
मराठी अपडेट्स - Marathi Updates
May 20, 2025 at 11:40 AM
जयंतराव नारळीकर आपल्यातून निघून गेले ही बातमी सकाळी ऐकली आणि खूप बेचैन झालो. याचं कारण विज्ञानातला खरं म्हणजे एक ध्रुवताराच निखळला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थानं विज्ञानावर संशोधन करणाऱ्यांपैकी आणि भारतात परत येऊन भारतामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि विवेकवादी तसंच विज्ञानवादी दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याला आपल्या सगळ्यांचा सलाम !
नारळीकर हे फक्त वैज्ञानिक नव्हते तर ते विज्ञान लेखक आणि साहित्यिकही होते. दुर्गा भागवतांनी त्यांच्या विज्ञानकथांचं खूप कौतुकही केलं होतं. त्यांचं यक्षाची देणगी हे पुस्तक वाचून मी खूप भारावून गेलो होतो. त्यानंतर त्यांची टाईम ट्रॅव्हल, अवकाशातले स्फोट अशा अनेक विषयांवरची
पुस्तकं वाचली. मग त्यांच्या कादंबऱ्या झाल्या. त्यांनी मराठी साहित्यात एवढी भर घातली की 2021 सालचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
पण खरं त्यांचं योगदान हे विश्वविज्ञान किंवा कॉस्मोलॉजी याविषयीचं होतं. नारळीकर केंब्रिजला गेले, तिथे रँगलर झाले, फ्रेड हॉईल या तिथल्या प्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलं आणि त्यांच्याचबरोबर हॉईल- नारळीकर थेअरी मांडली. गेल्या शतकात विश्वनिर्मितीच्या विषयी दोन महत्त्वाचे विचार किंवा थेअरीज निर्माण झाल्या. एक म्हणजे बिग बँग आणि दुसरी म्हणजे स्टेडी स्टेट. बिग बँगच्या थेअरीप्रमाणे विश्व एका बिंदूपासून स्फोट होऊन निर्माण झालं आणि ते प्रसरण पावत राहिलं. पण त्याविरुद्ध हॉईल आणि नारळीकर स्टेडी स्टेटची थेअरी मांडत होते. काही दशकं हा वाद खूपच रंगला. पण शेवटी 1970 च्या दशकात बॅकग्राऊंड मायक्रोवेव्ह नॉईज अमेरिकेतल्या न्यू जर्सी मध्ये सापडला आणि त्यामुळे बिग बँगची थेअरी सिद्ध झाली असं कित्येक वैज्ञानिक मानायला लागले.
प्रत्यक्षात नारळीकरांची थेअरी किती बरोबर आणि किती चूक यापेक्षा त्यांच्या संशोधनाचा स्तर हा आंतरराष्ट्रीय कॉस्मोलॉजी मध्ये किती मोठा होता हे आपल्या लक्षात येईल. आणि एवढ्या मोठ्या माणसानं मराठीवर प्रेम म्हणून मराठीमध्ये अनेक पुस्तकं लिहिली. त्यांचं 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. इतक्या सोप्या मराठी भाषेत कॉस्मोलॉजी सामान्यांना कळेल अशा भाषेत सांगणं म्हणजे काही चेष्टा नव्हती. मी किमयागार लिहिताना नारळीकरांमुळे खूपच प्रेरित झालो होतो.
1972 साली इंदिरा गांधींच्या आग्रहामुळे नारळीकर भारतात परत आले आणि त्यांनी या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी खूप मोठी कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. प्रथम टी आय एफ आर आणि नंतर आयुका अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट तर्हेनं अध्ययन आणि संशोधन या दोन्ही बाबतीत प्रचंड काम केलं. अर्थातच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण अशा अनेक सन्मानांनी भूषवलं यात काही नवल नव्हतं.
त्यांचा साधेपणा मला नेहमी भावायचा. आयआयटीनंतर एक वर्षभर मुंबईमध्ये मी जी भटकंती केली त्यात टी आय एफ आर मध्ये सुद्धा अनेकदा मी जायचो. त्यावेळेला नारळीकर तिथे अनेकदा दिसायचे. मुंबईला आकाशवाणीच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचं एकदा भाषण होतं. अतिशय शांतपणे बोलणं आणि अवघड संकल्पना सोप्या करून सांगणं हे मला आयुष्यभर खूपच महत्त्वाचं वाटलं आहे. कॉस्मोलॉजी आणि गणित यात तर त्यांची मास्टरी होतीच पण त्याशिवाय त्यांना अनेक विषयात रस असायचा. एकदा त्यांचा मला असाच फोन आला. ते म्हणाले "अच्युत, तुझं अर्थात हे पुस्तक आत्ताच वाचून संपवलं. अर्थशास्त्रावरती मराठीमध्ये इतकं सोपं आणि सुंदर पुस्तक मी अजून वाचलेलं नाही." आणि यानंतर ते बराच वेळ बोलत राहिले. माझा ऊर तर भरून आलाच, पण मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटत राहीलं. एवढा मोठा वैज्ञानिक अर्थशास्त्रसारख्या विषयात रस घेतो, मन लावून ते पुस्तक वाचतो आणि नंतर लेखकाला त्याची दाद आणि पावतीही देतो हे मी कधीही विसरणार नाही.
ज्योतिषाविषयी त्यांची मतं खूप परखड होती. (खरं म्हणजे विवेकानंदांची सुद्धा तेवढीच परखड मतं होती हे कित्येकांना माहीत नसेल. यासाठी दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचावं). यामुळे नारळीकरांना श्रद्धांजली जर का द्यायची असेल तर आपण यापुढे अंधश्रद्धेला बळी पडणार नाही आणि वैज्ञानिक आणि विवेकवादी दृष्टिकोन अंगीकारू अशी आपण शपथ घेतली तर ती खरी श्रद्धांजली ठरेल.
अच्युत गोडबोले
❤️
🙏
👍
9