
Yuti's Hub Library
February 28, 2025 at 07:29 AM
*मी का बदललेे?*
*..५.. प्राची*
प्राची व मी एकाच भागात राहत होतो पण कधीच एकमेकांना पाहीले नव्हते, ओळखत नव्हतो की भेटलो नव्हतो. निवृत्तीनंतरच्या काळात भजन, सत्संगाच्या गृप मध्ये ओळख झाली. प्राची एकपाठी, सुस्पष्ट उच्चार, फार निटनेटकी. या तीन चार वर्षांचीच आमची ओळख.
दोन तीन दिवस प्राची काही भजनाला आली नाही, मीच तिला फोन केला. जरा बरे वाटत नाही म्हणाली.
मी विचारलं 'येवू का? येताना काही बनवून आणू का?'
ती ये म्हणाली 'पण काही खावेसे वाटत नाही. काही आणू नकोस'. मी तिच्या घरी गेले. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती फार निस्तेज दिसत होती. मी विचारलं 'बरे वाटत नाही म्हणजे नेमके काय होते गं? डॉक्टरकडे गेली होतीस का?' 'काही नाही ग. चल स्वयंपाक घरात मी चहा करते.' मी व ती स्वयंपाकघरात होतो तेवढ्यात तिच्या सासूबाई आत आल्या, त्या म्हणाल्या 'दोन दिवस झाले तीने काही खाल्ले नाही'. मी तिला म्हणाले 'मी आणू का विचारलं तू नको म्हणालीस म्हणून आणले नाही'. ती म्हणाली 'अगं घरात खूप कोरडा खाऊ, फळं आहे. पण खावेसेच वाटत नाही' चहा वर येत होता तरी तिचं लक्ष नव्हत. मी सहजच म्हणाले, मनात फार उफाळून येतंय का? चहाकडे बघ. ती म्हणाली खरंच उफाळून आले आहे, गॅस लहान, मोठा किंवा बंद करता येतो, पण भावनांचे काय करू? आम्ही तिघी चहा घेऊन बसलो. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, 'नातीने कॅनडाला बोलावले आहे तिला, पणतीला सांभाळायला पण मला सोडून जायला ती तयार नाही.' मला फार आश्चर्य वाटले. मी म्हणाले 'प्राची, का गं जात नाही कॅनडाला?' प्राची म्हणाली 'अगं तूला काय सांगू, मुलगी बोलवते तिला फार गरज आहे तिच्या मुलीसाठी माझी. सध्या तिच्या सासूबाई आहेत, त्या तिथे रहायला तयार आहेत पण त्यांच्या तब्येतीला तेथील हवा मानवत नाही व तिथे नागरीकत्व नसेल तर औषधोपचार फार महाग. मला बोलावते ती. माझा सुपर विझा आहे आता माझ्या कायम नागरीकत्वासाठी प्रयत्न करणार. मागे तिच्या बाळंतपणासाठी व नंतर दोनदा गेले होते तेव्हा मला तेथील वातावरणाचा काही त्रास झाला नाही उलट मानवले. मी म्हणाले 'अगं तू आधी गेली होती ना, कॅनडा मानवले ना, मग कसला विचार करतेस जा नं.' प्राची म्हणाली 'आधी मी कॅनडाला गेले तेव्हा हे होते आईबरोबर, हे गेल्यानंतर मी कॅनडाला गेले नाही.' मी विचारलं, 'तूला दिर, जाऊ, नणंद कोणी नाही?' ती म्हणाली 'नणंद आहे, तीचे घर लहान, माणसे जास्त त्यात ह्यांना कुठं नेणार? मी नणंदेला तूम्ही सगळे ह्या घरात रहा म्हणून सांगितले तर त्या तयार नाहीत. पाच दहा दिवसांसाठी असते शेजारी पाजार्यांना , मैत्रिणींना सांगितले असते पण कमीतकमी म्हटले तरी तीन महिने कसे जमणार?'
https://www.shrutimundada.com/2022/02/c-v-raman.html
मी म्हणाले 'खरेच प्राची मानले तूला. एवढी सासूबाईंची काळजी, चिंता वाटते तूला. तूझ्या जागी दुसरी कोणी असती तर केला असता का इतका विचार? आजकाल कोणालाही सासू सासरे, कोणतीही जबाबदारी नको असते'.
