Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 9, 2025 at 07:51 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - १४. आनंदी म्हणाली, आपणच सांगितलेली कविता आठवा... " अये रुढे! वर्णूं अतुल महिमा मी तव किती। न शास्त्राची सुद्धां तुजपुढति गे चालत गती।।" गोपाळराव काहीच बोलले नाही. चमत्कार झाल्यासारखे एकदम म्हणाले, वाच ते हार्डवर्डचे बुक! पुढचे पाच सात दिवस गोपाळराव गप्प गप्पच होते. त्यांचे काहीतरी बिनसले होते. अभ्यास चालू होता. एके दिवशी ते पोस्टातून लवकर घरी आले. म्हणाले, आज खरोखरच अलिबागच्या नावाने आंघोळ करायला हवी. सुटले एकदाच हे गाव! सगळ्यांनी फार त्रास दिला. दोघींना काही अर्थबोध होत नव्हता. जेवताना सांगितले, कोल्हापूरला बदली करून घेतली. बांधा बांधायला सुरुवात करा. रात्री नेहमीप्रमाणे आनंदी वाचू शकली नाही. अदबीने मान खाली घालून तिने विचारले, बदली का करून घेतली? या हलकटांचा कंटाळा आला होता. अहोऽ, असे कुचकट, हलकट लोक जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत. गोपाळराव म्हणाले, मी हेतुपुरस्पर कोल्हापूर मागून घेतले. का? तिथे मिशन हायस्कूल आहे. तिथे तुला इंग्रजी चांगलं वाचता येईल. आणि आजीबाईंना कल्याणला पोहोचवून देणार आहे. शिक्षणामध्ये दुसऱ्या कोणाचा अडथळा नकोय! घर अंबाबाईच्या देवळाजवळच मिळाले. वाड्यात खालच्या मजल्यावर हे राहत होते. मालक वर राहत होते. बाकी बिर्‍हाडं नव्हते जम बसायला दहा पंधरा दिवस गेले. घरी अभ्यास चालू होता. शाळेचे अजून जमले नव्हते. बऱ्याच खटपटी लटपटीत करून मिशन स्कूलच्या मायसी बाईकडे गोपाळराव गेले. तिथे गुहिन साहेब होते. नमस्काराची देवाण घेवाण झाल्यावर, गोपाळराव मायसी बाईस म्हणाले, माझ्या बायकोला इंग्रजी शिकवण्याची माझी इच्छा आहे. ती अज्ञानी आहे. मग हलक्या आवाजात म्हणाले, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. पेशव्यांच्या जातीचा. बायको हुशार आहे. शिकली तर तुम्हाला, समाजाला तिचा उपयोग होऊ शकेल. तिला मिशन स्कूलमध्ये दाखल करतो. पण स्कूल फार लांब आहे. ब्राह्मणांची बाई ख्रिश्चन शाळा शिकते हे लोकांना पाहणार नाही. तिला लोकं त्रास देतील. मायसबाई म्हणाल्या, आपण पोलीस बोलावूं. हे इंग्रजांचे राज्य आहे. लोकांची हिम्मत होणार नाही. हळूच गोपाळराव म्हणाले, असे केले तर... आपण रोज शाळेत बग्गीतून जाताच. बग्गी माझ्या घरावरून घेतली तर, बायको तुमच्याबरोबर जाऊ शकेल. त्या काही बोलण्या आधीच गुहिनने मान्यता दिली. आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता बग्गी घराजवळ येईल म्हणून सांगितलं. गोपाळराव एका वेगळ्याच आनंदात घरी आले. आनंदीला म्हणाले, उद्या सकाळी मिशन स्कूलच्या मॅडमची बग्गी अकरा वाजता येईल. तिच्याबरोबर शाळेत जायचे. आनंदीला बोलण्याचा अवसर न देता खेकसून म्हणाले, शाळेत जायचे आणि अभ्यास पण करायचा. अभ्यास म्हणजे तू ...