
Dr. Pareexit Shevde
February 23, 2025 at 03:40 AM
#वैद्यराज
"आईला लिव्हरसाठी तुम्ही जी औषधं देत आहात त्याने लिव्हरला इजा वगैरे तर नाही ना होणार वैद्यराज?" अजितने काळजीच्या स्वरात विचारलं.
"आईंचा डायग्नोसिस काय केलंय हे ठाऊक आहे ना तुला अजित?" वैद्यराजांनी नेहमीचं स्मितहास्य करत प्रश्न विचारला.
"हो. सिरॉसिस म्हणून सांगितलं आहे डॉक्टरांनी. त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. पण एकदम असं का विचारलंत?" अजित म्हणाला.
"सिरॉसिस होण्याचं कारण काय सांगितलं मग तुला त्यांनी?" वैद्यराजांचा पुढचा प्रश्न आला.
"असं काही स्पेसिफिक सांगता नाही येणार म्हणाले ते. अनेक कारणं असू शकतात असं म्हणत होते."
"अच्छा. मला सांग. आई पेनकिलर गोळ्या खायच्या का रे?" वैद्यराजांनी आणखी एक प्रश्न पुढे विचारला.
"हा. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं. पण ती अधूनमधून डोकं दुखतं म्हणून खात असायची पेनकिलर. पण त्याचं काय मध्येच?" अजित गोंधळला होता.
"अरे आईंच्या केसपेपरवर DILI म्हणजेच drug induced liver injury असं स्पष्ट लिहिलंय! युरोपियन जर्नल ऑफ इंटरनल मेडिसननुसार औषधांनी होणाऱ्या यकृत इजांपैकी ३५% NSAID म्हणजे सोप्या शब्दांत पेनकिलरमुळे दुष्परिणाम म्हणून होतात, अँटीबायोटिक्स मुळे २०%, इम्युनिटी कमी करणाऱ्या औषधांमुळे ९% तर डायबेटिस वरच्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून ४% यकृत इजा दिसतात. २०% यकृत इजा या मिश्र कारणांनी होतात; असा आकडा आहे. यात पारंपरिक औषधं पण आली हा. पण यातल्या बहुतेक केसेस मध्ये पेशंटने स्वतःच्या मनाने आणि वाईट दर्जाची औषधं घेतली असल्याचं दिसून येतं. त्यातही यातला आयुर्वेदाचा आकडा डोक्यावरून पाणी १०% समज. पण आपली मानसिक गुलामगिरी बघ हं; आपण ज्यांच्यामुळे ९०% यकृत इजा होतात - त्यांना एका शब्दानेही तू विचारलेला प्रश्न विचारत नाही. आम्हा १०% वाल्यांवरच काय ते जुलूम तुमचे. आणि तेही ९०% वाले तुमच्या डोक्यात पिल्लू सोडणार म्हणून. हो ना? "
वैद्यराजांनी आधी विषय स्पष्ट करून नंतर नेहमीच्या मिश्किलपणे आपला मुद्दा संपवला.
"बापरे.....खरंच यातलं काही माहिती नव्हतं हो वैद्यराज. आणि तुम्ही म्हणता तेही खरंय. माझा मावसभाऊ डॉक्टर आहे. त्यानेच हा प्रश्न विचारायला सांगितला होता. तुम्ही प्लीज राग मानून घेऊ नका." अजित अगदीच नरमला होता.
"अरे राग काय त्यात? सवय आहे आम्हाला याची. आणि तुला आईबद्दल काळजी असल्यानेच तू विचारलं असणार याची खात्रीही आहे." वैद्यराजांनी हसत हसत अजितला निरोप दिला.
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
🙏
❤️
😮
👌
80