Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
May 14, 2025 at 12:09 PM
आत्मपरीक्षणाची आवश्यकता! "आयुर्वेद दिवस" ही संकल्पना जाहीर झाली ती राष्ट्रीय पातळीवर. योग दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो तसाच आयुर्वेद दिवसही व्हावा अशी इच्छा आमच्यासारख्या काही वैद्यांनी जाहीर बोलून दाखवली तसेच योग्य मार्गाने योग्य ठिकाणी पोहचवलीदेखील. काल जाहीर करण्यात आल्यानुसार इथून पुढे २३ सप्टेंबर हा "आयुर्वेद दिवस" साजरा करण्यामागे "जगभरात हा दिवस साजरा करण्यात अडथळे येऊ नयेत आणि सोयीचे जावे" हा उद्देश असल्याचं केंद्र शासनाने नमूद केलं आहे. हा दिवस जगभरात नेण्याच्या हालचालींना वेग का आला असावा? आयुर्वेद हा soft diplomacy चा भाग असल्याचं मी वेळोवेळी लिहिलं आहे. भारत हा पाश्चात्य वैद्यकाच्या औषधांचं उत्पादन करण्यात आघाडीवर असलेला देश आहे. मात्र जगातला एक मोठा टक्का पारंपरिक उपचार पद्धतीचा अवलंब करणारा आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत चालली आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वेनुसार आपल्या देशात सुमारे ९०% लोक दैनंदिन आयुष्यात आयुर्वेदाचा काही ना काही उपयोग करतात. जगाचा विचार करता हा आकडा वाढत आहे. गेली पाच वर्षे नियमितपणे करत असलेल्या ऑनलाईन / टेलीकन्सल्टेशन वरून याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत आहे. मात्र जगाच्या पाठीवर पारंपरिक उपचार पद्धती म्हटलं की त्याची आर्थिक उलाढाल पाहिल्यास क्रमांक एक चिनी पारंपरिक उपचार पद्धतीचा आहे. त्या खालोखाल आयुर्वेद असला तरी यातली तफावत फारच मोठी आहे. ही दरी २०३० पर्यंत अर्ध्याने कमी करण्याचा विद्यमान केंद्र शासनाचा उद्देश आहे. Attack where hurts ही नीती जशी शस्त्रास्त्र उत्पादनात “भारतीय” बनावट म्हणून वापरण्यात आली तसंच ड्रॅगनच्या औषध क्षेत्रातल्या वाटचालीचा सामना करण्यासाठी आयुर्वेद हा soft diplomacy चा भाग आहे. म्हणूनच यावर्षीपासून हा दिवस जगात अधिक पोहचवण्याचा मनसुबा असल्याचं शासनातल्या खात्रीलायक स्रोतांकडून कळलं. या दूरदृष्टीसाठी देशाच्या नेतृत्वाचं अभिनंदन करायलाच हवं! आत्मपरीक्षण कोणी आणि कुठे? – स्वतः शासनाने! हो…. केवळ दिवस साजरे करून किंवा विविध उत्पादने इतकंच मर्यादित राहिल्यास आपल्याला चीनी बाजारपेठेचा सामना करता येणार नाही. ज्या पातळीवर चीनमध्ये सरकार पैसे ओतून आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत समजतील असे रिसर्च पारंपरिक उपचार पद्धतीत करत आहे त्याकडे लक्ष आणि प्रयत्न असायला हवे. – आयुर्वेदीय वैद्यांनी; जगाच्या स्पर्धेत उतरायचं असल्यास जगाच्या भाषेत जितकं शक्य तितकं आपलं शास्त्र मांडता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडच्या कामांचे चोख पुरावे ठेवायला हवेत. जगात काय घडतंय आणि आपण त्यावर उत्तर कसं देऊ याकडे लक्ष द्यायला हवं. आमच्याकडे याच पद्धतीने काम सुरू असल्याने विविध प्रकारच्या गंभीर आणि दीर्घकालीन रोगांवर उपचार देणं आणि त्याला यशस्वीपणे इतरांसमोर मांडणं शक्य होत आहे. उदा. Autoimmune disease मध्ये सुई टोचल्यावर वाढ होणार हे आपण तीन वर्षांपूर्वीच सांगत होतो; आणि आज या अवस्थांवर आपल्याकडे भरपूर रुग्ण आहेत. दुसरं म्हणजे; आपण अधिकाधिक documented clinical काम करण्याकडे लक्ष द्यायला हवं. केवळ reels बनवून काम भागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाश्चात्य वैद्यकपेक्षा काय अधिक देऊ शकता हे सप्रमाण आणि भीडभाड न बाळगता सांगायला हवं. रामदेव बाबांकडून यातला थोडा धडा घ्यायला हरकत नाही! – “ठराविक” भाजप समर्थकांनी….सगळे नाही. निवडकच बरं! केंद्र शासन काहीएक दूरचा विचार करून धोरण आखत असताना जे समर्थक सातत्याने आयुर्वेदाबाबत नकारात्मकच नव्हे तर खिल्ली उडवणारं लिखाण करत असतात त्यांना अजूनही आपला अभ्यास वाढवण्याची आणि आयुर्वेदाला उपयुक्त ठरणारी कामं करण्याची ही चांगली संधी आहे. आयुर्वेदाला पाठिंबा देणारे अन्य लोकं याबाबत त्यांच्याशी चर्चा करू शकतात. – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही! हो हो; तुम्ही वाचकांनीही थोडंसं आत्मपरीक्षण करायला हवं की! तुम्ही दैनंदिन आयुष्यात आजारी पडू नये म्हणून आणि आजारी पडलाच तर उपचारांत पहिला पर्याय म्हणून आयुर्वेदाचा विचार करता का? तो करायला सुरू करायची हीच वेळ आहे. छे…..हे काही soft diplomacy वगैरे म्हणून सांगत नाहीये. भावनात्मक म्हणूनही सांगत नाहीये. पण आयुर्वेद ही प्रभावी, दुष्परिणाम / साइड इफेक्ट्स न करणारी आणि अतिशय वेळेत रिझल्ट देणारी भारतीय उपचार पद्धती आहे; म्हणून! गरज पडेल तिथे पाश्चात्य वैद्यकच कशाला? अगदी संगीत चिकित्सादेखील वापरायला हरकत नाही असं माझं मत आहे. त्यात कशाला उगाच इगो ठेवायचा? पण आयुर्वेद उपचार वेळेत घेतले तर अन्य कसली शक्यतो गरजच पडत नाही हा आजवरचा डोंबिवली, पुणे येथील प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि ऑनलाईन / टेलीकन्सल्टेशन मधून हजारो पेशंटचा अनुभव आहे. एकुणात काय? आयुर्वेदाचा हा अमृतकाळ आहे. मात्र आपल्या प्रत्येकाच्या त्यातल्या भूमिकेबाबत आत्मपरीक्षणाची ही सुसंधी आहे. – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
Image from Dr. Pareexit Shevde: आत्मपरीक्षणाची आवश्यकता!  "आयुर्वेद दिवस" ही संकल्पना जाहीर झाली ती रा...
👍 ❤️ 💯 😢 🙏 56

Comments