प्राची म्हणाली, 'अगं, मी काही वेगळी नव्हते. लग्न झाले तेव्हा आम्ही सांताक्रूझ येथील चाळ नामक झोपडपट्टीत रहात होतो. पाणी, शौचालयाची सोय बाहेर. मी वर्षात गरोदर राहिले. बाळंतपणासाठी माहेरी गेले तेव्हा वेगळा संसार मांडला तरच येईन ही अट ठेवली. सासू सासरे सांताक्रूझ सोडायला तयार नव्हत्या. त्यांचे व्यवसाय ही घरूनच चाले, छोटेखानी दुकानात चॉकलेट बिस्किटे, पेन्सिल वैगरे सासरे विकत व सासूबाई मोड आणलेली धान्य. मग माझ्या नवर्याने खूप उचापती करून वसई येथे घर घेतले. मी वसईलाच शाळेत होते. मला शाळेत जायला बरे पडले. नवर्याने एक अट घातली मुलीला सासूबाईजवळ ठेवायचे त्या सांभाळणार. मला ही वाटले सर्व निट जुळून दे, वेगळे घर तर होऊ दे मुलीला नंतर तिच्या शिक्षणासाठी आणू. तोपर्यंत ती ही जरा मोठी होईल. मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही वसई येथे रहावयास गेलो. पुढील दोन वर्षे आईंनी मुलीला सांभाळले. मला शाळा असल्याने तश्या बर्याच सुट्ट्या होत्या. वरचेवर सांताक्रूझ येथे जाऊन येवून नोकरी करत होते. मुलीला शाळेत घालताना मी माझ्याच शाळेत तिचा प्रवेश घेतला. शाळेजवळच एक बेबी सिटींग पाहून ठेवले. मला वाटले मी जिंकली. मी मुद्दाम सकाळची शाळा घेतली. सकाळी मी शाळेत जात. हे ओफीसला जाताना तिला बेबी सिटींगला सोडत. बेबी सिटींगवाली तिला शाळेत सोडत व नेत. माझी शाळा सुटली की मी मुलीला बेबी सिटींगहून घरी घेऊन येई. एक वर्ष बरे गेले. मुलीचा पाचवा वाढदिवस आम्ही वसईत येथे केला. शाळा म्हणजे नर्सरी फक्त दोन तीन तासच असायची. आता माझी लेक मोठ्या नर्सरीत जाऊ लागली. एक दिवस मुलीला ताप आला. बेबी सिटींगला जायचे नाही, शाळेत जायचे नाही. आई तूच पाहिजे म्हणून रडू लागली. औषध आणले, दोन दिवस सुट्टी घेतली. मुलीला बरे वाटले म्हणून तिसऱ्या दिवशी मी शाळेत गेले, मुलगी झोपली होती. यांना मुलीला बेबी सिटींगला न्या सांगितले. दुपारी मुलीला घरी नेण्यासाठी बेबी सिटींगला गेले तर मुलीला ताप होता, मुलगी रडत होती. मला पाहताच बिलगली. मी मुलीला घरी नेले. वाटले स्वच्छ आंघोळ घालावी, दोन दिवस ताप होता तेव्हा अंग फक्त पुसून घेतले होते. बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी कपडे काढताना छातीकडे वळ दिसला. मी विचारलं काय झाले पडली का? ती फक्त रडू लागली. मी तिला आंघोळ घालताना पाणी ओतले तर तीला त्रास होऊ लागला. काय होत आहे ती सांगू शकत नव्हती. मी जरा बारकाईने निरीक्षण केले तर दातांचे व्रण वाटले. मग मी ही घाबरले. मला काही सुचेना. तिला काही सांगता येईना. ती मला क्षणभर सोडेना. मी तात्काळ मुलीला घेऊन सांताक्रूझला गेले. सासूबाईंना पाहून लेक म्हणाली 'मी आता इथेच रहाणार वसईला नाही जाणार'. सासूबाईंनी तिला जवळ घेतले व म्हणाल्या 'काय झाले छकूली?', मला त्यांनी नजरेनेच चूप बसायला सांगितले. आजी नातीचे हितगुज सूरू झाले. हळूहळू तीने आजीला सांगितले 'शाळेतून घरी नेण्यासाठी एक मुलगा ठेवला होता, त्याने शाळेतून बेबी सिटींगला नेताना तिला एका झाडाखाली नेले व तिला त्याने खूप पापी दिली, तिचा वरील शर्ट काढून तिला छातीवर चावला. ती जोराने ओरडली कोणी तरी विचारले काय झाले. त्याने तीला उचलले व बेबी सिटींगला आणून