मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
June 16, 2025 at 07:21 AM
खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा मी विवेकानंदांची पुस्तके मोठ्या भक्ती भावाने वाचत असायचो. एकदा वाचता वाचता अचानकच मला वैराग्य आले. अन उद्याच्या उद्या घरदार सोडून पाथर्डीतून डायरेक हिमालयाची एस्टी पकडून निघून जायचे असे ठरवले. जायला खर्ची लागंल म्हणून आजीच्या पोतड्यातून पस्तीस अन आईच्या पिशवीतून दिडसे रुपये चोरून घेतले. सोबतीला फक्त एक भगवी लुंगी ठेवायची असं ठरवलं. बास. जेवन तर मागूनच खायचे होते. बाकी अंगातले शर्ट पॅन्ट हिमालयाजवळ गेल्यावर काढून टाकायचे ठरवले. निघालो. जाताना एकसारखं भरून येत होतं. आई -वडील, आजी- आजोबा, बहीणी यांच्याशी न कळत निर्वाणीचं बोलून घेत होतो. ते मात्र नेहमीप्रमाणे आपापल्या कामात मश्गूल होते. त्यांना कळत नव्हते की आपला मुलगा आता आपला राहिला नाही. तो साऱ्या जगाचा झालेला आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याने आपले सर्व जीवन अर्पित केलेले आहे. असो. त्यांना काय कळणार? ते सांसारिक सुखाच्या छ्टाकभार मोह मायेत अडकलेले शुद्र जीव! ईश्वर त्यांना सद्बुध्दी देवो! स्वतःबद्दल काहीतरी भव्यदिव्य वाटत होते. त्याच झाकीत गाडीत बसलो. पाथर्डीत गेल्यावर आधी माझा आवडता वडापाव खाऊन घेतला. पाथर्डीच्या वडापावची चवच अशी आहे की, दहा टक्के वैराग्य तिथंच गळून पडले. वरून एकशेवीस तिनसेचामावा मारला. माव्याच्या कीकने आणखी वीस टक्के वैराग्य कमी झालं. तिथेच सलमानच्या चोरी चोरी चुपके चुपकेचं पोस्टर लागलेलं. म्हटलं शेवटचा पिक्चर पाहून घेवू. थेटरमध्ये गेल्यावर आणखी वीस टक्के वैराग्य कमी होवून राणी मुखर्जीसारख्या पोरीसंग लगीन करायची आसक्ती वाढली. बाहेर आल्यावर मात्र हिमालयात जायचं जीवावर येवू लागलं. तिथं जास्त थंडी असते म्हणे, त्यात खायला नुसते कंदमुळे. शिवाय गुहांमध्ये साप वगैरे निघाले तर तिच्यामायला फुकट मरू ! कायच्या काय डोक्यात येवू लागलं. जाऊ द्या. पुढं कधीतरी जाता येइल म्हणून मुक्काम्या गाडीनं पुन्हा घरी आलो. तर आल्या आल्या आईने घर डोक्यावर घेत पैसे चोरल्याची कबूली घेतली. कबूली दिल्यावर दोन रट्टे हानले. वरून बापानेबी दणकून मुस्काडलं. त्यात उरलेलं पन्नास टक्के वैराग्य खाडकन उतरलं. तिच्यायला हे वैराग्य वाईटच राव. तव्हापास्नं काय ते कधी आलं नाही बघा. - Sudam Rathod
😂 🙏 😀 😜 16

Comments