शालेय शिक्षण
June 7, 2025 at 02:20 AM
*❀ ७ जून ❀*
*हुकुमशहा मुअम्मर अल गद्दाफी जन्मदिन*
जन्म - ७ जून १९४२ (लिबिया)
स्मृती - २० ऑक्टोबर २०११ (लिबिया)
लिबियाचा हुकुमशहा मुअम्मर अल गद्दाफी याचा जन्म लिबियात झाला. मुअम्मर गद्दाफी म्हणजे आफ्रिका आणि अरब सीमेवरच्या लिबिया या देशाचा हुकुमशहा. आपल्या अरब संस्कृतीचा त्याला अभिमान होता. देशाची सेवा करण्यासाठी त्याने शाळा निम्म्यातून सोडून सैन्यात दाखल झाला. तत्कालीन सरकार आपल्या देशाच्या धर्माच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करते आणि फक्त स्वतःच्या घराण्याच्या तिजोऱ्या भरायचं काम करते हे त्याने जनतेला पटवून दिलं. गद्दाफी ने लष्करी क्रांती घडवून सत्ता ताब्यात घेतली. १ सप्टेंबर १९६९ या दिवशी लिबियात रक्तहीन उठाव झाला आणि राजे इद्रिस यांना पदच्युत करून गद्दाफी सत्तेवर आला. वयाच्या २७ व्या वर्षीच त्याने रक्तहिन क्रांती केली होती. सत्ता ताब्यात आल्या आल्या आपल्या सगळ्या विरोधकांना त्याने नेस्तनाबूत केले. अरब राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तेलाच्या राजकारणामुळे होत असलेला अमेरिकन हस्तक्षेप झुगारून देणार असल्याच तो ठासून सांगायचा. आपल्या शत्रूंना वठणीवर आणायचं असेल तर अण्वस्त्रानी सुसज्ज असायला हवं हे त्याच स्पष्ट मत होतं. नावापुरती लोकशाही लिबिया मध्ये आणून स्वतः तिथला कायमचा राष्ट्रप्रमुख बनला. विस्मरणात जात असलेल्या आपल्या ऐतिहासिक संस्कृतीला त्याने परत उजाळा देण्याचे काम केले. इतिहासातून पाश्चिमात्य प्रभावाला हटवून टाकले. धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून कट्टरवाद वाढवण्याच काम त्याने केलं. धर्माचा वापर आपलं राजकारण टिकून राहण्यासाठी केला. लिबिया वर अनेक वर्ष राज्य केलेल्या इटालियन आणि ज्यू वंशीय लोकांवर त्याचा विशेष राग होता. तो स्वतः नेहमी लिबियाच्या पारंपारिक वेशात राहायचा. राहायला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्या पेक्षा अरबी तंबू त्याला आवडायचा. फक्त हा तंबू अलिशान आणि बुलेटप्रुफ होता. तो ज्या ज्या देशात जाई त्या देशात पंचतारांकित हॉटेल मध्ये हा तंबू सुद्धा सोबत असे. सुरवातीला लिबियाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न दाखवणारा अवतारी पुरुष असल्याचा दावा करणारा गद्दाफी कधी देशाला विकणारा नेता बनला हे तिथल्या जनतेला सुद्धा कळालचं नाही. लिबियाचे संविधान बरखास्त करून आपल्या विचारधारेचे व पसंतीचे कायदे लागू केले. लिबियाच्या अर्थव्यवस्थेवर गद्दाफी कुटुंबीयांनी संपूर्ण ताबा मिळवला. लिबियन जनतेचे आयुष्य गद्दाफीच्या कारकिर्दीत अवघड व हलाखीचे होऊन बसले. गद्दाफीने लिबियातील प्रचंड खनिज तेल साठ्या मधून मिळणारा पैसा अण्वस्त्रे मिळवण्यासाठी वापरला व अनेक कट्टर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. जवळपास ४२ वर्ष लिबियावर गद्दाफीने राज्य केलं. त्याने दोन लग्ने केली होती, त्या शिवाय त्याची अनेक रखेली होत्या. तो बऱ्याचदा शाळा कॉलेजेसना भेटी देण्यासाठी जायचा. तिथे त्याला आवडेल अशा मुलीच्या डोक्यावर हात ठेवायचा. त्या रात्रीचं त्या मुलीला गदाफ्फीच्या अंतःपुरात पाठवण्यात येई. कधी कधी त्या मुलीच वय १३-१४ वर्षाचं असे. नकार देणाऱ्या मुलीना प्रचंड मोठी शिक्षा देण्यात येई. हे सगळ प्रकरण आतल्या आत दडपण्यात येई. 'इन गद्दाफीज हरम' या पुस्तकात या घटनांच पुराव्यासकट वर्णन करण्यात आलं आहे. त्याची मुलाखती घेण्यासाठी येणाऱ्या पत्रकार महिलांनाही तो सोडत नसे.
