
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 1, 2025 at 10:53 AM
"देश तरक्की कर रहा है!" असं आम्हाला बातम्यांमधून वाचायला, ऐकायला मिळतं. पण आमच्या खेड्याचे रस्ते मात्र अजूनही सुधारले नाहीत. ते जशाला तसेच आहेत. माझी बाईक पण लै जुनी आहे. तिचे शाकाप गेलेले आहेत. त्यामुळे ती खड्ड्यात खूप जोरात आदळते. तिच्या सोबत आदळून आदळून माझी कंबर कामातून गेली आहे. माझ्या मनातील हे दुःख मी इथे तुम्हाला सांगितलं पाहिजे.
पण मला सिनेमा बघायचा भारी नाद आहे. त्यामुळे या जमिनी वास्तवाकडे डोळेझाक करून, किंवा खरे म्हणजे या वास्तवाचा विसर पडावा म्हणूनच मी माझ्या खेडे गावापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका तालुक्याच्या गावी सिंगल स्क्रीन वर लागलेला पिक्चर बघायला वगैरे जातो. मग ते आदळत आदळत प्रवास करणं वगैरे हे सगळं त्यातच आलं. हाही माझ्यासाठी आता सिनेमाचाच भाग बनून गेला आहे.
आज थेटर मध्ये शाहिद कपूरचा "देवा" लागलेला आहे हे कळल्यावर मी माझ्या सोबत्याला घेऊन दुपारचा शो बघायला म्हणून बाईक वर डबल शीट तालुक्याच्या गावी गेलो. आज थंडी जरा कमीच होती. हे एक बरं झालं. नाहीतर बाईकवर गारठा म्हणलं की अजूनच त्रास. थंडी नसल्यामुळे आमचा प्रवास सुखाचा झाला असे म्हणावे लागेल.
फर्स्ट डे फर्स्ट शो असून सुध्दा तिकिटाच्या रांगेत गर्दी वगैरे तर सोडूनच द्या.. आमच्या दोघांशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. त्यामुळे रांगेत पहिला नंबर आमचाच लागला. तिकिटासाठी ताटकळत उभे राहण्याचा वगैरे त्रास झाला नाही. हेही इथे कबूल केले पाहिजे.
तिकीट दर: बाल्कनी साठी रॉयल सोफा 200 रुपये आणि रॉयल चेयर 150 असा होता. 100 रुपये स्टॉल साठी. आम्हीं आमच्या दोघांसाठी 150 ची दोन तिकिटे काढली. आणि आत प्रवेश केला. थियेटरच्या दारातून मागे वळून बघितलं तर अजून दोघे जण आत येताना दिसले. पण त्यांनी 100 रुपयांची तिकिटे काढलेली असल्याने ते खाली स्टॉल मधे बसले आणि आम्हीं वर बाल्कनीत गेलो.
200 रुपयांची लाईन रिकामीच असल्याने आमच्या जवळ 150 ची तिकिटे असून सुध्दा आम्हाला 200 च्या रॉयल सोफ्यावर बसून सिनेमा बघण्याचा लाभ मिळाला. हे देखिल प्रामाणिकपणे इथे सांगितलं पाहिजे.
सिनेमाच्या इंटरव्हल मध्ये पुन्हा खाली गेलो. बाथरूम मध्ये जाऊन लघवी वगैरे करून हात धुण्यासाठी नळा जवळ गेलो. पण बहुतेक टाकीतील पाणी संपलेले होते. तरीही नळातून एक एक थेंब गळत होता. त्याच्या खाली हात नेऊन माझी ओंजळ भरण्याची वाट बघितली. त्यात माझा बराच वेळ गेला.
हात धुवून पॉपकॉर्न विक्रेत्या जवळ आलो. तर तिथे फक्त चिप्स आणि पाणी बॉटल विकायला होते. मग 40 रुपयांचे चिप्स पाकीट आणि 20 रुपयांची पाण्याची बाटली घेतली. पुन्हा वर आलो. तोपर्यन्त सिनेमाचा दुसरा भाग सुरू झालेला होता. एक चिप्सचा पुडा दोघात खाऊन आणि वर पाणी पिऊन झाले. शेवटी सिनेमाही त्याच्या ठराविक वेळेत संपलाच.
आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर तुम्ही तुमच्या बद्दलच सांगितले. सिनेमा बद्दल काहीच सांगितले नाही.
तर मंडळी, या "देवा" सिनेमाबद्दल काही बोलण्यासारखे, सांगण्यासारखे त्यात काही नाहीच. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही न बोललेलेच बरे!
- तानाजी तुकाराम शेजूळ
😂
😀
7