Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 10, 2025 at 08:55 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - १७. गोपाळराव अतिशय निराशेने गुहिनच्या बंगल्यातून बाहेर पडले. रस्त्याने चालताना त्यांच्या डोक्यात नुसता आगडोंब उसळला होता. शेवटी या गोऱ्या माकडांनी दगा दिलाच. त्याच मःनस्थितीत ते घरी आले. आनंदी अभ्यास करत होती. तिला पाहून त्यांचा आणखी संताप झाला. ही बया अशीच इथे कोल्हापूरच्या या छोट्याशा खोलीत राहणार, मरणार. ती रघुवंशी वाचत होती. तिच्या हातातील पुस्तक घेऊन कोपऱ्यात भिरवून दिले. नवऱ्याची भीती होतीच पण पूर्वीसारखी थरथरत नव्हती. त्यांचा स्वभाव तिला कळला होता. वाचनामुळे प्रगल्भता आली होती. तिने नवऱ्याकडे पाहिले. डोळ्यातून ठींणग्या तडतडत होत्या. बाहेर काहीतरी बिनसले होते. आज आपली कमबख्ती आहे हे ओळखले. खाली मान घालून ती स्वस्थ उभी राहिली .ओरडत म्हणाले, कसलं संस्कृत वाचतेस? हजारदा सांगितले, इंग्रजी वाच. तिचा जोराने कान पिरगाळला. म्हणाले, का इंग्रजी वाचत नाही? मला समजत नाही. संतापाने बेभान होऊन तिच्या गालावर दोन-चार जोराने थापडा मारल्या. आज ती रडली नाही. गालावर पाची बोटं उमटली होती. संतापाने बेभान झालेल्या नवऱ्याकडे ती बघत राहिली. तिला ढकलून टेबलावर असलेल्या बायबल त्वेषाने उचलून त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. त्यांना वेड लागले की काय? हळूच लांबून पुटपुटली... काय चालले आहे? विकट हास्य करत म्हणाले, श्राद्ध करतोय. आकाशातल्या बापाचं श्राद्ध! दिवस उदासिनतेत चालले होते. साहेबांनी दगा दिला होता. इथे राहून काहीच होणार नाही. इथून दूर जाणे जरुरीचे होते. कोल्हापूरकरांनाही ते नकोच होते. बदली सहज मिळाली. मुंबई गिरगावातील पोस्ट ऑफिस जवळच मिस प्रेस कॉटची शाळा होती. निघतांना एका साहेबाने मिस प्रेस्कॉटसाठी पत्र दिले होते. त्यामुळे शाळेत सहज प्रवेश मिळाला असता. पण गिरगावा पासून ही शाळा फार लांब होती. कसे जायचे? गिरगावातच मिशनरीची दुसरी शाळा होती. शिकवायला मड्डम होती. आनंदी त्या शाळेत जाऊ लागली. तिथे सर्व श्रीमंतांच्या मुली बुट स्टाकीन घालून येत. त्या चार घोड्यांच्या बग्गीतून येत. लोकांना त्यांचे फार कौतुक. पण एका साध्या पोस्ट्याची बायको बूट स्टॉकिंग घालून शाळेत जाताना पाहणे त्यांना असह्य होई. इथेही तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. लोक अंगविक्षेप करत. आचकट विचकट बोलत. वरच्या मजल्यावरून पाणी फेकत. पण करणार काय? सहन करणे भाग होते. दिवस चालले होते. शाळेत मॅडमशी इंग्रजीत बोलावे लागत असल्यामुळे इंग्रजी बोलण्याचा सराव आनंदीला झाला होता. गोपाळरावांना सगळ्या वातावरणाचा उबग आला होता. महाराष्ट्रात आनंदीला शिकवण्याचे ध्येय साध्य होणार नाही याची त्यांना खात्री पटली. या जुनाट, टवाळखोर, कुचकट विचारांच्या लोकांपासून दूर गेल्याशिवाय आनंदीचे शिक्षण