SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 16, 2025 at 02:11 AM
#वाचनवेडा #कादंबरी #सूर्याची_सावली सूर्याची सावली ही प्रतिभावान लेखणी लाभलेले लेखक नितीन थोरात लिखित बहुचर्चित आणि समाजमाध्यमांवर सतत फिरणारी कादंबरी आहे. ती जेव्हा माझ्या हातात पडली तेव्हा एकादमात वाचून काढली. ग्रामीण जीवनाशी निगडीत असणारे कथानक मनाला चटका लाऊन जाते. बायकोवर प्रचंड प्रेम असणारा नवरा पाहिल्यावर उच्च विद्याविभूषित नवऱ्याच्या संकुचित विचारांची कीव येते. आपली बायको आणि मुलगा सांभाळणे आपले इतिकर्तव्य समजून तो स्वतःला कष्टाच्या खाईत लोटून देतो. पूर्णपणे भणंग कफल्लक झाल्यावर सुद्धा स्वाभिमान हे अंगभूत मूल्य सोडत नाही. त्याच्या पाठीला पाठ देत जिद्दीने आहे त्या परिस्थितीत राहणारी त्याची बायको मला आदर्श वाटते. कादंबरी मध्ये दुःख, भय, करुणा, प्रेम, माया यासारख्या कित्तेक भावनांचा संमिश्र कल्लोळ आढळतो.भारतासारख्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या अन साऱ्या जगावर राज्य करण्याची ताकत असणाऱ्या आमच्या देशात अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक आहेत हे वाचून आश्चर्य वाटते. कित्तेक दिवसांनी मनाला भुरळ घालणारी कमालीची ताकद असणारी, वाचकाला हेलकावुन सोडणारी कादंबरी वाचली. मनाला अप्रूप असे समाधान मिळाले होते. कादंबरीचा अंत वाचून मनाला चागलाच हादरा बसला होता. अती तिथे माती चा यथोचित प्रत्यय आला. पेराल तसेच उगवते. तुम्ही जर अंधश्रद्धेची काटेरी बिया पेरल्या तर तुमच्या येणाऱ्या पिढीला वैज्ञानिक दृष्टी आणि वैद्यकीय पेशा ची मधुर फळे कशी चाखायला मिळतील? पण तरीही मुलाच्या प्रेमाखातर, वाईट परिस्थिती समोर नतमस्तक झाल्यावर नकळत निवडला गेलेला चुकीचा मार्ग मुलाच्या प्रारब्धाची राखरांगोळी करतो हे वाचून गलबलायला होत.एकंदरीत कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. लेखक नितीन थोरात यांनी ही कादंबरी लिहून मराठी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शब्दांकन - भाग्यश्री शेळके -घोडके छ.संभाजी नगर

Comments