
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 12, 2025 at 06:17 AM
कथा लेखन
विषय-एक खंबीर स्त्री
आधार
दारावरची बेल वाजली. मालतीबाई नी दार उघडलं समोर पोलीस उभे पाहून त्यांचे सर्वांग थरथरू लागलं. "विजयराव देशमुख आहेत का घरी?"
" हो, आहेत. काय काम होतं?" थरथरत मालतीबाई कशा बशा बोलल्या.
"त्यांनाच भेटायचे आहे. आत येऊ का?"
"अ, हो या ऽऽ नं."
तोपर्यंत विजयराव बाहेर आले, कोण आहे ते पहायला. दारात आयपीएस भरत दराडे यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. "या आत या सर" असे म्हणत त्यांना विजयराव घरात घेऊन आलेत.
विजयराव आणि मालतीबाई बैठकीत त्यांच्या समोरच बसले होते. आयपीएस दराडे बैठकीत सभोवार नजर फिरवत सोफ्यावर स्थानापन्न झाले.
घर छान सजविले होते. कुठे भपका नाही की पाश्चात्य संस्कृतीचे प्रदर्शन नाही. टीव्ही,सोफा, एसी असलेलं साधं चार खोल्यांचा घर होत. उच्च मध्यमवर्गीय घर जसं असतं तसंच. विजयरावांकडे पाहून वाटलं एक सेवानिवृत्त सुखी आयुष्य जगत असलेले समाधानी व्यक्तिमत्त्व. आयुष्याच्या संध्याकाळी सगळी सुख उपभोगल्याचे समाधान चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सारं बघता बघता मालतीबाई कडे नजर जाताच भरत दराडे यांचे डोळे पाणावले. कृतार्थतेचे तेज चेहऱ्यावर झळकत होते. अश्रू च्या अंधुकशा प्रकाशात त्यांच्यासमोर सिनेमातील खेळाप्रमाणे सारा भूतकाळ तरळून गेला. पंचवीस वर्षांपूर्वीचा तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर आला.
संसाराला हातभार लागावा, नीट चालावा म्हणून मालतीबाई शाळेत नोकरी करत होत्या. विजयराव बँकेत असले तरी खूप पगार नव्हता. नोकरी लागल्याबरोबर लगेच मालतीबाईशी प्रेम विवाह केला असल्यामुळे आधीची काहीच शिल्लक नव्हती. शिवाय पदरात दोन गोंडस मुलं होती. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी मालतीबाई ना नोकरी करणे गरजेचे होते. कर्मधर्म संयोगाने त्या एका माध्यमिक शाळेत रुजू झाल्या.
मालतीबाई ची सवय होती रोज संध्याकाळी शाळेतून घरी येतांना वाटेतल्या गजानन महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत. थोडावेळ तिथे बसले की सगळा शीण नाहीसा होतो असे त्यांना वाटायचे.
एके दिवशी त्या मंदिरात आल्या तर त्यांच्या समोर एक सहा सात वर्षाचा छोटा मुलगा उभा राहून,
"आई हार घे ना, बाबासाठी, आज गुरुवार आहे, महाग नाही फक्त पाच रुपये."
मालतीबाईनी विचार न करता पाच रुपयाचा हार घेतला आणि त्या मंदिरात गेल्या. दर्शन घेऊन बाहेर आल्या आणि नेहमी प्रमाणे चप्पल घालून निघाल्या तर पुन्हा तो समोर आला.
" आई आज तुम्ही हार घेतला न बघा माझ्या धंद्याचीच बोहनी झाली हो. आठवड्यापासून इथे फुलं विकतो आहे पण कोणी घेई ना. खूप उपकार झाले तुमचे."
"बरं बरं रोज घेईल मी हार" असे म्हणून मालतीबाई घराकडे झपझप चालू लागल्या. यानंतर त्यांचा रोजचाच क्रम झाला, याचेकडून हार घ्यायचा अन दर्शन घेऊन त्याच्याशी थोडं जुजबी बोलून त्या घरी येत. हळूहळू ओळख वाढत गेली.
"काय रे नाव काय तुझं?"
"राजू"
" कुठे राहतो?, आईबाबा काय करतात तुझे?"
" मी समोरच्या घरात राहतो. मावशी कडे. मावशी म्हणजे आईची शाळेतली मैत्रीण आहे. आई बाबा मी लहान असतानाच देवाघरी गेले. आईची मैत्रीण कुंदा मावशी तिच्याकडे सगळी कामे करतो. अन संध्याकाळी इथे फुलं विकतो."
त्याची कर्म कहाणी ऐकून मालतीबाई ना खूप वाईट वाटायचे. एक आश्रितासारखा राहणाऱ्या मुलाचे हाल मालतीबाई ना पाहवले नाही. इतका गोड मुलगा का त्याच्या वाट्याला असे कष्ट यावे. खेळायचे, बागडायचे दिवस त्याचे अन तो व्यवहार शिकतो आहे. खरंच काय असेल बरं त्याचं प्रारब्ध आणि पुढे भविष्य.
घरी आल्यावर एकदा जेवतांना मुलांना त्यांनी राजूबद्दल सांगितले. "बाहेर किती वाईट परिस्थिती आहे. शिक्षणासाठी काय काय करावं लागतं पहा. तुम्हाला मिळतं आहे तर तुम्ही मेहनत करा आणि यशाची शिखरे गाठा जी तुम्हाला खुणावत आहेत. मेहनत केल्याशिवाय यश मिळणार नाही हे निर्विवाद सत्य आहे बाळांनो. असे रोज काहींना काही मालतीबाई मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहित करत होत्या.
