मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
May 20, 2025 at 09:20 AM
लग्नाच्या वाढदिवसाचा अनुषंग. आई म्हणाली,'बाळा, नवरीच्या अंगावं गुंजभर तरी सोनं लागातंच.!' म्हणून, ६४६८/- मंगळसुत्र (वर्मा ज्वेलर्स हडपसर, हप्त्यावर) येथून घेतलं. १० महिन्यात त्याचे पैसे फेडून टाकले. ३५० /- लग्नाचा शर्ट, मुलचंद येथून घेतला. ४५०/- प्यांट, मुलचंद. ७००/- आईला साडी, मुलचंद येथून. १३००/- वर्हाड टेम्पो गावडे मामांनी ठरवला. ६७५/- किरकोळ खर्च. ■ लग्नात घालतात असं सांगितलं म्हणून नरेंद्र झिंजाड (पुतण्या) ह्याच्याकडून कोट आणला. लग्नानंतर त्याला तो परत दिला. ० /- वरात खर्च (केलीच नाही त्यामुळे "फुग्यांचा (दारू) खर्चही वाचला) (त्यामुळे नवीन बेवडे तयार करण्याचे पातक आमच्या माथी लागले नाही, शिवाय त्या रात्री अख्खे गावही लाखोल्या न वाहता शांतपणे झोपी गेले) ०/- टोपी टॉवेलचा खर्च. कामाला जाताना जे कपडे घालायचो तेच कपडे हळदीसाठीही वापरले. तरी कुणाला काहीच समजले नाही. कुणाकडून आहेर घेतला नाही... कुणाला साडी नेसवली नाही. फेटा बांधला नाही. जागरण, गोंधळ अजूनही घातला नाही. लग्नासाठी फक्त ५ दिवस सुट्टी काढली. त्यात एक दिवस जाणे एक दिवस येणे धरून. दुसऱ्याची गाडी घेऊन नवरी दाखवायची म्हणून उगाच गावोगावी फिरलो नाही. ■ लग्न आहे म्हणून आईनी घर चांगलं शेणानी सारवून घेतलं होतं. चुलीला सुंदर पोतेरा दिला होता. उभ्या भिंतीही पांढऱ्या मातीनं आईनं सारवल्या अन जिथं आईचा हात पोहोचत नव्हता तिथं मी स्वतः हातात 'पोतेरा' घेऊन सारवल्या. फुटक्या खेटरी कौलांच्या जागी पत्र्याच्या डब्याची झाकणं कापून मी स्वतः बसवली. पावसात घर कमी गळावं म्हणून तो आमचा नेहमीचा उपाय होता. लग्नाच्या आदल्या दिवशी मावशा मुक्कामी आल्या होत्या. त्यांना मी म्हणालो, "तुम्हा तिघींनाबी मला पॉर झाल्यावं लुगडी घेईल, आता मातर मपल्याकं पैसे नाहीत". त्यांनी आईच्या काळजाने समजून घेतलं. त्यांच्या कम्बरेच्या पिशवीतून १००-१०० रुपये मला दिले. त्यांचीही तेवढीच श्रीमंती होती पण त्याच २०० रुपयात आईनं हळकुंडं आणि साखर आणली. ढांगाढोंगात लगीन केलं नाही तरी पोरं झाली. थोडी उशिरा का होईना झाली पण झालीच. देवाला प्रभा मिळाली. प्रभू+देवाचा संसार फुलला. पोरांचेही वाढदिवस आले अन गेले. केक मात्र कधीच कापला नाही. कापणारही नाही. घरच्या घरी औक्षण करणं व जिथं गरज आहे तिथे थेट मदत करणं हे माझं तत्व. मदत करत राहणार. बायकोनं माझ्यासारख्या पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरणाऱ्या माणसाला संभाळून घेतलं. मीठ मिरची खाऊनही प्रसंगी दिवस काढले. कधी कुठला हट्ट केला नाही. उंची कपडे, महागड्या मेकअपच्या कधीच ती नादी लागली नाही. बायको अन नवरा समविचारी असली की संसार कडेला जातो म्हणतात ते खरं आहे. सोबत आहोत.असू. प्रभा तुला लग्नाच्या एवढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! वाचनाचा वेग वाढत रहावा. फार लेक्चर काय कामाचे. सुरुवात स्वतःपासून करावी. थेट कृती करा. लग्न साधी करा, जास्त खर्च केला म्हणजे लोकं लई चांगलं म्हणत्यात असं काही नसतं. किंवा गावातली लोकं आपल्याला फार श्रीमंत समजतात असं नव्हे. शेवटी लोकं, आपलीच बंदी खाऊन आपल्याच बोकांडी बसायला तयार असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जगलं की माणूस सुखी होतो. राहतो. मोठा होतो. आम्ही आमच्या कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असं झालं असतं, नाही का? १९९९ ला पुण्यात आलोय तेव्हापासून बँक सोडली तर कुणापुढे कधीच हात पसरले नाहीत. बँक सोडून आजही माझ्यावर कुणाचं कर्ज नाही. आई म्हणायची, 'रीन काढून सण करणारे जिनगानीत कधीच म्होरं जात नाहयीत.' तेच तत्व आयुष्यभर पाळलं त्यामुळे पुण्यात प्ल्यास्टिकची बंदतुटकी पिशवी घेऊन आलेलो मी आज पुण्यात पोट भरू शकतोय... एवढंच सांगेन की, गरिबी आली तर अजिबात लाजू नका. श्रीमंती आली तर माजू नका.... जेवढे साधे रहाल तेवढे मोठे व्हाल हा मंत्र कुठल्याही चंगळवादी काळात आपल्याला जगवेल. - देवा झिंजाड देवटीप - आता अनेक कमेंट करणारी माणसं असं म्हणतील की जीवन एकदाच असतं, खर्च करायला काय हरकत आहे? माझं त्याबद्दल अजिबात दुमत नाही. ज्यांच्या खिशात पुरेसा पैसा आहे त्यांनी तो जरूर खर्च करावा पण आमच्याकडे पैसा नव्हताच. आमचं घर आमच्या लग्नाच्या वेळेसही पावसाळ्यात गळतच होतं. त्यामुळे आम्ही काटकसर करून लग्न साधेपणाने केलं. जर सुदैवाने आमच्याकडे त्यावेळेस पैसा जरी असता तरीही आम्ही आमचं लग्न अतिशय साधेपणानेच केलं असतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते ते करावे. काहीजण असे म्हणतील की लग्नात सासू-सासर्‍यांनी तुम्हाला चांगले कपडे घेतले नाहीत का? तर त्यांची खूप चांगली कपडे घ्यायची इच्छा होती परंतु लग्नात होणारे अनेक प्रकारचे अनावश्यक खर्च वाचवून ते पैसे आम्ही आमच्या संसारासाठी राखून ठेवले. त्याचा पुढे फायदा झाला. - देवा झिंजाड
Image from मराठी अपडेट्स - Marathi Updates: लग्नाच्या वाढदिवसाचा अनुषंग.  आई म्हणाली,'बाळा, नवरीच्या अंगावं गुंजभर...
❤️ 👍 5

Comments