
SwaRa "पुस्तक परिचय"
June 11, 2025 at 03:34 AM
*समाजातील अस्वस्थ घटनांवर आवाज उठवायला लावणारी कविता - 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे'*
तुहा जल्म झालता
तव्हा
चिमणीत घासलेट नव्हतं...
दुसऱ्या दिवशीच तुला पाह्यलं...
या ओळी वाचताना आत-काळजात लागतं... कवी देवा झिंजाड यांच्या 'घासलेट' या कवितेतील या ओळी आहेत.
फेसबुकवर ही कविता वाचली होती आणि मग या कवीच्या प्रेमात पडलो. या कवीला वाचावं असं वाटलं पण अजूनपर्यंत यांचं एकही पुस्तक नव्हतं. जेव्हा समजलं की त्यांचं पुस्तक येतंय, तेव्हा ते मागवलं आणि मग वाचायला सुरूवात केली....
समाजात आजूबाजूला होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या, कर्मठता, निसर्गाची होणारी अवहेलना, घरातले दारिद्रय, कष्टकरी आणि गरिबांचा होणारा छळ, न संपणारी भूक, मुली, स्त्रियांवर होणारा अत्याचार, भ्रष्टाचार, मातीचं भेगाळलेपण, स्त्रियांच्या प्रश्नांची वाढत चाललेली जठीलता अशा अनेक गोष्टींमुळे कवी अस्वस्थ होतात आणि म्हणतात 'हे सगळं उलथवून टाकायला पाहिजे' आणि अशा कविता या कवी देवा झिंजाड यांच्या 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' या काव्यसंग्रहात आहेत. याची प्रस्तावना कवियत्री कल्पना दुधाळ यांनी लिहलीय. काळ्या मातीला हिरवं करता करता आपल्या कवितांना बहरत ठेवणाऱ्या कल्पना दुधाळ यांनी 'सिझर कर म्हणतेय माती' आणि 'धग असतेच आसपास' हे दर्जेदार काव्यसंग्रह लिहले आहेत...
कवी देवा झिंजाड यांनी 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' या काव्यसंग्रहात 'अगतिकीकरण', 'भाकरायण' आणि 'हरवलेल्या हिरव्या बांगड्या' अशा तीन भागात कविता लिहल्या आहेत...
जागतिकीकरणात भरडली गेलेली सामान्य माणसे, शेतकरी वर्गाचे होणारे हाल 'अगतिकीकरण' या भागातील कवितांमधून पाहायला मिळतात... भाकरीचा, भूकेचा प्रश्न घेऊन जगणारी 'भाकरायण' इथे पाहायला मिळतात... आणि ज्यांचं सुखच हरवून बसलंय अशा स्त्रिया मग ती आई, बहीण, मुलगी वा कोणतीही तरुणी, बाई असेल यांच्या 'हरवलेल्या हिरव्या बांगड्या' या भागात कविता वाचायला मिळतात..
बाईचा जन्म हा बोरी, नांगरी, बांगडी, चुंभळीसारखा आहे अशा कवी उपमा देतात. चुंबळीसारखी बाई असते हे सांगताना कवी म्हणतात,
ती दबली जाते... ती दाबली जाते
भिजली जाते
थिजली जाते
विरली जाते
एकदा चपटी झाली की
कायमची अडगळीत फेकून दिली जाते
असंच तर बाईचं जीवन असतं चुंबळीसारखं...
आईवर अनेकांनी लिहून ठेवलंय. पुढेही लिहलं जाईल. पण प्रत्येकजण आई वेगवेगळ्या प्रकारे मांडत असतो. इथे लहानपणी कवी आईला म्हणतात भांडी विकू नकोस, अनवाणी चालू नकोस. मग आता आई म्हणते हे सगळं केलं म्हणून तर तुला शिकवता आलं आणि आज तू वर्तमानपत्र आणि टीव्हीत दिसतोस. आई कितीही अडाणी असली तरी आपल्या मुलांसाठी ती गुरू असते. संघर्ष करून, सर्व काही सोसून, अनुभवातून तिने पीएचडी केलेली असते. इथे कवी अंतःकरणापासून आपले आईवरचे प्रेम व्यक्त करतात. आणि म्हणून देवापेक्षाही आईला महत्त्व देताना कवी म्हणतात...
देव नाही देवळात नको श्रद्धेचा पसारा
चला जिवापाड जपू हा मायेचा देव्हारा
कवी ग्रामीण भागातून मोठे झालेत त्यामुळे शेतीशी त्यांची नाळ घट्ट आहे. शेतकरी उन्हा तान्हात स्वतःचं रक्त आटवून हिरवं रान पिकवतो. हे एसीत बसणाऱ्या टायघाल्यांना समजणार नाही. विमानात बसून परदेशी दौरे करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायला शेतातही दौरे काढायला हवेत. दुष्काळ आणि कर्जामुळे आत्महत्या झाल्यात, होतीलही पण माती कधीच आत्महत्या करीत नाही कारण तिला चिमण्यापाखरांचा संसार सांभाळायचा असतो आणि पोरीबाळींचे हात उजळायचे असतात. पुढे कवी म्हणतात आई आणि माती या दोन्ही एकसारख्याच असतात निस्वार्थी. दुष्काळामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात पण 'नांगर' कधीच आत्महत्या करत नाही. ही नांगर म्हणजे त्या शेतकऱ्याची बायकोसारखी आहे. कवी म्हणतात....
नांगरत राहते त्याच्यादेखत
स्वतःचं ऊर
अन् सावरत राहते त्याच्या स्वप्नातलं शिवार
तिच्या भुंड्या हातांनी...
