
Yuti's Hub Library
June 8, 2025 at 06:08 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - १२.
आनंदीला आता अभ्यासात रस वाटू लागला. मराठीची दोन-तीन बुकं वाचून झाली. भूगोलाचे प्राथमिक गोपाळरावांनी शिकवले. प्रथम तिला व्याकरणाचा कंटाळा यायचा. पण गोपाळरावांनी निरनिराळी उदाहरणे देऊन तिला समजावून सांगितले. नुसती भाषा वाचण्यापेक्षा त्यातील शब्दांचे स्थान जाणणे जास्त महत्त्वाचे आहे. व्याख्या कशी करावी हे समजून सांगताना त्यांनी काही जुन्या ओव्या तिच्याकडून पाठ करून घेतल्या. ग्रंथामध्ये दृष्टांत हवा त्यासाठी त्यांनी श्रीधरच्या ओव्याही पाठ करून घेतल्या...
" अमृताहुनी गोड अन्न। परि रुची नसे शाखेविण।
दृष्टांताविण ग्रंथ संपूर्ण। रसीं न चढे सर्वथा।
अलंकार शोभे नितंबरी। कीं गगनमंडीत उडूगणीं। की मानस सरोवर मनहंसावाचुनी शोभा न दिसे सर्वथा
कीं विरक्तीविण ज्ञान। कीं प्रेमेंविण भजन।
कीं दानेविण भाग्य पूर्ण। दृष्टांत विना ग्रंथ जैसा।।
गोपाळरावांनी व्याकरणाबरोबर निरनिराळ्या काळात भाषा कशा बदलत गेल्या हे उदाहरणासहित शिकवले. पेशवाईतील भाषा, दादोबा पांडुरंगाची भाषा, महादेव शिवराम गोळे यांची भाषा कशी निरनिराळी आहे हे त्यांनी तिला पटवून दिले. वाक्य म्हणजे काय? उद्देश कोणते? विधेयक कोणते? संयुक्त वाक्य कसे असते? हे शिकवल्यावर आनंदी स्वतः वाक्य तयार करून कागदावर उतरवू लागली. पाच सात वाक्य लिहिल्यानंतरच तिला कृतकृत झाल्यासारखे वाटले. पण गोपाळरावांनी तिचा तो आनंद टिकू दिला नाही. म्हणाले, नुसते चार पाच वाक्यात एवढी हुरळून जाऊ नकोस. तुला अशी शेकडो पान लिहावी लागतील. नुसते मराठीतच नाही तर इंग्रजीतही!
गोपाळरावांनी तिला संस्कृत बरोबर इंग्रजीचेही पाठ द्यायला सुरुवात केली. इंग्रजी, संस्कृत, मराठी तीन वेगवेगळ्या भाषा. तिला मोठी गंमत वाटू लागली.
अभ्यास चालला होता. दिवस भरत आले होते. तिच्या आजीने बाळंतपणाची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळे मदार त्यांच्यावरच होती.
शरीरात जडत्व आले होते. अभ्यासात मन लागेना. गोपाळरावांनीही अभ्यासाबद्दल बोलायचे सोडून दिले.
एका रात्री आनंदीला कळा सुरू झाल्या. गोपाळराव बाहेरच्या ओसरीवर बसून बातमीची वाट पाहत होते. काही वेळाने मुलगा झाल्याची बातमी आजीबाईंनी दिली. ते निर्विकारपणे तसेच तटस्थ बसून राहिले.
दहा-बारा दिवसांनी गोपाळराव आनंदीच्या खोलीत गेले. आनंदी मुलाला पाजत होती. दोन-तीन मिनिटांनी तिने मुलाला खाली ठेवले. ते तसेच उभे असलेले पाहून तिच्या लक्षात आले, नवऱ्याचे काहीतरी बिनसले. एक प्रकारचे भय तिच्या सर्वांगात भिनले. म्हणाले, मूल.. मूल.. मूल.. किती दिवस वाया घालवणार आहेस? आणलेली बुकं कोण वाचणार?
