
Dr. Pareexit Shevde
February 7, 2025 at 11:29 AM
#महत्त्वाचे
ब्रायन जॉन्सन हा अमेरिकन बिझनेसमन "don't die" म्हणजेच "मरू नका" चळवळीचा प्रणेता आहे. दीर्घायुष्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. यातले काही वादग्रस्तदेखील असू शकतात. त्याचं शारीरिक वय ४७ वर्षं असलं तरी त्याच्या अवयवांची वयं त्याहून कित्येक वर्षं कमी असल्याचं आढळलं आहे.
नुकताच आपल्या भारत भेटीत उद्योजक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमधून तो मधूनच उठून गेला. याकरता त्याने कारण दिलं "खराब AQI" अर्थात वायु प्रदूषण. विशेष म्हणजे पॉडकास्ट मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात शूट होत होतं. तरीही तिथल्या १२० AQI या पातळीचा आपल्याला त्रास होत असल्याचं सांगून त्याने काढता पाय घेतला.
"हे गोरे उगाच भारताची लाज काढतात" असं म्हणून आपण हे प्रकरण उडवून लावू शकतो. पण मुद्दा याहून गंभीर आहे. रोजची वाढत असलेली बांधकामं आणि कारखाने घेत नसलेली काळजी यांसारख्या प्रमुख कारणांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण वाढत आहे. अन्यही कित्येक कारणं आहेतच. "सध्या लहान मुलांचे खोकले लगेच बरे होत नाहीत/पुन्हा पुन्हा होत राहतात" यामागे हे प्रमुख कारण आहे. मात्र हा महत्त्वाचा मुद्दा कधीही न हाताळता काही ठराविक लोकं केवळ दिवाळीच्या पाच दिवसांत उडणाऱ्या फटाक्यांवरच बोलत/लिहीत राहतात हे विशेष आहे!
इंडियन जर्नल ऑफ कॅन्सरने केलेल्या अभ्यासानुसार सध्या भारतात आढळणाऱ्या फुफ्फुस कर्करोग रुग्णांत ५२% रुग्ण हे नॉन स्मोकर म्हणजे धूम्रपान न करणारे आहेत! हा आकडा धक्कादायक आहे. भारतात वाढणारं वायु प्रदूषण हे यामागचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
येणाऱ्या काळात आयुर्वेदाने सांगितलेले "वय:स्थापन गण" आणि "रसायन" ही बाह्यत: निरोगी भासणाऱ्या सगळ्यांनीच उपयोगात आणण्याचा विषय असणार आहेत.
विषय ऐरणीवर येण्यासाठी ब्रायन जॉन्सन हा फक्त निमित्तमात्र आहे. मुद्दा बराच गंभीर आहे!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
😢
🙏
❤️
👆
😊
😱
68