Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
February 24, 2025 at 08:45 AM
तू म्हणून तर बघ.... ©️®️डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर. "अहो, एक विचारू? " गौरीने तन्मयला, तिच्या नवऱ्याला विचारलं. लॅपटॉपमधली मान अजिबात न वर करता त्याने शुष्कपणे म्हंटलं, " एवढी फॉर्मॅलिटी? विचार ना " गौरी आणि तन्मय, चाळीशीच्या उंबरठ्यावर. आजच त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता. कुठल्याही दांपात्यात असतं, तसंच त्यांचंही वैवाहिक आयुष्य चालू होतं, रटाळ हो! गौरीला वाटायचं तन्मय बदलला. आता त्याच्याकडे वेळ नाही, मी आवडत नाही, इतकं करून त्याला माझी किंमत नाही वैगेरे. तर तन्मयला वाटायचं, ही नुसती मुलांमध्येच बिझी असते, कधी छान तयार होत नाही, सगळा रोमान्सच सम्पलाय वैगेरे. एकमेकांवरचं प्रेम कमी झालंय असं नाही पण मिसिंग आहे काहीतरी ह्याची जाणीव होती. आज आवर्जुन लग्नाचा अल्बम बघताना, गौरीला वाटलं कित्येक वर्षे मनात असलेला हा प्रश्न आज विचारावाच. ती म्हणाली, " आपलं लग्न ठरवायच्या वेळी तुम्ही छान उच्चशिक्षित शिवाय नोकरी चांगली, दिसायलाही राजबिंडे नसलात तरी कुणालाही आवडेल असे पण मी मात्र जेमतेम ग्रॅज्युएट, तेव्हा धड नोकरीही नव्हती, दिसायला तर सावळीच शिवाय घरची परिस्थितीही बेताचीच, मग माझी निवड का केली तुम्ही? मिळाली असती ना एखादी सुंदरा " तन्मयने चक्क लॅपटॉप बंद केला. तो गौरीजवळ आला आणि म्हणाला, " अगं वेडी आहेस का तू? स्वभावाने चांगली आहेस हे माहितच होतं पण तुला कोणी सांगितलं तू छान दिसत नाहीस म्हणून. सुंदरच आहेस तू, मला आवडतेस..... " असं शांतपणे म्हणून तन्मय दुसऱ्या खोलीत निघूनही गेला. इकडे गौरी मात्र मोहरली होती. बेडसमोरच्या आरशात स्वतःकडे बघून तिला आपण मिस इंडिया असल्यासारखं वाटून गुदगुल्या झाल्या. अंगात एक गोड शिर्शीरी आली, आपण सुंदर होतो आणि आहोत, तन्मयला आवडतो हे फिलिंग तिला मनापासून सुखावत होतं. क्षणात तिचं मन पालटलं, तन्मयवर आपण उगीच चिडतो असं तिला वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम करतानाही ती आनंदी होती, सातवे आसमान पर का काय म्हणतात ना तशी! तिच्या बाजूच्या डेस्कवरचा तिचा मित्र, युवराज, युवीच म्हणायचे सगळे त्याला आदळापट करत आला. उशीर तर झालाच होता शिवाय अगदी त्रासलेला दिसत होता. गौरी, युवी आणि युवीची बायको यामिनी हे खरंतर एकाच कॉलेजातील . त्या दोघांचं अरेंज मॅरेज असलं तरी तिघेही तसे एकमेकांचे मित्र. आजपण युवी यामिनीशी भांडून आलाय असं दिसतंय म्हणत गौरी कामाला लागली. युवी मात्र शून्यात हरवून बसला होता. शेवटी गौरीच युवीला म्हणाली, " चल, कॉफी घेऊन येऊ " बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि गरम कॉफी, ऑफिस कँटिनमध्ये सुरु असणारी रफीची जुनी गाणी.... अहाहा! गौरी तर जाम खुश झाली पण युवी मात्र तोंड पाडून बसलेला. त्याच्याकडे पाहून गौरी म्हणाली " युवी, काय रोमँटिक वातावरण आहे ना? " "रोमँटिक? वेड लागायची वेळ आली आहे