आजींना राहवले नाही. म्हणाल्या, अहोऽ! हे काय बोलणे? ओल्या बाळांतीणीला बुकं वाचायला सांगता? बास् झाला तमाशा. आता ती बुक नाही वाचणार.
रागारागाने ते निघून गेले. दोन-तीन दिवस ताण तणावातच गेले. एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर ते बाळंतिणीच्या खोलीत गेले. आजीबाई बाहेर सटकल्या. ते नुसतेच उभे असलेले पाहून, आनंदीने विचारले, का रागावलात? चांगला मुलगा झाला. काय चुकलं? ते म्हणाले, मुलगा झाला हेच चुकलं. मुलगी झाली असती तर तिला चांगले शिकवले असते.
मग गंभीरपणे म्हणाले, गेला एक-दीड महिना तुझी गय केली. उद्यापासून अभ्यासाला लागायचे. उद्या रात्री इंग्रजीचा पाठ वाचून ठेवायचा. भयाने तिचा घसा कोरडा पडला. कसा बसा होकार भरल्यावर मुलाकडे न पाहताच तरातरा निघून गेले.
दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आले ते तणतणतच. तिरसटपणे म्हणाले, धडा झाला नसेलच. ती सुन्नपणे बसून राहिली. ते आणखी आरडाओरडा करणार, तोच आजीबाई हळुवार आवाजात म्हणाल्या, मुलाला आज बरं नाही. सकाळी अंग चांगलंच तापले होते. आता ज्वर जास्त वाढला. छातीही वाजत आहे. निःश्वास टाकू ते बाहेर येऊन बसले.
पुढे आठवडाभर त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार चालले. पण गोपाळराव तिर्हाईतासारखे बघत होते. गावात डॉक्टर होता. पण तो ख्रिस्ती होता. त्याला घरात आणायचे? बाळांतीणीच्या खोलीत न्यायचे? बायकोला व मुलाला तपासायला सांगायचे? कसे शक्य आहे? त्यांच्या मनात विचार चमकून गेला... गावात एखादी ब्राह्मणबाई डॉक्टर असती तर..?
एका रात्री बाळाचे जास्तच झाले. सर्व इलाज थकलेय! शेवटी पहाटेच्यावेळी बाळाने या जगाचा निरोप घेतला.
रडण्याचा एकदम कल्लोळ उठला. आनंदी ढसाढसा रडली. गोपाळराव शांत, स्थितप्रज्ञ होते. आजीबाई रडत म्हणाल्या, त्या दिवशी तिन्ही सांजेलेला यांनी अभद्रासारखी आंघोळ केली. आता पुन्हा करा म्हणावं..
पुढचे आठ दहा दिवस असेच दुःखात गेले. गोपाळरावांना दुःख झाले की नाही कळत नव्हते. आनंदी थोडी सावरली.
काही दिवसांनी ती दोघं पुन्हा खोलीत झोपायला लागली. गोपाळरावने तिला जवळ घेऊन थोपटले. बऱ्याच दिवसांनी असा प्रेमळ स्पर्श झालेला नव्हता. ती थरारली. हळुवारपणे म्हणाले, झाले हे वाईटच झाले. तिला रडू कोसळले. म्हणाले, मूल जगायला हवं होतं. पण आता गेलं म्हणून रडत बसण्यात काय अर्थ? तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस.
आता वेळ न दवडता उद्यापासून अभ्यासाला लागायचंस. तू जास्त अभ्यास करावा असे देवाच्या मनात होते. म्हणून असं झालं. तू इतकी शिक की, लोकांनी तुझं नाव घ्यावं. सर्व विद्वानांसारखी विद्वान हो!
बिचारी हतबल झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागणे भाग होते.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
🙏
👍
4