
शिवशक्ती प्रबोधन
May 28, 2025 at 10:41 AM
कशा रांगोळ्या काढता तुम्ही, घरंदाज व्यथांनो !
कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू, खुडता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी, रोज नव्या केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळघरातला अंधार प्रार्थणारी देवघरातली आंदणाची उभी समई, आतबाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आरत्या पुसट शब्दांच्या सुरांच्या वेणीत अर्थ गुंफून टाकून - तो अर्थ मी चाचपू पाहतो, पाहतो तेव्हा भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची फांदी न फांदी कावळ्यांनी काळीकुट्ट लदलेली असते.
कुणासाठी ही अबोल संथ वाटपाहणी ?
उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी तुमच्या आंगठ्यांची लवलव कुणासाठी?
किती दिवस... हे आरशालाच माहित असलेले तुमचे कोरीव कुंकवाच्या चांदणीखालचे पहाटचे फटफटीत कपाळ?
मलाही कळू द्या तुमची उभार दृष्टीघोळ जवळीक... न्हाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण
मलाही कळू द्या का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ सदा कपाळापर्यंत... ह्या आपल्याच आपल्याच घरात चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या भेसूर बायांनो ! माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी
भालचंद्र नेमाडे, 'देखणी' मधून