
Yuti's Hub Library
February 21, 2025 at 12:10 PM
#गुण_की_अवगुण... शब्दाचा खेळ
https://www.shrutimundada.com/2025/02/21-february-international-mother.html
माझा नवरा एका मित्राला रवीला भेटून आला की नेहमी थोडा त्याच्या प्रभावाखाली येतो . नकळत आपल्या मुलांची तुलना त्याच्या मुलाशी करतो .. त्यांची मुलं किती छान आणि आपलं कार्ट किती वाया गेलेलं असच त्यांच्या बोलण्यातून जाणवत... आणि आपल्या मुलांना कुणी वाईट म्हटलं की आपल्याला फार वाईट वाटते.. मग तो मुलाचा बाप का असेना.... 🤣
कदाचित मनात बायकोशी पण तुलना होतं असावी.. पण माझ्या समोर बोलण्याची हिम्मत नाही 😂😂
रवीच्या तोंडून बायकोची स्तुती पण मी बरेचदा ऐकली.... सगळे काम कशी घरी करते.. कशी सुंदर देवपूजा करते... मी ऐकून घेते... कारण आपली परिस्थिती असताना उगीच पैसे वाचवावे म्हणून घरकाम स्वतः करणे मला पटत नाही... देवपूजा म्हणाल तर हात जोडले की झाले.... मानवसेवा ही ईश्वरसेवा या विचाराची मी... उगीच तासंतास पूजा करावी इतका वेळही नाही आणि आवडही.... माझ्या नवऱ्याने जर मला पूजेबद्दल तुलना केली तर मी म्हणते मी किती छान लिहिते... कधी स्वतः स्वतःची स्तुती करावी 🤣🤣
मला माझ्या नवऱ्याने रवीकडे चल म्हटलं तर मी नेहमी नकार देते... नेहमी स्वतः च्या मुलांची, बायकोची स्तुती ऐकून माझे कान किटतात.... बर बायकोही तशीच... त्यांच्या गोष्टी ऐकून वाटत जगातील एकमेव आदर्श कुंटुब हेच असावे.....
काल असेच माझे पती रवीच्या घरून आले... आणि मुलीवर चिडचिड करू लागले... मला त्याच्यावर मित्राचा प्रभाव जाणवला...
मी त्यांना म्हटलं.. अहो सगळ्यांची मुलं थोडीफार सारखीच असतात.कशाला आपण कुणाच्या मुलाशी का तुलना करायची.. आता मी तुम्हांला सांगते ते नीट ऐका. मी पण रवीकडे नेहमी यायची आधी... नेहमी त्याची बायको ज्या गोष्टी सांगायची त्यावरून मी सांगते....
त्यांची छोटी मुलगी वस्तू इकडे तिकडे टाकते.... पण त्यांची बायको कौतुकाने आणि लाडीकपणे सांगायची. अग, माझी छोटी ना इतकी वेंधळी आहे ना... एक वस्तू जाग्यावर ठेवेल तर शपथ.... काय कराव या मुलीचं.... ती इतकं छान सांगायची की ती अवगुण सांगते की गुण मला कन्फयुज व्हायचं....
आणि तुम्ही... ही पोट्टी (आमच्या नागपूरला राग आला की पोट्टी म्हणतात )एक वस्तू धड ठेवत नाही... एक सवय धड नाही... असं रागाने बोलता की आपली मुलगी म्हणजे अवगुणांचा पुतळा वाटावी .
आणखी दुसरी गोष्ट, ती नेहमी नवऱ्याचं कौतुक करते .... एकदा मला म्हणाली होती... आमचे हे ना आपल्या मतांवर इतके ठाम असतात की देव जरी आला तरी आपलं मत बदलवत नाही... कुणाचाच ऐकत नाही.. त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं बिलकुल चालत नाही... इतकं लाडीकपणे आणि कौतुकाने सांगत होती की दुसऱ्याला हेवा वाटावा....
आता माझी एक दुसरी मैत्रीण आहे.. तिचाही नवरा पण असाच थोडा पक्क्या विचाराचा... तर ती कशी सांगते, काय कराव बाई या माणसाचं. जिथे तीथे आपलंच खरं म्हणतो. एक नंबरचा हेकट आहे....
आता बोला... स्वभाव एकच.. पण एक गुणी ठरतो तर दुसरा अवगुणी....
माझ्या नवऱ्याला माझं म्हणणं पटलं असावं कदाचित.... कारण त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं.
फक्त पदार्थच नाही तर नाती सुद्धा सजवावी लागतात .. एखादा बेचव पदार्थ कागदाच्या प्लेट मध्ये दिला तर कुणी ढुंकून पाहणार नाही पण तोच पदार्थ जर एखाद्या सूंदर प्लेट मध्ये वाढला तर आवडीने खाल्ला जातो.. असच नात्याचंही असते... आपण आपली नाती जशी लोकांसमोर मांडू तशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते...
आपल्या नवरा, बायको, मुलांची स्तुती कुणी परका करणार नाही... आपण जर नावे ठेवली तर लोकही नावे ठेवणारचं...तेव्हा आपल्या नात्याचा मान आपणच राखायाचा असतो...
म्हणून आपणही आपल्या माणसाच्या स्वभावाला सुंदर शब्दाचा साज चढवायचा असतो. (जेव्हा तेव्हा स्तुती करणे टाळा )आपल्या माणसातील अवगुण असतील तर त्याला चार भिंतीत समजावून सांगायला हवं पण बाहेर मात्र त्यांचे अवगुण सांगायचे कटाक्षाने टाळायला हवं आणि कुणाचं ऐकून आपल्या नात्याची तुलना तर अजिबात नको करायला कारण बऱ्याचदा कुणी आपल्या माणसाचं वर्णन कस करतो यावर आपण त्याची प्रतिमा बनवत असतो.. प्रत्यक्षात कदाचित आपली नाती त्यांच्यापेक्षा छान असू शकतात.... प्रत्येक माणूस वेगळा असतो.. प्रत्येकात गुणदोष असतात आणि नातं गुणदोषांसोबत स्वीकारायचं असत...
आपलं कुटुंब हे आपल्यासाठी स्पेशल असत नाही का?
©️अर्चना
👍
❤️
👌
✅
🌺
💐
😂
🫶
27