आज राजू खूपच उदास दिसत होता. त्याचे डोळे सारखे भरून येत होते. काय करावे काहीच त्याला सुचत नव्हते. तेवढ्यात मालती बाई मंदिरात पोहचल्या. त्याच्याकडे पाहताच आज काहीतरी झालं आहे हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. दर्शन झाल्यावर त्या राजूजवळ आल्या, "काय रे काय झालं आज? का असा दिसतोस? रडला का? बरे वाटते आहे न!"
राजू काहीच बोलत नव्हता.फक्त डोळ्यातून सारखे अश्रू वहात होते. मालतीबाईनी पुन्हा विचारले, "सांग काय झालय बाळा? कोणी काही बोलले का, की हर विकून आलेले पैसे वगैरे हरवले आहेत?" शब्दांची जुळवाजुळव करत राजू कसा बसा म्हणाला,
"आई, मावशी म्हणते आता पुढं काही शिकू नको, एवढे पैसे नाहीत आमच्याजवळ पण मला शिकायचे आहे, कसेही करून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. सरफरोश सिनेमामध्ये जसा अमिरखान होतो तसे."
"तू कुठे बघितला सरफरोश?"
"मावशीची मुलं बघत होती तेव्हा पाहिला टीव्हीवर. आई तुम्ही करू शकता काही माझ्यासाठी. म्हणजे मावशीला सांगा न मला पुढे शिकू दे."
"ठीक आहे बघू आपण ."
असे म्हणून मालतीबाई घरी निघाल्या. त्यांच्या डोक्यात राजू विषयी विचार चालू होते. विजयरावांशी याविषयी बोलावे असे वाटत होते, पण विजयरावांना असे काही आवडत नव्हते. तरी एक दिवस त्यांनी विजयरावांना याविषयी विचारलेच. त्यांचे म्हणणे एवढेच होते की "असे कितीतरी प्रत्येक मंदिरासमोर असतात, फुटपाथवर असतात त्यांना काय प्रत्येकाला तू मदत करीत फिरशील का? त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच पण आपल्याही मर्यादा आहे खर्च करण्याच्या. आपला पण संसार आहे. दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे गंमत नाही. उच्च शिक्षण दिले तरच या स्पर्धेच्या युगात आपली मुले तग धरू शकतील." पण मालतीबाई ना काही हे पटेना. राजूचा रडवेला चेहरा सारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असावे किंवा गजानन महाराजांनीच माझ्यावर ही जबाबदारी टाकली असावी असेच विचार या भोळ्या भाबड्या माऊलीच्या मनात येत होते. काहीही करून राजुचे भविष्य घडवायचे आपल्या मुलांसारखे असे ठरविले.
त्यांचं शिक्षकी मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. कसंही करून राजुला मदत करायची पण कशी हे सुचत नाही. शेवटी शिक्षकच खरा मार्ग दाखवितो ये सत्य आहे. त्यांनी राजुला जवाहर नवोदय विद्यालय दिल्लीची परीक्षा द्यायला सांगितले. त्या परीक्षेची फी, पुस्तके सारा खर्च मालतीबाई करत होत्या. विजयरावांचा विरोध पत्करून. राजू ने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. राजू नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाला आणि पाचवीपासून राजू नवोदय विद्यालयात दाखल झाला. मालतीबाई आनंदल्या. त्याचे स्टेट बँकेत मालतीबाई नी खाते उघडले आणि दरमहा त्याच्या खात्यात पैसे जमा करू लागल्या.
राजुचे शिक्षण सुरू झाले. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकात त्याचा क्रमांक येत होता. मेहनत आणि जबाबदारीची जाणीव, मालतीबाईचा विश्वास या बळावर राजू यशाची एकेक पायरी सर करत होता. पाचवीपासून राजू बाहेरगावी असल्यामुळे कधी त्याची भेट होत नव्हती. त्याच्या शाळेत मुख्याध्यापकामार्फत त्यांची चौकशी मालतीबाई करत असत. त्याच्या अवांतर खर्चाचा सगळा भार एक पालक म्हणून मालतीबाई नी उचलला होता.याबाबत विजयराव आणि त्यांचे कधीच एकमत झाले नाही. तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. एखादी गोष्ट करायची ठरवले की स्वतः चा निर्धार पक्का असणे गरजेचे असते.
मालतीबाई आणि विजयराव दोघेही आता सेवानिवृत्त झाले. त्यांची दोन्ही मुलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागली होती.
एक दिवस अचानक राजुचा फोन आला,"आई आता मला पैसे पाठवू नको, माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी युपीएससीची सिव्हील सर्व्हिस एक्साम पास झालो आहे आणि माझी आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे. लवकरच भेटू आपण."
राजू च्या आवाजातील आत्मविश्वास, मार्दव ऐकून मालतीबाईचे पापणकाठ पाणावलेत. आपण योग्य निर्णय घेतल्याने त्या सुखावल्या. कधी एकदा राजुला भेटते असे झाले त्यांना. किती मोठा झाला असेल न आता, ओळखायला येईल की नाही आपल्याला या विचारात त्या रमू लागल्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचीही जपवणूक करता आली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
"मालती, हे आयपीएस भरत दराडे. नव्याने रुजू झाले आहेत इथे. कालच माझी एका कार्यक्रमात यांची ओळख झाली." विजयरावांच्या आवाजाने आयपीएस भरत दराडे भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून विजयराव चपापले.
"काका माझी ओळख काय करून देता या माऊलीला! हिच्या खंबीर आधाराने मी आजचा दिवस पाहतो आहे. ही माऊली नसती तर मी कुठेतरी हमाली करत असतो आज."
आई मी राजू, तुला हार विकणारा राजू..... "
राजुचे शब्द ऐकले आणि मालतीबाई नी डोळयातल्या आनंदाश्रू ना वाट करून दिली.....
रसिका राजीव हिंगे
❤️
👍
😢
🥰
11