मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 26, 2025 at 01:43 PM
विल पॉवर म्हणजे काय ? सत्यकथा वाचाच ! Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd) **** नोकरदारांना घर घ्यायचे असेल तर त्याच्या पगाराच्या पन्नासपट कर्ज मिळते ! हा सार्वत्रिक नियम ! म्हणजे १० हजार पगार असेल तर ५ लाख कर्ज मिळू शकते ! मात्र माझा पगारच जेव्हा पाच हजार होता तेव्हा माझ्या सारस्वत बँकेकडे मला घर घेण्यासाठी साडेचार लाख रुपयांचे लोन मागितले ! त्यावेळी तिथे कामत साहेब होते, ते चक्कर यायचे बाकी होते. कारण पाच हजार च्या पन्नासपट म्हणजे जास्तीत जास्त अडीच लाख मला लोन (कायद्याने) मिळू शकते! आणि मला तर साडेचार लाख हवे होते. हजारभर चौरस फुटाचा टेरेस फ्लॅट घेण्याचे स्वप्न माझ्या मनात. कारण हा जो फ्लॅट होता ती बिल्डिंग ज्या चाळीला पाडून उभी राहत होती, त्याच चाळीमध्ये दीड खोलीच्या पत्र्याच्या खोलीत राहत होतो. त्यामुळे असे वाटायचे कि सांसारिक जीवन जिथे सुरु झाले तिथेच नवीन फ्लॅट घ्यावा. नशीब म्हणजे बिल्डरने देखील (माझा जुना भाडेकरू म्हणून क्लेम असताना आणि ज्यामुळे मला किमान १५० फूट फ्लॅट चकट फु मिळणार होता तो मी तो न घेता हजार फुटी टेरेस फ्लॅट फक्त रेट कमी करून मागितलेला) त्यामुळे बिल्डरने लगेच मला तो फ्लॅट दिला होता, तोही कमी किमतीत ! त्यावेळी त्या फ्लॅटचा रेट ७५० रुपये असताना मला मात्र त्याने ४५० रुपये रेट दिला होता) * तर हे सगळे मी माझ्या बँकेला सांगितले. मी माझा फुकटचा १५० फुटाचा क्लेम कसा काय सोडला, याचेच मॅनेजरला आश्चर्य वाटलेले. मी सांगितले कि, जे माझे नाही, त्यावर उगीच कायद्याच्या आधारे लाभ घेणे मला आवडत नाही. त्यावर काय वाटले मॅनेजर ला काय माहित, पण म्हणाले कि, गड्या, तू वेगळा आहे रे ! पर्सनल रिस्क वर तुला हे साडेचार लाखाचे कर्ज देतो. पण एका अटीवर. कि पुढचे ३ महिने तू साडेचार हजार चा हप्ता भरून दाखव. मग पुढे पाहू, नाहीतर मग लोन कॅन्सल" ** मी उड्या मारत घरी आलो. आता कल्पना करा कि, पगार होता पाच हजार आणि हप्ता होता साडेचार हजार. म्हणजे पाचशे रुपयांत आम्ही एक महिना कसे जगायचे ? पण हिम्मत सोडली नव्हती. त्या तीन महिन्यात खरोखर २०- २० तास काम केले ! नोकरी सांभाळून घरी रात्री उशिरापर्यंत डिझाईन चे काम करत गेलो आणि पूर्ण तीन महिने बरोबर १ तारखेला साडेचार हजार चा हप्ता देत आलो. तीन महिने संपले. तर तेव्हा ते मॅनेजर म्हणाले कि, अजून ३ महिने असेच करून दाखव ! मग पाहू, लोन सॅंक्शन करायचे कि नाही" * मीही जिद्दीला पेटलो ! पुढचे ३ महिने मी तसेच परिश्रम करून हप्ते फेडले ! आणि मग मॅनेजर समोर जाऊन उभा राहिलो. त्यांनी कॉम्पुटरवर माझे सहा महिन्याचे रेकॉर्ड पाहिले ! एकही तारीख चुकली नाही ते चेक केले आणि चक्क उठून मला शेकहॅण्ड केला ! आणि म्हणाले, "गड्या, जिंकला तू" आणि मग त्यांनी मला नियम थोडे