Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 6, 2025 at 04:52 PM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग 59* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   याच वेळी कल्याण-भिवंडीत मार खाऊन परतलेल्या रणमस्तखानालाही ‘बहादूरखान’ ही किताबत देऊन औरंगने त्याचा मरातब केला होता. का? तर त्यालाच आता आदिलशाहीच्या विजापुरावर धाडावयाचा होता. रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशाह रोजा धरून होता. थुंकीही न गिळता पाळाव्या लागणाऱ्या, कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या शिकंदर आदिलशाहाला लिहायच्या खलित्याचा मजकूर सांगत होता. मनी ‘अलिजांना आपलाच काही शक आला की काय?’ ही धास्ती धडक भरत असताना प्रत्यक्ष त्याची सूनच तो मजकूर रेखीत होती – आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेलासुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते! सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्टयांचा शतरंज खेळीला पडला. औरंगाबाद, पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते. खेळे होते मोगल, फिरंगी आणि मराठे. रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेच लागले होते, कारण पणजीचा विजरई तळफिरंगाणात चालून येण्यासाठी हत्यारे, सैन्यसंचणी यांची जय्यत तयारी करतो आहे, अशी पक्की खबर होती. त्याला लढाऊ सामान पुरविणारी दोन गलबते पोर्तुगालहून, सात-दर्यापार होऊन पणजीला उतरली होती. औरंगजेबाची कल्याण-भिवंडीवरची पिछेहाट ही राजांनी केल्या अंदाजाप्रमाणे हूल होती. बाहेर तुरळक पाणसरी कोसळत होत्या. खासेमहालात बोलावून घेतल्या निळोपंतांना राजे म्हणाले, ‘‘पेशवे, बिचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या. डचांची पडेल ती मदत शहजाद्याच्या बोटाच्या आकडीने खेचली पाहिजे. त्यासाठी मरातबाचा नजराणा पाठवा बिचोलीस... मात्र... मात्र कंठयासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात!’’ ‘‘जी. रेवदंडयाचा घेर म्होरक्याविना पावसात आहे. तेव्हा – निळोपंतांनी मोलाची बाब पुढे घेतली. “नाइलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे. वरफिरंगणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळकोकणावर दाव टाकणार आहे. प्रसंगी बेळगावमार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खातरीची खबर आहे. औरंगजेबाला – ‘दिल्लीतख्ताचा शहेनशहा’ म्हणवून घेणाऱ्या – अकबराला दस्त करायचं आहे. आणि त्याच मार्गानं आपल्या मुलखातही घुसायचं आहे.’’ ‘‘फिरंगी-मोगलांची जोड पडली, तर पुरा तळ आणि वरकोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज.’’ निळोपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलले. ‘‘त्यासाठी आम्ही वरफिरंगाणात रेवदंडयाचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत.’’ ‘‘जशी आज्ञा. आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर.” पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगड उतरले. आणि पडत्या पावसात आठ हजारांची फौज दिमतीला देऊन महाराजांनी निळोपंतांना पाचाडपागेसमोर निरोप दिला. महाराजांनी अटकळ बांधली तसाच या वेळी औरंगाबादेतून आपल्या आबाजानांचा जामा, गुडघे टेकून चुंबत औरंगजेबाचा लाडका शहजादा शहाआलमही वाजतगाजत वेशीबाहेर पडला. त्याच्या दिमतीला तुर्की, पठाण, मोगल, फितूर मिळून पंचेचाळीस हजारांचे सैन्य होते! त्यात तोफखान्याचा दरोगा आतषखान होता. लुत्फुल्ला, इखलास, जान निसार, सादत असे खान होते. आणि पहाडी, डोंगरदऱ्यांच्या मुलखाची शहाआलमला अचूक आणि इमानेइतबारे माहिती पुरविण्यासाठी नागोजी माने नावाचा सातारातर्फेचा, रहिमतपूरचा, एक ‘माहीतगार’ मराठा सरदारही होता. सुरतहून दर्यामार्गे पणजीला धान्य, शस्त्रे आणून, ती त्याला पुरविली जाणार होती. भेटीस आलेल्या शहजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता. ‘‘बांदा, बिचोली, पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिसेल तिथं कत्लच करावा!’’ भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही ‘बाप’ शांत-थंडपणे सांगत होता. तिहेरी पट्टयांचा शतरंज सुरू होता. पाऊस उलगला. बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या. ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री-बेरात्री बेचिराख करू लागले. कैद माणसे सक्तीने बाटवू लागले. माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या. चौल भागात घेर टाकून बसल्या निळोपंतांच्या कानी त्या पडताच पुरा रेवदंडा, दमण, वसई पट्टा त्यांनी पटाखाली धरला. त्याने भेदरलेले चार हजारांवर फिरंगी मुंबईच्या पंखांखाली आसऱ्याला गेले. पणजीची घुसखोर चाल पारखूनच बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले. येसाजींच्या बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघताच महाराजांना धनाजी जाधवांचीच आठवण झाली. कृष्णाजी मल्लखांबासारखा घोटीव आणि ताठ अंगकाठीचा सावळा गडी होता. ‘‘कंककाका, फिरंगी आज ना उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार. तुम्ही, धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी.” महाराज येसाजींना म्हणाले. ‘‘बरी कामदारी सोपवलिसा धनी. आम्हावर हाय न्हवं फोंडा, काळजीच करू नगा त्येची. ह्या पोराला तेवढ्यासाठनंच आणलाय संगट.” उतार झाले तरी खड्या बोलीचे येसाजी कृष्णाजीकडे हातरोख देत म्हणाले. धर्माजी नागनाथांना राजांनी रसद, कुमक, फिरंग्यांच्या लढाईचं तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली. धर्माजी, येसाजी, कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले. आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणारा, फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते. डावे-उजवे मुधोजी, चांगोजी, खंडोजी उभे होते. कुणीच काही बोलत नव्हते. एवढ्यात जोत्याजी केसरकर लगालगा माचीवरच आला. राजांना स्वतःत डुबलेले पाहून सांगावे की नको, या विचाराने घुटमळला. काहीतरी विचाराने महाराजच वळले. जोत्याजी आता मात्र सामोरा झाला.6 ‘‘धनी, दिलेरखानाची खबर हाय...” तो चाचरला. ‘‘जोत्याजी, नाव नका काढू आम्हासमोर त्याचं.’’ महाराजांच्या मनात क्षणभरातच दिलेरच्या गोटातले साल सरकले. ‘‘जी ती पाळीच यायची नहाई आता कुणावर! दिलेरनं आपल्या गोटात हिरकणी खाऊन जीव दिला धनी!!’’ “क्काऽय जोत्याजी, काय म्हणालात?” आज पहिल्यानेच फारा दिवसांनी राजांच्या उभ्या देही काटा सरकला. ‘‘खरं हाय धनी – बादशानं त्येची समद्या म्होरं लई खरड क्येली. म्हनला, ‘तुम जैसा सालार है नमकहराम, फते क्यू नहीं की मुलूखमें?’ आन् बेइज्जतीने बिघाडला खान तसाच आपल्या डेऱ्यात परतला आन्...” दिलेर! रामराजांच्या मासाहेब! गोदावरी! मावळतीला जाणाऱ्या बिंबाच्या तिकोनी फरशीगत जळजळीत विचारच विचार शंभूमनात फिरू लागले आणि मग बराच वेळ अनेक रूपांतला पठाण दिलेर तेवढाच महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला. राजापुरात एकीकडून राजांनी फर्मान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या, दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट करताहेत अशा खबरांवर खबरा येत होत्या. आता राजापूर मराठी फौजेचा जंगी तळच झाले होते. तीस हजारांवर मावळा तिथे डेरेदाखल झाला होता. धर्माजी, नागनाथ, हंबीरराव, खंडोजी त्या पुऱ्या तळाची देवघेव बघत होते. धर्माजींना बोलावून घेत राजांनी फर्मावले, ‘‘सुभेदार तुम्ही फ्रेंचाच्या वखारीत जाऊन त्यांच्या विजरईची भेट घ्या. त्यांना साफ समज द्या. इथून फिरंग्यास कोण्या वजेची कुमक करण्याची आगळीक त्यांनी करू नये. इथला आमचा तळभार वाढला आहे. तातडीच्या खर्चासाठी दीड हजार पागोडेही कर्ज म्हणून देण्याची मागणी घाला त्यास.” ‘‘जी, फोंडा आता अधिक नाही तग धरायचा. आठ दिवस झाले. येसाजी कुमकेची वाट बघत नेटानं घेर झुंजविताहेत.” धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली. धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्याबाहेर ‘ठो ऽऽ ठो ऽऽ’ अशी कुणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज आला! राजांनी धर्माजींकडे चमकून बघितले. काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले. त्याला पुढे घालत म्हणाले, ‘‘नायकवडी आहे हा फोंडा कोटाचा. काही फिर्याद आहे म्हणतो. मिनत्या केल्या सांगत नाही. म्हणून शेवटी खाशासामनेच आणावा लागला.” खंडोजी वैतागलेले दिसत होते. धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवडीला ओळखले. त्याच्याजवळ जात त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले, ‘‘बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळकोकणात चिटणीस! काही बेअदब केली नाही त्यानं.” महाराज नायकवडीच्या समोर आले. राजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी तो आडवाच झाला. त्याला राजे म्हणाले, ‘‘उठा. बोला. निडरपणे फिर्याद बोला तुमची.” ‘‘माजी एकल्याची न्हाई!” धीर चेपलेला नायकवडी फिर्याद ठेवत म्हणाला, ‘‘मुलखाची हाय. कशापायी धनी अडकून पडल्यात हतं? आमचा पोंडा तर जाणारच; पर भोवतीचा मुलूखबी जाणार फिरंग्याच्या घशात. जे असंल त्ये आजच कराय पायजे.” राजांच्या मनातली बाबच छेडली फिर्यादी नायकवडीने. वळते होत राजांनी विचारलं, ‘‘आणि काही फिर्यादी?” ‘‘आज लई जोराची हालचाल चाललिया फिरंग्यांची फोंड्याभवत्यानं. आज रातीलाच घालील, त्यो वर्माचा हमला कोटावर.” ‘‘खंडोजी, हंबीरमामांना बोलावून घ्या. धर्माजी, पाच हजारांचा निवडीचा घोडालोक तयार ठेवा. जमेल तेवढे, पायदळ आत्ताच कूच करा फोंडामार्गानं. आम्ही – खुद्द आम्हीच जाऊ येसाजींच्या कुमकेला!” राजे निर्धारी बोलले. आला नायकवडी समाधानाने डेऱ्याबाहेर पडला. आत आले खिदमतगार राजांच्या अंगी बख्तर, ढाल, हत्यारे चढवू लागले. याद फर्मावलेले हंबीरराव आले. ‘‘आम्ही फोंड्यांची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत सरलष्कर. तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावानं येऊन मिळा. फोंडाच नाही, फिरंगाणच धरायचा आहे घेरात!” राजे त्यांना म्हणाले. ‘‘आम्ही संगतीच आलो तर...” राजांना एकले पुढे सोडणे हंबीररावांच्या जिवावर आले. ‘‘पुरा तळ हलायला वेळ लागेल. त्यासाठी तुम्ही मागे असा.” लढाऊ साज अंगावर घेतलेले राजे बाहेर पडले. धर्माजी, खंडोजी, हंबीरराव यांना गाठीच्या फौजेवर ठेवून, त्यांनी सिद्ध झाल्या ‘चंद्रावता’वर मांड घेतली. ‘जय भवाऽनी’ त्यांनी हंबीररावांसह सर्वांचा निरोप घेत टाच भरली. उधळत्या चंद्रावताच्या आघाडी खुरातले चंदेरी कडे उन्हात झमझमू लागले! विजरई आल्वोर आपल्या साथीदारांसह, भगदाड पडल्या फोंड्यात, निकराचा आखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता. त्याचे वाजंत्री फिरंगी पडघम घुमवीत फौजेला चेतना देत होते. चित्रविचित्र किलकाऱ्या उठवीत होते. तटावरून हवालदिल येसाजी-कृष्णाजी त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते. आता फोंडा होता, जिवा-मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर.... एवढ्यात उठल्या! “हरऽ हरऽ म्हाऽद्येव’’च्या गगनस्पर्शी मर्दान्या किलकाऱ्या उठल्या. सरसरत येत्या धूळलोटांतून फडफडत येणारा भगवा जरीपटका येसाजी- कृष्णाजींना तटावरनं दिसला. पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळसळून उठला. ऐलतीराला त्यानं साद दिली ‘हरऽ हरऽ म्हाऽद्येव.’ फोंडाही पैलतीरावरून कडाडला. मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले – ‘‘ता पळय. राजा इलो!” हा-हा म्हणता विजरईने अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पाऽर विसकटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोकू लागले. भिडले! पायदळ मध्ये घेऊन पाच हजार घोडदळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले. घेराचा आता रंगच पाऽर पालटला. बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही. राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच. होता फोंडा गडचढीचा हमेशाचा प्रघात! फोंड्यावर आता चक्क नौबती दुडदुडु लागल्या! येसाजींनी आज आठ दिवसांनंतर फोंड्याचा दरवाजा उघडला. सामने थोरल्यांचे अंकुर, तडफदार, बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले म्हातारबाचे. रिवाज द्यायला ते कमरेत वाकताहेत, हे बघून राजे चटकन पुढे झाले. ऐन भराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कडकडून ऊरभेट पडली. गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर! ‘‘कंककाका, तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं. फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी. त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे!” “जी.” येसाजी-कृष्णाजी घायपाती, लवलवत्या पानांसारखे हलू लागले. राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकूम देताच, त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडाईतांनी माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या. मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजीपुत्र कृष्णाजीच बिथरला! त्याने आभाळाकडे गर्दन उठवून सर्व घोडाईतांचे पाठकणे सुरसुरून फुलवीत केवढीतरी मोठी किलकारी दिली. “हरऽ हरऽ हर म्हाऽऽद्येव.” ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालाइतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदुकधाऱ्यांची. फिरंगी मोर्चे पार विसकळीत झाले. घुसलेल्या काही मावळे भालाइतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते. कैक गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली. – आणि – आणि अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा, घामेजला कृष्णाजी छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला!! ज्या ठिकाणी जाया झालेले येसाजी, कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी, त्यांच्याशेजारीच कृष्णाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपविले. आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती. महाराज घोंगडीवर झोपविल्या येसाजींजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, ‘‘सुक्षेम हाईसा न्हवं?” काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजीच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर, आईच्या मायेने हात फिरवीत म्हणाले, ‘‘ऐसा कैसा रे फुटोन गेलास तू कृष्णा!” त्यांनी भोवतीच्यांना आज्ञा केली, ‘‘या बापलेकांस आत्ताच कऱ्हाड प्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोहोचवा.” नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजिऱ्याच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी, असाच हाही प्रसंग होता – गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा. सालसेत, बारदेशवर हंबीरराव उतरले. दुर्भाट-आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले. राजांच्या तितोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या. राजे आणि खंडोजी जुवे बेटावर चालून गेले. त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले. जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की, जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता! भयकातर झाल्या फिरंगी पाद्रयांनी, विजरईच्या तातडीच्या आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा, धोका म्हणून रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली! बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते. आता गोव्याची खैर नाही, हे तो मनोमन जाणून होता. जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई चारशे सैनिकांसह भल्या पहाटेच, ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकरानं चालून आला. टेकडीवरचे राजे, त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो माऱ्याच्या टप्प्यात येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले. “पळाऽपळाऽ!” चालून आलेले फिरंगी मांडाची घोडी, नीट टेकडी उतरेनात म्हणून ती टाकूनच पळू लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्र केवढं आहे? यातच बगलेने आलेली तीनशे स्वारांची मावळी कुमक राजांच्या सेनेला मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघू लागले. उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजरईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी! चार मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळजे चरकली फिरंग्यांची. दोम रोद्रिगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हणूनच जीवे वाचला तो! तरीही तलवारीचा एक निसटता वार बगलेला बसून घायाळ झालाच तो. रोद्रिगो केवढ्यानेतरी ओरडला – ‘‘खाडी पकडा. पळा.” भेदरलेला, रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडून जनावर फेकू लागला. त्याच्यावरच नजर खिळवून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला ‘चंद्रावत’ कौशल्याने बाहेर काढला. विजरईच्याच पाठलागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे, असा नजारा बघणे भाग पडत होते. पुढे घायाळ, जीव बचावण्यासाठी दौडणारा पार भेदरलेला विजरई कोंद-द- आल्वोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान ‘संबा!’ राजे एकलेच विजरईच्या मागे धावताहेत, हे पाहून चलाख खंडोजींनीही आपला घोडा त्यांच्या मागे दौडता काढला. गर्जत्या, फेसाळत्या, भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मध्ये उभी असलेली होडी गाठण्यासाठी जिवाचे रान करू लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकू लागली. चंद्रावतासह खाडीकाठाकडे दौडणारे राजे चुटपुटत ओरडले – ‘‘सोडू नको त्यास! उभी गावे जाळतो-बाटवतो – ” आणि पाठलागावरच्या बेभान, संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच, अनावर चुटपुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला!! खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. दहा हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या, भरतीच्या ओढीला हां-हां म्हणता वाहतीला लागला. विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा ‘संबा’च घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटू लागले. राजे चंद्रावताच्या रिकिबीतले पाय आता सोडवू बघत होते. ते सुटले. एका हाताने वाहतीचा चंद्रावत आवरत दुसऱ्या हाताच्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले. टेकड्यावर आता तर टाळ्या-आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला. एकच क्षण – पण उभं आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यांसमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वाहतीला लागली. – आणि टेकडीवरच्या बघ्यांची दातखीळच बसली. त्यांना घोड्यावरूनच एक माणूस जिवाच्या आकांताने खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने ‘संबा’ला, पाते लवायच्या आत गाठलेही. आपल्या हातांची जोड देत- देत तो वाहणाऱ्या संबाला खाडीकाठाकडे आणू लागला. कायदे राजांच्या हातून सुटताच चंद्रावतही अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता, खंडोजी बल्लाळ! पुरते अंगभर भिजले राजे-चिटणीस सुखरूप खाडीकाठाला आले. राजांनी खंडोजींकडे डोळाभर बघत त्यांना भावभिजली मिठीच भरली. आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत, बारदेश प्रांतावर उतरले. हा तोच प्रांत होता, जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता. ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तरण्याताठ्या पोरी जबरीने बाटवून दिवसा त्यांचा धर्मप्रसारासाठी आणि रात्री त्यांच्या शरीरांचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते, अशा भिक्षुणींचे तीन मठ मावळी सैनिकांनी फोडले. सर्वांत मोठा मठ होता राचोलीचा. तो फुटताच, दावी तोडलेल्या सफेद गाई चौखूर उधळाव्यात तशा पांढरे झगेवाल्या कोळी-भिक्षुणी मानेवरचे जोखड उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. त्यांना मनमोकळे पळताना बघून घोड्यावर स्वार झालेले राजे समाधानी, भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले, ‘‘मामा, हे बघायला आमच्या थोरल्या आऊच पाहिजे होत्या आज.” त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकाटत गेली, ‘आमच्या राणूअक्का आणि दुर्गा अशा मुक्त करण्याचं भाग्य लाभतं या हातांस तर!’ बारदेशच्या आभाळाने कधीच टिपले नव्हते, असे एक दृश्य सामोरे आले राजांच्या. सोलापूर-पंढरपूर भागात पाच-तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची समाईक इरजिक घालतात तद्वत सात फिरंगी पाद्री एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली. ‘‘काय करावं ह्येंचं धनी? द्यावं का मासळीमारीच्या जाळ्यावानी फेकून दर्यात?” तुकडीचा म्होरक्या म्हणाला. सगळ्या पाद्रयांच्या गर्दनी, देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या. राजे बारकाव्याने त्यांना निरखू लागले. ‘‘समर्थ राहू द्याच – दिवाकर गोसाव्यांसारखाही का नाही दिसत यांपैकी एकही जण? समर्थांच्या पायठशांवर धर्म वाट शोधीत चालतो असं वाटायचं! यांच्या? हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवितात. दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो कसला धर्म? एवढे कब्ज झालेत, तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं? बाटवणं म्हणजे तरी काय? बाटतात ती शरीरं – मनं कुणाला आणि कशी येणार बाटवता?” ‘‘हुकूम व्हावा धनी.” अनावर उताविळीने म्होरक्या म्हणाला. ‘‘बैलच आहेत हे; धर्माच्या घाण्यास जुंपलेले. जुलमाचे तेल गाळणारे. यांच्याही पाठीवर कोरडे ओढा आणि धिंड काढा यांची!” संतप्त राजे कडाडले. तिकडे पणजीत जुन्या देवळात, भेदरलेले फिरंगी एकजाग झाले होते. खांद्या- कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची ‘करुणा’ भाकत होते. शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्याने विजरई कोंद-द-आल्वोर झेवियरच्या शवाच्या हातातील सुवर्णी धर्मदंड आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळरोखाने उठवीत पुटपुटत होता – ‘‘राख, गोव्याची लाज राख. हा ‘संबा’ कसाही जाऊ दे. पण परत जाऊ दे. पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला – पण आमचे जीवन नको!” फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूच व्हायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या-नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सज्ज झाली होती. त्यात फिरंगी बायका-पोरे चढलीही होती. विजरईची ही झेवियरच्या शवाला आखरी करुणा होती. मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता. देवळाच्या मोठाल्या घंटा ठणठणत होत्या. दुर्भाट, जुवे, अंत्रुज, बारदेशच्या मावळी फौजा एकजाग होऊ लागल्या. राजे त्या पणजीत घुसविणार होते. त्यासाठी राजे, हंबीरराव, खंडोजी, धर्माजी दर्यात एकवट होणारी होडकी तळपत्या नजरेने बघू लागले. पण – आणि ‘पण’ची माशी शिंकलीच! कवी कुलेशांनी धाडलेला रामोशी खबरगीर राजांना शोधत धापा टाकत आला. खबर ठेवत म्हणाला, ‘‘शाआलम लाखाच्या बळानं रामघाट उतरतोय! रांगच्या रांग लागलीया घाटात.” ‘‘काऽय?’’ विस्फारल्या डोळ्यांनी राजे किंचाळलेच. पुन्हा तोच प्रसंग आला – योजावे पण साधावे असे घडूच नये! शहाआलम आणि विजरई यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसविल्या सेनेसह फिरंगाणाबाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता. तहाला तयार झाल्या फिरंग्यांशी तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगडी आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या. कोकणात उतरलेला शहाआलम आणि मुंबईचा टोपीकर! फिरंग्यांनी मागे येसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत, अशी तक्रार केली होती. म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलुखासाठी राजांनी कुलेशांना ‘कुलएख्तयार’ केलं. त्या सुलुखाची सारी बाबच त्यांच्यावर सोपविली. राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती. तीच कित्येकांना खटकली. ‘छंदोगामात्य-कुलएख्तयार’ – कनोजा भारी होत चाललाय, अशी खुसपूस उठू लागली. आज्ञेप्रमाणं कुलेश-अकबर फोंडा, भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटीगाठी घेऊन तहाची बोलणी करू लागले. फिरंग्यांशी चालल्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला. टोपीकरांची मुंबईची बसकण आता स्वराज्याला घातक ठरणार, हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केले. टोपीकरांची कारंजा, एलेफंटा ही बेटे आणि माहीम, दंतोरा, सारगाव, कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली. मुंबईवर चालून जाण्यासाठी जावळी, कऱ्हाड, पुणे, पन्हाळा भागात नवी सैन्यसंचणी सुरू झाली. अकबर राजांजवळ बापाविरुद्ध कुमक मागून थकला होता. म्हणत होता, ‘‘मला इराणला जाऊ द्या.” राजे त्याला चुचकारून फिरंग्यांशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवीत होते. मात्र मनात आता याला जवळ ठेवून घ्यावा की नाही? याचा विचार करीत होते. शहाआलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वत:च आदिलशाहीच्या विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती. लाख फौजेनिशी कुडाळ, बांदा, डिचोली भागात फिरणाऱ्या शहाआलमची पाचावर धारण बसली होती. कारण दर्यामार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती. पाणोठे विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणीसुद्धा मिळेनासे झाले होते. आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते. राजांनी त्याच बेताने पेशवे निळोपंत आणि हंबीररावांना बोलावून घेतले. ‘‘पेशवे, आदिलशाहीवर चालून जाण्याचा बेत दिसतोय औरंगचा. पाठबळ देऊन राखली, तर ती शाही खूप दिवस झुंजेल.” राजे स्वत:शीच बोलल्यासारखे बोलले. ‘‘जी. आम्हीच जाऊ होतर आदिलशाहीच्या कुमकेला.” हंबीररावांना राजांचा विचार पटला. ‘‘तुम्हासच पाठवू मामासाहेब, पण आत्ता नाही. योग्य समयास. निळोपंत, तुम्ही नव्या संचणीचा अठरा हजार लढाऊ विजापूरमार्गे कूच होईल ते करा.” राजे औरंगच्या चालीच्या मागचा विचार करू लागले. एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला. त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती. ‘‘शाअलम मार खात-खात, हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोहोचलाय धनी. लाखाच्या सेनेतलं अवघं चाळीस, पंचेचाळीस हजार उरल्यात त्येच्याकडं. त्येच्यातबी बळ न्हाई हत्यार पेलायचं. बापाला त्यानं नगरकडं सांडणीस्वार धाडलाय – ‘मुझकू घोडे और खेचर भेज देव. नहीं तो मर जाऊँगा मय वहाँ पहाडमें।” ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले, ‘‘आता तुम्ही आम्ही संगतीच उतरू मुंबईजवळच्या पालतट्ट्यावर सरलष्कर.’’ राजांचे बोलणे तुटकच राहावे, अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या कानी घातली. ‘‘कऱ्हाड प्रांतात परतलेले येसाजी कंक तब्येतीने सुधारताहेत... पण कृष्णाजी जखमा फुटून गेले, स्वामी!” कृष्णाजी! राजांचे मन खिन्न झाले. काही क्षण विचारातच गेले. कृष्णाजीला बायको आणि तीन वर्षांचा मुलगा आहे, या जाणिवेने राजे पेशव्यांना म्हणाले, ‘‘कृष्णाजीस सालिना हजार आणि येसाजींना हजार होन मिळतील अशी व्यवस्था करा, पेशवे. आणि खंडोजींना हजार होन आणि पालखीचा मरातब द्या.” ‘संबा’ला कसलीही मदत न करण्याबद्दल औरंगने आदिलशाहाला लिहिले. मराठी-मोगल-फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला. मुंबईच्या केजविनने आपल्या हलाखीचे पत्र लंडनचा राजा चार्ल्स याला लिहिले. त्यात त्याने म्हटले – ‘‘आपल्या लगत असलेल्या ‘शंभूजी’ या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा चाळीस मैलांचा पट्टा बेचिराख केला आहे. तीस हजारांवर त्याच्या सेना मुंबईचा रोख धरून भोवती पसरल्या आहेत. आपल्याजवळ फक्त दीड- दोनशे आपले आणि दोनशे काळे सैनिक आहेत. शंभूजीने आपल्याकडे साठ तोफा, चारशे पिंपे आताषीसामान, कथील, लहान- मोठी जहाजे-कापड यांची मागणी केली आहे. मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत, तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काय