
Yuti's Hub Library
June 10, 2025 at 09:14 AM
*छावा*
*लेखक - शिवाजी सावंत*
*भाग-६१*
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेला म्हलोजीबाबा घोरपड्यांचा तरणा मुलगा संताजी सामोरा आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव – म्हलोजी यांची रणमस्त व रुहुल्लाखान यांच्याशी जोरावारीची हातघाई झाली होती. तिचा वृत्तान्त राजांना देऊन संताजी म्हणाला, ‘‘पार पिटाळल्यात दोन्ही खानं बेळगावच्या बाजूला सरलष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुरादखान यास कोट नेटानं झुंजवावा, असा थैलीस्वार दिलाय.”
संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितलेले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ येऊन त्याचा खांदा थोपटीत राजांनी विचारले, ‘‘कसे आहे आमचे म्हलोजीबाबा आणि किल्ले पन्हाळा?”
‘‘जी. आबा गेल्यात कापशीला – गावाकडं. किल्ला म्हनशिला तर तूर्ताला आम्हाकडंच हाय की.”
या पाऊसमाऱ्यातच कुडाळच्या नीळकंठ नारायणांनी पाठविलेला थैलीस्वार, कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीत मजकूर होता – ‘‘मोगली सारंग याकुतखानाचा खेमसावंतास खलिता आहे की – पादशहास येऊन मिळावे. जशी अर्जुनजी अचलोजी यांची केली, तशी हजरत तुमचीही सर्फराजी करतील.” नीळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुन्नराने त्याने खेमसावंताशी याकुतखान बांधत असलेल्या संधानाची बित्तंबातमी कळविली होती.
शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण; पण त्यालाही वाळवी डसावी, असे दिवस धरले होते.
अनेकविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसलेतरी नाकळते अशुभ भोवती भिरभिरतेय असे वाटत होते. ते कुणाशीच मनमोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्या – रेड्यांची एकमेकांना माथी थडकावीत, तुंबळ टक्कर माजावी, तशी त्यांच्या भोसलाई मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती.
‘कुणासच कसं वाटेना, हे राज्य श्रींचं म्हणून? का नांगी टाकताहेत सारे औरंगपुढं? औरंगजेब! आम्हास आग्ऱ्यास एकदा विचारणारा – ‘खेलोगे हौदा हमारे पहेलवानसे?’ कसा दिसत असेल तो या उतारवयात? त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद? दिसत असतील कधी आबासाहेबांच्या – आमच्या मुद्रा त्याच्या मिटल्या डोळ्यांस? येत असेल त्याला आपल्या बापाची – भावाची, विष चारलेल्या मिर्झा राजाची, हिरकणी खाल्लेल्या दिलेरची, कैदेत टाकलेल्या आपल्या मुलांची याद?’
रायगडची राजसभा भरली होती. नुकताच श्रावण संपला होता. सिंहासनचौकातील आडपडदे हिवाळी वाऱ्यावर थरथरत होते. पूर्वाभिमुख राजसिंहासनावर महाराज बसले होते. त्यांची चर्या गंभीर होती. प्रधानमंडळातील आठी खांबांजवळ अष्टप्रधान उभे होते. सिंहासनपायरीवरच्या आसनावर बाळ शिवाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारी छंदोगामात्य कुलेश खडे होते. दरबारी चौकात अंथरलेल्या रुजाम्यांवर रूपाजी, कृष्णाजी नरस प्रभू, येसाजी, म्हलोजीबाबा, संताजी – धनाजी, जानराव, बारदमल असे कितीतरी मानकरी आपापल्या जागी खडे होते. एवढे माणूस एकवटले होते, पण आडपडद्यांची सळसळही ऐकू यावी, अशी भयाण शांतता दरबारभर पसरली होती.
कारण? कारण साफ होते. त्रिदलातील एक दल तुटले होते. आदिलशाहीचे विजापूर पडले होते! बाल शिकंदर औरंगजेबाच्या हवाली झाला होता. तळपत्या नंग्या तेगी पेललेल्या हशमांच्या घेरात सजल्या शाही हत्तीच्या हौद्यात बसून औरंगजेबाने विजापुरात फत्तेचा फेरफटका टाकला होता. शहरभर दवंडी पिटली होती – ‘‘बिजापूर की रियाया अब दिल्लीतख्तके सल्तनतकी रियाया है। किसपर भी जुल्मजोरी नहीं होंगी। सब शाही सल्तनतसे इमानदारी रक्खे।”
दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला आता चार वर्षांनंतर पहिली फत्ते मिळाली! पठाणी बेदिलीनं बजबजलेली आदिलशाही कोसळली. ती खबर लागताच चौवाटा जासूद फेकून हा दरबार राजांनी भरविला होता. गंभीर मसलतीचा दरबार.
सगळ्यांची कल्पना होती, नेहमीसारखे निळोपंत दरबारी बोलणे खोलतील. तसे घडले नाही. सिंहासनाच्या दुहातीच्या कोरल्या सिंहमुखांवर आपले हातपंजे घट्ट रुपवीत महाराजच बोलले – ‘‘सारे जाणता... इदलशाही पडली.” भरून आले छातवान रिते करीत महाराजांनी लांबीचा सुस्कारा सोडला. शांतताच शांतता पसरली.