साठ-सत्तर हजाराचे दागिने गळ्यात घालून मिरवणाऱ्यांना अक्षरांचा भार पेलत नाही. चार पाच गुंठे जमीन विकत घेतल्यासारखे शिकलेल्या चार पाच माणसांना विकत घेऊन ठेवतात. कारण अकलेपेक्षाही पाच पाच पट पैसा त्यांच्या खिशात आहे. अशा हातांत जर शैक्षणिक विकासाची सूत्रे दिलीत तर शिक्षणाचा विकास कसा होईल ? असा प्रश्न कवींना पडतो. एखाद्याचं वाईट झाल्याशिवाय राजकीय स्तरावरची माणसं दारी येत नाहीत. तसं झालं असतं तर लोकांवर वाईट वेळ यायची वाटच बघावी लागली नसती. डीजे लावून पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते आणि तत्त्वे उलटी टांगली जातात. या अशा लोकांच्या हाती सत्ता असेल तर वेगळं काय होणार ? असा कवीला प्रश्न पडतो... आता फुले, शाहू , आंबेडकर कुठून आणणार ! त्यांचे विचार आहेतच, आता आपण स्वतःपासून क्रांती केली पाहिजेत आणि सगळं उलथवून टाकलं पाहिजे...
भूक माणसाला खूप काही शिकवते. जग दाखवते. भूक नसल्याचं नाटक करून आई उपाशी राहते. मुलाला पोटभर जेवण देऊन आपण मात्र पाणी पिऊन झोपते. परिस्थितीने गरीब केलं असलं तरी ती विचाराने श्रीमंत असते. मुलांमध्ये संस्कार पेरते. राबून राबून मुलांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतः उपाशी राहत असे. या भूकेला, चतकोर भाकरीसाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाला कवीने जवळून पाहिले आहे. पोटात जाणारा घास कचऱ्यात दिसला की त्यांना चीड येते म्हणून म्हणतात...
तेव्हा होतात
अनंत वेदना आतड्याला
जेव्हा बघतो मी
शिळ्या भाकरीचे
श्रीमंत तुकडे
डस्टबिनमध्ये...
देशाचं भवितव्य ज्या तरुणांच्या हाती आहे असं आपण म्हणतो त्या तरुणांच्या हातात तर मोबाईल आहे. आणि या तरुण पिढीला मोबाईलमधून डोकं वर काढायला सवड नाही. आजूबाजूला काय चालले आहे याकडे या तरुणाचं लक्ष नाही. वासुदेव, नंदीबैल सारखे कलाकार आल्यानंतर त्यांना धान्य दिलं जायचं पण आताची पिढी तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरायचे कष्ट घेत नाही. आताच्या पिढीची हृदये काँक्रीटसारखी झाली आहेत. पिझ्झा, बर्गर खाणाऱ्यांना ज्वारी, बाजरीच्या भाकरीची चव समजणार नाही. पायांना घाण लागते म्हणून मातीत पाय ठेवणं टाळू लागतात. बुटात राहून यांचे पाय रिबॉक जातीचे झालेत आणि यांच्या जिभाच म्याकडोनाल्ड जातीच्या झाल्यात, असे कवी म्हणतात.
त्याच त्याच कविता म्हणत संमेलन गाजवणाऱ्या कवींवरही कवी चिडतात. तो करतो, ती करते म्हणून सगळेच कविता करायला निघालेत. यांच्या सादरीकरणाने, गोड सुरांवर रसिक हुरळून जातात, टाळ्या मिळतात. आईवर चांगली कविता लिहून स्टेज गाजवणाऱ्या कवीला शहराच्या मिठीत राहून गावाकडे आई वडिलांना दोन वेळच्या जेवणाची सोय करता येत नाही. स्टेजवर वाहवा मिळवणाऱ्या, इमानावर बोलणाऱ्या कवींचे स्टेज सोडलं की वेगळेच रंग असतात. अशा लोकांचे टोळके, गँग झाली आहे. ही लोकं कविता पाकिटात घालून विकतात, असे कवी म्हणतात.
अस्वस्थता ही निर्मितीमागची प्रेरणा आहे. आपल्या लेखनात आणि वागण्यात कृत्रिमता नसावी. म्हणून जे अस्वस्थ करतं त्यावर लिहलं पाहिजेत, आवाजही उठवला पाहिजे प्रसंगी सगळं उलथवून टाकलं पाहिजेत असं कवी म्हणतात. इथे काही कविता वाचताना आपल्याला हळव्या करून सोडतात... कवितेवर लिहताना कवी म्हणतात...
"आयुष्य स्वराज्यासाठी लावून पणाला आग्ऱ्याहून सुटते कविता..."
समाजाकडे बघत असताना कवी अस्वस्थ होतात, ही सर्व अस्वस्थता या संग्रहात वाचायला मिळते. सामान्यांच्या प्रश्नांवर कवी लिहतात. सर्वांनी वाचायला हवा असा हा संग्रह आहे...
वाचकांमध्ये क्रांतीचे विचार पेरणाऱ्या कवी देवा झिंजाड यांना पुढील लेखन आणि साहित्यिक प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा....
◆ काव्यसंग्रह - सगळं उलथवून टाकलं पाहिजे
◆ कवी - देवा झिंजाड
.
- हणमंत जयवंत पाटील
कालकुंद्री / चंदगड
मो. नं. - ९०११५२९३८८
#वाचू_पुस्तके
घरपोच पुस्तकासाठी
स्वरा बूक्स
9579824817
