
Dr. Pareexit Shevde
February 20, 2025 at 03:19 AM
#महत्त्वाचे
नियमित नामस्मरण करताय? या दहा गोष्टी कटाक्षाने टाळा!
पद्म पुराणात दहा 'नाम अपराध' वर्णन केले आहेत. नामस्मरण करणाऱ्यांनी आपल्याकडून ते घडू नयेत म्हणून सजग असणं आवश्यक आहे.
१. सन्निन्दा
इतर भगवद्भक्तांची किंवा सज्जनांची निंदा करणे.
२. असति नामवैभवकथा
ज्यांना भक्तिभाव / श्रद्धा नाही. किंवा जे नास्तिक आहेत त्यांच्यासमोर नामस्मरणाचे गुणगान करणे.
३. श्रीशेशयोर्भेदधी:
शिव आणि विष्णू हे भिन्न आहेत असे मानणे.
उभयो: प्रकृतिस्त्वेका प्रत्ययभेदेन भिन्नवद्भाति।
कलयति कश्चिन्मूढो हरिहरभेदं विना शास्त्रम्॥
हरि आणि हर यांची प्रकृती एकच असून प्रत्ययभेदाने ते भिन्न भासतात. ही सत्यस्थिती न जाणणारे मूर्ख मात्र हरि हर भेद करत राहतात.
४. ५. ६. अश्रद्धा श्रुतिशास्त्रदैशिकगिराम्
श्रुति म्हणजेच वेद, शास्त्र म्हणजेच अन्य सर्व धर्मग्रंथ आणि गुरु यांच्या वचनांचा अनादर करणे.
७. नाम्र्यर्थवादभ्रम:
म्हणजे नामस्मरणाबाबत फारच वाढून चढवून सांगितले जाते आणि प्रत्यक्षात इतक्या सोप्या गोष्टीने कसा काय लाभ होईल? अशी शंका घेणे.
८. ९. नामास्तीति निषिद्धवृत्तिविहितत्यागौ
एकीकडे नामस्मरण करत दुसरीकडे पापकर्म करत राहणे किंवा नामस्मरण केल्यानेच सारे काही होईल अशा मानसिकतेत जाऊन विहित कर्मांचा त्याग करणे.
१०. धर्मान्तरै: साम्यम्
"नामस्मरण करा वा करू नका; आपलं कर्म नीट करत रहा. तेही पुरेसं आहे." अशी धारणा ठेवत नामाच्या महतीला नाकारणे.
गुरू उपदेश किंवा कुल उपासना किंवा व्यक्तिगत प्राक्तन यांनुसार जे कोणतंही नाम नित्यनेमाने घेत असाल; त्यात वरील गोष्टी टाळल्या जाणं आवश्यक आहे. शक्य झाल्यास एकेका मुद्द्यावर थोडं अधिक विस्ताराने लिहीन. तूर्त इतकंच!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏
❤️
👍
💯
🚩
🪔
110