“ॠणानुबंधाची ती गादी राखून औरंग गुंतवून ठेवावा, यासाठी आम्ही जंग – जंग केलं. आता दौलतीवरचं सावट वाढलं आहे. खबरा आहेत मोगली फौजा आता गोवळकोंड्याचा रोख धरतील. ती हूलही असेल. साऱ्या बाक्यांना त्यासाठीच पाचारण केलं आहे. ज्यास जे वाटेल ते मोकळ्या मनी मसलतीचं बोलावं. हे राज्य उभारण्यासाठी आबासाहेबांपासून गावोगावचे धारकरी कामी आलेत, हे सारे जाणता. हे राज्य आमचं एकल्याचं नाही, हे आई जगदंबेचं, जिवाचा आटापिटा केलेल्या थोरल्या आऊंचं – आबासाहेबांचं, रानावनांत राबणाऱ्या खानदेश – वऱ्हाडपासून जिंजीपावेतो लढणाऱ्या धारकऱ्यांचं हे राज्य आहे. प्राणबाजी लावून ते राखून चालविणं ही जोखीम तुम्हा – आम्हांवर आहे.” काय नि किती बोलावेसे झालेले महाराज सिंहासनावरून उठले.
सारा दरबार कानांचे शिंपले करून ते शंभूबोल ऐकत होता.
‘‘समय बाका आहे. मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार बंडाळी करताहेत. आपले म्हणावे ते पारखे होऊन, गनीमतळ गाठून मनसबीसाठी औरंगजेबास कुर्निसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एकदिलाने सर्वांनी शर्थ करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे; सारे खुला मनसुबा दरबारसमोर ठेवतील. कोणी कचदिल होऊन आत-बाहेर करणार नाहीत.” आपण नकळत उभे ठाकलोत, हे जाणवलेले राजे बसते झाले.
राजांना बघताना मिर्झा राजाशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालेल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात, खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला, ‘‘एवढं चिंतागती व्हाय नगं महाराजांनी. आदिलशाही पडल्याली न्हाई. पठाणांच्या बेदिलीचा काव्यानं फायदा उठवून बादशानं पाडल्याली हाय. आम्ही हाय तवर त्येच्या प्याद्यालादिकुन थारा देत न्हाई मुलखात. ही जी खिल्लता पांघराय बुनगी, बुजगावणी पळत्यात त्यास्नी आज न्हाई, उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय त्ये. महाराजांनी बिनघोरी असावं. आम्ही पाठीशी हाव.” हंबीररावांच्या रूपाने जसा मावळकडाच रांगड्या बोलीत, कुचमल्या दरबारला धीर देत सुनावून गेला.
“कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबीत आम्ही डोळ्यांत तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही.” रामचंद्रपंतांनी सरलष्करांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मान डुलवून साथ भरली. थिजल्या, मुकाट दरबाराला अंग धरू लागले.
‘‘आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ.” खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्याने दरबारातली चिटणिसी बैठक सोडून खडे होत, आपली दाद नोंदविली.
‘‘शहजादा अकबरकी मददसे फिरंगोंको चूप बिठाना, जमीनदारोंको मिलाकर राजासाबके साथ रखना हमारी जोखीम है। पन्हाला, खेलना, मलकापूर प्रांत की राजासाब फिक्र न करे।” कुलेशांनी कनोजी हिंदोस्थानीत आपली साथ प्रकट केली. खांबालगतचे न्यायाधीश प्रल्हादपंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले.
आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले, “राजकारणातलं काही कळत न्हाई आम्हास्नी. महाराजांनी बोलताव म्हणून माफी करावी.’’ हंबीरराव घुटमळले.
‘‘बोला. सरलष्कर तुम्ही कदीम, घरचे. अगदी नि:संकोच बोला.”
‘‘माफी असावी महाराज. त्या शाजाद्याचा काही उपेग न्हाई. उलट त्याचंच निमित्त करून बादशा पुन्हा दौलतीत घुसायचं भ्या हाय. छंदुगामात्यांनी नाद सोडावा, आता त्येचा अन्....’’
आता दरबारचे ध्यान एकट्या हंबीररावांवर खिळले. अनेकांच्या मनातला सल बोलण्याचे – तेही भरदरबारात हे फत्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार, वय व त्याग होताच तेवढा.
‘‘काय आहे मनी? साफ बोला मामासाहेब.” राजांनी त्यांना मुभा दिली.
आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साती प्रधानी खांबांवर आणि छंदोगामात्यांवर त्यांनी एकदा फिरविली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सप्तप्रधान, कुलेश, दरबारी मानकरी, खुद्द महाराज सारेच हंबीररावांकडे बघू लागले.
‘‘बाब आमच्या अखत्यारीची न्हाई महाराज. पर कुनीतरी, कवातरी ह्ये बोलाय पायजेच. आम्ही रगात सांडलंय थोरल्यांच्या ह्या गादीपायी म्हनूच बोलताव – कानांवर येतंय आमच्या की, मंत्रिमंडळातल्या असामी, दफ्तरी अधिकारी आणि छंदुगामात्य कब्जी यांचा बेबनाव हाय!”
प्रधानी खांबांलगतच्या बड्या असामी एकमेकांकडे बघूच लागल्या. कुलेशांचा चेहरा खरकन उतरला. काळीज पिळून काढणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली.
‘‘कसला बेबनाव सरलष्कर?” महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या.
‘‘आम्हास्नी कळतंय मंत्रिबाडीतील कुणी असामी छंदुगामात्यास्नी ‘कनुजा’ म्हून पंगतीला घेत न्हाई! कबजी दिकुन कुनाकडं जात न्हाईत. त्येंचं महाराजांच्या आसपास असणं कैकांना पसंद न्हाई. या बाक्या वक्ताला येळेसुर या बाबीचा कंडका पडाय पायजे.” हत्यारघाईतले हंबीरराव परवडले, पण हे जबानमार करणारे नको असेच मंत्रिमंडळातील असामींना होऊन गेले.