सोडताना सांगितले 'हे कोणाला सांगितले तर तूझी आई मरेल'. आता आम्हाला कळले तीला दोन दिवस ताप का आला, ती शाळेत जायला, बेबी सिटींगला जायला का घाबरते. आम्ही नशीबवान होतो, फार अनर्थ घडला नव्हता. तिला डॉक्टरकडे नेले. बाल मानसोपचार तज्ज्ञाकडे ही नेले. मी नोकरी सोडायचा विचार केला. सासूबाई म्हणाल्या, 'सोड नोकरी हरकत नाही.' मी, ह्यांनी व सासू सासर्यांनी तो आठवडा फार चिंतेत घालवला. हे तर त्या मुलाला मारायलाच निघाले. सासर्यांनी फार समजूत घातली 'तू त्याला मारून आपली चिंता मिटणार नाही वाढेल. पुन्हा पोलीस तक्रार, खटला या सर्वात वेळ पैसा बरबाद होईल. ह्यात अनन्याचे फार नुकसान होईल. आपण बेबी सिटींगवालीला त्या मुलांपासून खबरदार करू इतर मुलींना त्रास होऊ नये म्हणून'. शेवटी आम्ही वसई सोडायचे ठरवले. सासर्यांनी सासूला व ह्यांना समजावून सांगितले, 'सांताक्रूझमध्ये राहू तर सगळे विचारतील वसई सोडून का आलात? चुकून तोंडातून बाहेर पडेल आपण सांताक्रूझही सोडू या. अनन्या लहान आहे लवकर विसरेल व नवीन जागी रूळेल.' माझ्या मुलीच्या भविष्यासाठी सासू सासरे इतक्या वर्षांचा त्यांचा जमलेला व्यवसाय सोडायचा, घर सोडायचा विचार करत होते. मुलीला पुन्हा वसईला नेलेच नाही. मला राजीनामा द्यायला, माझे साहित्य घ्यायला वसईत जावेच लागणार होते. हे वसईत गेले तर त्या मुलाला, बेबी सिटींगला काही राडा करतील म्हणून मी व सासर्यानी वसईला जाऊन सगळी कामे आटोपली. अगदी नुकसान सोसून ते घर सोडले. त्या दिवसापासून मी अंतर्बाह्य बदलले.
आम्ही मालाड येथील चाळीत राहायला आलो. सांताक्रूझच्या घराचे पैसे बरे आले होते. पण मी आजारी पडू लागले. या गोंधळात मला पाचवा महिना लागला हे लक्षातच आले नाही. काही करता येण्यासारखं नव्हते. सासूबाई म्हणाल्या 'अगं बरेच झाले अनन्याला मन रमवायला छान भावंडं मिळेल'. मला दुसरीही मुलगीच झाली. मी माझ्या मुलीचा स्विकारच करू शकत नव्हते. पुन्हा मुलगी नको होती. त्यावेळी सासूबाई म्हणाल्या,'अगं आपण पण स्त्रीच ना! जो तो आपलं नशीब घेऊन येतो. आपल्याला कसे सगळे चांगले लोक भेटले, आपल्या मुलींनाही चांगली लोक भेटतील. एक अनुभव वाईट आला म्हणून जगातील सर्व पुरूषांना का वाईट ठरवायचं? दोघी वाढतील नीट'. मी दुसरीला सतत नाय नाय(नाही, नको) म्हणायची म्हणून व अनन्याला शोभेल असे नैना (नाय ना, नाय ना) नाव ठेवले. मालाडला आल्यावर मला नवीन नोकरी लागली. दोन्ही मुलीं छान शिकल्या, माझ्या दोन्ही मुलींना वेगवेगळ्या वेळी सासरे शाळेत, छंद वर्गात सोडणे, आणणे करू लागले. सासूबाईंनी मोड आलेल्या धान्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला, पुर्वी एवढा जम बसला नाही पण हातात चार पैसे खेळत राहिले, वेळ चांगला जावू लागला, चार ओळखी वाढल्या. पुर्वी ह्या व्यवसायात काय मिळते? ह्या मतांची मी होते, प्रत्यक्ष पाहिले तर आठ तास घर सोडून, गाडी खर्च करून मेहनत करून जेवढे एकदम पगार रुपी मिळे ते माझ्या सासूबाईंना घराकडे लक्ष देवून, गाडी भाडे खर्च न करता समाधानकारक पैसे मिळत फक्त ते एकदाच मिळत नाही म्हणून कळत नव्हते. पण या व्यवसायावर त्यांनी माझ्या नवऱ्याला, नणंदेला वाढवले, शिकवले. माझ्या मुलींची वेळेत लग्न झाली. योगायोगाने दोघींना