Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 7, 2025 at 07:58 AM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग-६०* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   ‘‘आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडलं आहे. शिकंदरशाहनं आगवानीही केली आहे त्याची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागी आहे.” महाराज समोर दिसणारी पूर्वक्षितिजकड नजरेत पकडत निर्धारी बोलले. ‘‘हरजी, तुम्ही कर्नाटक रोखून आहात. तिकडंसुद्धा घुसतील मोगली फौजा.’’ हरजींच्याकडे वळून राजे केवढेतरी टोकाचे बोलले. ‘‘जी. मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आज हत्यार धरलं, तो उद्या कुतुबशाही, कर्नाटक, पुरी दख्खनच धरेल पटाखाली हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नेटाबळानं ठेवलाय आम्ही, हे नजरेखाली घालायला यावं एकदा महाराजांनी कर्नाटकात.” हरजी धीराचे बोलले. औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचणी करून जागोजागच्या बाक्यांनी गडकोट जय्यत तैयार ठेवून सावध असावे, असा निर्णय करून मसलत उठली. पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात. ‘‘जे असेल ते बोला निळोपंत. काहीसुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हांस. आणखी कोण-कोण फिरले? सांगा.” खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले. “फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी – पण – पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही...!” पंतांनी हाती धरले उपरणे भावावेगाने चुरगळले. “मतलब?” राजांचा पायफेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यांत खोलवर बघत राहिले. ‘‘गंभीर आहे ही बाबत महाराज. कटावाची!!” पेशव्यांनी आपलीच गर्दन खाली टाकली. पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले, ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी, सुन्न होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच. ‘‘काय – बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणा कुणास कमी वाटले? कशासाठी आणि कुणी-कुणी केला कटाव?” ‘‘महाराज, शरम वाटते पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपले – आपले मानाजी मोरे! राहुजी सोमनाथ, गंगाधरपंत, वासुदेवपंत....” ‘‘बस्स – बस्स पेशवे. ऐकवत नाही.” उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले. ‘‘महाराज फिरंगाणाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली.” पेशवेच सांगताना व्याकूळ झाले. ‘‘कशासाठी? काय मनसुब्यानं?’’ महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले. हा तिसरा कटाव होता! ‘‘रामराजांना गादीवर बसवून आपल्या हाती कारभार घ्यावा, असा बेत आहे या मंडळींचा. पुरी शहानिशा केलीय आम्ही. यामागे कोणीतरी बडी असामी असावी, अशी पक्की खातरी आहे आमची. पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप.” ‘‘निळोपंत, तुम्ही जा आणि असतील तसे घेऊन या रामराजांस आमच्या सामने.” आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज. ‘‘जी आज्ञा.” म्हणत निळोपंत गेले. ‘मानाजी मोरे! रामसेज, बागलाण भागात दौलतीसाठी तळहाती शिर घेऊन घोडा फेकणारे! कसे पडले या नको त्या समयास या भरीला? राहुजी? केवढे वयस्क! आम्ही त्यांनी गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा तर सल नसेल त्यांना?’ राजमन स्वत:शीच जणू बोलत होते. निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले. ऐन भरीच्या तोंडावर आलेले रामराजे गोरेपान; पण नाजूक दिसत होते. नुकतीच ओठांवर लव फिरली होती. त्यांच्या पुढे होत, मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वत:बरोबर चालवीत आपल्या शेजारी बसवून घेतले. ताराऊंची चौकशी करून राजांनी रामराजांना, कुणालाही जाणवावे अशा हल्लक आवाजात विचारले, ‘‘रामराजे, आम्ही एक विचारू? शांतपणे बोलाल आमच्याशी?” ‘‘जी. दादामहाराजांना असं का वाटावं आज? आम्ही जाणतो, दौलत चौतर्फेनं संकटात आहे. जशी हरजीराजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास. लहान नाही आम्ही आता!” रामराजांच्या बोलण्यात बरीचशी झाक त्यांच्या मातोश्रींची उतरली होती. चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते. ‘‘देऊ. समय येताच तुम्हासही साजेशी कामगिरी देऊ आम्ही. आम्ही नाही दिली तर जगदंब देईल!” रामराजांना कटावाची सुतराम कल्पना नाही, याची खातर झाली होती. काही क्षण स्वत:शीच झगडले महाराज. ‘‘येसाजी, आमच्या रामराजांना घेऊन जा. तुम्हावर फार जोखीम आहे यांची. आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता.” येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली. ते रामराजांसह निघून जाताच निळोपंतांना आज्ञा झाली, ‘‘पेशवे, मानाजी, राहुजी सारे कटाववाले दिसतील तेथे दस्त करण्याची आज्ञापत्रं द्या. कटावाची सूत्रधार ‘बडी’ असामी कोण याचा सावधपणे शोध घ्या.’’ राजांचे मन गलबलले. कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला. फोंडा, भीमगड, मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूख पक्का केला. तहात अनेक अटी होत्या. फिरंग्यांनी मोगली जहाजांना आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये. दोन्ही दरबारांनी आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावे. परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी. फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजांनी गडकोट बांधू नयेत! अशा मुख्य अटी होत्या. मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली. राजांनी तहाच्या कागदपत्रावर शिक्केमोर्तब करण्यासाठी अकबर, राय किरनसिंह, महादजी नाईक यांना पणजीला पाठविले. तह पक्का झाला. शहजादा अकबरसंगती फिरंगी विजरईने राजांना नरमाईचा खलिता धाडला. त्यात लिहिले होते – ‘‘राजांनी सुलुखाची कलमे पाळावीत. आम्ही ती काटेकोरपणे पाळू. दोन्ही दरबारांत खुला व्यापार व मुख्य म्हणजे ‘शांतता’ राहावी.” फोंड्यावर अचानक चालून येणारा विजरईच हे लिहीत होता. तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजांनी काढून घेतल्या. वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला – पण रोगराईचा सुरू झाला. वसईत प्लेगाची लागण पसरली. टोपीकर दरबारचे काम बघणाऱ्या प्रल्हादपंतांना राजांनी बोलावून घेतले. पंत चलबिचल झाले होते – पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले. ‘‘न्यायाधीश, टोपीकरांच्या सुलुखाचं....” ‘‘जी. पुरा करून दिलाय तो आम्ही त्यांच्या हेजिबांकडं.” प्रल्हादपंतांनी प्रथम सुस्कारा सोडला. मग ते तहाचा कलमबार तपशील सांगू लागले, ‘‘तह दोन बाबींचा मोर्तब केला आहे. कर्नाटकप्रांती ते वखारी घालायला परवानगी मागताहेत ती अाणि दौलतीशी त्याचे संबंध कसे राहावेत ही.” न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तहकलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वत:शीच विचार करीत त्यांनी विचारले, ‘‘टोपीकर पाळेल हा सुलूख पंत? तुम्हास काय वाटतं? मोठी बसकण झालेय मुंबईत हबशी, मोगल, फिरंगी यांची त्याच्या आसऱ्यानं.’’ ‘‘जी. कलमातच मान्य केलंय टोपीकर विजरईनं की, तह बरकलम पाळू असं. शिवाय बोलवा आहे, विजरई केजविन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची. कुणी ग्रांथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी आल्याचंही कळतं.” राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हादपंतांसमोर आले. पंतांच्या छातीभर सरकलेले उपरणे नाकळेलसे थरकले. ‘‘तब्येत सुमार दिसत्येय न्यायाधीश तुमची. खूप तापदरा झाली तुमची गोऱ्या हेजिबांशी बोलणी करण्यात.” बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांना राजांनी घरोब्याने विचारले. ‘‘जी. तशी खास नाही – पण मुंबईहून परतताना हबशांनी केलेल्या दर्याछाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा.” ‘‘राजकारण रोजचंच आहे पंत. तुम्ही न्यायाधीश. तुम्हास थंडी सोसली नाही, तर तुम्ही दिलेला न्याय रयतेस सोसायचा नाही. मोगली फौजा परतल्या आहेत आता. थोडा विश्राम घ्या तुम्ही.” ‘‘जी.’’ म्हणत प्रल्हादपंत निघून गेले. जाताना ते कसल्यातरी विचारात खोलवर बुडून गेले होते. मं त्रिबाडीतील निळोपंतांच्या वाड्यावरचा खासगी कारभारी भेटीला आल्याची राजांना वर्दी आली. कारभारी यावा असे सहसा कधी घडत नव्हते. काय झाले असावे, या शंकेनेच राजांनी पेशव्यांच्या कारभाऱ्याला पेश घेतले. तो भीत – भीत म्हणाला, ‘‘धन्यांनी आपली भेट मागितलेय. ते येऊ शकत नाहीत इथवर महाराज.” ‘‘का? काय झालं पेशव्यांस?” ‘‘पोटशुळानं तळमळताहेत ते एकसारखे अंथरुणावर.” कारभारी उत्तरला. ‘‘काऽय?’’ महाराजांच्या कानात जसा शब्द – बाणच घुसला होता. राया, अंता, खंडोजी, पुरुषा, जोत्याजी असा माणूसमेळ घेत, ते निळोपंतांची तब्येत बघायला मंत्रिबाडीकडे निघाले. महाराज येताहेत या वार्तेने बाडी खडबडून उठली. इथे एका हारीत सुरनीस, डबीर, न्यायाधीश, अमात्य यांचे एकालगत एक वाडे होते. प्रत्येकावर हत्यारी पहारेकरी होते. निळोपंतांना बघण्यासाठी प्रवेश करायला म्हणून राजांनी वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला मात्र; राजांच्या मनी, आठवणीच आठवणी उतरल्या. ‘हा तोच वाडा होता, जिथे मोरोपंतांनी आपला देह ठेवला होता. अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या – निळोपंतांच्या हाती पेशवाईच्या मुद्रा आणि एक भिकबाळीचा करंड ठेवला होता. मोरोपंत! सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी असणारे, कसे निघाले आम्हास कैद करायला फौजबंद होऊन पन्हाळ्याकडे? बिरवाडीला रघुनाथपंत मजालसीत बोलले तेव्हा मोरोपंत हवे होते. तेच देऊ शकले असते हणमंत्यांना पटेलसा जाब. त्यांच्या या वाड्यावर – त्यांच्यावर हत्यारी पहारे बसवावे लागले आम्हास. त्यांचे पद आम्ही त्यांच्यामागे निळोपंतांना दिले. त्यांच्या तोंडी कधी खंत नाही आली आपल्या वडिलांबद्दल. कसले ॠणानुबंध हे?’ समोर आलेल्या निळोपंतांच्या बंधूंसमवेत – गंगाधर मोरेश्वरांच्या बरोबर राजे पेशव्यांच्या वाड्यात प्रवेशले. तळमळत्या स्थितीतही निळोपंत रिवाजासाठी पलंगावरून उठू लागले. पुढे होत राजांनी त्यांना लेटते केले. शेजारी बसून तब्येतीची वाजपूस करू लागले. असह्यवेदनांनी पेशवे, डोळे घट्ट मिटून घेत तळमळतच म्हणत होते – ‘‘ही उदराची व्यथा नको त्या समयास आली स्वामी.” ‘‘पंत, तुम्ही बरे वाटेतो आराम घ्या. तुमच्या पेशवाई दफ्तराचे काम बघतील तोवर गंगाधरपंत.” राजांनी पेशव्यांच्या मनावरचे दडपण सुमार केले. मंत्रिबाडीतून आलेल्या राजांना चांगोजी काटकर एका असामीसह सामोरा झाला. ती असामी होती कारवारची. संताजी पावला नावाची. “महाराजांच्या फौजेचं पाठबळ घेत कारवारात राम दळव्याची बंडाळी मोडून काढली आम्ही धनी.” रिवाज देत संताजी म्हणाला. महाराजांच्या चर्येवर, ते ऐकताना समाधानाची लकेर पसरली. ऐन उन्हतापीचे दिवस सुरू झाले. अशा उन्हाळ्यातच औरंगने विजापूरला चहूबाजूंनी घेर टाकला. विजापूर कोटाला भक्कम खंदक होता. त्याचा आधार घेत आदिलशाही फौज कोट निकराने लढवू लागली. कुतुबशाहीने विजापूरच्या मदतीला तीस हजारांची सेना पाठविली. आता दक्षिणेच्या तिन्ही शाह्या आणि दिल्लीची मोगलाई यांचे लक्ष एकवटले ते विजापुरावर. याच विजापुरात शहाजीराजांना काढण्या घालून फिरवण्यात आले होते. इथेच बड्या बेगमेच्या दरबारात ‘सेवा को जिंदा या मुर्दा पेश करूंगा’ अशी कसम खात खान अफजलने असर महालात विडा उचलला होता. आणि तीच आदिलशाही राखायला हंबीरराव घोडदळासह विजापुराभोवती घिरट्या घालत होते. मेलगिरी पंडित मध्यस्थी करीत होते. हरसूलच्या गंगाधर नागनाथ नावाच्या, दाढी कोरलेल्या एका असामीला घेऊन कुलेश खासेवाड्याच्या सदरेला राजांना पेश आले. सोबत आणल्या असामीची ओळख करून देत कुलेश म्हणाले, ‘‘नेताजीराव को बडे स्वामीने पावन कर दिया है। इस बेचारेको भी दिया जाय।” गंगाधर नागनाथ हरसूलचा – मूळ मोगली चाकर – ब्राह्मण, त्याला जबरीने मुसलमान करण्यात आले होते. आपले शुद्धीकरण करून धर्मात घ्यावे, म्हणून तो एवढ्या लांबवर गड चढून आला होता. ‘‘महाराज, दया करा. माणसात घ्या मला.’’ म्हणून स्फुंदत तो राजांच्या समोर धाडकन कोसळलाच. राजांनी पुढे येत, वाकून त्याला उठते केले. थोपटून त्याला शांतवत कुलेशांना विचारले, ‘‘काय करता येईल यांच्या शुद्धीकरणासाठी छंदोगामात्य?” ‘‘जी. इसको प्रायश्चित्त लेना पडेगा। पश्चात विधिनुसार धर्मप्रवेश करना पडेगा।’’ “प्रायश्चित्त कोण प्रकाराने केले पाहिजे, यास समजावून सांगा. बाब धर्मखात्याची असल्याने मोरेश्वर पंडितांच्या देखरेखीखाली यास शुद्ध करून घ्या.” राजांनी गंगाधरचे पडेल खांदे दिलासा देत थोपटले. त्यांचा मनोमन कसलातरी विचार चालला होता. ‘का? आमच्या रयतेवरच शुद्ध करवून घेण्याची नौबत का यावी? नेताजी तर सरनौबत होते. हा मामुली इथवर आला म्हणून लागेल तडीस. जे येणार नाहीत, येऊ शकत – धजत नाहीत त्यांचे काय? आम्हाला का वाटत नाहीत, हाती कब्ज झालेले मोगल, फिरंगी, पाद्री, टोपीकर, हबशी यांना बाटवावे असे?’ बराच वेळ महाराज त्या विचारात गुंतून राहिले. कुलेश आणि गंगाधर गेल्याचेही त्यांच्या ध्यानी आले नाही. पेशवाईची नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या गंगाधर मोरेश्वरांना राजांनी बोलावून घेतले. चेऊल भागातील रयतेला द्यायच्या सवलती त्यांना सांगितल्या. हबश्यांचा पुरा बंदोबस्त राहावा, या विचाराने ते गंगाधर मोरेश्वरांना म्हणाले, ‘‘जंजिरा कोटाच्या तर्फेनं नव्या नामजादीची पत्रं पाठवा पेशवे. खंदेरीवर माणकोजी, सागरगडावर उदाजी पडवळ आणि सुभानजी खराडे, कुलाबा कोटावर भिवजी गुजर ही वकुबाची माणसं नामजाद करा. त्यांना तातडीनं नेमल्या जागा जवळ करायची समज द्या.’’ महाराज सांगत होते, ते ध्यानपूर्वक ऐकणाऱ्या गंगाधर मोरेश्वरांना काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे, हे राजांनी ताडले. मध्येच थांबत त्यांनी विचारले, ‘‘आमच्या निळोपंतांची तब्येत बरी की कशी?” ‘‘जी. कालपासून ठीक आहेत ते. थोडी विश्रांती घ्यावी लागेल. आम्हाला म्हणायचं होतं...” बाब वर्माची असल्याने गंगाधर अडखळले. ‘‘बोला. काय आहे?” राजांना ते कशाबद्दल सांगणार याचा काही अंदाज आला नाही. ‘‘कर्नाटककडची – तंजावरची खबर आहे की – ” ‘‘काय? बोला.” राजांच्या कपाळीचे शिवगंध आक्रसले. ‘‘एकोजी महाराजांचे चिरंजीव अर्जुनजी तंजावर सोडून मोगलास मिळाले!” ‘जगदंब’ म्हणत, इंगळी डसल्यागत राजे बैठकीवरून उठले. मन बधिर झाले त्यांचे. विजापूर नजरेच्या टप्प्यात राहावे, यासाठी आता औरंगजेबाने आपला प्रचंड तळ नगरहून सोलापूरला हलविला. कुतुबशहाच्या, दिलजमाईच्या आलेल्या खलित्यात त्याने दोन वर्मी अटी घातल्या. त्यातली एक होती, पूर्वी पेशकश म्हणून वीस लाख पगोडे देणाऱ्या कुतुबशहाने आता एक कोट वीस लाखांची पेशकश द्यावी! दुसरी अट होती, आकण्णा आणि मादण्णा या हिंदू अधिकाऱ्यांना दरबारातून ताबडतोब बडतर्फ करावे! या अटी नव्हत्याच. उद्या आपल्या फौजा गोवळकोंड्यावर उतरणार याची ती दिलेली सरळ समज होती. औरंगच्या मराठी मुलखातून फौज मागे घेण्याच्या एकाच खेळीवर आता शतरंजचा पटच पालटला. राजा बाल उमरीचा आणि सरदारांत बेदिली याचा फायदा घेण्यासाठी औरंगने कमकुवत आदिलशाहीच पटाखाली धरली. तिला राखण्यासाठी कुतुब आणि मराठशाही धडपडू लागली. कोकणातील वतनदारांची बंडाळी मोडण्यात सचिव रामचंद्रपंतांची ताकद खर्ची पडत होती. त्यांना रायगडी यायलाही फावत नव्हते. त्यासाठीच शंकराजी नारायण यांना याद फर्मावून राजांनी सचिवपदाची जोखीम त्यांच्यावर सोपविली. जशी शुद्धीकरणाची बाब काट्यासारखी राजांच्या मनी सलत होती, तशीच आणखी एक बाब होती. मुलखातल्या बागलाणपासून कारवारपर्यंतच्या वरघाटातील भिल्ल, कोळी, धनगर अशा अश्राप, असहाय लोकांना गुलाम म्हणून खरेदी करून त्यांचे तांडेच्या तांडे सिद्दी व टोपीकर बोटीवर लादून दूरदेशी पाठवीत होते. माणसांना जसे काही वालीच नव्हते कुणी. याला पायबंद घालणे आवश्यक होते. नव्याने नामजाद शंकराजी नारायण यांना त्यासाठी राजांनी याद घेतले. ‘‘शंकराजी, वरघाटाची रयत गुलाम म्हणून हबशी व टोपीकर खरेदी करून त्यांचा दूरदेशी विक्रा मांडतात. कशी जातात ही माणसं, काही माग?” शंकराजींच्या ध्यानीमनी नसलेली बाब पुढे आली. ‘‘जी. जकात भरतात त्यांची दरडोई तीन पगोडे खजिन्यात. गरीब, अन्नाला मोताद माणसं एवढ्यावरही गुलाम म्हणून जायला तयार होतात!’’ ‘‘तीन पागोड्यांस एक माणूस! शंकराजी, अशी रानावनातली जी माणसं आहेत, त्यांचं मन वळवून संचणी करायला कळवा घाटाघाटातील सुभेदारांना. यातूनही शिपाईगिरीपरीस गुलामगिरीच चखोट मानून जे दूरदेशी जायला राजीच असतील त्यांच्यासाठी खरेदीदारावर दरडोई बारा पगोडे जकात जारी करा!” राजे कडव्या निकालाने बोलले. हुकुमाची तातडीने तामिली करण्यासाठी शंकराजी निघून गेले. ‘गुलामी! केवढा कलंक हा माणुसकीवरचा! जनावर, लाकूडफाट्यासारखा माणसाचा भाव. घाण्याच्या बैलासारखे लादलेले जिणे. कुठून आले हे हबशी, टोपीकर? बेधडक इथली माणसे खरेदी करतात. कुणाकडे जावे त्या गुलामांनी आसऱ्याला? आबासाहेबांनी जहाजावर चढविलेल्या बाळाजींना त्यांच्या मातेसह, दिले पैसे भरून उतरून घेतले. गुलामीतून मोकळे केले. गेले असते बाळाजी कुठल्यातरी देशी गुलाम म्हणून तर? काय झाली असती त्यांची गत? बाळाजींना आबासाहेबांनी जहाजावरून उतरून घेतले. आम्हाला त्यांना कटावाच्या आरोपापोटी हत्तीच्या पायी द्यावे लागले! मांडवीच्या खाडीत वाहतीला लागलेला आमचा घोडा त्यांच्या खंडोजींनी बचावला! कसला तिढा हा हयातीचा? का उकलत नाही?’ आपल्याच विचारांत हरवलेले, सैरभैर महाराज महाली फेर घेत असताना जोत्याजी केसरकर बाळराजांच्यासह आला. त्याच्या भुजेवरून उतरताच बाळराजे दुडक्या चालीने येऊन राजांच्या पायांना मिठी भरत बिलगले. त्यांना मायेने वर घेत त्यांची पाठ थोपटीत राजे म्हणाले, ‘‘तुम्ही नाही कुणाचे गुलाम हे ठीक आहे.” बाळराजांना ‘गुलाम’ या शब्दाचा अर्थच कळला नाही. ते गोंधळून आपल्या आबांकडे बघू लागले. ‘‘बोलत नाही ते जोत्याजी?” बराच वेळ जोत्याजी गुमान राहिला, हे ध्यानी येऊन राजांनी सहज विचारले. ‘‘हेरी काय नाय पर कानावर भल्या फाटेचंच आलंय याक.” “काय?” बाळराजांच्या पाठीवरचा फिरता हात थांबवत राजांनी विचारले. ‘‘...