हॉलीवूडच्या मोठमोठ्या फिल्मस्टार्सना आपल्या वैयक्तिक कार्यक्रमाच्या निम्मिताने तो लिबिया मध्ये बोलावून घेई. यापैकी अनेक हिरोईन सोबत त्याने रात्र घालवली होती असे म्हणतात. पण अशा कार्यक्रमा मधून आपल्या श्रीमंतीचे आणि ताकदीचे प्रदर्शन करण्याचा त्याला चंद होता. एकदा एका फॅशन शोच्या कार्यक्रमात त्याने भारतीय मॉडेल्सना बोलावून घेतले होते, यामध्ये तेव्हा अजून स्टार नसलेली कॅटरीना कैफ, नेहा धुपिया, अदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता. पण सगळ्यात फेमस त्याच्या बॉडीगार्ड महिला होत्या. पाश्चात्य पत्रकारांनी अमेझॉनीयन गार्डस असे ज्यांचे वर्णन केले आहे अशी ४० मादक महिलांची एक टीम गद्दाफीच्या रक्षणासाठी तैनात असायची. या मुलींची नियुक्ती स्वतः गद्दाफी करायचा. असं म्हणतात की, या सर्व मुली कुमारी असायच्या. त्यांना मिल्ट्री अकॅडमी मध्ये खास प्रकारचे कमांडो ट्रेनिंग दिलेलं असायचं. गद्दाफी जिथे जिथे जाईल तिथे सावली प्रमाणे या टीम मधल्या आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशा १५ मुली त्याच्या सोबत असायच्या. मात्र, या हुकूमशाहने आज पर्यंत जगातील कोणत्याही हुकूमशाहला शक्य झाले नाही असा अद्भुत करिश्मा केला होता. लिबियाच्या वाळवंटात कृत्रिम नदी द्वारे गोड पाण्याचा प्रवाह वाहता करून गद्दाफीने जगातील आठवे आश्चर्य निर्माण केले होते. लिबियाच्या वाळवंटातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाइप जोडून २८२० किलोमीटर लांबीचे नेटवर्क तयार केले होते. त्यामध्ये न्यूबियन सँडस्टोन अॅक्विफर सिस्टिम फोसील द्वारे पिण्याचे पाणी येत होते. हे जगातील सर्वात मोठे पाइपचे भूमिगत नेटवर्क होते. या नेटवर्क मध्ये १३०० हून अधिक विहिरी होत्या. या विहिरी पैकी काही विहिरी ५०० मीटर पेक्षाही जास्त खोल होत्या. ही कृत्रिम नदीच त्रिपोली, बेनगाजी आणि सिर्तसह लिबियाच्या अनेक शहरांना पाणीपुरवठा करीत होती. सप्टेंबर १९९६ मध्ये सुरू झालेली ही कृत्रिम नदी आता बंद झाली आहे. मात्र, नाटो फौजांचा गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यात हे आठवे आश्चर्य उद्ध्वस्त झाले आहे. २०११ च्या सुरुवातीस अरब जगतातील लोकशाहीवादी चळवळ अरब स्प्रिंग लिबिया मध्ये दाखल झाली व बंडखोरांनी लिबिया मधील गद्दाफीची सत्ता झुगारून देण्यास आरंभ केला. काही महिन्यांनी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात लपून बसलेला गद्दाफी २० ऑक्टोबर २०११ रोजी मारला गेला.
*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*