होणार नाही. शिवाय मधून मधून अमेरिका डोक्यात डोकावतच होती. मुंबई सोडून दूर कुठेतरी जायचे त्यांनी ठरवले. जामनगर संस्थानात भुजला बदली करून घेतली. अमेरिका मनातून गेली नव्हतीच. तिथे जायचे तर इंग्रजी वाढवायला हवी होती. घरी शिकवून आनंदीला बीए करायचे ठरवले. भुजला चांगला जम बसला. तिथे विनायक भागवत नावाचे नायब होते. ते आनंदीला मुलगीच मानत. तिथे कर्नल बॅटची पत्नी आनंदीला इंग्रजी, शिवणकाम, लोकरकाम शिकवित. प्रगती चालू होती पण गोपाळरावांच्या मनाला समाधान नव्हते. असेच काही महिने गेल्यावर एक दिवस गोपाळराव ऑफिसमधून लवकर घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. म्हणाले एक आनंद दायक बातमी आहे. ओळख ना.. नाही ओळखता येत. गोपाळरावांनी खिशातून पत्र काढून तिला देत म्हणाले, वाच. पत्र इंग्रजीत होते. तिच्या नावाने असल्याने तिचे अंग शहारले. आपल्याला? एका बाईला? इंग्रजीतून पत्र... हिंदू ब्राह्मण बाईला पत्र... जगात पहिल्यांदाच असे घडले होते. अमेरिकेतून आपल्याला पत्र? नवलच आहे. भारावलेल्या मनाने ती पत्र वाचायला लागली. तू खरोखरच मला बहिणीसारखी वाटतेस म्हणूनच मी सुरुवातीला प्रिय भगिनी म्हटले. तुझ्या नवऱ्याने मिस्टर वाइल्डला पाठवलेले ह्रदयद्रावक पत्र वाचले. तिने नवऱ्याकडे बघितले. अगंऽ, तिथं एका वर्तमानपत्रात मी पाठवलेले व त्यांनी उत्तर पाठवलेले दोन्ही पत्र प्रसिद्ध झालीत. ती या बाईच्या वाचण्यात आली. आणि ती विसरूनही गेली. दहा-बारा दिवसांनी तिच्या नऊ वर्षाच्या मुलीने आईला सांगितले, रात्री आपल्याला स्वप्न पडले की तू हिंदुस्थानात कुणाला तरी पत्र लिहीत आहे. त्या मुलीला एशियाचा भूगोल, हिंदुस्थान काहीच माहीत नव्हते. त्या बाईनेही वर्तमानपत्रातील दोन्ही पत्रे वाचण्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता. तरीही आपल्या मुलीला असे स्वप्न पडावे याचे तिला फार आश्चर्य वाटले. याबाबतीत आपण पुढाकार घ्यावा असे देवाच्या मनात आहे असे तिला वाटले म्हणून, तिने हे पत्र लिहिले. खरोखरच चमत्कार आहे. कोल्हापूरची अंबाबाई पावली म्हणायची. आनंदी पुढे वाचू लागली... माझ्याकडून तुला किती मदत होईल सांगता येत नाही. परंतु तुला मदत करायची माझी मनापासून इच्छा आहे. तुमच्या लोकांमध्ये आमच्या लोकांनी घेण्यासाठी पुष्कळ सदगुण आहे. तुझ्या कल्याणासाठी निरंतर झटणारा पती मिळाले, हे तुझे महद् भाग्य आहे. आपले परस्परांचे आचार विचार कळावे यासाठी मी एखादे वर्तमानपत्र, मासिक पाठवत जाईन. त्या वरून आमच्या रीती भाती, विद्याभिरुची विषयी बरीच माहिती मिळेल. ज्ञान प्राप्ती करून घेण्याचा तुझा प्रयत्न, दुसऱ्याला मदत करण्याची उत्कट इच्छा आमच्या मनाला भावली. तुम्हा दोघांचे मी व माझा नवरा खरे मित्र आहोत हे लक्षात ठेव. खाली सही होती... तुझी बहीण व सहकारी मिसेज बी एफ कार्पेटर.... क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
😮 🙏 2

Comments