Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 9, 2025 at 07:51 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - १५. गोपाळराव संयंत स्वरात म्हणाले, आपण मला कोण सांगणार? मला तिकडे जायलाच हवे. किरिस्ताव व्हायचं की नाही हे मी ठरवणार. तुमचा त्यात काही संबंध नाही. जाधवरावांचे अंग संतापाने थरथरले. कुणा समोर बोलताय? हे कोल्हापूर आहे. तुम्ही असे वागलात तर इथे राहणे तुम्हाला मुश्किल करू. गोपाळराव म्हणाले, मी इंग्रज सरकारचा नोकर आहे. मी कसं वागावं हे इंग्रज सरकार सांगेल. मला फार त्रास झाला तर प्रेसिडेंटला कळवीन. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहिले. काही क्षण थांबून म्हणाले, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला काही सांगावेसे वाटले म्हणून बोलावले. अजून विचार करा. आपली संस्कृती, धर्म बुडत चाललाय. तुमच्या वागण्याने आणखी बुडवू नका. गोपाळराव हळू आवाजात म्हणाले, तुम्ही अजून मला ओळखलं नाही. मी कधीही ख्रिस्ती होणार नाही. हे सारं साहेबांच्या पोटात शिरण्यासाठी आहे. थोडी हूल उठवली की आपला कार्यभाग साधला जातो. कसला कार्यभाग? बायकोला शिकवण्याचा. या गोऱ्या लोकांचं ज्ञान मोठं आहे. आपल्या बायकांनी ते शिकायला हवं. धर्म न सोडता विद्या घ्यायला हवी. मग त्यासाठी बायकाच कशाला हव्यात? बायका शिकल्याशिवाय खरी सुधारणा व्हायची नाही. सगळ ज्ञान बाईला यायला हव. काय वाटेव ते झालं तरी ज्ञान मिळवायलाच हवे. बऱ्या बोलाने हे बेरकी गोरे शिकवणार नाहीत म्हणून हा सगळा आटापिटा आहे. जिना उतरणाऱ्या गोपाळ रावांकडे जाधवराव बघतच राहिले. दुसऱ्या रविवारी गोपाळराव व आनंदी टांग्यातून मायसी बाईच्या बंगल्यावर आले. व्हरांड्यात मॅडम व एक साहेब बसले होते. या विचित्र विजोड जोडप्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. काही वेळ बोलणे झाल्यावर, मायसीबाईंनी एक इंग्रजी पुस्तक आनंदीला वाचून दोन-तीन दिवसात परत द्यायला सांगितले. दोघेही विमनस्क मनःस्थितीत घराकडे निघालेत. आनंदीने सुटकेचा श्वास टाकला. मॅडम कडे काही खावे लागते नाही. नाहीतर भ्रष्टाचारच! रात्री गोपारावांनी एक धडा वाचून घेतला. मायसी बाईकडे पाच-सात वेळा जाणे येणे झाले. एक बुक संपले दुसरे वाचायला घेतले. गोपारावांचे बोलणे कमी झाले होते. एका रात्री धडा वाचून संपल्यावर आनंदीने विचारले, अलीकडे आपण बोलत का नाही? ते म्हणाले, आपण किरिस्ताव तर झालो तर राहायला मोठा बंगला मिळेल. अगं! आपल्याला ते अमेरिकेत सुध्दा नेतील. तिथे कशाला जायचं? आपलं कोल्हापूरच बरं! अगं तिथं सगळ्यांना स्वातंत्र्य असते. तुला खूप शिकता येईल. डॉक्टर सुद्धा होता येईल. काहीतरीच काय बोलायचे? बाई कधी डॉक्टर होते का? जगात असं कुठे घडले का ?