शालेय शिक्षण
June 10, 2025 at 03:21 PM
*❀ १० जून ❀*
*उद्योगपती राहुल बजाज जन्मदिन*
जन्म - १० जून १९३८ (कोलकाता)
स्मृती - १२ फेब्रुवारी २०२२ (पुणे)
‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज’ ही जाहिरात आठवत नाही असा एकही भारतीय असू शकत नाही. कारण १९८० च्या दशकात घरासमोर बजाज चेतक स्कूटर म्हणजे तो श्रीमंत माणूस असे समजले जायचे. या बजाज ग्रुपचे राहुल बजाज हे भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक उद्योजक, अर्थसहाय्यासह दुचाकी वाहन, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रील लॅम्प, पवनउर्जा, मिश्र धातू, स्टेनलेस स्टील, फोर्जिंग, प्रवास आणि जीवन विमा या क्षेत्रात त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. बजाज हा व्यावसायिक घराण्याचे संस्थापक राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे होते. त्यांच्या नंतर आलेल्या प्रत्येक पिढीने घराण्याची व्यावसायिक परंपरा पुढे नेत त्यात अधिक भर घातली. राहुल यांचे प्राथमिक शिक्षण कैथड्रल अँड जॉन कॉनन स्कूल मध्ये झाले. त्यानंतर सेंट स्टीफेंस कॉलेज मधून त्यांनी दिल्ली विद्यापीठाची अर्थशास्त्र (ऑनर्स) पदवी घेतली. मुंबई विद्यापीठाची लॉ पदवी घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून एम.बी.ए. केले. सन १९६५ मध्ये त्यांच्या हाती बजाज उद्योग समुहाचा कारभार सोपविला गेला. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वशैलीने प्रतिकुल परिस्थितीत बजाज घराण्याचा व्यवसाय वाढवला. १९८० मध्ये बजाज ही स्कूटर निर्मिती मधील एकमेव कंपनी होती. त्यांच्या चेतक या स्कूटरला एवढी मागणी होती की, या स्कूटर करिता १० वर्षांसाठीचा वेटिंग पिरीयड होता. पाच सहा वर्षानंतर स्कूटर करिता नंबर लागल्यावर ग्राहकाला स्कूटर मिळायची, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावत नसे. राहुल बजाज अनेक कंपन्यांच्या अध्यक्षस्थानी होते. आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांची २००६-२०१० या कालावधी करिता राज्यसभेकरिता खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच आय.आय.टी. रुकडी सहित ७ विश्वसविद्यालयांचे डॉक्टरेट ही मानद पदवी देखील प्रदान करण्यात आली आहे.
१९९० च्या दशकात भारतात उदारीकरणाचे वारे सुरु झाले आणि बजाज उद्योग समुहासमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा राहिला. उदारीकरणामुळे आयात स्वस्त झाली आणि प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला सुरुवात झाली. साहजिकच सरकारच्या या धोरणाला राहुल बजाज यांनी विरोध केला. अचानक बाजारपेठेत वेगवेगळ्या मोटारसायकल उपलब्ध झाल्याने, स्कूटरची मागणी घटू लागली आणि याचा बजाज ग्रुपवरही परिणाम झाला. आर्थिक आणि व्यापार क्षेत्रातील राहुल बजाज यांचे योगदान पाहता त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यात २००१ मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण, हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून माजी विद्यार्थी अचीव्हमेंट पुरस्कार, नवभारत टाइस्म, अर्न्स्ट अँड यंग, सीएनबीसी टी.व्ही. १८ तर्फे लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कार, फ्रान्सच्या राष्ट्रपती कडून ’नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ म्हणून नियुक्ती, भारत सरकारतर्फे १९७५ ते १९७७ दरम्यान ऑटोमोबाईल उद्योग विकास परिषदेचे अध्यक्षपद, १९७५ मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता संस्थेतर्फे ‘मॅन ऑफ द इयर’, १९९२ मध्ये प्रिंन्स ऑफ वेल्सने त्यांना ‘प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिजनेस लीडर्स फोरम’ च्या सदस्यपदी आमंत्रित केले. एफ.आय.इ. फाऊंडेशन तर्फे १९९६ साली राष्ट्रभूषण पुरस्कार, लोकमान्य टिळक स्ट्रट तर्फे २००० साली मिळालेला टिळक पुरस्कार. १९८६ ते १९८९ च्या दरम्यान इंडियन एयरलाइन्सचे अध्यक्षपदही राहुल बजाज यांनी भूषविलेले आहे. तसेच २००३ ते २००६ दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे अध्यक्ष व सदस्य राहण्यासोबतच हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. बजाज समुहाच्या उत्कर्षामध्ये राहुल बजाज यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही सामाजिक जाणिवेतून सुरु करण्यात आलेल्या जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि शिक्षण संस्थेद्वारा भारतीय युवा शक्तीा ट्रस्ट आणि पुणे येथील रुबी हॉल क्लिानिक चालविले जाते.
*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*