बाजूला ठेवून पाच हजार च्या पगारी माणसाला साडेचार हजार हप्त्याचे कर्ज दिले ! पुढचे १२ वर्षे मीन्स १४४ हप्ते एकही तारीख न चुकवता मी सर्व कर्ज फेडले ! हे करत असताना मनाशी कायम एकच विचार होता कि, ज्या चाळीत राहिलो तिथे माझा टेरेस फ्लॅट असावा. आणि माझ्या त्या स्वप्नाला माझ्यातील विल पॉवर ने साथ दिली. * यथावकाश कर्ज नील झाले. तोवर माझी नोकरी संपून स्वतःचा बिझिनेस सुरूही झाला होता. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या थोडाफार स्थिर झालो होतो. आणि इतक्यात एक नवीन संधी समोर आली. ज्या जागेत माझा बिझिनेस सुरु होता त्या टिळक रोडवरील ती ऑफिसची जागा मालकाने मलाच विकत घे म्हणून सांगितले. (हे तेच मालक, दीपक कठाळे, माझे गुरु, ज्यांच्याकडे एकेकाळी ७०० रुपयावर पडेल ते काम केले होते) तर त्यांनी मला उभारी देऊन हे ऑफिस घेच असे सांगितलं. ५ वर्षांपूर्वी याची किंमत इतकी होती कि त्याचे मी स्वप्न देखील पाहू शकत नव्हतो. पण पुन्हा विल पॉवर जागी झाली. त्याच बँकेत पुन्हा गेलो,. आणि पुन्हा लोन मागितले. त्यावेळच्या माझ्या बॅलन्स शीट नुसार मला फक्त १६ लाख मिळू शकत होते आणि माझी गरज तर दुपटी पेक्षा जास्त होती. तोवर अर्थात ते घराला कर्ज देणारे मॅनेजर निवृत्त झाले होते. त्याजागी आता नवीन मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी माझे लोन प्रपोझल एक सेकंदात फेटाळले. मी चिवट !! त्यांना समक्ष भेटलो. आणि इतकेच विचारले कि, जर मला पाच हजार पगार असेल तर मला तुम्ही किती कर्ज द्याल ? त्या म्हणाल्या कि, "अडीच लाख" मी हसून म्हणालो कि, हा माझा xxxxxxxx इथलाच होम लोन अकाऊंट नंबर ! जरा चेक करता का ? टोटल हिस्ट्री:" त्यांनी लगेच चेक केले आणि त्याहि चकित झाल्या ! म्हणाल्या कि, तुम्हाला दिलेच कसे इतके कर्ज ? आणि तरी तुम्ही एकही हप्ता न चुकवता फेडले कसे ? मी म्हणालो, मॅडम, मेहनत करतोय,. आणि स्वप्न पाहतोय त्यामुळे आपोआप संधी समोर येत आहेत. शिवाय सोबत विल पॉवर आहे त्यामुळे मला आता हे ऑफिस घ्यायचे आहे. काहीपण करा पण हे माझे काम व्हावे ! त्या म्हणाल्या कि, ओके, मला जरा वेळ द्या ! तुम्ही नंतर भेटा मला ! * आणि अक्षरशः २१ वेळा मी बँकेत गेलेलो, केवळ फॉलोअप साठी ! शेवटी त्या मॅडमनी देखील नियम थोडे शिथिल करून मला मदत केलीच आणि स्वतःचे टिळक रोड वर ऑफिस झाले ! हेच ते ऑफिस होते जिथे एकेकाळी ७०० वर काम करत होतो. * पत्र्याच्या चाळीतून त्याच जागी टेरेस फ्लॅटमध्ये आणि हरकाम्याच्या नोकरीच्या जागेचा २० वर्षांनी मीच मालक * डॉ. डीडी क्लास : हि सत्यकथा आहे मित्रानो ! हे घडले केवळ विल पॉवर मुळे ! इतकेच आज सांगायचे होते. कि, स्वप्न मोठीच पहा आणि त्यासाठी बेदम कष्ट तर कराच पण सोबत विल पॉवर कधीच कमी पडू देऊ नका ! मग पहा, काय जादू होते ! लेखक - धनंजय देशपांडे D D #repost #follower #hilights
👍 ❤️ 💯 🙏 8

Comments