शालेय शिक्षण
June 6, 2025 at 12:48 AM
*✹ ५ जून ✹*
*इतिहासकार गणेश हरी खरे स्मृतिदिन*
जन्म - १० जानेवारी १९०१ (पनवेल,रायगड)
स्मृती - ५ जून १९८५
इतिहासकार डॉ. ग. ह. खरे यांचा जन्म रायगड मधील पनवेल येथे झाला. ते वि.का. राजवाडे यांचे शिष्य, ज्यांनी अविवाहित राहून इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. खरे यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली. सुटके नंतर त्यांनी इतिहास अभ्यास सुरु केला. त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केले. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. १९२९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे नोकरी, पण नंतर निधना पर्यंत, चिटणीस, कार्याध्यक्ष या नात्यानी संस्थेची भरीव सेवा त्यांनी केली. संस्कृत, हिंदी, फारसी, कन्नड, कोकणी भाषा त्यांना अवगत होत्या. नाणकशास्त्र, पुरतत्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या या विषयात त्यांचा व्यासंग होता. भारतात त्यांनी सर्वत्र संचार केला होता. लहानमोठी ५३ पुस्तक, ४०० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झालेत. त्यांनी शिवचरित्र साहित्य काही खंड व ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. ग.ह. खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले. हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले, त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गजानन भास्कर मेहेंदळे, शोभना गोखले यांचा समावेश आहे, ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतःचा वेगळा ठसा कामातुन दाखवला. संशोधकाचा मित्र, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते, हे त्यांच्या ग्रंथ संपदेतील विशेष व महत्वाचे ग्रंथ. त्यांचा अनन्य कार्याचा मानसन्मान म्हणून त्यांना इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग होता, तसेच इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या १९५१ च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषावले होते. न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या १९७४ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्या कडे होते. पुणे विद्यापीठानी १९८४ साली सन्माननीय डीलिट पदवी त्यांना प्रदान केली.
*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
🙏
1