निर्धाराने प्रल्हादपंत म्हणाले, ‘‘सरलष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यच कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानांहून ते स्वत:स वेगळे मानतात. महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्याकडे पंक्तीस पाचारण करतात. कुणी जात नाही त्यांच्याकडे.”
ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले, “सरकार, झूट बोलते है, न्यायाधीश। हमने कनोजमें जनम लिया ये कैसा कसूर हमारा? राजासाब के चरणोंमें निष्ठा रखते है और आखरी दमतक रखेंगे। मंत्रिगणसे क्या वास्ता हमारा?’’ कुलेशांना क्रोधभाराने धड बोलवेना.
चित्रविचित्र विचारांची, क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढा गैरमेळ घर करून बसला आहे, या विचाराने तर मन अपार खंतावले त्यांचे.
“सरलष्करांचा अभिमान वाटतो आम्हास.’’ राजांची नजर हंबीररावांवरून दरबारभर सरकली. ‘‘हा कसला समय आणि ही कोण मानपानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी? कुलेशांना आम्ही ‘छंदोगामात्य’ केलं, फिरंग्यांच्या सुलुखासाठी ‘कुलएख्त्यार ’ केलं ते त्यांचा वकूब बघून, त्यांना हिंदोस्थानी बोलभाषा चांगली अवगत म्हणून! कवी भूषण राहते आमच्या दरबारी, तर त्यांसही ‘छंदोगामात्य’ करून गौरविले असते आम्ही.’’
प्रधानी-खांबालगतच्या मंत्रिगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीज पिळवटले. विट्यासारखी आपली धार नजर कुलेशांवर रोखत ते म्हणाले, ‘‘कुलेश, मंत्रिगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकताहात तुम्ही! सरलष्कर म्हणतात ते सही आहे. मानापानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पाडला पाहिजे. रामजी पांगेऱ्यांच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदाभाकर प्रेमानं ओठांआड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये... पुन्हा असा बोभाट कानी येतो, तर लहान-थोर, आपला-परका कुणाचीच गय धरणार नाही आम्ही!!” नाकशेंडा लालावलेले महाराज भावावेगाने आपसूकच खडे झाले. पुरा दरबार त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभूमुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्दन्शब्द फुटू लागला. ‘‘आदिलशाही पडली याची धास्त, काळजी करायलाही समय नाही आम्हास. जमल्या बाक्यांना आम्ही निक्षून-निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हरभातेनं कोशिस करणार आहोत. साऱ्यांनीच पोख्त विचारानं आमच्या पाठीशी राहावं. आपसांतील लहान-थोर मानपानाचे बगलेस ठेवून प्रसंगास साऱ्यांनी कसं सामोरे जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं.”
कोंडी फोडत हंबीररावच म्हणाले, ‘‘आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पायजे. उगवतीच्या तोंडावयली आपली ठाणी रातध्याड जागती ठेवाय पायजेत. जमेल तेवढा घोडा गोवळकोंड्याभोवती फिरता ठेवाय पायजे.”
‘‘आता निस्त्या मोगली फौजाच न्हाईत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चाल ठेवील अवरंगजेब.” म्हलोजीबाबा पूर्वी आदिलशाहीत होते. तिथल्या सरदारांचा अंदाज बांधीत ते म्हणाले.
‘‘विजापूरचा राजा बाळ. गोवळकोंड्याचा हसनशहा उमेदीचा आहे. कुतुबशाही नाही नमायची औरंगासमोर.” निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले.
‘‘पेशवे, मोगल कुतुबशाहीकडं वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही. शक्यता आहे, तो शहाजाद्याचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल.” प्रल्हादपंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपणाला पसंत नाहीत, हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले!
बराच वेळ दरबारात एकमेकांत उलट-सुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली. आदिलशाही पडणे हा दक्षिणफळीला केवढा जबर धक्का आहे, हे सर्वांनाच जाणवून गेले. प्रधानमंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत, हेही सिद्ध झाले. हंबीररावांसह अनेकांना मराठी मुलखातला शहजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते, हे उघड होऊनच चुकले.
पंतांकडील सुरनिशी दफ्तर शंकराजी नारायण यांच्याकडे सोपवून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते. त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत, या शंकेने त्यांनी विचारले, ‘‘तुमच्या ठायी शंकराजींना सुरनिशी दफ्तराकडं नामजाद केलं आम्ही. पंत, त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही?”
‘‘जी. तसं मनीसुद्धा नाही आमच्या. कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावर ती बाब सोपविली आहे स्वामींनी, हे जाणतो आम्ही. ती पार पाडताना यातना होतात काळजास. जीभ धजत नाही, घडलं सत्य सांगावयास.”
‘‘मतलब? रामचंद्रपंत खोलून बोला जे बोलणं ते.” महाराजांची नजर रामचंद्रपंतांवर जखडून पडली.
‘‘जी. माफी असावी. पण – पण कुडाळच्या खेमसावंतास जाणारा खलिता स्वारसुद्धा कब्ज केलाय आपल्या जासुदांनी.”
‘‘कुणाचा खलिता?”
‘‘जी... जी...’’ रामचंद्रपंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली. पण जबानीतून नाव काढणे काही जमले नाही त्यांना.
राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली. आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली.
आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाळच्या खेमसावंतांना, आबासाहेबांचे जावई, राजांचे मेहुणे, फलटणकर महादजी नाईक-निंबाळकर लिहीत होते –
‘‘मातीच्या ढेकळागत दिल्लीधिशासमोर इदलशाही पडली. संभाजीचीही बाबत राहणार नाही! भागानगरीची मोहीम जालियावरी दिल्लीश्वर याचाही परामर्श घेतील. दहा हजार घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो. रायरीपावेतो कडेकोट ठाणेबंदी केली जाईल.”
राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला. संतापाने नाकपुड्या फाकल्या. वळी, खलिता तसाच पंतांच्या हातात खुपसून ते पुटपुटले, ‘‘हरामखोर. डोमकावळे.”
रामचंद्रपंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले – ‘‘अशाच मजकुराचा खलिता शेख महमद बक्षी या मोगली सरदाराचा आहे... त्यानं सावंतास....”
राजांना तळहात दोन्ही कानांवर ठेवून घ्यावेसे वाटले. काही न बोलता ते महादरवाजातून दसराचौकाकडे चालले. रामचंद्रपंत, चांगोजी काटकर, खंडोजी, राया-अंता त्यांच्या पाठीशी झाले. गडाच्या महादरवाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळोपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले.
मोरेश्वरांनी नुकतीच गड चढून आलेली एक भगवी छाटीधारी असामी राजांना दाखवून म्हटलं, ‘‘पाटगावहून आलेत हे. म्हणतात.” पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले. आपल्या सुकल्या ओठांवरून त्यांनी जीभ फिरविली.
‘‘मठशिष्य आहेत हे पाटगावचे.” निळोपंतही रुकले.
‘‘पेशवे, यांना इथवर यायचा त्रास कशाला दिलात? आधीच गड चढलेत. आम्ही भेटलो असतो सदरेवर. काय बाबा, आमच्या मौनीबाबांची तब्येत कशी? नाराज नाहीत ना ते आम्हावर, बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून?” राजांनी शिष्याला विचारले.
महाराजांच्या शब्दाशब्दांबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यांतून आसवांचे थेंब छाटीवर टपटपले. त्याच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले, ‘‘बाबांनी – मौनीबाबांनी देहकार्य संपविलं महाराऽज! निर्वाण केलं त्यांनी भुदरगडतर्फेला पाटगावी.”
‘जगदंब’ म्हणत महाराजांनी हातबोटे छातीशी नेत गपकन डोळेच मिटले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्वसंगत्याग केलेल्या मौनीबाबांच्या शांत, सात्त्विक मुद्राच मुद्रा तरळू लागल्या.
विजापूर पडताच मोगली फौजा लगतच्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा भागात पांगल्या. सालार सर्जाखानासह झाडून सारे विजापुरी सरदार औरंगजेबाला मिळाले.
आपले खान विजापूरभोवती पांगते ठेवून, विजापुरावर हत्यारी बंदोबस्त बसवून औरंगजेबाने विजापूर सोडले. तो सोलापुराकडे निघाला.
कर्नाटकातून हरजीराजांचे सारखे हारकारे येत होते. राजांनी अंदाज केल्याप्रमाणे मिळतील ते कर्नाटकातील सरदार गळाला लावून, आपले फौजबंद खान सीमेवर पेरायला औरंगजेबाने सुरुवात केली.
हरजींची कुमक करायला पाठविण्यासाठी राजांनी केसो त्रिमल व संताजी घोरपड्यांना याद घेतले. समोर जिंजीकोट फिरत असलेले राजे त्यांना म्हणाले, ‘‘केसोपंत, तुम्ही आता संताजींसह कर्नाटकात हरजींच्या कुमकेला आपल्या जमावानिशी उतरा. रघुनाथपंत गेल्यापासून हरजी एकले एवढा प्रांत सांभाळताहेत. जैतजी काटकर, काकडे आहेत त्यांच्या दिमतीला. तुम्ही त्यांना रघुनाथपंतांच्या ठायी आहात. त्यांच्या-तुमच्या एक विचारे कर्नाटक राखून असा.” राजांनी केसो त्रिमल व संताजींना मानवस्त्रे दिली. हरजीराजांची जोड करण्यासाठी निरोप दिला.
‘‘निळोपंत, मुद्रा त्रासिक दिसत्येय. तुमची तब्येत?’’ महाराज बोलत दफ्तरी दालनातील पेशव्यांच्या समोरच आले. निळोपंतांनी चमकून वर पाहिले. त्यांचे डोळे पाणथरून आले. उपरण्याचा शेव त्यांनी नेत्रकडांना लावला.
‘‘पेशवेऽ, झालं काय?” राजांचाच आवाज विचारताना चिरकला. भोवतीचे हत्यारी पहारेकरीही चमकून बघू लागले.
‘‘काय सांगायचं स्वामी! आम्ही पेशवे – कुणास आता कसं तोंड दावणार? आमचाच... एक जवळचा नातेवाईक कैद करून गुलाम म्हणून घेऊन गेला माजोर हबशी. डोळ्यांस डोळा नाही लागत ते ऐकल्यापासून.”
‘‘पंडितराव, चेऊलच्या सुभेदार रायाजी सदर प्रभूंना स्वार द्या.’’ धर्मखात्याचे प्रमुख मोरेश्वर राजांचे सांगणे ध्यानपूर्वक ऐकत होते.
‘‘कोण वजेचा रायाजींना स्वार द्यायचा स्वामी?” मोरेश्वरांनी विचारले.
