शिवशक्ती प्रबोधन
शिवशक्ती प्रबोधन
May 24, 2025 at 07:49 AM
*सरंजामशाही माजाचा बळी वैष्णवी हगवणे* ---------------------------------------- १६ मे २०२५ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी गावात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले किंवा मारहाण करून ठार केले. वैष्णवी हगवणेच्या आई-वडिलांनी तिला लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार, सात किलो चांदीची भांडी हुंडा म्हणून दिली होती. याशिवाय लग्नात इतर खर्च किती झाला असेल त्याची गणती नाही. समाजात, सोशल मीडियात या प्रकरणावरून प्रचंड असंतोष दिसतो आहे. वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, तिचा अनन्वित छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्व लोकांची इच्छा आहे. लोकांचा हा राग अगदी बरोबर आहे, परंतु लोक समस्या तयार झाल्यानंतर राग व्यक्त करतात, पण समस्येच्या मुळाशी कधीच जात नाहीत. समस्येच्या मुळाशी जायचे तर आत्मपरीक्षण करावे लागते आणि लोक स्वतःचे दोष कबूल करण्यास कधीच तयार नसतात, म्हणून ते कोणत्याही समस्येच्या मुळाशी न जाता वरवर बोलतात.आता आपण मूळ समस्येचा विचार करू या. महाराष्ट्रात, देशभरात हुंडा ही मोठी समस्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हुंडा प्रथेमुळे अनेक नवविवाहितांचे सासरच्या लोकांकडून छळ, हत्या व आत्महत्यांची प्रकरणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे सरकारने कायद्याने हुंडा प्रथेवर बंदी घातलेली आहे, तरी पण हुंड्याची प्रथा संपलेली नाही. तात्विकदृष्ट्या सर्वजण हुंडा प्रथा चुकीची असल्याचे कबूल करतात. पण कुणीही ती सोडायला तयार नाही. सर्वच सामाजिक रुढी प्रथांच्या बाबतीत असेच होते, लोकांना ते चुकीचे असल्याचे कळते पण वळत नाही. आज हुंडा प्रथेचे स्वरूप थोडे बदलले आहे. पूर्वी लग्न जमवताना ओढाताण करून हुंडा दिला व घेतला जायचा. आज बहुजन समाजात काहीसी आर्थिक सुस्थिती आल्याने हुंडा स्वखुशीने दिला घेतला जातो. आज मुलाकडचे हुंडा मागत नाहीत, फक्त लग्न व्यवस्थित करा एवढेच सांगतात. व्यवस्थित म्हणजे चांगले १०- १५ पक्वान्नाचे जेवन, सुपारी, साखरपुडा, मेहंदी, हळद, महागडा बस्ता, मानपान, साड्या, फेटे, समारंभाचा एसी हॉल, डीजे, घोडा, गायन पार्टी, प्री-वेडिंग शूटिंग, डिजिटल स्क्रीन, अत्तराचा ड्रोन, वरात, जेवणावळी या साऱ्या गोष्टी न मागता अपेक्षित असतात. महाराष्ट्रात हुंडा प्रदेशानुसार कमी जास्त असतो. कोकणात हुंडा प्रथा जवळपास नाहीच, पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने कमी हुंडा घेतला जातो, खानदेश व मराठवाड्यात प्रचंड हुंडा दिला घेतला जातो. अलीकडे सोने महाग झाल्याने पूर्वीइतके सोने दिले जात नाही. पण छुप्या पद्धतीने हुंडा चालूच आहे, थांबलेला नाही. गरीबाचे लग्न किमान पाच लाख, मध्यमवर्गीयांचे दहा लाख व श्रीमंतांच्या लग्न खर्चाची गणतीच नाही. लग्नात जेवढा खर्च मुलीकडच्यांना होतो, जवळपास तेवढाच मुलांकडच्यांनाही होतो. हुंडा घेऊन कोणत्याही मुलाचा बाप श्रीमंत होत नाही. मुलाच्या बापाने सोने रुपात पाच लाख हुंडा घेतला तरी त्याचा खर्च दहा लाख होतो. लग्नात एकंदरीत दोन्ही बाजू तोट्यात असतात. प्रथा परंपरांमुळे दोन्हीकडचे लोक खड्ड्यात उड्या