुद्धीचे प्रेरक दत्त महाराज आहेत . हे सर्व माध्यमरूपातून झालेले उपदेश म्हणजे दत्त महाराजांनी केलेली योजना होती असं म्हणायला हरकत नाही .
आपल्यासारख्या सामान्यांना देखील अनेकदा असे मार्गदर्शन होत असते पण मनाच्या कवाडांना बंद करून बसलेलो आम्ही ते ओळखू शकत नाही मग पुन्हा हात जोडून प्रार्थना करत म्हणतो
ते मन निष्ठुर न करी आता ll श्रीगुरुदत्ता ll
श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏
❤️
🙇♀
🙇♂
18