तू.. म्हणजे दुसरं काहीच नाही. समजलं? दुसऱ्या दिवशी अकरा वाजता आनंदी सजवून धजून बसली होती. आजू बाजूंच्या लोकांना कसा कोणास ठाऊक सुगाव लागला असावा. घराच्या खिडक्या ओट्यावर तुफान गर्दी झाली होती. थोड्याच वेळात घरासमोर बग्गी येऊन उभी राहिली. गोऱ्या मॅडमने डोके बाहेर काढून तिला खूण केली. आनंदी थरथर कापत बग्गीजवळ गेली. आत एकच बाक होते. मॅडम जवळ बसलेले तिला आवडेल का? विटाळ होणार नाही का? बावळट चेहर्‍याने ती तशीच उभी राहिली. मॅडमने खुणेने पायाजवळ बसायला सांगितले. मधल्या अरुंद जागेत ती अवघडून बसली. बग्गी भरधाव निघाली. मॅडमचे पाय तिला लागत होते. काही बोलणे शक्य नव्हते. तिच्या पायाशी बसणे अपमानास्पद वाटत होते. तिचे ब्राह्मणी रक्त सळसळत होते. तीन-चार दिवस शाळेत जात होती. पण कळत काहीच नव्हते. नुसते जायचे आणि यायचे. मॅडमच्या पायाशी बसायचे. घरी आल्यावर रोज रात्री नवऱ्याला हजेरी द्यायची. ते ओरडून विचारायचे, आज काय शिकली? तिला काही समजेना. काय उत्तर देणार? त्यांचा संताप अनावर होई. त्यांना घाई झाली होती. एका दिवसात बायको पंडित व्हावी. शेवटी मनाचा हिय्या करून एके दिवशी सांगितले... शाळेत मला काहीच समजत नाही. ते संतापून वाटेल तसे बोलू लागले. म्हणाले, मॅडमला तसे सांगावे. सांगितले की, ती ताडताड बोलते. तुझीच काही चुकत असेल. उद्या मीच घरी थांबतो. विचारतोच त्या बयेला. दुसऱ्या दिवशी ऑफिस बुडवून गोपाळराव मुद्दाम घरी थांबले. दहा, अकरा, बारा, साडेबारा वाजले. बग्गी आलीच नाही. संध्याकाळी ते मायसा बाईच्या बंगल्यावर गेले. ती वाटच पाहत होती. म्हणाली, आज आले नाही. कधीच येणार नाही. तिचं काही चुकलं का? लहान आहे. त्या म्हणाल्या. तिची काहीच चूक नाही. मग काय झाले? दरबारचे कारभारी जाधवराव सरदार यांना एका ब्राह्मणाच्या बाईने मडमे बरोबर बग्गीत जाणे पसंत नाही. त्यांनी मायसीला तसे सुचवले. गोपाळराव हतबध्द झाले. दोन-तीन दिवस त्यांचे विमनस्क मनःस्थितीत गेले. त्या दिवशी रविवार असल्यामुळे गोपाळराव घरीच होते. एक पट्टेवाला आला. मुजरा करून म्हणाला, आमचे सरकार सरदार जाधवरावांनी बोलावले. गोपाळराव त्याच्याबरोबर निघाले. वर मोठ्या दिवाणखान्यात जाधवराव लोडाला टेकून बसले होते. गोपाळराव उभे होते. जाधवराव करड्या आवाजात म्हणाले, मुद्दामच बोलावले. तुमचं कुटुंब मडमे बरोबर ख्रिस्तांच्या शाळेत जाते. होय! पाद्र्याला सांगून मी बंदोबस्त केलाय. मॅडम तुमच्याकडे येणार नाही. गोपाळराव हलक्या आवाजात माझी बायको जाईल मड्डमकडे. जाधवरावांनी चमकून समोरच्या शूद्र ब्राह्मणाकडे पाहिले. ते ओरडून म्हणाले, तुम्ही ब्राम्हण आहात. तुम्ही धर्म पाहायचा. तुमचे आचरण शुद्ध असायला हवे. तुम्ही त्यांच्याकडे जाता कामा नये..... क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
👍 🙏 2

Comments