करावे? पोर्तुगीजांचा तपशील ध्यानी ठेवून तह करावा असे वाटते!” पालतट्टा धरून कारंजा-एलेफंटा असा फेर टाकून, मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याच्या इराद्यात असलेले राजे रायगडी परतले. सिंहासनसदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली – ‘‘पणजीहून आलेले फिरंगी हेजीब घेऊन कुलएख्त्यार कुलेश भेटीस येताहेत.” पाटगावला मौनीबाबांच्या दर्शनासाठी गेलेले कुलेश तिथे भेटलेल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडी आले होते. त्यांच्यासंगती फ्रायर, कॉन्सिको, थेमुडो, पाद्री अॉगस्टीन, अल्बुकेर्की अशी मंडळी होती. वकीलमंडळाने राजांना नजराणा दिला! मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते. अल्बुकेर्की, कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपशील दुभाष्या राम नाईक याच्या मध्यस्थीने राजांना देत होता. मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता, काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकीलमंडळाला तीन रात्री रखडविले. तिसऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बुकेर्कीने तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला. ‘‘आमचा दरबार अंजदीव बेट सोडणार नाही! राजे मागतात ती बक्षिसी मिळणार नाही!” “मतलब?” राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच. त्यांची चर्याच काटेफड्यागत लालबुंद झाली. “कुलेऽश, या फिरंग्यास सांगा – आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील, तर वरफिरंगणातून आमचे पेशवे हटणार नाहीत. भीमगडाच्या कैद्यांना सोडले जाणार नाही. बारदेशात कब्ज केल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत! जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ!” अल्बुकेर्की ते रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला. वकीलमंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले. राजे बिरवाडीला आले. इथे उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासेवाडा बांधला होता. त्याच्या सदरेवर प्रल्हादपंत, इंग्रज वकील गॅरी यासह भेटीस आले. मुंबईच्या गव्हर्नर केजविनने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते. म्हणून तर केजविननं आपला वकील टाकोटाक धाडला होता. ‘‘टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती मागताहेत. फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले ‘प्रेसिडेंट’ नावाचे जहाज परत करावे म्हणतात.” गॅरीला पुढे घालीत प्रल्हादपंत म्हणाले. राजांनी इंग्रजी वकिलाला अंगभर निरखला. ‘हे टोपीकर फिरंगी, डच, फ्रांसिस कोण कोठच्या देशीचे. दर्यापट्टया धरून मिळेल त्या दरबारचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात. आज वखारी घालतात – उद्या हातपाय पसरतील. औरंग खासाच उतरला नसता फौजबंदीनं दख्खनेत, तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार. पण या बिकट समयास चौफेर गनीम ठेवावा तो किती?’ राजमनात विचार आले. शांतपणे राजांनी प्रल्हादपंतांमार्फत गॅरीशी बोलणी केली. थॉमस विल्किन्स आणि दुभाषी राम शेणवी गॅरीच्या मदतीला असल्याने चांगली तीन दिवस ही बोलणी बिरवाडीत चालली. तहाच्या अटीचा मसुदा प्रल्हादपंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले. पण प्रल्हादपंत टोपीकरांना मसुदा देऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत. त्यांची आणि मानाजी मोरे, गंगाधरपंत, राहुजी सोमनाथ, वासुदेवपंत यांची कसलीतरी एकांती बैठक ठरली होती, तिकडे ते निघून गेले. या वेळी शहाआलम आणि औरंगजेब या बेटाबापाची अहमदनगरमध्ये भेट होत होती. बापाने पाठविलेल्या घोड्यांच्या आणि खेचरांच्या मदतीने शहाआलम कसातरी घाट चढून आला होता. एक लाखांपैकी आता फक्त चाळीस हजार सैनिक शिल्लक होते त्यांच्या संगती! गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहजाद्याला औरंगजेब केवढ्यातरी नफरतीने म्हणाला, ‘‘वो बागी अकबर कमसे कम अकेला गया। तुम हशम लेकर गये और उन्हे गवाँकर आये। जूरत कैसी हुई काला मुँह लेकर आने की? तुम भी क्यों नहीं गये उसके साथ?” बिचारा शहाआलम काय जाब देणार होता? शरमिंदा होऊन तो बापासमोरून निघून गेला. संभाच्या जनान्यातल्या बायका खुल्दाबादेत कोठीत आहेत, याचा फायदा घेऊन मावळे जालन्यापर्यंत छापे घालतात याने चडफडणाऱ्या औरंगजेबाने वजीर असदखानाला बोलावून फर्मावले, ‘‘संबाके जनानेकी औरते भेज दो बहादूरगड। पहरा जारी रक्खो साथ।’’ बादशाहाच्या हुकमाने दुर्गाबाई आणि राणूआक्का बहादूरगडात हलविण्यात आल्या. पेडगावच्या किल्लेदाराने त्याबद्दल लेखी पोचपावती बादशाहाला पाठविली. मृग तोंडावर आला. रामसेज, कल्याण, भिवंडी, बागलाण, पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरीखात्याचे खासे पाठोपाठ रायगड चढू लागले. चारीबाजूंनी रायगडावर खबरा थडकू लागल्या. ‘‘औरंगजेब रामसेज, तळकोकणातील काही किल्ले इथं मोजक्याच शिबंद्या ठेवून फौजा मागं घेतो आहे. त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करताहेत!” औरंग आणि माघार? असे कधीच घडले नव्हते, त्याच्या हयातीत. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून तो स्वारीशिकारीत होता. पण ‘माघार’ अशी तो पहिल्यानेच घेत होता. गेली तीन वर्षे मराठी मुलूख पाडण्यासाठी त्याने जंग-जंग पछाडले होते. हाती काहीसुद्धा आले नव्हते त्याच्या. फक्त लढाया, घेर, कत्तली यांतच पुरी तीन वर्षे जाया झाली होती त्याची. जाता-जाताही त्याने रायगडावरच चालून जायचा गाजीउद्दिनखानाला हुकूम दिला होता. ‘‘हंबीरराव, रूपाजी, कुलेश, रामचंद्रपंत सगळ्या खाशांस चढ्या घोड्यांनी रायगड जवळ करण्यास लिहा. फर्मानं आल्या खबरगिरांकडूनच धाडा चौफेर.’’ निळोपंतांना, सरसर फेर घेत राजे आज्ञेमागून आज्ञा देत होते. ते आपल्याच विचारात गढले होते. ‘का घेत असावा औरंग फौजा मागे? काय हेत आहे त्याचा यात? पावसाळा तोंडावर ठेवून या चाली आहेत त्याच्या की पावसाळा उलगताच जोरावारीनं पुन्हा धरणार तो मोहरा?’ आता तर राजांना उसंतच नव्हती. निळोपंत, खंडोजी एकामागून एक थैलीस्वार गड उतरवू लागले. जागोजाग पांगलेले मंत्री सुभेदार राजथैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले. इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लागला होता. ‘‘सुलुखाचे कागद शिक्कामोर्तब करून पक्के पाठवून द्या.” त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. राजांनी ती पुरी बाबच प्रल्हादपंतांवर सोपविली. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, संताजी – गुजराथेतून परतलेले धनाजी, रामचंद्रपंत, दौलतखान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासनसदरेला उन्हतापीच्या ऐन दिवसांत मसलती बैठक बसली. पेशवे निळोपंत मसलत खोलत म्हणाले, ‘‘सांप्रत गनीम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलूखभरची फौज मागे घेतो आहे. खबरा आहेत, तो आदिलशाहीवर चालून जाणार. त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे. खाशांना पाचारण केलं आहे, ते या मसलतीसाठीच.” ‘‘शहाआलम नगरहून निघून सोलापूरमार्गे चालला आहे. बादशाहाचा आदिलशाहीवरच रोख दिसतोय.’’ रामचंद्रपंतांनी सुचविले. ‘‘मध्येच गाठून तोडला पाहिजे त्यास.” राजे निर्धाराने बोलले. ‘‘विजापुरावर ग्येला त्यो तरी पेशवं म्हंत्यात तसं गाफील राहून न्हाई भागायचं.” हंबीरराव राजांच्या मनातलेच बोलले. ‘‘सरलष्करांचं सही आहे. त्यासाठीच मसलतीत घेतलंय साऱ्यांना. पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कुणी. मिळेल ती संचणी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मदतीस.” कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले. जमल्या खाशांना बारीक-सारीक सूचना देण्यात आल्या. सगळ्यांना निरोपाचे विडे देण्यात आले. अशा वेळी नेहमी बोलणारे प्रल्हादपंत गुमान राहिलेले कुणालाच नाही कळले. मसलत संपताच ते, राहुजी, मानाजी मोरे प्रल्हादपंतांच्या मंत्रिबाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले. बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले. पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बालेकिल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. ‘केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी! कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे शिर्के आणि फलटणकर? काय वाटत असेल पेडगावच्या कोठीत दुर्गा आणि राणूआक्कांना?’ ‘‘महाराज, कुनी पठानी असामी आलीय पावसाचं गड चढून, भेट मागतीय.’’ पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या, लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी. पण कुठे? काही आठवेना – ‘‘आदाबअर्ज – जिल्हे सुबहानी – मुल्के मऱ्हाट.’’ आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली. ‘‘कौन? मिलनेका मतलब?” राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते. ‘‘पेहचाना नहीं राजासाबने नाचीजको?” पठाणी मोकळे हास्य खुलले. “नहीं. बताओ.” ‘‘मिरबतखान!” दिलेरचा भाऊ! तो भीमेचा काठ. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. ‘‘खाऽन – तुम?” म्हणत मिरबातला त्यांनी ऊरभेट दिली. ‘‘कैसा हाल?” सगळे माहीत होते, तरी बळेच राजांनी विचारले. “क्या बताना राजासाब! वो क्या बादशहा है? शैतान है – संगदिल! हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत कर के! तंग आये उसके जुल्मसे!” मिरबात पिळवटून बोलला. ‘‘खान, कळलंय आम्हास सगळं. तुम्ही दोन दिवस मनमोकळी विश्रांती घ्या गडावर. काही उणं पडायचं नाही तुम्हास.” ‘‘दो दिन? इस बरसातमें आये है हम – क्या मेहमानदारीके लिये राजासाब? जिंदगी रख्खी है, पैरपर राजासाबके.” कमरबंद खोलून मिरबातने आपली पठाणी तेगच, गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायांवर ठेवली. त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला – ‘आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो, तर ‘लेकरा कुठं गेला होतास?’ म्हणत आम्हाला मिठीत घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण?’ राजांनी मिरबातला पदरी ठेवून घेतले. कोकणातून आलेला अकबराचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती श्रीसखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा होता. ‘‘शहजादे म्हणतात – फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी.” पेशव्यांनी अकबराचा तपशील समोर ठेवला. ‘‘आणिक काही?” ‘‘जी. ते म्हणतात – म्हणतात -” निळोपंत चाचरले. ‘‘बोलाऽ’’ राजांना शंका आली की, आणखी काही मागणी आहे की काय शहजाद्यांची? ‘‘जी! शहजादे म्हणतात – कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्लानं करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी त्यांच्यावर.” खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती. “एवढंच?” राजांनी छातीवरची कवड्यांची माळ वरखाली होईल, असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते, ते कुलेशच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले. ‘‘इस कठिन समय को साथ देनेके लिए लिखा है, हमने सब जमीनदारोंको स्वामी!” कुलेशांनी आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला. राजांनी कुलेशांना सांगितले, ‘‘तुमची चिंता वाटते शहजाद्यास कुलेश.’’ ‘‘हम लिखेंगे उसको – खुद की करनी चाहिए उसने!” हसत कुलेश म्हणाले. ‘‘तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे, शहजादा कुलेश.” ‘‘जी. सुलुख हुआ है, तो भेजने चाहिए करारपत्र.” ‘‘तूर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणाची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही.” ‘‘अच्छा होगा वह!” कुलेशांनी दुजोरा दिला. ‘‘चला सदरी जाऊ कविजी.” राजांनी कुलेशांसह सिंहासनसदर जवळ केली. ‘‘महाराज, परततानासुद्धा औरंगनं माणूसफोडीचा तडाखा दिलाय.” खंडोजी चिंतेने म्हणाले. ‘‘को – कोण चिटणीस?” ‘‘नायब शाहकुली, खंडूजी, रंभा शंकराजी अशा फितल्या माणसांना मनसबी दिल्या आहेत, नगरकोटात बादशहानं.” ते ऐकताना सचिंत झालेले राजे सदरेच्या झरोक्याशी झाले. आभाळातून कोसळताना पांढऱ्याधोट असलेल्या पाणसरी भुईला मिळताच गदळ होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या. ‘‘मोगली सेना परतत आहेत, या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी.” खंडोजींनी पाणधारा निरखणाऱ्या राजांची तंद्रा तोडली. ‘‘कुलेश, खंडोजी, का आणि कशी आली आपल्या बोलीचालीत कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे एक – कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ!” ‘‘समजलो नाही आम्ही.” सरळधोप स्वभावाचे खंडोजी बुचकळ्यात पडले. कुलेशांना तर ती मऱ्हाटबोली म्हण कळलीच नाही. ‘‘खास नाही काही खंडोजी. दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतंय हे आमच्या मनी.” जे बोलायचे होते, ते मनाआड टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावणसरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासनसदरेसमोरचा हमचौक क्षणात उन्हात, क्षणात पाऊसधारांत न्हाऊन निघत होता. नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली अंबेच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले. थोड्याच दिवसांत, रायगड ज्याचा अंदाज बांधून होता, ती खबर येऊन थडकली – ‘‘बादशाहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही, आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशाहा याला गोवळकोंड्यात घेरून टाकला.’’ औरंगनं आपला बेटा आझम यास फौजबंदीनं जेव्हा विजापूरचा बालराजा शिकंदर याच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाह्या खडबडून जाग्या झाल्या! इस्लामी असल्या तरी त्या ‘दख्खनी’ आहेत हे साफ झालं होतं. ‘जशी त्या शाह्यांनी नांग्या टाकून, गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती – तसंच आता आपण वागायचं का?’ मोठा वर्माचा होता हा सवाल महाराजांपुढे. दसऱ्याच्या निमित्ताने जमलेले खासे, बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासनसदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानांतील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हादपंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वरपंत, रामचंद्रपंत व कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हरजीराजेसुद्धा होते. पेशव्यांनी बैठकीबेत खुला केला – ‘‘नगरकोटाच्या खबरा आहेत. गनीम आदिलशाहीचा रोख धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलखातून त्यानं नामोश घेत जवळ-जवळ सगळे तळ उठविले आहेत....” बैठक शांतपणे, कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकी सिंहासनवजा आसनावर बसलेले राजे मसलतभर नजर फिरवीत होते. आबासाहेब गेल्यापासून, पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मनी फिरकी घेऊ लागली. ‘‘कै. स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या, असे काही मनी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यांस.’’ पेशव्यांचे निवेदन चालूच होते. ‘पुढची चाल कशी ठेवावी?’ असा सवाल उठवून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढातरी नि:श्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरविला होता. तोच बेत सुचवीत कुलेश म्हणाले, ‘‘आदिलशाही की फिक्र इस दर्बारको क्यों? वे चूप बैठे थे, हम पर गुजरी तो!’’ ‘‘छंदोगामात्य म्हणतात ते रास्त आहे. कर्नाटकात होतो आम्ही, तरी हररोज इकडच्या खबरीसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथपंतांना धाडलं होतं आम्ही.” राजांशेजारी बसलेले हरजीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले. ‘‘आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही त्यामुळे.” एवढा वेळ गप्प असलेले प्रल्हादपंत बोलले. ‘‘थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही. चिवट झुंजेल बादशाहाशी. शिवाय सर्जाखानासारखे मातबर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत ते झुंजत ठेवतील औरंग.” निळोपंत वर्माचे बोलले. मसलतकऱ्यांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलट-सुलट विचारांची पाठशिवण पडली होती. ‘आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्तमेढ आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झा राजेसंगती तर त्यांना नाइलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरतेपावेतो दौडणाऱ्या त्यांनी कधी विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती! पन्हाळ्यावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, ‘‘आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार. त्याची फिकीर करा.” आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍 🙏 4

Comments