Yuti's Hub Library
February 20, 2025 at 08:53 AM
!!! राजा चंद्रहास !!!
भाग - ३२.
गालवमुनी म्हणाले, महाराजांनी एक निर्णय घेतला... राजकन्या चंपक मालतीचा विवाह राजा चंद्रहास बरोबर करण्यात यावा. मदनला मनातून समाधान वाटले. तो म्हणाला, महाराजांचा निर्णय स्तुत्य आहे.
महाराज म्हणाले, आणखी एक.. कुंतलपूरचं राज्य देखील चंद्रहासला दिले जाईल. आणि मी राणीसह वानप्रस्थाश्रम स्वीकारत आहे. मदन म्हणाला, महाराज आपला निर्णय ऐकून मला फार आनंद झाला.
महाराज पुढे म्हणाले, हा निर्णय ऐकण्यासाठी मुद्दाम विषयाच्या भावनेचा विचार करून, तिला इथे बोलावून घेतले. तिनेही आपले स्पष्ट मत सांगावं. म्हणजे पुढे कोणताही प्रश्न उद्भवू नये. पडद्याआडूनच विषया चटकन म्हणाली, महाराज, आपल्या निर्णयाचा मी मनापासून स्वागत करीत आहे. मालती माझी लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण आहे. आमचे दोघींची एकमेकींवर जीवापाड प्रेम आहे. आम्ही जरी सवती झालो तरी बहिणी म्हणूनच राहू.
राज ज्योतिषी पंचाग पाहत होते. ते मध्येच म्हणाले, महाराज, आज अमृतसिध्दी योग आहे. आजचा गोरोज मुहूर्त उत्तम आहे. या गोरज मुहूर्तावर राजकन्येचा विवाह संपन्न व्हावा आणि एका घटीका नंतर अमृत सिद्धी योग आहे, त्या योगावर आपण राजदान करावे.
राजजोतिष्याचे बोलणे ऐकल्याबरोबर, महाराजांनी मदनला लगेच आज्ञा केली. मदन, त्वरित वाड्याकडे जाऊन, चंद्रहासला इकडे घेऊन ये. आताच विवाह उरकायचा असल्यामुळे, वेळ अजिबात नाही.
लगेच मदन निघाला. वाड्याकडे जाताना त्याला खूप समाधान, हलके हलके वाटत होतं. मनावरचं मळभ दूर झाले होते.
कारण कुंतलपूरचा राजा चंद्रहास झाल्यावर, सारे सूत्र त्याच्या हाती येतील. त्याचे प्रशासन सुरू होताच, बाबांचं वर्चस्व पुष्कळसे कमी होईल. त्यांचा सत्ता लोभ, राक्षसी महत्वाकांक्षा, द्रव्याची अतोनात ओढ हे सर्व आपोआपच दूर होतील. चंद्रहास सत्ताधीश होताच बाबांचं काही चालणार नाही. चंद्रहास त्यांना चांगला ओळखून आहे. त्यामुळे मदनला अतिशय आनंद झाला.
गोरज मुहूर्त टळू नये म्हणून मदन तातडीने वाड्याकडे जात होता. तोच समोरून पूजेचे तबक हाती घेऊन घाईघाईने चंद्रहास येताना दिसला. त्याला पाहताच चंद्रहास त्याला म्हणाला, मदन, मला या कुळाचाराची आधी कल्पना का दिली नाहीस? आश्चर्याने मदाने विचारले, कसला कुळाचार? प्रधानजी म्हणाले, लग्ना अगोदर चंडीकेची पूजा करायची असते ती राहून गेली. म्हणून ते खूप हळहळत होते. तेव्हा नाहीतर आता तरी कर, असे म्हणून, त्यांच्या आज्ञाने हे पूजेचे ताट घेऊन मी निघालो आहे.
अरे चंद्रहास, तू काय बोलतोस? मला काहीच कळेनासे झाले. अरेऽ, कसली पूजा? आणि कसलं काय? तुला महाराजांनी ताबडतोब राजवाड्यावर बोलावलं आहे. कार्य अति महत्त्वाचे आहे. चल लवकर. नाही मदन. प्रधानजी नाहक रागावतील.
अरे चंद्रहास, महाराजांचं काम तुझ्या वाचून अडलेलं आहे. शिवाय राजाज्ञा आहे हेही विसरू नकोस. कुळाचार नंतरही करता येईल.
नाही मदन! मी ताबडतोब पूजा करुन राजवाड्यावर येतो. तू तसे महाराजांना कळव. त्याचा निर्धार पाहून मदन म्हणाला, बरं, मग असं कर, ते पूजेचे ताट माझ्याकडे दे. मी चंडीकेची पूजा करायला जातो. तू जा राजवाड्याकडे जा. मदन ने त्याच्या हातून पूजेचे तबक घेऊन तो चंडीके कडे निघाला. आणि चंद्रास राजवाड्याकडे. देऊळ नगरापासून बरेच दूर होते. रस्त्याने मदन विचार करुं लागला, हा बाबांचा नक्कीच चंद्रहासला संपवण्याचा काही तरी कुटील डाव असावा. म्हणजे माझी आहूती देण्याची वेळ आली तर?
वर्षातून एकदाच चंडिकेच्या देवळात यात्रोत्सव होत असे. एरवी कोणी तिकडे फिरकत नसे. एव्हांना अंधार होऊ लागला. त्वरेने मदन जाऊ लागला. त्याच्या मनात राहून राहून प्रश्न येत होता पूजेसाठी दिवसाची वेळ सोडून हीच वेळ का निवडली असावी? पिताजींचा काही दुष्ट तर हेतून असेल ना? या अंधारात चंद्रहासला पाठवण्याचे काय प्रयोजन असेल? की काही त्यांची कपटनीती असेल? मदनचे मन साशंकित झाले. त्याने विचार केला, जे काही असेल ते समोर येईलच.
तो देवळात पोहोचला तेव्हा चहबाजूने अंधार दाटून आला होता. त्याने देवळाच्या दारातून प्रवेश केला तोच पूजेचे ताट असलेल्या हातावर जोऱ्याने शस्त्राचा प्रहार झाला. तो असह्य वेदनेने कळवळू
न खाली कोसळला. तोच दुसरा प्रहार त्याच्या वक्षस्थळावर झाला. तो वेदनेने कळवळून ओरडला... आईऽऽ गऽऽ!
https://www.shrutimundada.com/2021/08/10-effective-ways-to-relieve-stress.html
कोण मदनबाबु? मारेकऱ्यांना अतिशय दुःख झाले. म्हणाले, धिःक्कार...धिःक्कार असो या राजनीतीचा, या राजकारणाचा! स्वपुत्राचा वध घडवून आणताना जो द्रवला नाही ते कसलं पितृह्रदय? केवढी ही निर्दयता? ही तर पशुलाही लाजवेल अशी क्रूरता..
मारेकऱ्यांनो! शांत व्हा.. माझा मृत्यू हेतू पूर्वक होत आहे. मी स्वतःहून स्वीकारला आहे. माझी अंतिम इच्छा समजून, एक काम करा.. मी सांगतो तो निरोप माझ्या सद्हृदयांना कळवा....
क्रमशः
संकलन व लेखन
मिनाक्षी देशमुख.
👍
❤️
4