टाकतात. लग्न आयोजनासाठीचा लग्न घरच्यांचा व भाऊबंदांचा वेळ, हजारो वऱ्हाडींचा वेळ याची गणतीच केली जात नाही. शेतकरी म्हणतात की लग्न एकदाच होते, हौस मौज करून घेऊ द्या. एका दिवसाच्या हौस मौजेसाठी अनेक वर्षांची कमाई खर्च केली जाते, डीजेसारख्या विकृतीला प्रतिष्ठा दिली जाते. दोन्हीकडच्या पार्ट्या मिळून लग्नासाठी २५ ते ५० लाख रुपये खर्च करतात. मुलगा मुलगी शहरात नोकरीला असतील तर त्यांना टू बीएचके फ्लॅटसाठी किमान एक कोटी रुपये लागतात. लग्नासाठी २५ ते ५० लाख रुपये खर्च केलेले हे पती- पत्नी एक कोटी कर्ज अधिक एक कोटी व्याज मिळून दोन कोटी रुपये आयुष्यभर नोकरी करून बँकेत भरतात. पुढे मुलांना महागड्या खाजगी शाळेत शिकवण्यासाठी दरवर्षी लाख रुपये फी भरतात. लग्नाच्या एका दिवसाच्या खोट्या हौस व प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर कर्ज आणि ओढाताण सहन करावी लागते, याचे भान अज्ञानी शेतकऱ्यांना नाही. लग्नावर प्रचंड खर्च करणारे हेच शेतकरी दुसऱ्या बाजूला सातत्याने शेतमालाच्या बाजारभावाचे रडगाणे गात असतात. सध्या शेतीच्या अनेक समस्या गंभीर बनल्या आहेत. वाढलेले मजुरीचे, खतांचे, कीटकनाशकांचे दर आणि दुसरीकडे शेतकरीविरोधी, बनिया- भांडवलदार धार्जिण्या शासकीय धोरणांमुळे शेतमालाचे घसरणारे दर यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. खर्चिक रूढी प्रथांच्या बाबतीत ब्राह्मण बनियांचा आदर्श बहुजनांनी घेतला पाहिजे. ब्राह्मण बनिया जाती खोट्या प्रतिष्ठेसाठी खरा पैसा खर्च करीत नाहीत. खानदेशात एक म्हण आहे, "घरात दाना, भिल उताणा!" आदिवासींना दोन वेळचे खायला मिळाले की ते भविष्याची चिंता न करता पोटापुरते काम करून संपत्तीचा संचय न करता आराम करतात, पैशामागे धावत नाहीत, परंतु त्यामुळे त्यांचे दारिद्र्य पिढ्यान पिढ्या चालू राहते. शेतकरी लग्नात लाखो रुपये खर्च करून कर्जबाजारी होऊन कर्ज फेडत बसतात, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले असते. शेतकरी आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी गांजलेला असतो. त्याला जोडी खर्चिक समारंभांची मिळाल्याने तो आणखीच गाळात जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, "किती सांगो तरी नाईकति बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील!" सुधारणेच्या गोष्टी सांगितल्या की लोक म्हणतात "हो तुमचे बरोबर आहे" आणि कृतीच्या वेळी माघार घेतात. एकीकडे देवधर्म, तीर्थयात्रा, अध्यात्म, कीर्तन प्रवचने, पारायणे, हरिनाम सप्ताह यांच्या धुडगूस चालू असतो, तर दुसरीकडे खोट्या व पोकळ प्रतिष्ठेच्या गोष्टी प्रचंड खर्च करून धुमधडाक्यात चालू ठेवतात. तुकोबा म्हणतात, "पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण!" आपला पोकळ प्रतिष्ठेचा, जातीचा अभिमान जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण कर्मकांडी धार्मिक असतो, अध्यात्मिक नसतो. संतांच्या विचारानुसार अध्यात्मिक असणे म्हणजे अहंकार जाणे होय. शेतकऱ्यांचे आपसातील भाऊबंदकीचे वाद, कौटुंबिक व शेतीच्या कोर्टकचेऱ्या, खर्चिक समारंभ एकीकडे आणि दुसरीकडे तीर्थयात्रा, हरिनाम सप्ताहांचा पसारा, ही प्रचंड मोठी विसंगती आहे. बहुजनांबद्दल बोलताना मराठ्यांबद्दलही बोलले पाहिजे. कारण महाराष्ट्रात