म्हंत्यात भागानगरात औरंगजेबाच्या चिथावणीनं बहकलेल्या कुतुबशाही सरदारांनी आकण्णा आन् मादण्णा यांचा खून केला. भरचौकात भोकसलं त्येस्नी!” अंगावर वीज कोसळावी तसेच वाटले राजांना ते ऐकताना. याच आकण्णा आणि मादण्णा यांच्या मध्यस्थीने आबासाहेबांपासून दौलतीने गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध राखले होते. भागानगरच्या भेटीत तर आकण्णांच्या घरी जाऊन आबासाहेबांनी ‘विश्वासू घर’ म्हणून भोजनही घेतले होते. आमची माणसे फोडून जसे आम्हाला औरंग हैराण करतो आहे, तसेच हे खून करवून कुतुबशाही खिळखिळीच केली आहे त्याने... ‘‘औरंग! काय हवस आहे या माणसाची?” महाराज स्वत:शीच पुटपुटले. मृगाचे दिवस आले. आता पाणधार केव्हा धरेल याचा नेम नव्हता. आदिलशाहीवरचा औरंगच्या फौजांचा ताण वाढत होता. मेलगिरी पंडित, सर्जाखान आणि शिकंदरशहाला भेटून विजापूरहून परतले होते. त्यांनी सर्जाखानाचा तातडीच्या मदतीचा निरोप आणला होता. आता गाठीच्या आणि राजकारणात तरबेज कुलेशांना आदिलशाही आघाडीवर पाठविण्याशिवाय मार्ग नव्हता. समोर याद घेतल्या कुलेशांना राजे म्हणाले, ‘‘माणसं पुरविल्याशिवाय आदिलशाही तगत नाही छदोगामात्य.” ‘‘सोचते है हमही जायेंगे आदिलशाही कुमक के लिये।” कुलेशांनी, राजांनी विचारण्यापूर्वीच जोखीम पेलण्याची तयारी दाखविली. ‘‘मनचे बोललात आमच्या कुलेश. आजच गड उतरा आणि पन्हाळगडाच्या रोखानं कूच व्हा! तिथलीही शिबंदी पाठीशी घेत आदिलशाहीत उतरा. शहजादा आझमच्या फौजा येतील आडव्या तुम्हाला मिरज प्रांतात.” ‘‘जी. हम आजही गड छोडेंगे।” कुलेश आज्ञा घेऊन निघून गेले. मिरज, सोलापूर, अकलूज, इंदापूर अशी उभी पट्टी धरून राजांनी आता हंबीरराव, कुलेश यांच्या फौजफळ्या आदिलशाहीच्या पाठीशी उभ्या केल्या. बाहेर गडमाथ्यावर पाऊस कोसळत होता. राजमनात विचारधारा थडथडत होत्या. याच वेळी लंडन दरबारचा खलिता घेऊन एक जहाज सुरत बंदराला लागले होते. त्या खलित्यात लंडनकरांनी स्पष्ट शब्दांत लिहिले होते – ‘‘राजा शंभूजी याच्या गोटात दाखल होऊन तुम्ही त्या युद्धसंमुख राजाशी दाट मैत्री संपादन करा. मग तुम्हाला मोगल किंवा पोर्तुगीज यांना भिण्याचे कारण नाही. मुंबईजवळ सिद्दी किंवा मोगल यांना फिरकू देऊ नका. त्या राजाशी झालेल्या तहाच्या पूर्ततेसाठी सोबत बंदुका आणि दारूगोळा पाठविला आहे. अधिक लागल्यास मद्रासच्या जलकोटातून घ्या.’’ राजांच्या ताकदीचे जे मोल सात – दर्यापार, टोपीकर दरबारला कळले होते, ते या देशचे असून, आप्तेष्ट असून कैकांना कळले नव्हते! लंडन दरबारने राजांना ‘युद्धसंमुख वीर’ म्हटले होते. निळोपंत आणि प्रल्हादपंत राजांच्या भेटीस आले. पोटशुळाची व्यथा सुमार होताच निळोपंत प्रल्हाद निराजींच्यासह वानापूर येथे इंग्रज वकील रिचर्ड स्टॅन्ले याच्याशी बोलणी करून आले होते. स्टॅन्लेशी झाल्या बोलण्याचा तपशील राजांना देत निळोपंत म्हणाले, ‘‘आपले सुभेदार टोपीकर व्यापाऱ्यांकडून कर घेतात, अशी तक्रार हा इंग्रज वकील करतोय महाराज.” “जकातीपोटीचे आहेत ते कर पेशवे. नेहमीचीच आहे ही त्यांची तक्रार.” ‘‘जी. आम्ही गोऱ्या वकिलास त्याची समज दिलेय. या भीतीनं ते जादा वखारी घालायला तयार नाहीत आणि खुल्या व्यापारावरचे कर द्यायला कुरकुरतात. पण वरून काहीतरी कानपिचकी आलेली दिसते. भाषा नरमाईची वाटली वकिलाची.” ‘‘काय शेवट झाला तुमच्या बोलण्याचा पेशवे?” ‘‘टोपीकरांनी आपला वकील मुंबईला ठेवून घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांचाही एक वकील आपल्याकडे राहील.” पंतांनी प्रल्हाद निराजींच्याकडे बघत जाब दिला. ‘‘आता न्यायाधीशांना टोपीकर दरबारात गुंतवून नाही भागायचं. कुणी दुसरी असामी पाठवा पेशवे मुंबईला. काय प्रल्हादपंत?” राजांनी न्यायाधीशांचा सल्ला विचारला. ‘‘जशी आज्ञा. नवी माणसं तयार झाली पाहिजेत हेजिबीत.” प्रल्हादपंतांना आपले वकील म्हणून झालेले मागील वेळचे हाल राजांना पसंत पडले नसावेत की काय, अशी शंका आली. ‘‘आम्ही गोऱ्यांच्या वकिलाकडे दोन बंदुकांची मागणी घातली. त्यानं ती मान्य केली आहे स्वामी.” पेशवे उजळ चर्येने म्हणाले. ‘‘बंदुका देतीलच ते निळोपंत. सिद्दी, मोगलांना ते पाठीशी घालतात त्याचं काय?” राजांनी मूळ धरले. ‘‘हबश्यांना टोपीकरांनी हाकललंच आहे. हबशी आता आपल्या समुद्रपट्टीत फिरतो ते उंदेरीतून, असं इंग्रज वकिलाचं म्हणणं आहे. मोगली आरमारालाही