खडकवासल्याचा कोलंबस
खडकवासल्याचा कोलंबस
June 8, 2025 at 08:22 PM
उन्हाळ्याची दुपार. तुम्ही रस्त्यावरून चालत आहात. उन्हाने अंग तापलंय, घामाच्या धारांनी चिंब झालंय… पण इतक्यात एक शाळेचा जुना मित्र भेटतो. सहज म्हणतो, "चहा घेऊ या?" अर्धा तास कसा गेला, समजलच नाही. वर्षांपूर्वी हरवलेलं एक चहाच्या कपात सापडलं *अस काहीतरी....* घरात कोणीच नाही. तुम्ही एकटेच. सहज हाताला कॉलेजची स्लॅमबुक लागते. पानं फिरवत असताना, तिचं पान सापडतं. तिने लिहिलेलं – जपून, विचार करून. तुमचं तिच्याशी असलेलं नातं कोणालाच समजू नये, म्हणून तिने लिहितानाही घेतलेली काळजी. शब्दांवरून उगाच बोट फिरतात. पुन्हा कधीही ना अनुभवलेलं, पहिलं *असं काहीतरी...* गर्दी, धावपळ, डोक्यात चिंता. वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना, त्यांनी हात धरला. रोज त्यांच्याशी वाद घालणारा पण, नकळत तोंडातून निघतं “बाबा, मी आहे… काही काळजी करू नका.” पुन्हा कधीच बोलू न शकलेल, *अस काहीतरी....* शांत संध्याकाळ. बाहेर पावसाची संथ लय आत एक कलाकार गातोय. फक्त काही जण ऐकत असावेत. ना मानधन ना हजारोंची गर्दी तो का गातोय त्यालाही माहित नाही गाणं संपतं तो हात जोडतो एक छोटा मुलगा उठतो आणि त्याने जपून ठेवलेला मोरपीस देतो नकळत डोळे पाणवतात हजारोंच्या मैफिलीत हरवलेलं मोरपिसात सापडलं *असं काहीतरी....*
❤️ 1

Comments