कॅनडातील स्थळ आले. त्यांच्या बाळंतपणासाठी, इतर निकडीच्या वेळी कॅनडात जावे लागे म्हणून मी नोकरी सोडली. सासरे आजारी झाले. त्याच वेळी चाळीच्या जागेवर इमारत बांधणार म्हणून चर्चा सुरू झाली. पडल्या पडल्या त्यांना कसे कळले कींवा का वाटले माहीत नाही सासरे म्हणाले इमारत होईल तेव्हा होईल आता ज्या किंमतीला येईल त्याला विका व तयार इमारतीत घर विकत घ्या. मी असा बिछान्यावर किती भाड्याने घर बदलणार आपली चाळ जावून इमारत होईपर्यंत? त्यापेक्षा छोटेसे पण भक्कम इमारतीत स्वतःचे घर घ्या. आम्ही दहिसरला आलो. मालाडच्या घराने खूप सुख, शांती व स्थैर्य दिले. दहिसरला आलो, दोन तीन वर्षेच झाले, पहीले सासरे गेले ते आजारीच होते. हे फार अचानक गेले. मालाडची इतर माणसे भेटली तर, फोन केला तर म्हणतात, तूम्ही योग्य निर्णय घेतला त्यांना न जागा मिळाली ना पैसे मिळाले, हाल हाल आहेत एकेकांचे. माझ्या सासूसासर्यांमुळे आमचे व माझ्या मुलींचे भवितव्य घडले. आता माझी व सासूबाईंची फार छान घडी बसली आहे. मुलगी बोलावते म्हणून सासूबाईंची नीट सोय नसताना कशी जावू?'.
सासूबाई म्हणाल्या, 'मी हीला सांगते, माझ्या मुलीकडे राहीन अथवा वृध्दाश्रमात राहीन. माझे आता किती दिवस राहीले आहेत? अनन्या व नैना गरज आहे म्हणून बोलावतात. तूझा पुढील काळही चांगला जाईल. मी सांताक्रूझमध्ये छान स्थिरस्थावर झाले होते. आपण तिच्यासाठीच मालाडला आलो, बरेच दिवस करमायचे नाही मला, नंतर हळूहळू जुळवून घेत गेले, रमले. तूला ही काही दिवस परक्या देशात करमणार नाही पण तूला बदलावेच लागेल. तूम्हीच समजावून सांगा हीला'
खरे तर माझ्याकडे काहीही उत्तर नव्हते. पण दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहून बरे वाटले. मी म्हणाले, 'आत्ता मला साहित्य द्या मी गरमागरम उपमा करते मस्त खाऊ व विचार करू' प्राची म्हणाली 'मी करते.' मी म्हणाले 'अगं कधीकधी दुसऱ्याच्या हातचे आयते मिळाले की बरे वाटते'. मी उपमा व कॉफी केली. खरंतर मी काही उत्तर दिले नाही की सुचवले पण मनातील बोलल्यामुळे असेल किंवा दोन दिवस काहीही न खाल्ल्याने प्राचीने व्यवस्थित उपमा व कॉफी घेतली. मी घरी आले. नंतर मी काही काळ पुण्यात गेले. फोनवर कळले प्राची ची सासू झोपेतच शांतपणे गेली, फार आजारी वैगरे न पडता. प्राची सध्या कॅनडात दोन्ही मुलींबरोबर आळीपाळीने रहाते.
मुलीच्या बालपणी तिच्यावर आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे प्राची बदलली. प्राची ची आठवण लिहिताना आता जाणवले काय त्या अप्रसंगाने फक्त प्राचीच बदलली? माझे उत्तर नाही तीचे सासू सासरे ही बदलले. तरूणपणी बदल लवकर स्विकारण्याची कुवत असते, किंबहुना बदल तरूणपणी हवाहवासा वाटतो. जेवढं वय होते तेवढे बदलण्यापेक्षा स्थैर्य बरे वाटते. वयाच्या साठी नंतर चालू व्यवसाय सोडून नवीन जागी बस्तान मांडणे सासूबाईंना किती कठीण गेले असेल. चॉकलेट, बिस्किटे पेन्सिल विकणे बंद करून नातींच्या वेगवेगळ्या शाळेच्या, छंद वर्गाचे वेळापत्रक सांभाळणे सासर्यांना किती कठीण गेले असेल?
*उमा योगेश्वर कामत*
टिप: माझ्या ओळखीच्या अनेक मैत्रिणींच्या त्या कश्या व का बदलल्या अगदी १०० सत्यकथा किंवा व्यथा शब्दांकन माझे लिहायचे ठरवले आहे.
👍
❤️
🙏
👌
9