Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
February 21, 2025 at 03:49 AM
*उगवतीचे रंग* *निवडक पण दर्जेदार गीते देणारा संगीतकार : खय्याम* ( सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील हा खास लेख माझ्या ' *अष्टदीप* 'या पुस्तकातून ) चित्रपटगीतांचे दर्दी असणाऱ्या रसिकांना खय्याम हे नाव निश्चितपणे परिचित असणार. खय्याम यांची गीतं म्हणजे बावनकशी सोनं. हिणकस कुठेही आढळणार नाही. लतादीदींची संगीत कारकीर्द म्हणजे आकाशाचा एक विस्तीर्ण पट म्हटला तर निरनिराळ्या संगीतकारांची लखलखती नक्षत्रे आपल्याला या आकाशात चमकताना दिसतील. या नक्षत्रांमध्ये आपल्या तेजाने लक्ष वेधून घेणारे एक नक्षत्र म्हणजे संगीतकार खय्याम. लतादीदींना एका मुलाखतीमध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी विचारले की तुम्ही आजपर्यंत हजारो गाणी गायलीत. या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्हाला सर्वात जवळचं वाटणारं गाणं कोणतं ? दीदी म्हणाल्या, ' तशी तर मला खूप गाणी आवडतात. पण मी जेव्हा एकटी असते किंवा प्रवासात असते तेव्हा ' रझिया सुलतान ' मधलं ' ऐ दिले नादान...' हे गाणं गुणगुणायला मला खूप आवडतं. ' दीदींचं हे उत्तर ऐकून जावेद अख्तर खुश झाले कारण या गाण्याचे गीतकार होते जावेद अख्तर यांचे वडील जां निसार अख्तर आणि संगीतकार होते खय्याम. खय्याम म्हटलं की चित्रपट रसिकांसमोर त्यांचे नुरी, त्रिशूल, बाजार असे अनेक संगीतमय चित्रपट डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागतात. पण प्रामुख्याने डोळ्यापुढे येतात ते म्हणजे ' कभी कभी ' आणि ' उमराव जान. ' या दोन्ही चित्रपटातील गाणी म्हणजे खय्याम यांचे मास्टरपीस. लता मंगेशकर आणि आशा भोसले या खैय्याम यांच्या अतिशय आवडत्या गायिका. एका ठिकाणी त्यांच्याबद्दल खैय्याम म्हणतात,' या दोन्ही बहिणींबद्दल काय बोलावं ? एक संगीताची पट्टराणी तर दुसरी संगीताची महाराणी. ' काही वर्षांपूर्वी खय्याम यांना पं हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ' जगभरात खय्याम यांच्या नावाचा जो डंका वाजतो, ते नाव मोठे होण्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन नावांचा मोठा वाटा आहे. लता मंगेशकर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण मी त्यांना ' माँ ' म्हणूनच हाक मारतो. देवानेच त्यांना मोठी पदवी देऊन पाठवले आहे. ' लतादीदींबद्दल यापेक्षा सुंदर आणि उदात्त उद्गार कोणते असू शकतील ! खय्याम यांची चित्रपट संगीताची कारकीर्द तशी साठ वर्षांची. पण एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या माणसाने अवघे ५३/५४ चित्रपट केले असतील. त्यांनी आपल्या संगीताच्या दर्जाशी कधीही तडजोड केली नाही. जे द्यायचे ते सर्वोत्तमच द्यायचे हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे या महान संगीतकाराच्या आयुष्यात काही काळ असा आला की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी. त्यांच्या पत्नी म्हणजे प्रसिद्ध गायिका जगजीत कौर. जगजीत कौर या अत्यंत श्रीमंत अशा पंजाबी कुटुंबातून आलेल्या. त्यांच्या आणि खय्याम यांच्या संगीताच्या कार्यक्रमामुळे भेटी झाल्या. दोघांचे सूर जुळले आणि दोघे एकमेकांचे जीवनसाथी बनले. त्यांच्या विवाहाच्या आड त्यांचा धर्म, पैसा काही काही येऊ शकले नाही. जगजीत कौर आणि खय्याम म्हणजे जणू ' मेड फॉर इच ऑदर ' दोघांनी एकमेकांना सांभाळले, एकमेकांची प्रतिष्ठा जपली. २०१३ मध्ये खैय्याम यांच्या प्रदीप या मुलाचे अत्यंत दुःखद आणि अकाली निधन झाले. तो काळ या दोघांसाठी अतिशय वेदनादायी होता. पण जगजीत कौर यांनी प्रत्येक परिस्थितीत खैय्याम यांची साथ दिली. जगजीत कौर यांनी ' तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे देदो ' हे ' शगुन ' चित्रपटातलं गाणं जणू खय्याम यांच्यासाठीच गायलं असं त्यांचं खैय्याम यांच्या प्रति असलेलं समर्पण आणि निष्ठा पाहून म्हणावसं वाटतं. मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी हे पूर्ण नाव असलेल्या खैय्याम यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी पंजाबातल्या नवांशहर जिल्ह्यात झाला. इतर बऱ्याचशा कलंदर संगीतकारांप्रमाणे खैय्याम यांचेही शिक्षणात मन लागत नव्हते. चित्रपट पाहण्यासाठी ते घरातून पळून जात. आपणही चित्रपट अभिनेता व्हावे ही त्यांच्या मनातली सुप्त इच्छा होती. त्यांच्या घरच्यांचे आणि त्यांचे या गोष्टीवर कधीच एकमत झाले नाही. खैय्याम यांचे एक काका तेव्हा दिल्लीत राहत होते. खैय्याम यांनी घरून पळ काढला तो थेट आपल्या काकांकडे ते गेले. काका अतिशय चांगले होते. त्यांनी खय्याम यांची समजूत घालून त्यांना शाळेत घातले. त्यावेळी ते फार तर दहा वर्षांचे असतील. खैय्याम यांनी कसंबसं आपलं पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. काकांनी त्यांची गाण्याची आवड ओळखली आणि त्यांना संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्रख्यात संगीतकार हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे मोठे बंधू पं अमरनाथ यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. पुढे प्रख्यात पाकिस्तानी गायक आणि संगीतकार बाबा चिश्ती यांच्याकडेही संगीताचे धडे त्यांनी गिरवले. https://www.shrutimundada.com/2025/02/21-february-international-mother.html संगीताची मुळातच आवड असणाऱ्या खय्याम यांचा शास्त्रीय संगीताचा पाया आता मजबूत झाला होता. पण त्यांना काम मिळत नव्हते. तो काळ दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीचा होता. खैय्याम यांनी त्या काळात सैन्यात भरती होऊन तीन वर्षे सेवा दिली. पण सैन्यातल्या बंदुका, तोफा हाताळण्यापेक्षा निरनिराळी वाद्ये हाताळण्याची ओढ खैय्याम यांना स्वस्थ बसू देत नव्हती. १९४६ मध्ये ते मुंबईत आले. ज्यांनी सुरुवातीला त्यांना संगीत शिकवलं अशा हुस्नलाल भगतराम या संगीतकार बंधूंना भेटले. त्यांच्या ओळखीने त्यांना जोहराबाई अंबालीवाला यांच्यासोबत युगलगीत गाण्याची संधी मिळाली. काही काळ त्यांनी अजीज खान आणि हुस्नलाल भगतराम यांचे संगीत सहाय्यक म्हणून काम केले. पुढे त्यांना ' हीर रांझा ' या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांच्यासोबत रेहमान या नावाचे आणखी एक संगीतकार होते. या दोघांनी ' शर्माजी आणि वर्माजी ' या नावाने जवळपास पाच चित्रपटांना संगीत दिले. पुढे शर्माजी-वर्माजी जोडीतील वर्माजी म्हणजे रेहमान पाकिस्तानात निघून गेले. या नंतर झिया सरहद्दीनी त्यांना ' फूटपाथ ' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. झिया सरहद्दीनी सांगितल्यानुसार तेव्हापासून ' खय्याम ' या नावाने संगीतकार म्हणून काम करू लागले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला ' खैय्याम ' नावाचा अद्वितीय संगीतकार मिळाला. नंतर प्रख्यात अभिनेता राज कपूर यांचा ' फिर सुबह होगी ' हा चित्रपट त्यांना मिळाला. त्यांच्या संगीत कारकिर्दीची देखील ती खऱ्या अर्थाने सुबह म्हणजे पहाट ठरली. खय्याम आणि गीतकार साहिर या जोडीने या चित्रपटात अप्रतिम गीते दिली. नंतर आलेल्या ' शोला और शबनम ' या चित्रपटात खय्याम यांनी गीतकार कैफी आजमी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटाची सगळी गाणी हिट ठरली. खैय्याम यांना एकामागून एक चित्रपट मिळत गेले. पण निवडक चित्रपटच त्यांनी घेतले. चित्रपटाचा