Current Affairs by Pratik Babar Sir
Current Affairs by Pratik Babar Sir
February 14, 2025 at 05:08 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांची आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून, विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली असून, ते संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केला 'इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट' (व्यापार मार्ग) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट (व्यापारी मार्ग) देखील जाहीर केला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश या व्यापार मार्गाच्या निर्मितीसाठी काम करत आहेत. हा मार्ग भारतात सुरू होऊन नंतर इस्रायल, इटली आणि अमेरिकेपर्यंत येईल. याकडे चीनच्या रोड अँड बेल्ट प्रोजेक्टला आव्हान म्हणून पाहिले जात असल्याने या घोषणेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एफ-३५ जेट्स आणि लष्करी सामग्री डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-३५ लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणाही केली आहे. 'या वर्षापासून, आम्ही भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी सामग्री विक्री करणार आहोत. आम्ही भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्याचा मार्गही मोकळा करत आहोत,' असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेत राहणारे भारतीय खूप महत्वाचे ट्रम्प आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्याबाबत एक मोठी घोषणाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'लवकरच बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये दोन दूतावास सुरू होणार आहेत. या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील.' अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत यावरही पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांनी २०३० पर्यंत त्यांचा द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. या व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत.' अमेरिकेकडून तेल आणि गॅसचा पुरवठा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान, तेल आणि गॅस खरेदीबाबत एक मोठा करार झाला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि गॅस पुरवठादार बनणार आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वाढणार आहे.'

Comments