मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
June 10, 2025 at 01:19 PM
नाश्त्यासाठी एखादं चांगलं साऊथ इंडियन रेस्टॉरेंट कसं असावं, याबाबतीत माझे अगदी साधे सोपे निकष आहेत: १. साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की इडली, मेदूवडा, डोसा, उत्तपम, उपमा, पिवळा किंवा केशरी रंगाचा शिरा, फिल्टर कॉफी… इतकेच पदार्थ डोळ्यासमोर येतात. ते सगळेच पदार्थ त्या रेस्टॉरेंटमध्ये नाश्त्याच्या वेळी तयार असायला हवेत. म्हणजे “आता इडली मिळेल, वड्याला अजून वेळ लागेल “, अशी वाक्ये कानावर पडायला नकोत. २. दाक्षिणात्य खाण्यात सांबराला अतिशय महत्व आहे. सांबार गोड नसावा. खूप तेलकट नसावा. मोहरी, कडीपत्ता, तिखट लाल मिरची, हिंग, यांची छान फोडणी घातलेला असावा. पहिल्या घासातच त्या सांबाराचा ठसका लागायला पाहिजे. इडलीचा मठ्ठपणा झाकायला सांबाराचं हे डॉमिनेटिंग असणं फार आवश्यक आहे. इडली सांबराची जोडी म्हणजे डॅशिंग नवरा आणि त्याच्याबरोबर असणारी त्याची मंद बायको अशी आहे. ३. दाक्षिणात्य खाण्यात पांढरी चटणी आवश्यक आहे. पांढऱ्या चटणीत मुख्य स्वाद हा नारळाचा असावा. मिरची, शेंगदाणे वगैरे टाकण्यात काहीच हरकत नाही. पण त्याने नारळाशी स्पर्धा करू नये. टोमेटो चटणी जरी असेल, तरी त्यात प्रामुख्याने नारळच उठून दिसावा. अगदी एखाद्या फोटोमध्ये शेठ उठून दिसतात, तसंच! ४. मसाल्या दोश्याबरोबर जी बटाच्याची भाजी देतात, त्यात बटाटे भरपूर उकडून छान कुस्करलेले असावेत. भाजीत गरम मसाला वगैरे घालू नये. गाजर, टोमेटो वगैरे तर अजिबात घालू नये. म्हणजे भाजीने स्वतःला ‘ मसाला ‘ म्हणवून सुद्धा ती भाजी बऱ्यापैकी साधी असावी. म्हणजे इन्फोसिसच्या अगदी विरुद्ध! ५. उत्तपमची जाडी ही दोश्याच्या जाडीपेक्षा किमान तीसेक पट असावी. दोसा आणि उत्तपम यातील फरक स्पष्टपणे जाणवावा. अर्थात खाणाऱ्याला! त्यावरील कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यांचं प्रमाण हे भाज्यांच्या दरांवर अवलंबून नसावं. ६. सांबार आणि चटणी, हे दोन्ही अनलिमिटेड असावं. एक्स्ट्रा मागवलं, तर त्याचे पैसे लावू नयेत. खायला चमचे द्यावेत. काटे देऊ नयेत. काट्याने सांबार खाणं फार कठीण जातं. ७. उपमा हा साऊथ इंडियन स्टाईलचाच असावा. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, बिन्स, शिमला मिरची, फ्लॉवर अशा अनेक परस्परांशी काही खास संबंध नसलेल्या भाज्या रव्यात अगदी निर्विकारपणे एकत्र बांधलेल्या असाव्यात. साउथचा उपमा बघून अगदी इंडिया आघाडीची आठवण व्हावी. उपमा म्हणून फोडणीचा रवा देऊ नये. ८. शेवटी कॉफी मागितल्यावर फ़िल्टर कॉफीच द्यावी. बोनव्हिटा सारखी इन्स्टंट कॉफी देऊ नये. कॉफी चांगल्या ब्रँडची असावी. ग्लास मध्ये फेसाचं प्रमाण २०% असावं. थोडी कडू, थोडी गोड अशी कॉफी घेतल्यानंतर आपलं आयुष्यही अगदी कॉफीसारखं असावं, असा एखादा काव्यात्मक विचार मनात यावा. _ Aproov Kulkarni
Image from मराठी अपडेट्स - Marathi Updates: नाश्त्यासाठी एखादं चांगलं साऊथ इंडियन रेस्टॉरेंट कसं असावं, याबाबतीत म...
👍 ❤️ 😂 6

Comments