गोपाळराव हसून म्हणाले, झोप आता. उद्या पुढचा धडा वाचायचा ना? आनंदीला बराच वेळ झोप आली नाही. तिला वेडीवाकडे स्वप्ने पडली. ती ख्रिश्चन झाली. झगा घातला. उंच टाचेची बूट घातले. माने पर्यंत केस कापलेले, कपाळावर कुंकू नाही. स्वप्नात कुंकू विरहित चेहरा पाहून, तिला रडूच कोसळले. तिने कुस बदलून झोपायचा प्रयत्न केला. शिक्षण घरीच चालले होते. ऑफिसव्यतिरिक्तचा सगळा वेळ आनंदीला शिकवण्यात गोपाळराव घालवत होते. आनंदीची हुशारी पाहून ते स्तिमित होत होते. ती एकपाठी आहे हे लक्षात आले. ती थोडे थोडे इंग्रजी वाचू लागली. अंकगणितही दशांशापर्यंत शिकली. मधून मधून संस्कृतही वाचत होती. ज्ञानाचा सर्व शाखोपशाखांत तिची वाटचाल चालू होती. पण गोपाळवांना समाधान नव्हते. मिशनरी स्कूल व मायसी बाईचीच्या अपेक्षेने त्यांनी इतक्या लांब कोल्हापूरला बदली करून घेतली होती. उपयोग काहीच झाला नाही. घरी शिकवून शिकवून अशी किती शिकणार? त्यांच्या डोळ्यापुढे उंच उंच शिखरे होती. पण वर जायला रस्ता सापडत नव्हता. सारा अंधार होता. जीवाची नुसती तगमग होई. अगदी लहानपणापासून त्यांना स्वतंत्र विचार करायची सवय होती. आपल्या देशाची सुधारणा होण्यासाठी स्त्री शिक्षण आवश्यक होते. स्री शिक्षण हे कौटुंबिक संस्थेचे मूळ आहे. कोणत्याही सुधारणेला घरापासून सुरुवात करायला हवी. आपल्या बायकोला शिकवणे आपले कर्तव्य आहे. तिला चांगले शिक्षण मिळाले तर ती देश भगिनीस विद्यादान करू शकेल. बायकोला शिकवणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. पण प्रगती थांबली होती. काय करावे सुचत नव्हते. चार चौघांसारख्या संसाराची त्यांना किळस होती. मायसीबाईकडे त्यांचे जाणे येणे चालूच होते. तिथे अनेक मिशनरी भेटत. त्यांना उच्च कुलीन बायकोसह आपल्या धर्मात आणता आले तर आपण फार मोठी लढाई जिंकल्यासारखी होईल असे वाटायचे. याबाबत या माणसाला सहज बनवता येईल असे वाटायचे. दिवसेंदिवस गोपाळराव कोल्हापूरला विटत चालले होते. इथे माणसे आनंदीला सुखा सुखी शिकू देणार नाहीत. जे कोल्हापुरात तेच सगळीकडे. कुठेही गेले तरी तोच काळोख. प्रकाश कुठेच दिसत नव्हता. काय करावं? आणि त्यांच्या मनात धाडसी कल्पना अवतरली. आनंदीच्या शिक्षणासाठी हिंदुस्थान सोडायला हवे. बस ठरले! जायचे कुठे? अमेरिकेला? मिशनरांच्या साह्याने जायचे. पण शक्य होईल का? गोपाळरावांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. मिशनऱ्यांशी संबंध वाढवले. ख्रिस्ती धर्मावरील पुस्तके वाचली. बायबलचा अभ्यास झाला. त्यांना आवडेल, पटेल अशा चर्चा करू लागले. त्यांच्या धर्माला चढवू लागले. आपला हिंदू धर्म किती मागासलेल्या विचारांचा आहे हे त्यांच्या मनावर बिंबबू लागले. या त्यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन, गुहिनने कपाटातून एक धर्मग्रंथ काढून गोपाळरावांच्या हाती देत म्हणाले, योहानचा शुभवर्तमानाचा हा ग्रंथ आहे. यातला चौथा अध्याय वाचा. म्हणजे मग येशू ख्रिस्ताचे म्हणणे पटेल. मान लववून ग्रंथ हाती घेतला. घरी येताना गोपाळरावांना सारखे हसू येत होते.... क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
👍 🙏 7

Comments