
Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
February 16, 2025 at 04:23 AM
वाचण्यास सोयीचे म्हणून मूळ प्रत पाठवत आहे.
_*हस्ताक्षरवेडा किशोर कुळकर्णी!*_
शाळेतील मुले भले मोबाईलवेडी झाली असतील, पण त्यांना अजून गृहपाठ हस्ताक्षरांत पुरा करावा लागतो; परीक्षांतही पेपर ‘लिहावे’ लागतात. मात्र ते लेखन सुंदर हस्ताक्षरांत असावे असा आग्रह कोणाचा नसतो. सुरेख, नीटनेटक्या हस्ताक्षरातील लेखनास पाच गुण जास्त मिळतील असे प्रलोभन पूर्वी असे. सुवाच्य, डौलदार हस्ताक्षर हे व्यक्तीचे भूषण मानले जाई. आता मुदलात लेखनच ‘मेसेज’पुरते उरलेले आहे. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर या गुणाला समाजात किंमत राहिलेली नाही; जशी ती पाढे पाठ असण्यालाही नाही. योगायोग असा, की हस्ताक्षर असे कालबाह्य होत असताना अक्षराचे वळण कलेच्या पातळीवर नेणारा चित्रकार अच्युत पालव यास केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार याच आठवड्यात जाहीर झाला आहे. र.कृ. जोशी, कमल शेडगे यांनीही आयुष्यभर अक्षरलेखनाचाच ध्यास घेतला. त्यांच्यासारखेच काही निष्ठावान सौंदर्यभोक्ते अजूनही शाळाशाळांत जाऊन सुलेखनाचा आग्रह धरतात. तसाच जळगावचा किशोर कुळकर्णी आहे. त्याने गेल्या तीस वर्षांत चारशे शाळांमध्ये जाऊन दोन हजारांपेक्षा जास्त मुलांना सुंदर हस्ताक्षराचे पाठ दिले आहेत.
किशोर हस्ताक्षर लेखनासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरतो. अक्षर सुंदर, टपोरे, वळणदार दिसण्यासाठी काय केले पाहिजे? वर्णातील मुख्य़ रेषा सरळ काढलेली मोठी असावी, अक्षरातील उंची, दोन अक्षरांतील अंतर, त्यांची जाडी, लिहिण्यासाठी पेन कोणता असावा, कागदावर पेन कसा चालवावा – पेन चालवण्याची दिशा, लेखन करण्याची गती, वळण, ते कसे व कोठे थांबवावे? अशा मुद्यांवर किशोर कार्यशाळेत सोदाहरण मार्गदर्शन करतो.
रामदास स्वामींनी साडेचारशे वर्षांपूर्वी ‘अक्षर घडसुनी करावे सुंदर |’ असे लिहून ठेवले आहे. त्यावेळी मुद्राक्षरेच नव्हती; फक्त हस्तलेखन होई. चांगल्या हस्ताक्षराचे महात्म्य प्रथम टाइपरायटरमुळे संपले. नंतर संगणकावर सरसकट टाइपच करावे लागत असल्याने वेगवेगळ्या वळणांचे फॉण्ट उपलब्ध झाले. तेथे स्वहस्ताक्षराचा फॉण्टदेखील निर्माण करता येऊ शकतो. किशोर सांगतो, की गुगल हँडरायटिंग ॲप्लिकेशनने अक्षर गिरवता येते !
किशोर कुळकर्णी याने पदवी अंमळनेरच्या कॉलेजमधून घेतली. त्याने नाशिकच्या एचपीटी कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्यावर तेथे नाना लाभे यांचा प्रभाव पडला. नानांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ असा उपक्रम होता. त्यांनीच किशोरच्या अक्षरांना सुंदर वळण दिले. किशोरने तोच प्रयोग पुढे चालू ठेवला आहे. हस्ताक्षराकडे दुर्लक्ष होते, यामुळे किशोर व्यथित असतो. परंतु अलिकडेच, हस्ताक्षर दिनानिमित्ताने (२३ जानेवारी) त्याला उमेद देणारा फोन परभणी जिल्ह्याच्या सेलू गावातून आला. तेथे जिल्हा परिषदेने शाळाशाळांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली होती. तिचा बक्षिस समारंभ व त्याच वेळी मुलांची हस्ताक्षर कार्यशाळा असा सेलूकरांचा बेत आहे. त्यांनी किशोरला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे किशोर खुषीत आहे. त्याचा ठाम विश्वास आहे, की चांगल्या हस्ताक्षराला मरण नाही !
किशोर कुळकर्णी 9420607059 [email protected]; [email protected],
- _*दिनकर गांगल*_ 9867118517
-------------------------------------------------------------------------------------------------