मराठा बहुजनांमध्ये लीडिंग रोल करतो. जातीच्या उतरंडीनुसार ब्राह्मणांचे अनुकरण बनिया, राजपूत, शेतकरी जाती करतात, तसे मराठ्यांचे अनुकरण दलित व ओबीसी करतात. मराठे सुधारले तर बहुजन सुधारतील आणि मराठे बिघडले तर बहुजन बिघडतील, असे सामाजिक सूत्र आहे. आता मराठ्यांनी पाटील, देशमुखीच्या जातीय अहंकारातून बाहेर पडले पाहिजे. मराठे जर सरंजामदार, उच्च कुळीचे आहेत तर मराठ्यांना आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे का काढावे लागतात? कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या का होतात? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठ्यांचे प्रमाण सर्वाधिक का आहे? मराठा शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावासाठी, विजबिल माफीसाठी व कृषी कर्जमाफीसाठी मोर्चे का काढावे लागतात? शिवजयंतीला आणि लग्नात डीजेपुढे बेधुंद नाचून मराठ्यांच्या- बहुजनांच्या समस्या सुटणार नाहीत. अस्मानी व सुलतानी संकटे तर आहेतच, पण किमान पोकळ प्रतिष्ठेच्या नावाखाली स्वतःहून समस्या निर्माण करू नयेत. मराठ्यांच्या जातीय श्रेष्ठत्वाबद्दल बोलायचे झाले तर ज्या वैष्णवी हगवणेच्या निमित्ताने हा लेख लिहिला जात आहे त्याचेच उदाहरण घेऊ. हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेचे सासरचे आडनाव हगवणे तर माहेरचे कस्पटे आहे. हगवण हा एक पचनाचा आजार आहे व हगवण हा तिरस्करणीय शब्द आहे. कस्पट म्हणजे काडी कचरा, कागदाचा तुकडा, कापडाची चिंधी, छोटी क्षुद्र व तुच्छ वस्तू होय. (खरे तर सर्वच मराठा व बहुजनांनी आपली हगवणे, हागे, बुळकुंडे, कस्पटे, वाकडे, आंधळे, तिरळे, उताणे, सरपटे, भोंगळे, चाटे, उंदरे, मांजरे, बकरे, माकडे, गायतोंडे अशी क्षुद्रत्वदर्शक आडनावे बदलून घेतली पाहिजेत) ब्राह्मणी धर्मसूत्रे व मनुस्मृतीने ब्राह्मणांची आडनावे विद्या व सन्मानदर्शक, क्षत्रियांची शक्ती, शौर्य व सत्तादर्शक, बनियांची संपत्तीदर्शक व शूद्रांची हिनत्वदर्शक असावीत" असे सांगितले आहे. तरी बहुजन समाज ब्राम्हणी धर्माचा व ब्राह्मणांचा सोगा सोडायला तयार नाहीत. मराठा अस्पृश्य नसले तरी ते ब्राह्मणी धर्मानुसार ते शूद्रच आहेत. फक्त ते दलित व ओबीसींच्या वर असल्याने त्यांना ते शूद्रत्व जाचक वाटत नाही. मराठे आपल्या नावापुढे 'पाटील', 'देशमुख' शब्द जोडून आपले शूद्रत्व झाकण्याचा प्रयत्न करतात. 'हागे पाटील' शब्दाला सन्मानदर्शक म्हणावे की अपमान दर्शक? मराठ्यांनी कितीही जातीचा अभिमान बाळगला तरी पण ब्राह्मण, बनिया, ठाकुरांच्या दृष्टीने ते शूद्र किंवा क्षुद्रच आहेत. शिवाजी महाराजांनी गागाभट्ट ब्राह्मणाला लाखो रुपयाची लाच देऊन क्षत्रियत्वाचे डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट घेतले होते. शिवरायांचे कास्ट सर्टिफिकेट डुप्लिकेट असल्याचा ठळक पुरावा म्हणजे त्यांचेच वंशज राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या ब्राम्हण राजपुरोहिताने वैदिक मंत्रांचा अधिकार नाकारला व त्या प्रकरणात राष्ट्रीय नेते ब्राह्मण टिळकांनी आपल्या जातीच्या राजपुरोहिताची बाजू घेतली होती. शिवरायांना मोगलांच्या दरबारातील जयसिंग व इतर राजपूत सरदार शूद्र कुणब्याचा मुलगा म्हणून तुच्छ लेखत होते. राजांचा ब्राम्हण मंत्री रामचंद्र पंत अमत्याने