‘‘चेऊलच्या एका निपुत्रिक बाईची अखेरची इच्छा होती की, आपला जमीनजुमला मोरयाबाबांच्या चिंचवडमठास आपल्या माघारे द्यावा. बाई आता गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी आम्हास आपली इच्छा निरोप्याकडून कळविली आहे.” त्या बाईंचे नाव, जमिनीचा तपशील मोरेश्वर पंडितरावांना सांगता-सांगताच महाराज थांबले. केवढ्यातरी चमत्कारिक सत्याने त्यांचे मन भरून आले. ‘कोण, कुठली, आम्ही ना पाहिली, देखलेली स्त्री असामी. आपले सारे हक्काचे ते मोरयाबाबांच्या धर्मस्थानास अर्पून टाकते. आणि – आणि शिर्के, अर्जुनजी, अचलोजी, महादजी – ‘जी’ म्हणत- म्हणत मन्सबांसाठी औरंगतळावर चालत जातात!’
भागानगराहून आलेल्या कुतुबशहाच्या वकिलासह पेशवे महाराजांना पेश आले. वकिलाबरोबर चार-पाच सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार होते.
‘‘हे कुतुबशाहीचे राजदूत भेटीस आले आहेत महाराज.’’ सिंहासनसदरेला आसनावर बसलेल्या राजांना निळोपंतांनी वकिलाचा परिचय दिला. वकिलाने कुर्निसात करून आपल्या हजरत तानाशाहांचा निरोप राजांना सांगितला, ‘‘हमारे हजरतने ये एक लाख पेशकश राजासाबके खिदमत में पेश भेजी है।” वकिलाने आपल्या खिदमतगारांवर नजर टाकली. त्यांनी झुकून पुढे होत, हातस्पर्श द्यावा म्हणून तबके राजांसमोर धरली. त्या तबकाकडे आणि वकिलाकडे आळीपाळीने बघत राजांनी वकिलाच्या ध्यानीमनी नसलेला धक्का त्याला दिला – ‘‘ही खास कुतुबशाही रीत दिसते निळोपंत. आमच्या आणि भागानगरच्या दरबाराशी सलोख्याचे संबंध राहावे, म्हणून धडपडणाऱ्या मादण्णा आणि आकण्णा यांचे कुतुबशाहीत भररस्त्यात खून करविले जातात. का? तर दिल्ली सल्तनतीच्या औरंगची त्यांच्यावर ‘काफर’ म्हणून नाराजी होती यासाठी? तोच औरंग गोवळकोंड्यावर चालून येतो आहे, हे साफ झाल्यावर आम्हाला ही लाखाची पेशकश पाठविली जाते. का? तर या बाक्या समयी आम्ही कुतुबशाहीच्या पाठी राहावं!”
निरुत्तर झालेला कुतुबशाही वकील निळोपंतांनीच आता काही बोलावे यासाठी त्यांच्याकडे बघतच राहिला. निळोपंतांनी अनुभवी बोल पुढे ठेवले.
‘‘रास्त आहे स्वामी म्हणतात ते. मादण्णा आणि आकण्णा काय वकुबाच्या असामी होत्या, हे लवकरच कळून येईल कुतुबशाही दरबारास. पण त्यांच्या आडमुठ्या धोरणाची चाल धरून नाही भागायचं या दरबारास असं वाटतं आम्हाला.’’
‘‘यासाठीच पूर्वीपासून पाठीशा आहोत आम्ही गोवळकोंड्याच्या. जे आबासाहेबांनी राखलं तेच धोरण कुतुबशाहीशी राखून चालविलं आम्ही – पुढंही चालविणार आहोत.” पेशकशीची तबके निरखत महाराजांनी त्यांना हातस्पर्श दिला.
वकिलाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
तानाशाहासाठी त्याला फेरनजराणा देताना महाराज म्हणाले, ‘‘तुमच्या हजरतास सांगा, आम्ही पाठीशी आहोत कुतुबशाहीच्या. आपल्या संकटाला भरदमानं तोंड देण्याची तयारी ठेवून असा. या.’’ वकिलाची रीतसर बोळवण करण्यात आली.
महाराज गोवळकोंड्याच्या कुमकेला कुणाला पाठवावे, या विचारात गढले असतानाच किल्लेदार चांगोजी काटकर त्यांच्या सामने आला. गळ्यातील गोफबंद व चांदीपेटीचा ताईत डुलवीत त्याने वर्दी दिली, ‘‘गोवयाचं सुंदरजी बाजी आल्यात.”
महाराजांनी रुकाराचा हात उठविला. चांगोजी सुंदरजींना घेऊन आला. फिरंग्यांनी गोव्यालगतचा मुलूख लुटला, गावे बाटविली, वतनदार त्यांना मिळाले, असलेच काही अशुभ आता ऐकायला मिळणार यासाठी राजांनी मनाची तयारीही केली. चर्या मात्र शांत ठेवून एवढ्या दूरवर आल्या सुंदरजींना त्यांनी आपुलकीने हालहवाल विचारली. ती देऊन प्रसन्न चर्येने सुंदरजी म्हणाले, ‘‘एक खास बाब स्वामींच्या कानी घालण्यासाठी जातीनं आलो आम्ही एवढ्या पल्ल्यावर.”
‘‘बोला.’’ महाराजांना ते कशाबद्दल बोलणार याचा काहीच अंदाज आला नाही.
‘‘आता पणजीच्या बंदरातून खाशा स्वाऱ्या घेतलेली गलबतं निघालीही असतील.”
‘‘कसल्या सवाऱ्या?’’
