Yuti's Hub Library
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 21, 2025 at 06:04 AM
                               
                            
                        
                            !!!  राजा चंद्रहास !!!
                  भाग - ३४.
               दुष्टबुद्धी अस्वस्थ मनःस्थितीत असतानाच, राजवाड्यावरून वाद्य वाजत असल्याचा आवाज आला. 
https://www.shrutimundada.com/2025/02/21-february-international-mother.html
तुतारी, सनई, ढोल इत्यादी वाद्य वाजत होती.  दीप रोषणाईने सारा परिसर उजाळून निघाला होता. ही कशासाठी वाद्य वाजत आहे? कसला उत्सव साजरा होत आहे? त्याची उत्सुकता ताणल्या जात होती. रात्रीचा पहिला प्रहार संपत आला होता.
      शेवटी कशाची मिरवणूक निघाली म्हणून,पाहण्या साठी तो सौंधावर गेला. मिरवणूक हळूहळू राज रस्त्यावरून जात होती. एका भव्य शृंगारलेल्या हत्तीवर अंबारी होती. तिच्यात कोणीतरी बसले होते. अंबारीवर छत्र, चामरे ढाळले जात होते. फुलांचा वर्षाव होत होता.
        दुष्टबुद्धीला काहीच समजत नव्हते. ही कोणाची मिरवणूक? रात्रीच्या वेळी का निघाली असेल? मदन अजून का आला नाही? त्याने तरी दूत पाठवून मला कल्पना द्यायला नको का? नेमकं हे काय चाललं? मला अज्ञात ठेवून हा राजा कसला उत्सव साजरा करीत आहे? त्याचे धाडस झाले तरी कसे ?आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. विषयाचा विवाह गुप्परितीने पार पडला म्हणून तर हे घडत नसेल?
      मिरवणूक जवळ आली तसा, दुष्टबुद्धी सौधाहून घाईने उतरुन खाली आला. गर्दीतून वाट काढत, तो थेट हत्तीने जवळ गेला. अंबारीतील व्यक्तीला पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आत वधू- वर होते. चंद्रहास आणि चंपक मालती. त्याला गरगरल्यासारखे झाले. भोवळ येऊन पडतो की काय असे झाले. म्हणजे? कुंतलेश्वराने माझ्यावर सूड उगवला होता तर? माझ्या नाकावर टिच्चून आपली कन्या चंपक मालती माझा शत्रू, चंद्रहसला दिली. माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. आजपर्यंत केलेले सगळे डावपेच, योजनांचा बोजवारा उडाला.
        पण मदन कुठे आहे? दिसत नाही. का त्यालाही राजाने कटात सामील करून घेतले? चंद्रहासला तर चंडीकेच्या देवळाकडे पाठवलं होतं. मग हा इथे कसा? का मारेकरू फितूर झाले? की यानेच त्यांना ठार केले ? शेवटी चंद्रहासलाच विचारावे..
       चंद्रहास तूं चंडिका पूजनास गेला होता ना? होय! पण अर्ध्या वाटेवर मदन भेटला. तो म्हणाला, तुला महाराजांनी राजवाड्यावर तात्काळ बोलावले. त्वरित जा. मी त्याला पूजेसबंधी म्हटल्यावर, तो म्हणाला, राजाज्ञा सर्वात महत्त्वाची. ती पाळलीच पाहिजे. तुला कुलाचार, पूजेबद्दल एवढेच वाटत असेल तर, दे ते पूजेचे ताट माझ्याकडे. मीच पूजा करून येतो. असं म्हणून माझं काहीही न ऐकता तो चंडिका देवळाकडे निघून गेला .
     चंद्रहासच्या तोंडून हकीकत ऐकून, दुष्टबुद्धीचा भयाने थरकाप झाला. त्याचे मस्तक गरगरू लागले. अरेरेऽ, माझ्या प्रिय मदनचं काय झालं असेल? कोणाचा काहीही विचार न करता, दुष्टबुध्दी चंडिका देवळाकडे धावत निघाला. पिसाटासारखा धावत होता. मनात एकच चिंता, मदनचे काय झाले असेल? अंधूक आशा वाटत होती, मारेकर्यांनी मदनला ओळखून जिवंत सोडले असेल.... अनेक कुशंकांनी मन भयभीत झाले होते.
       शेवटी ठेचकाळात धडपडत मंदिरात प्रवेश केला. तर त्याला दिसले, मदन रक्ताच्या थारोळ्यात छिन्नभिन्न होऊन पडला होता. त्याचे प्राण कधीच गेले होते. ते दृश्य पाहून दृष्टबुद्धीला चक्कर आली. कोसळून खाली पडला. तो मुर्च्छित झाला. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर, तेच दृश्य पाहून, दुःखारितिकाने टाहोऽ फोडला. मदनऽऽ! मदनऽऽ..हुंदक्यावर हुंदके देत आक्रोशाने म्हणत होता... माझ्या कुलदीपकाऽऽ उठ... उठनारेऽऽ... माझ्या पाडसाऽऽ... अरेऽऽ, एक वेळ तरी बोल रेऽऽ माझ्याशी ...अरे किती स्वप्न पाहिले? किती चक्रव्यूह रचले?किती प्रतारणा केल्या. अरेऽ, केवळ तुझ्यासाठीच रेऽऽ!
                अखेर माझ्या हाती काय पडलं? राज्य मिळावं, संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून, कृरकर्मी बनून,  नीती, धर्म, मर्यादा पायदळी तुडवल्या ....तोच मी   दृष्टबुद्धी! तोच मी प्रधान! माझ्या वंशदिपाऽ, ज्यानं आजपर्यंत जगाची फसवणूक केली, आज तोच त्याच्याच फसवणीचा शिकार झालाय! त्याच्या नजरेसमोर त्याने आतापर्यंत केलेल्या कृष्ण कृत्ये फेर धरून नाचू लागले. त्यालाच पश्चाताप होऊ लागला. म्हणाला, मदन, तुझ्या मृत्यूने मला खरा अर्थ समजला. तुझ्या त्यागमय मृत्यूने मी भारावून गेलो. मानवता वादाची उंची गाठणाऱ्या तू महात्मा ठरलास. दोन्ही राज्यांमधील सत्ता संघर्ष मिटावा म्हणून, तू हे बलिदान स्वतः स्वीकारलेस.
          मदन, जीवन भोगात नसून त्यागात, समर्पणात आहे हे तू मला दाखवून दिलेस. तुझी हीच प्रेरणा घेऊन मीही तुझ्या पाठोपाठ येत आहे....      अरेऽऽ, चंद्रहास तू धन्य आहेस. अरे, कुठून मिळवलीस एवढी प्रज्ञाशरणता? तुझी ती न्यायसंमत राजनीती, धर्मनिती, विवेकशीलता, प्रजाधर्म? अरेऽ, तू खऱ्या अर्थाने पूजा बांधलीस. तू महामुनी आहेस. तुला नष्ट करण्यासाठी कपटकारस्थान करून, घातपाताचे शूद्र प्रयोग करीत राहिलो. पण तुझ्यात कधी सूड घेण्याची वृत्ती आली नाही की, तुझा संयम ढळला नाही. तूं खरा धिरोदत्त, धिरोत्तम आहेस. सुखाने राज्य कर!
         क्रमशः
संकलन व लेखन
मिनाक्षी देशमुख.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1