तर शिवरायांना भर दरबारात "आम्ही तुमच्यासारख्या शूद्राच्या हाताखाली काम कसे करावे" म्हणून सुनावले होते. त्यामुळे मराठा राज्याला उच्चवजातीय ब्राह्मण व राजपुतांची सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी शिवरायांना क्षत्रियत्वाचे डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट मिळवावे लागले. मराठ्यांना हत्ती होऊन लाकडे फोडण्यात आनंद वाटतो आणि मुंगी होऊन साखर खाण्यात कमीपणा वाटतो. दलितांनी बुद्धाचा व बाबासाहेबांचा बुद्धिवादी, विज्ञानवादी, मानवतावादी, समतावादी विचार स्वीकारून ते आज मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत. म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश झाले आहेत. याउलट अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विशाल मोगल साम्राज्याला टक्कर देऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांच्या जातीतील न्यायमूर्ती पी. बी. सावंत सोडता दुसरा मराठा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात झालेला नाही. मोगल सेनेला घाम फोडणारे संताजी व धनाजी घोरपडे, पानिपतापर्यंत तलवार गाजवणारे महादजी शिंदे यांच्या जातीतून भारताचा एकही सेनाप्रमुख आजवर झालेला नाही. प्रशासकीय सत्ता जाऊ द्या, पण महाराष्ट्रात ब्राह्मण फडणवीसांनी एका झटक्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम करून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. आता मराठे राजकीय नेतृत्वातूनही हद्दपार होत आहेत. त्यांच्यावर ब्राह्मण बनियांनी फेकलेले सत्तेचे तुकडे चघळण्याची वेळ आलेली आहे. लोक हुंडाबळी वैष्णवी हगवणे यांच्या सासरच्या लोकांना कठोर शिक्षा व्हावी असे म्हणतात, ती तर कायद्याने होईलच. परंतु त्याआधी वैष्णवीच्या माहेरच्यांना फासावर चढवले पाहिजे, तसा कायदा केला पाहिजे. वैष्णवीच्या मृत्यूला खरे जबाबदार तिच्या माहेरचे लोक आहेत. वैष्णवीच्या माहेरच्यांच्या पैशाच्या माजाने व जातीय अहंकाराने वैष्णवीचा बळी घेतलेला आहे. आपली ऐपत असो की नसो, कर्ज काढून, जमीन गहाण ठेवून असलेल्या किंवा नसलेल्या संपत्तीचे व खोट्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्याचा माज मराठ्यांना फार आहे. मुलीच्या सासरची माणसे किती का खत्रूड असेना पण श्रीमंत व सत्ताधीश असली पाहिजेत, असे अजूनही काही लोकांना वाटते. त्याला कारण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना हे आहे. लग्न जमवताना लोक ब्राह्मणाकडचे 36 गुण पाहतात आणि मानवी सद्गुणांकडे दुर्लक्ष करतात. मुलगी एकदा सासरी केली की सासरी तिचा कितीही छळ झाला तरी तिने माहेरी परतू नये, हा हट्ट जातीय श्रेष्ठतेतून येतो. म्हणून वैष्णवी ही जातीयतेचा पण बळी आहे. सारांश: मराठ्यांनी जातीश्रेष्ठत्वाच्या दंभातून बाहेर पडून, ब्राह्मणी धर्माच्या कालबाह्य रूढी परंपरांचा त्याग करून, बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या बुद्धिवादी व विज्ञानवादी विचारांचा अंगीकार केला नाही तर ही जात अनेक क्षेत्रातून मागे पडत जाईल आणि इतिहासातील मराठ्यांच्या पराक्रमाच्या आठवणी जागवण्याखेरीस त्यांच्या हातात काहीही राहणार नाही. ---------------------------------------- प्रा. बबन पवार,२३/०५/२०२५
👍 2

Comments