‘‘विजरई कोंद-द-आल्वोर आणि त्याच्या कबिल्याच्या!”
‘‘मतलब?’’ महाराज विचारातच पडले.
“पोर्तुगालच्या बड्या दरबारला स्वामींनी गोव्याची केलेली दैना शब्दबर पावली आहे. दरबारनं त्यासाठी खरमरीत खलिता लिहून विजरईची चांगलीच खरड केली आहे. मराठी मुलखावर गैरलागू चालून जाण्याचा त्यास जाब विचारला आहे.”
सुंदरजी हुरुपाने सांगत होते. राजांच्या पाणीदार डोळ्यांसमोर तरळत होता, घोंगडीवर झोपविलेला, पळसवृक्षाला लाजविणारा कृष्णाजी कंक!
‘‘विजरईला बड्या दरबारनं पोर्तुगालला परत बोलावून घेतलंय स्वामी. त्याच्या जागी दोम-रुद्रिगो-द-कोस्त म्हणून कुण्या नव्या विजरईची नामजादी झालेय गोव्यावर.”
तळपत्या शंभूनेत्रांसमोर मांडवीची निळी पांढरट खाडी तरळू लागली. ते सुंदरजींना म्हणाले, ‘‘आमच्या कानी कुणी मनास संतोष देईल असं काही घालत नव्हतं. सुंदरजी, चला जगदीशाचं दर्शन घेऊ. तुम्ही बरी खबर आणली आहे.”
महाराज जगदीश्वर मंदिराच्या दिशेने सुंदरजी, चांगोजीसह चालू लागले.
या वेळी त्या तिघांनाही कल्पना असायचे कारण नव्हते की, कैलासवासी स्वामींनी सुरतेला जवळचे म्हणून खजिन्यासाठी निवडलेल्या बागलाणातील साल्हेर-मुल्हेर किल्ल्यांपैकी साल्हेरीचा किल्ला नेकनामखानाने या वेळी फितुरीचा फास टाकून ओढत औरंगजेबाच्या घशात आणून घातला होता!
दिवाळी आली नि गेली. पुणे, सातारा, मिरज, सांगली, बेळगाव, हुबळी या देश व कर्नाटकप्रांतात या दिवाळीच्या दिवल्या काही पाजळल्या नाहीत. गेला पावसाळा कोरडाच परतल्याने त्या भागात भयाण दुष्काळ पसरला. त्याच्या काळीजवेधी वार्ता रोजाना राजांच्या कानी पडू लागल्या. लढते सैन्य आणि राबता कुणबावा या बिकट काळी राखणे महत्त्वाचे होते. खद्द राजे रायगडाच्या अंबारखान्यातील धान्यगोणी घेऊन देशावर पाठविल्या जाणाऱ्या काबाडीच्या बैलांच्या तांड्यावर जातीने देख देत होते. पन्हाळ्याहून कुलेश व म्हलोजीबाबा गंगा-जमुना या अंबारकोठ्यांचे धान्य बेळगावच्या वाटेला लावीत होते.
तीन-चार साल लढून दमगीर झालेला प्रत्येक गडकोट, नुकतीच आदिलशाही पडलेली, वतनदारांची जागजागी माजलेली बंडाळी, त्यातच पडलेला हा दुष्काळ. गेल्या चार सालांतील घटना कशा चित्रांसारख्या फिरत होत्या राजांच्या डोळ्यांसमोर.
ही औरंगची दक्षिणेत उतरायची दुसरी वेळ होती. पहिल्याने तो आला होता दख्खनसुभा म्हणून. परतला होता बंडखोर शहजादा म्हणून. आता दुसऱ्या वेळी आला होता, दिल्लीतख्ताचा शहेनशहा म्हणून पुरी दख्खन गिळायला. त्याच्या दाबजोर रेट्यासमोर आदिलशाही कोसळली होती.
आता त्याने दुतोंडी हालचाली सुरू केल्या. एकीकडून गोवळकोंडा पाडायचा, दुसरीकडून मराठी दौलतीचा कर्नाटकातील मिळेल तेवढा प्रदेश कुरतडायचा. तिला खिळखिळी करण्यासाठी त्याचे खास अस्त्र ‘फोडाफोडी’ आणखी चालूच होते.
कर्नाटकात घुसलेल्या औरंगच्या फौजांच्या पाठलागावर हरजींचे गोपाळ दादाजी व विठ्ठल पिलाजी हे तोडीजोडीचे सरदार कोसळून पडत होते.
जे कानी येत होते, त्याचाच मेळ मनाशी घालत राजे खासेवाड्याच्या दफ्तरी सदरेत खंडोजींना जागजागी धाडायच्या खलित्यांचे मजकूर सांगू लागले. कसल्यातरी खोलीच्या विचारात गढल्याने त्यांचा मजकूर सलग येत नव्हता. एवढ्यात गिरजोजीने दफ्तरी येऊन वर्दी आणली, ‘‘पेशवं येत्यात.”
थोड्या वेळातच आपल्या कारभाऱ्यासह निळोपंत रुजू झाले.
‘‘महाराज, सिद्दी कासम त्याच्या खुदाची खैर म्हणून थोडक्यात बचावून निसटला जैतापूरच्या लढाईत.” पेशवे उत्साहाने म्हणाले.
‘‘तपशील काय पेशवे?” महाराजांच्या डोळ्यांसमोर जैतापूरची खाडी तरळू लागली. पेशव्यांनी तपशील दिला. थोडा वेळ शांतता पसरली.
