शालेय शिक्षण
June 6, 2025 at 12:48 AM
🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁🌺🪴
*🎭 बोधकथा : सुसंवाद 🎭*
*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*
*⊰━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱*
एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे. आपल्या व्यग्र जीवन शैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे, यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्या समोरून निघून जायचा.
एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली, तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल. दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायी पर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला, अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात.
हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्या विषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.
*📍तात्पर्य :*
*व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.*
*▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*