त्यांनी सख्त ताकीद अलीकडे दिली आहे.” बराच वेळ प्रल्हादपंत काही बोलत नाहीत, हे ध्यानी आल्याने राजांनी त्यांना विचारले, ‘‘न्यायाधीश, बोलत नाही ते? तब्येत?” ‘‘जी. तसं काही नाही. बरे आहोत आम्ही.” त्यांच्या घशाला हे बोलताना कोरड पडली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फडफडल्या. दोघेही मुजरे देत निघून गेले. विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले. मामला कारीच्या सर्जेराव जेध्यांचा होता. कारीच्या जेधे घराण्याने दौलतीची, कान्होजी जेध्यांपासून सेवा केलेली होती. औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पलट खाल्ली! भाऊबंदकीने मने पोखरली. सर्जेराव जेध्यांचा भाऊ शिवाजी जेधे मोगलांना मिळाला. त्याने सर्जेरावांची गुरेढोरे वळवून नेली. त्यांचा मुलूख तसनस केला. हा कथला वास्तविक स्वराज्यातला; पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली. शिरवळच्या मोगली अधिकाऱ्याकडे विचित्रगडचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भाऊबंदकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली. राजांच्या कानी जेध्यांचा हा सगळा करीणा आला होता. संताजी निंबाळकरांचा सर्जेरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले – ‘‘...आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत. स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन, अभयपत्र देऊन स्वाधीन करतील, तर निष्ठेने सेवा करू.” शब्दांगणिक जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली. सरसर पायफेर घेत ते म्हणाले, ‘‘चिटणीस, कलमदास्तान घ्या. आम्ही सांगू तो मजकूर शब्दबर रेखून तातडीनं पाठवा.” खंडोजी कलमी सेवेवर बसले. समोर सर्जेराव जेधेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले, ‘‘...तुम्ही, संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगोन पाठविला की, आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला. त्याने आपली गुरेढोरे वळून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही. याबद्दल आपण उठोन सिरवळास आलो आहे. ऐसियासी आपण रा. स्वामींच्या पायाजवळी एकनिष्ठच आहे... त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे. ‘‘तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की, वतनदार होऊन इमानेइतबारे वर्तावे ते गोष्ट न करिता स्वामींचे अन्न बहुत दिवस भक्षिले. त्याचे सार्थक केलेत की, स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत. तुमचा भाऊ गनिमाकडे केला; तो बरे पाहिना ऐसे होते तरी तुम्ही हुजूर यावे होते!! म्हणजे तुमचा एतबार व एकनिष्ठता कळो येती. ते केले नाही. तरी बरीच गोष्ट जाहली. या उपरेही गनिमाकडे राहाणेच असेल, तरी सुखेच राहणे. तुमचा हिसाब तो काय? या क्षणी स्वामी आज्ञा करितात तरी गनिमादेखील तुम्हास कापून काढवीतच आहेत, हे बरे समजणे! ‘‘एकनिष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल, तरी जो राबता करणे तो हुजूर लेहून पाठवावा. हुजराती खेरीज दुसरियाकडे एकंदर राबता न करणे. “तुमचेजवळ एकनिष्ठताच आहे, ऐसे स्वामींस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करतील. तेणेप्रमाणे वर्तणूक करणे.” खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैलीबंद केला. ‘‘पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपीकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी.” खंडोजींनी दुसरी बाब पुढे घेतली. ‘‘बदलाचं धोरण काय आहे खंडोजी?” राजे त्रस्त झाले. ‘‘आपला समुद्रपट्टीचा मुलूख मारण्याचा ते यत्न करताहेत. पण आपले सारंग डोळ्यांत तेल घालून जागते आहेत.” राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. ‘‘चेऊलच्या खबरा आहेत. हबश्यांनी चेऊल जागजागी जेर केलं आहे. थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बरी करणाऱ्या पिलाजी न्हाव्याचा मुलगा बजाजी यानं हबश्यांच्या उंदेरी बेटावर जोरावारीचा हमला केला. त्यामुळं चिडून हबशी चौलात मेळानं घुसले आहेत. कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी.” खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले. राजांच्या मनी आबासाहेबांचे अखेरचे बोल थडथडत फिरले – ‘‘जंजिरा – उंदेरीवर हबशी पाय ठेवून आहे.” गलबतात लादून हबश्यांनी पसार केलेल्या, मुंबईत कामी आलेल्या सारंग सिद्दी मिश्रीची नेक मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागली. जंजिराखाडीच भरून काढण्यासाठी स्वत: केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली. हबशी! दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर! समर्थांच्या चाफळमठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाट कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्मखात्याच्या मोरेश्वर पंडितांना, त्यांच्या चिटणिसासह याद घेतले. ‘‘पंडित, चाफळमठाची कोण तक्रार?’’ राजांनी मोरेश्वरांना जाब विचारला. ‘‘जी. मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार – उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात.’’ मोरेश्वरांनी चाफळची हालहवाल सांगितली. ती सांगताना समर्थांमागे मठाच्या होणाऱ्या आबदांनी त्यांचेही मन व्याकूळले. राजे चिंतागत झाले. चिटणिसांकडे बघत म्हणाले, ‘‘कलम घ्या. कऱ्हाडचे देसाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकीदपत्र द्या.’’ राजे धर्मखात्याच्या चिटणिसांना ताकीदपत्राचा मजकूर सांगू लागले – ‘‘चाफळ श्रीरघुनाथ यात्रेचे नंदादीप, लिहिणार व अफराद यांचे वेतनाची मोईन सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पाववत नाही. सिंगणवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिलाकसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसावियास मधेच कथले करावयास संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वाहगावचा कृष्णाजी पाटील व पुजारी भक्षतो. तर बरजोद ताकीद करणे आणि पाटलाने खादले, ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावियास पावते करणे.’’ मठाच्या बारीक – सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले. गेली तीन-चार वर्षे झालेल्या फौजांच्या धावणींनी जागजागची शिवारे उजाड झाली होती. त्यातच नुकतेच दुष्काळी साल चाटून गेले होते. गावोगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर, दिलासा देऊन राने तवानी करणे भाग होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटाने धावतात, हे जाणलेल्या राजांनी सुरनीस शंकराजींना सदरेवर घेऊन मुलूखभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले – “जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे – ’’ विजापूरभोवती चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारामागून स्वार येत होते – कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले. बहिर्जी नाईक रामघाटात झालेल्या हातघाईची खबर देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेम सावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मदतीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सोंद्याचा राम दळवी, पंधरा हजारांच्या फौजेने हातभार लावीत होता. कारवार जाळत – लुटत होता. या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्रपंत आणि धर्माजी नागनाथ आटापिटा करीत होते. पण – पण एवढी आदिलशाहीला राजे कुमक करीत होते, तरी त्यांचाच सालार सर्जाखान याने रामघाटात सहा हजार हशमांचा तळ टाकून रामचंद्रपंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती, घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती, देसाई – दळवींच्या मार्फतीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूख मारून विजापूरचा खजिना भरायचा होता! कसेही करून औरंगच्या रेट्यापुढे तगायचे होते. कोकणातील देसाई – दळव्यांचा उपद्रव कसा वारावा, या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी बापूजी व गोविंद नारायण या चेऊलच्या दोन असामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला. ‘‘या उभयतांवर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. यांचा जमीनजुमला जुलमाने खादला आहे.” प्रल्हादपंतांनी सगळा कथला सांगितला. विठोजी आणि गोविंद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले – “मायबाऽप, न्याय द्या आम्हास. वाऱ्यावर सोडू नका.’’ ‘‘न्यायाधीश, चौलास देशाधिकारी कोण?” राजांनी पंतांकडे तपास घेतला. ‘‘जी. येसाजी अनंत.” ‘‘त्यांना तातडीनं आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरने करवून घेतलेले खतपत्र रद्दबादल ठरवावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले, ते पूर्वील देशाधिकारी कोण?’’ ‘‘हरी शिवदेव, महाराज.” प्रल्हादपंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता. ‘‘त्यांस एक सख्त समज द्या न्यायाधीश – विठोजी बापूजी व गोविंद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूम कानी आला. तुम्ही सुभेदार! तमाशा पाहता. वरतून सूर्याजीची कोशिस करिता. यावरून तुमची कारकुनी कळो आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे, ही कोण दिवाणी चाकरी?” संतप्त राजांनी हरी शिवदेवना काय समज द्यावी हे प्रल्हादपंतांना सांगितले. इकडे आपल्या अश्राप रयतेला वाजवी न्याय मिळावा, यासाठी राजे तिळतिळ तुटत होते. त्या वेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्यांनी बघत होती. आणि नुसतीच बघत होती. रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांदताऱ्यांचे हिरवे निशाण त्यावर फडकत होते. साठ हजार फौजीतळाच्या राहुट्या जागजागी पडल्या होत्या. शाही शामियान्याच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहच्यांचे च्यांचे तबक हे सामान हारीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्तीभोवती कडे धरून पहारा देत होते. साखळदंड वाजवीत चीत्कारत तो हत्ती डुलत होता. शामियान्यात मुहम्मद आझम, मुईजुद्दीन, बेदारबख्त, रणमस्तखान अशा खाशा असामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते. चाळीस-पन्नास घोडेस्वारांच्या दुडक्या पथकातून दोन अरबी, उमद्या घोड्यांवर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले. पहारेकऱ्यांनी त्यांना तसलीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशाहला तिवार कुर्निसात केला. त्यांतील तरण्याबांड, उंच असामीला बुढा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध वयस्क इसम पुढे झाला. त्याने आपल्या ‘जिल्हे सुबहानीं’च्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशहासमोर धरले. बादशहाने आपला माळधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असदखान. त्याने तबकातील हिरवीशार खिल्लत उचलून, आपल्या बरोबर आलेल्या तरण्याबांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावरचा जरीबतू चांदतारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकत पुन्हा कुर्निसात केला. त्याला पंचहजारी आणि बाहेर मांडलेल्या चीजवस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळबंद करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक! आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ! अचलोजीच्या कानी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की काय, अशी जंजिऱ्याच्या हबशी कासमने पुन्हा उचल खाल्ली. चौल, राजापुरात आपले हबशी तांडे घुसवून त्याने निर्दय कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वत:च कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोविंदजी कान्हो यांच्या आरमारी दर्याभांडणात गोविंदजी मारले गेले. आदिलशाहीचे एक-एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिरजेचा भुईकोट, पण तोही किल्लेदार आसदखानाने रणमस्त आणि रुहुल्लाखान यांच्या सुपुर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर-पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत, ती राखण्यासाठी जिवाचे रान करीत होते. लक्ष्मेश्वराच्या रवणगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजांनी पेशव्यांना पाचारण केले. आपणाला कशासाठी याद केले आहे, याची काहीच कल्पना नसलेले निळोपंत पुण्याहून दामाजींनी कळविलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, ‘‘रुहुल्ला आणि रणमस्तखान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख, देशपांड्यांना मसलतीत घेऊन फितवण्याचे यत्न चाललेत त्यांचे.” असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की, कुठूनतरी समर्थमुखातली गोसावी नांदी कानी पडावी. भोवतीच्या यातनांनी मनाची तल्खली होत असलेले राजे अंत:पुरी दालनात आले. बराच वेळ ते काही बोलत नाहीत; हे जाणवल्याने येसूबाई म्हणाल्या, “पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनीबाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय.” राजांनी चमकून येसूबाईंच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनीबाबा, मोरया गोसावी, मल्हारबाबा या कुणाचेच दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटपुटले त्यांचे त्या जाणिवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया – अंता आले. बाळराजे ‘मासाहेब’ म्हणत येसूबाईंना बिलगले. मायलेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्या आऊंची सय झाली. क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍 1

Comments