‘‘जेधे फिरून चाकरीत यायचा मनसुबा धरून आहेत. पुरंदरच्या बाजी घोलपांमार्फत निरोप आला आहे तसा त्यांचा.” पेशव्यांनी सर्जेराव जेध्याची बाब चर्चेला घेतली.
‘‘कशासाठी खोळंबलेत ते पेशवे?” राजमुद्रा त्रासिक झाली.
‘‘अभयपत्राची मागणी आहे जेध्यांची महाराज.’’
‘‘अभयपत्र?’’ महाराज विषादाने हसले.
‘‘पंत, गेले होते जेधे औरंगच्या पायांशी त्याचं अभयपत्र घेऊन? हे कान्होजींचे वारस जेधेच ही मागणी घालतात असं मानावं काय?”
पेशव्यांना काय बोलावे ते सुचेना.
‘‘पेशवे, त्यांनी नको त्या वक्तास धरसोड केली तरी आम्हास नाही करता येत. चुकले, फुटले तरी जेधे दौलताचे कदीम चाकर होते. द्या त्यांना अभयपत्र पाठवून. पत्रात लिहा – ‘तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता. कोण्या भरास भरून गेलेत? बरे जे झाले ते फिरोन न ये. परंतु गनिमाची सेवा करता तुम्हास कष्ट होतात. सांप्रत सेवेसी येऊन कार्यभाग करावा. कष्टाची मुजरा होईल. तुम्ही कदीम लोक. स्वामींचे बहुत अन्न भक्षिले. तुमचा भरवसा असे. क्रिया मनी धरून यावयाचे केले, तरी बहुत उत्तम केले. कदाचित गनिमाकडे गेले होतेस. त्या गोष्टी करिता यावयाचा अनमान कराल, तर सर्वस्वी न करणे. बेशक येणे. तुमची सर्फराजी करून बरे चालवू. अंतर न पडे.’’’
अभयपत्रात लिहावयाचा मजकूर पेशव्यांना सांगताना छत्रपतींच्या मनी समर्थांचे निर्वाणीचे बोल घुमत होते, ‘‘सकळ लोक एक करावे। कारभारी कार्यी लावावे। गनिमा निपटून काढावे। चढती वाढती पदवी पावाल येणे.”
अभयपत्राचा मजकूर मनी घोळत असलेले निळोपंत जायला निघाले. तेव्हा त्यांना थोपवून बराच वेळ मनात घोळत असलेला मनसुबा राजांनी त्यांच्या कानी घातला.
‘‘पंत, हंबीररावांसुद्धा जेवढे खासे तेवढ्यास खलबतासाठी आवतनाचे हारकारे द्या.”
महाराजांच्या मनी काय असावे, याचा विचार करीतच पेशवे निघून गेले.
मुंबईहून आल्या वार्तेचा राजे विचार करीत होते. तेथील दौलतीचा हेजिब वारल्याची खबर होती. त्या जागी कुणाला नामजाद करावे, यासाठी राजांनी प्रल्हादपंतांना याद केले. ‘‘न्यायाधीश, टोपीकरांच्या दरबारी वकिलाची हकिगत कानी आलीच असेल. तुम्ही त्या दरबाराशी संबंधाचे. नव्यानं कुणाला नामजाद करावं त्या जागी?”
प्रल्हादपंतांनी आपणालाच हुकूम झाला नाही, यासाठी हलका नि:श्वास टाकला.
‘‘आम्हाला वाटतं त्रिंबक गोपाळ नीट सांभाळतील तो दरबार. तिथल्या दुभाष्यांचा व त्यांचा दाट परिचय आहे. शिवाय आमच्याबरोबर एक-दोनदा टोपीकरांच्या दरबारात ते जाऊनही आलेत.”
राजे व न्यायाधीश यांची त्रिंबकजींबद्दल बारकाव्याची चर्चा झाली.
‘‘पंत, हेजिब म्हणून त्रिंबकजींना आपले ओळखपत्र द्या.” राजांनी निवाडा दिला.
प्रल्हादपंत गेले. शिलेखान्यावर नजर टाकून यावी, या विचाराने राजे पेहराव अंगी घ्यायला आसवाबखान्यात आले. खिदमतगार त्यांच्या अंगी पेहरावी साज चढवू लागले. एका खिदमतगाराने त्यांच्या मस्तकी राजटोप ठेवला, दर्पणात बघताना आज त्यांना फार प्रकर्षाने जाणवले की – आपला टोप आबासाहेबांच्या उभट टोपागत नाही! तो बसका – मोगली माटाचा आहे!
‘‘आबासाहेबांचा टोप घ्या दास्तानाबाहेर. दर्शन घेऊ या एकदा त्याचं.” आसवाबखानाच्या प्रमुखाकडे बघत राजे म्हणाले.
‘‘जी.’’ त्यानं थोरल्यांच्या राजटोपाचं तबक हळुवार दास्तानाबाहेर घेतले. राजांच्या समोर धरले. क्षणभरच शंभूमनाला वाटले, या टोपाखाली हुबेहूब आबासाहेबच उभे राहतील. राजांनी त्या तबकातील टोपाला बोटे भिडवून ती कपाळी लावली.
हरवलेल्या छत्रपतींचे ‘‘स्वाऽमी, स्वाऽमी’’ या सादवल्या बोलाकडे ध्यानच नव्हते.
‘‘अंऽ’’ एकदम वळून त्यांनी पाहिले. समोर कवी कुलेश आणि राजापूरचे सुभेदार देवाजी विठ्ठल रिवाजासाठी झुकताना त्यांना दिसले.
