डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
June 16, 2025 at 10:03 AM
*दीड एकर शेवग्यापासून लाखोंची कमाई; शेंग नाही, पानांची पावडर ठरली गेमचेंजर, जाणून घ्या शेतकऱ्याने कसं केलं नियोजन?* *🌾डिजिटल शेतकरी🌾* सध्या शेतीमध्ये पारंपरिक पद्धतींपासून दूर जात अनेक शेतकरी नवे प्रयोग करत आहेत. अशीच एक प्रेरणादायक यशोगाथा आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी हणमंत लोंढे यांची. ते गेल्या 15 वर्षांपासून पारंपरिक पिकांची शेती करत होते, मात्र उत्पादन व नफा समाधानकारक नव्हता. त्यामुळे त्यांनी नवे पीक घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी शेवग्यासारख्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पिकातून मोठी कमाई केली आहे, ती सुद्धा केवळ शेंगांमधून नाही, तर पानांपासून बनवलेल्या औषधी पावडरीमधून! हणमंत लोंढे यांनी केवळ दीड एकर क्षेत्रात देशी शेवग्याची लागवड केली. शेवगा ही झाडं कमी पाणी, कमी देखभाल आणि हवामानाला सहन करणारी असल्याने दुष्काळग्रस्त भागातही ती सहज टिकते. शेवग्याच्या झाडापासून केवळ शेंगाच नाही, तर पाने, फुले, बिया आणि अगदी खोडाचा उपयोग देखील होतो. लोंढे यांनी शेवग्याच्या पानांपासून पावडर बनवण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी पाने कापल्यानंतर त्यातील खराब, किडलेली व पिवळी पाने वेगळी केली जातात. स्वच्छतेसाठी ही पाने गरम पाणी व मीठ टाकून धुतली जातात. त्यानंतर ती निर्जंतुक करून वाळवली जातात व शेवटी पावडर तयार केली जाते. ही पावडर 3 वर्षांपर्यंत टिकाऊ असते. शेवग्याच्या या उत्पादनाला औषधी गुणधर्म आहेत. हणमंत लोंढे यांनी 'शिवांजली फॉर्म ॲन्ड हर्बल' या नावाने फर्मची नोंदणी केली असून त्यांनी "फायटर मोरिंगा पावडर" या नावाने उत्पादन सुरू केले आहे. ही पावडर 50 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंतच्या पॅकमध्ये मिळते. बाजारात या पावडरची चांगली मागणी असून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉईड यांसारख्या अनेक आजारांवर ही उपयोगी असल्याचे सांगितले जाते. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. सध्या हणमंत लोंढे यांची पावडर सोलापूरसह पुणे, मुंबई, धाराशिव, सांगली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक, बेंगळुरू, हैदराबादसारख्या राज्यांमध्ये कुरिअरद्वारे ग्राहकांना पोहोचवली जाते. त्यांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ऑर्डर मिळतात. विशेष म्हणजे दीड एकर शेवग्याच्या प्लॉटमधून त्यांनी दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. हा नफा त्यांनी शेतात कोणताही मोठा खर्च न करता केवळ कल्पकतेच्या जोरावर मिळवला आहे. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
👍 1

Comments