मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 13, 2025 at 02:08 PM
नवी पिढी, नवं राज्य!
१)हॉस्टेल मधून तो असा आडवारी घरी आलेला पाहून ती चक्रावली. दार उघडलं तर त्याच्या हातात एक बाळ होतं. जेमतेम वर्षाचं असेल.
"काय रे हे? कोणाला घेऊन आला आहेस?" आईने विचारलं.
निजलेल्या बाळाला अलगद कॉटवर झोपवून तो आईला म्हणाला," आमच्या हॉस्टेलच्या वॉचमन चा मुलगा आहे. ते दोघे रस्ता क्रॉस करताना एक्सिडेंट मध्ये जागीच गेले. हा वाचला. मी घरी घेऊन आलो. पोलिसांना सांगून आणलाय, काळजी करू नको."
"अरे, पण आपण काय करायचं?"
"मी याला दत्तक घेतो. सध्या तुम्ही सांभाळा. "
"अरे राजा, तुला अजून अठरा वर्ष पण पूर्ण झाली नाहीत. तू कसा दत्तक घेणार?"
"मग तुम्ही घ्या!"
"काहीही काय बोलतोस? तू आता एवढा मोठा आहेस. आणि हा जेमतेम एक वर्षाचा. लोक काय म्हणतील?"
"मला दत्तक घेतलत, तेव्हा मी ही एक वर्षाचा होतो आई! तेव्हा जे बोलायचय ते लोकांनी बोलून झालंय "
"पण आता आमचं वयही झालय राजा!"
"आई, चार पाच वर्षांचा प्रश्न आहे. मला चांगली नोकरी लागली की याची सगळी जबाबदारी माझी. तुम्ही अनाथांचा नाथ झालात! तुम्ही मला हा रस्ता दाखवला आहे, मला मार्गदर्शन करा, support करा! मी याच मार्गावरून चालणार आहे!"
"Proud of you Raja! Go ahead. We are with you." आईने छोट्या पिल्लाला छातीशी धरलं!
२) शाल्मलीचं Love marriage!
ती जेव्हा प्रथम विनयच्या घरी गेली तेव्हा त्याच्या आजीच्याच प्रेमात पडली. सायीसारखा मऊ प्रेमळ स्पर्श, कवळी काढल्यावर येणारं बोळक्यातलं हसू, हळूवार बोलणं आणि सगळ्यांवर खूप प्रेम असलेली आजी तिला कधी आजेसासू वाटलीच नाही. शाल्मलीची ती "ए आजी" झाली!
आजीची फुलांची आवड तिच्या नजरेतून सुटली नाही. रोज बागेतली फुलं स्वतः तोडून आणून आजी तिच्या खोलीत ठेवत असे. या वयात खोलीत असणारा विविध मलमांचा वास आजीच्या खोलीत कधीच नव्हता. आज चाफा, उद्या मोगरा, कधी गावठी गुलाब तिची खोली बहरून टाकत.
शाल्मली conference साठी आठ दिवस गावाला गेली होती. परत आली तर आजीने अंथरुण धरलं होतं. सगळे नातेवाईक पण गोळा झाले होते.
"आईचा जीव कशात अडकला आहे काही कळत नाही!" विनयचे वडील आईच्या उशाशी बसून म्हणत होते.
शाल्मली धावत बागेत गेली आणि तिने पसाभर मोगऱ्याची फुलं तोडून आणली. आजीच्या जवळ आपली ओंजळ धरून शाल्मली रडतरडत म्हणाली,
"आजी, ही घे तुझी फुलं. सुवास बरोबर घेऊन जा. आणि तुझी झाडं मी सांभाळीन याची खात्री बाळग!"
आजीने डोळे उघडून शाल्मलीकडे हसून बघितलं, फुलांचा खोलवर सुवास घेतला आणि श्वास सोडला!
नुकत्याच घरात आलेल्या सुनेने आपल्या आजे सासूला खरं ओळखलं याचं नातेवाईकांना कौतुक वाटलं!
३) "काका, स्वप्नील दादा आहे का घरी? तो अजून रूमवर आला नाहीये म्हणून मी बघायला आलो" दाराबाहेर एक गबाळा मुलगा उभा होता.
स्वप्नीलची आई बाहेर येऊन म्हणाली, "अरे, तो तुमच्याच कामासाठी गेला आहे. तू जा रूमवर."
बाबा अस्वस्थ झाले होते. गेल्या कित्येक दिवसात त्यांची आणि मुलाची भेटच झाली नव्हती. रोज रात्री अपरात्री आपला मुलगा घरी येतो, कुठे जातो - काय करतो काही सांगत नाही. या वयात वाईट सवयी लागायला कितीसा वेळ लागतो?? त्यांनी ठरवलं की आज तो येईपर्यंत जागं राहायचं आणि काय ते स्पष्ट विचारून टाकायचं.
आईला बाबांची काळजी कळत होती. पण आपल्या मुलावर तिचा पूर्ण विश्वास होता.
रात्री १२ वाजता स्वप्नील घरी आला. आई, बाबा दोघेही जागे आहेत हे बघून तो म्हणाला, बाबा, काही बोलायचय?"
"नाही, मी काही विचारणार नाही. तूच मला काय ते सांगणार आहेस. तू ऑफिस मधून परत आल्यावर पुन्हा रोज बाहेर जातोस, रात्री उशिरा परत येतोस. तू आता सज्ञान आहेस, सक्षम आहेस. मी फक्त काळजीपोटी विचारतो आहे."
" बाबा, मला तुमची काळजी कळते. पण एवढी खात्री बाळगा की माझं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही. मी तुमचे कष्ट बघितले आहेत. किती सामान्य परिस्थितीतून तुम्ही वर आला आहात ते मला माहीत आहे.
मी कॉलेजमध्ये असल्यापासून स्टेशनवर राहणाऱ्या मुलांना शिकवायला जात होतो. तेव्हा माझ्या खिशात पैसे नव्हते. त्यामुळे मी फक्त शिकवायला जात होतो. आता मला चांगला पगार मिळतो. आपल्या घराला माझ्या पगाराची आवश्यकता नाही हे मला माहित आहे. माझा स्वतःचा खर्च वगळून, बाकी सगळी रक्कम मी या मुलांच्या कॉम्प्युटर शिक्षणासाठी वापरतो आहे. मी भाड्याने एक खोली घेतली आहे आणि तिथे पाच कॉम्प्युटर्स ठेवले आहेत. आम्ही तिघं मित्र मिळून सध्या २५ मुलांना शिकवतो आहे. खूप हुशार मुलं आहेत ही. "
"पण मग मला सांगायचं नाही का? मी पण मदत केली असती"
"बाबा, आधी सगळं सेट अप झालं की सांगणारच होतो. मला स्वतःच्या बळावर काहीतरी करायचं होतं. "
" शाब्बास! काहीही लागलं तरी मी आहे तुझ्या बरोबर एवढी खात्री बाळग. "
आई समाधानाने दोघांकडे बघत होती.
संध्या घोलप
#sandhyagwrites
❤️
👌
👍
💜
12