Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 5, 2025 at 02:51 PM
सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित 'यिन मंत्रिमंडळ २०२५' ( यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ) या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी उपस्थित होते. यावेळी सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक मा. श्री. निलेश खरे जी, ज्येष्ठ पत्रकार मा. श्रीमती मृणालिनी नानिवडेकर जी व अन्य मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रम प्रसंगी मा. अध्यक्षांनी यिनच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा सत्कार केला तसेच यिनच्या मंत्रिमंडळाला शपथ देखील दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्याशी प्रश्नोत्तरपर संवाद देखील साधला. राजकारणात युवकांनी येण्याची गरज आहे. नवी पिढी घडवायची असेल तर त्यांच्या समोर आपणच आदर्श म्हणून राहिले पाहिजे. जर आपणच राजकारणापासून लांब गेलो तर सज्जन शक्तीची संख्या राजकारणातून कमी होईल. त्यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात आले पाहिजे. समाजामध्ये चांगले सकारात्मक बदल हे राजकीय इच्छाशक्तीतून घडवले जातात. अशा पार्श्वभूमीवर सकाळ या संस्थेने सुरु केलेला 'यिन' हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. यातून तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल व तरुण मोठ्या प्रमाणावर राजकीय क्षेत्रात येतील, अशी भावना यावेळी मा. अध्यक्षांनी बोलताना व्यक्त केली.

Comments