साहित्यिक दर्जा, मूल्ये इ गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांची गाणी तर हिट होत होती. पण चित्रपट समीक्षकांचा त्यांच्यावर आरोप होता की त्यांचे चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होत नाहीत. त्यांच्या ' कभी कभी ' आणि ' उमराव जान ' या चित्रपटांनी मात्र त्यांना एवढे अभूतपूर्व यश दिले की टीकाकारांची तोंडे आपोआप बंद झाली. या चित्रपटांच्या गाण्यांनी सगळे रेकॉर्ड्स तोडले. ' उमराव जान ' या चित्रपटाला संगीत देताना ते थोडे घाबरले होते. त्याचे कारण म्हणजे त्याच्या काही दिवस आधीच तशीच पार्श्वभूमी असलेला ' पाकिजा ' हा मीनाकुमारी आणि राजकुमार यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील गाणी हिट झाली होती. त्यांना साधारणपणे तशीच गणिकेची पार्श्वभूमी असणाऱ्या ' उमराव जान ' या चित्रपटाला संगीत द्यायचे होते. खय्याम यांनी त्यासाठीच्या तयारीत कोणतीच कसर ठेवली नाही. त्या काळातील लोकजीवन, संगीत आदी सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. ' उमराव जान ' हा चित्रपट ' उमराव जान अदा ' या कादंबरीवर आधारित होता. तिचा अभ्यास केला. त्यांच्या कठोर परिश्रमांना यश आले. ' उमराव जान ' मधील सगळी गाणी ऑल टाइम हिट ठरली. गायिका आशा भोसले यांनी या गाण्यांचे आणि अभिनेत्री रेखा यांनी त्या भूमिकेचे सोने केले. खैय्याम यांनी आपल्या संगीतात राग पहाडी, राग यमन यांचा अत्यंत चपखलपणे वापर केला. त्यांची गाणी जणू जखमेवर हळुवार फुंकर घालणारी ! फुलांच्या ताटव्यावरून येणारी शीतल, सुगंधी हवेची झुळूक ! लतादीदींच्या आवाजातील सौंदर्य खैय्याम यांच्या संगीतात विशेष खुललं. शंकर हुसैन या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील कहीं एक मासूम नाजूक सी लडकी, आप यूं फासलों से गुजरते रहे आणि अपनी आप रातोमे ही तिन्ही गाणी अप्रतिम. ' अपनी आप रातों में ... ' हे गाणं तर आपल्याला एका वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन जातं. या गाण्यांचा उल्लेख उदाहरणादाखल केला आहे. त्यांच्या संगीत निर्देशनात दीदींनी गायलेली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. त्यातील काही पुढे देणारच आहे. खैय्याम यांना आपल्या संगीतातील योगदानासाठी लता मंगेशकर पुरस्कार, नौशाद सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार इ पुरस्कार मिळाले. तीन वेळा ते फिल्म फेअर पुरस्काराचे मानकरी ठरले. २०११ मध्ये ते पदमभूषण पुरस्काराने सन्मानित झाले. खैय्याम हा अतिशय जिंदादिल माणूस होता आणि तशीच त्यांची गाणीही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जवळपास दहा ते बारा कोटींची संपत्ती नवोदित कलाकारांसाठी असलेल्या ट्रस्टला दान केली. १९ ऑगस्ट २०१९ या दिवशी खैय्याम यांचे निधन झाले. पण आपल्या संगीतच्या रूपाने ते अजरामर आहेत. त्यांची गाणी रसिकांच्या ओठांवर कायम राहतील. खैय्याम यांची काही लोकप्रिय गाणी उदाहरणादाखल पुढे देत आहे. बहारों मेरा जीवन भी संवारो... ( आखरी खत ), कभी कभी मेरे दिल मे ( कभी कभी ), आजा रे मेरे दिलबर आजा ( नुरी ), करोगे याद तो ( बाजार ), दिखाई दिये यु ( बाजार ), फिर छिडी रात ( बाजार ), ना जाने क्या हुआ ( दर्द ), मोहोब्बत बडे काम की चीज है ( त्रिशूल ), जाने मन तुम कमाल करती हो ( त्रिशूल ), सिमटी हुई ये घडिया ( चंबल की कसम ), जलता हैं बदन ( रजिया सुलतान ), हजार राहे ( थोडी सी बेवफाई ), तेरे चेहरे से नजर नही हटती ( कभी कभी ) © *विश्वास देशपांडे, चाळीसगाव* *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* ( *कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा* )
👍 🎉 4

Comments