
Weather Chat
June 17, 2025 at 05:42 AM
सोमवार दि. १६ जून २०२५
' मान्सून पुढे सरकला, परंतु पावसाचा जोर कोकणातच '
१- मान्सून-
तीन आठवड्यापासून जाग्यावरच खिळलेला मान्सून पुढे सरकला असुन त्याने नाशिक नगर संपूर्ण खान्देश मराठवाडा व विदर्भ सह जवळपास उत्तरेचा काही भाग वगळता महाराष्ट्र आज काबीज केला आहे.
२-पाऊस-
मान्सून जरी पुढे सरकला तरी त्याच्या प्रवाहात सध्या म्हणावा असा विशेष जोर नाही.
त्यामुळे बुधवार दि. १८ ते २५ जून पर्यन्तच्या आठवड्यात मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात मात्र जोरदार तर घाटमाथा व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
३- पेरणी-
ज्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या पावसाने भरपूर ओल आहे. आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अश्या शेतकऱ्यांना पेरण्या करावयाच्या असतील तर, अश्या खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार दि. १८ ते बुधवार २५ जून आमावस्या पर्यंतच्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यासह आपल्या विवेकावरच घ्यावा, असे वाटते.
सोयाबीन सारख्या पिकाला बक्कळ ओल व पूर्ण उतार होण्याची शक्यता असली तरी उतारानंतर सिंचन साधनाची उपलब्धता असेल तरच पेरणीचा विचार करावा असे वाटते. कारण खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात येत्या आठवड्यात सूर्यप्रकाशही जाणवू शकतो. शिवाय तुषार सिंचनासारख्या थुई-थुई पडणाऱ्या पावसाची शक्यता ही कदाचित ह्या १८ जिल्ह्यात ह्या आठवड्यात जाणवणार नाही, असे वाटते.
४- कश्यामुळे जाणवत, ह्या आठवड्यात कमी पाऊस?
मान्सून प्रवाहातील कमी ताकद आणि सध्या एमजेओ त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय वि्षुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज २ व ३ मध्ये एमजेओ जरी कार्यरत असला तरी त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) किंवा दोलन(ऑसिलेशन क्रेस्ट व ट्रफची) विस्तृत वाढ- मर्यादेची पातळी(एम्प्लिटुड) ही एक पेक्षा कमी जाणवते, म्हणजे ती लहर मध्य रेषेजवळच रेंगाळतांना जाणवत आहे.
त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीच्या पूरकतेचा अभाव व त्याचबरोबर इतर ठोकळ स्पष्ट अश्या प्रणालीचा अभाव जाणवतो.
त्यामुळे सध्या तरी अजुन आठवडाभर म्हणजे बुधवार दि. २५ जून पर्यन्त कदाचित खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात सध्या तरी जोरदार पावसाठी चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही, असे वाटते.
अर्थात वातावरणातील काही बदलच ह्यावर मात करू शकतो, व तसे झाल्यास, सूचित करता येईल.
आज इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.