शालेय शिक्षण
June 11, 2025 at 01:16 AM
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*⏹️ प्रतिकारशक्ती वाढीसाठी घरगुती उपाय*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
काही छोट्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकतो. घराच्या घरी सहज उपलब्ध होतील अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या बाबत जाणून घेऊया.
*आवळा* : आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरावळा, कॅन्डी या स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
*तुळस* : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर तुळशीची ४ ते ५ पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
*साजूक देशी तूप* : कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धा चमचा तूप आवर्जून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमचा तूप करतं ती या पदार्थांना जमत नाही.
*लिंबू* : लिंबात मोठ्या प्रमाणात क-जीवनसत्त्व असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूच खावं, लिंबाचं लोणचं नव्हे.
*नाचणी सत्व* : दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहरीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वात सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्व दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं. नाचणीची भाकरी आवर्जून खावी.
*बीट* : दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळ्याचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाच वेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, ॲंन्टि ऑक्सिडंटस् मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे, त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटचा समावेश असायलाच हवा.
*शुद्ध पाणी* : आरोग्याच्या दृष्टीनं पाण्याचं महत्त्वं खूप आहे. तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक, नारळपाणी, ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही, तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकते पेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.
*दूध-हळद* : रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेक जण साखर घालतात. पण तसं करू नये. तसेच लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काड्याच वापराव्यात.
*दही आणि ताक* : रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्या नंतर शिल्लक राहणाऱ्या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यात खडीसाखर घालावी.
*गुळाचा खडा* : घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडीसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करते.
*खडीसाखर* : लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या ॲक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडी साखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून अवश्य द्यावी.
*डॉ. रासकर*
*नवजीवन हेल्थ केअर, कोल्हापूर*
👍
2