त्या यामिनीमुळे " युवी बोललाच. " मग मी काय म्हणते, खड्ड्यात गेली यामिनी, आपण दोघं जाऊयात का मस्त डेटवर? नाहीतरी तन्मयला कुठं वेळ आहे? पण म्हणून आपण का नाही मजा करायची? " म्हणत गौरीने चक्क डोळा मारला युवीला. युवी उडालाच! हे गौरी बोलते ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सावरून तो म्हणाला, " गौरी, बरी आहेस ना? मी काय तुला तसा मुलगा वाटलो का? " " तसा म्हणजे कसा? " गौरीने चक्क युवीचा हात धरत त्याला विचारलं. युवीने तिचा हात झटकला, " हे बघ, मी यामिनीशी भांडत असलो तरी माझं तिच्यावर प्रेम आहे. मला आवडते ती. तू नीट रहा हा. बाय मी चाललो " गौरीने युवीचा हात धरून त्याला परत खाली बसवलं. " तेच तर म्हणते ना. जे आता मला बोललास, तेच घरी जाऊन तिला बोल. प्रॉब्लेम सॉल्वड!" गौरी हसत म्हणाली. " इतकं सोपं आहे का? म्हणे प्रॉब्लेम सॉल्वड " तोंड वाकडं करत युवी म्हणाला. " मीच का आणि? तिला नसेल वाटत प्रेम तर? आता काय प्रेमाची कबुली द्यायला आपण वीस वर्षाचे आहोत का? " " हं, कालपर्यंत मलाही असंच वाटत होतं पण नकळत तन्मयने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि माझी नकारात्मकता सकारात्मकतेत बदलली. आता चाळीशीत आपण नोकरीत स्थावरालोय, मुलं खूप लहान नाहीत आणि त्यांच्या करियरचं टेन्शन घ्यावं इतकी मोठी नाहीत. घरातली नातीही एड्जस्ट झालीत. तरी काहीतरी मिसिंग आहे, ते म्हणजे एकमेकांसाठीचा वेळ, प्रेमाची कबुली. कुरबुरी, स्ट्रेस कुणाच्या मागे नसतो? वाढत्या जबाबदाऱ्यांबरोबर एकटं पडत जातो आपण आणि मग मन नकळत तारुण्यातील दिवसांशी तुलना करू लागतं आणि आणखी त्रास होतो. आपली प्रिय व्यक्ती आपली अजुनही प्रिय आहे पण आपण तिला प्रिय नाही असं वाटून मन उगाच बंड करून उठतं. ह्याची परिणीती होते छोट्या मोठ्या भांडणात! अरे, तिचाही फोन आला होता मला. अगदीच उदास वाटत होती. मला माझंच प्रतिबिंब वाटलं ते आणि आम्ही अगदी समदुःखी असल्यासारख्या गप्पा मारल्या परवा " गौरी सांगत होती. " मग आज काय झालं? " युवीने उत्सुकतेने विचारलं. गौरीने मग कालचा प्रसंग सांगितला. " युवी, अरे त्याचं नुसतं एक वाक्य मला खुश करून गेलं. असं वाटलं, किती लकी आपण, उगीच काय छोट्या छोट्या गोष्टी धरून बसतो. मला वाटतं तू पण हा प्रयोग करून बघावा. मी ओळखते यामिनीला. आज मस्त घरी जा गजरा घेऊन, सगळा राग विसरून तिला गजरा माळताना जवळ ओढ आणि तू सुंदर दिसतेस, मला आवडतेस असं म्हणून तरी बघ.... " गौरीचं म्हणणं ऐकल्यावर युवी गोड हसला. पटकन कॉफी संपवून हाफ डे टाकून घरी गेला. ऑफिसचं काम संपवून गौरी घरी परतली. घरातली कामं संपवून तिने मोबाईल हातात घेतला तर यामिनीचा मेसेज होता, " थँक यु, आज युवी मला नव्याने भेटला. तुझे आभार कसे मानू कळतच नाही " त्याचवेळी युवीचा मेसेज पॉप झाला, " किती साध्या असतात गं तुम्ही बायका. आम्हीच चुकतो तुम्हाला समजून घ्यायला. खरंच, बोलनेसे सब कुछ होता है.... " ©️®️डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर
❤️ 👌 👍 🫶 17

Comments