‘‘तुम्ही?’’ कुलेशांकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. आपण स्वामींना भेटायला गैररिवाजाने थेट आसवाबखान्यात आलो आहोत; हे जाणून कुलेश अदबीने म्हणाले, ‘‘क्षमा स्वामी. मामलाही है ऐसा जो यहाँ आना पडा।”
‘‘कसला?’’ सुभेदार देवाजी विठ्ठल यांना निरखत राजांनी विचारले.
‘‘जी. जे पाहिलं ते तातडीनं सरकारांच्या कानी घालण्याजोगं आहे. नाही तर कसुरीचा गुन्हा बसेल माथी म्हणून राजापुराहून टाकोटाक आलोत आम्ही.”
‘‘बोला, देवजी.” कधी सहसा न पडणारी तिकोनी आठी राजकपाळी उमटली.
देवजींनी क्षणैक कुलेशांकडे बघितले. कुलेशांनी त्यांना नजरेनेच दिलासा दिला.
‘‘राजापूरच्या खाडीत गलबतात बसून शहजादा अकबर... अकबर इराणला निघून गेला महाराज!” ज्यासाठी ते आले होते, ती बाब देवाजींनी सांगितली.
‘‘झियाउद्दीन महमद शुजाई और पचास आदमी है उसके साथ।” कुलेशांनी अधिकाची माहिती दिली.
अकबराच्या पहिल्या भेटीपासूनच्या कैक आठवणी राजमनात फिरल्या. ‘आम्ही दिलेला मानाचा मोतीकंठा कलावंतिणीला देणारा, आमच्यासाठी फिरंगी दरबारात मध्यस्थी करणारा, बापाविरुद्ध बंड करून उठलेला अकबर – न भेटता – न बोलता इराणला निघून गेला! अकबर! काय ॠणानुबंध त्याचा? काय उपयोग झाला त्याचा आम्हास? कशासाठी दिला त्यास आसरा आम्ही? त्याच्या मार्गाने काही राजकारण चालते होईल म्हणून! पण औरंगजेबाला एक निमित्त जाले आमच्या मुलखात फौजा घुसवायला. आम्ही अकबराला आसरा न देता हाकलला असता दौलतीपार तर? टळता औरंगचा ससेमिरा आबासाहेबांच्या या श्रींच्या राज्यामागचा? कधीच नाही. तरीही तो चालून आलाच असता.’ विचारच विचार उफाळून गेले शंभूमनात. शांतपणे त्यांनी देवाजींना विचारले, ‘‘सुभेदार, दुर्गादासही गेले त्याच्याबरोबर?”
‘‘जी नाही. दुर्गादास आपल्या असामी घेऊन रतलामकडे निघून गेले.” राजांनी ते ऐकून सुटकेचा वाटावा, असा सुस्कारा सोडला. दुर्गादासबद्दल त्यांचे मत चांगले होते. तेही भरीला पडून गेले असते अकबराबरोबर इराणात तर?
‘‘तुम्हास काय वाटतं कविजी, करील इराणचा शाहा आब्बास शहजाद्याची मदत? येतील दोघे चालून दिल्लीवर?” राजांनी कुलेशांना विचारले.
‘‘नामुमकीन स्वामी! शहजादे की कबर अब इराणमें होगी! उस कब्र को कलमा पढने के लिए शाही खूनका भी कोई नहीं मिलेगा वहाँ।”
जहरी होते, तरी ते सत्य होते. ते ऐकून राजे क्षणमात्र विचारगत झाले.
याच दरम्यान जिंजीच्या उत्तर वेशीत बारा हजार सैन्य पाठीशी घेत प्रवेशणाऱ्या केसो त्रिमल आणि संताजी घोरपडे यांच्या आगवानीसाठी हरजीराजांनी पाठविलेले जैतजी काटकर आणि गोपाळ दादाजी त्यांना खांदाभेट देत होते. नौबती, नगारे दुडदुडत होते. आता कर्नाटक हरजीराजे आणि केसो त्रिमल यांच्या जोडचालीने औरंगजेबाशी झुंजणार होता.
रायगडाच्या खलबतखान्यात अंथरल्या लोड-गिर्द्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते. बैठकीत कुलेश, रूपाजी, खंडोजी बल्लाळ, निळोपंत, प्रल्हादपंत, कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित, धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती.
निळोपंतांनी खलबताचा हेत खोलला, ‘‘इदलशाही तर पडली – तिचेच सरदार गाठीशी घेत गनिमानं दुतोंडी हमला पुकारला आहे. एकीकडून गोवळकोंड्याचा मुलूख आणि दुसरीकडून आपला कर्नाटकपटात घ्यायचा इरादा आहे त्याचा – ’’
‘‘त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बळानं कर्नाटक प्रांतात उतरतो आहोत.” राजांनी खलबत आपल्या हाती घेत नजर सर्वांवर फिरवली.
‘‘म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे. विजापूरच्या घेरात औरंगला मदत करून तो दबा धरून आहे. हरजींच्या कुमकेसाठी आम्ही केसो त्रिमल व संताजींना धाडलंच आहे. आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला. धनाजी, रूपाजी, खंडोजी तुम्ही बरोबर असा आमच्या. पेशवे राणीसाहेबांच्या शिक्कामोर्तबाने इकडील कारभार हुशारीनं बघतील.”
खलबतातील प्रत्येक जण कान लावून राजाज्ञा ऐकत होता.
‘‘पेशवे, आम्ही येत असल्याचा थैलीस्वार धाडा जिंजीला हरजींच्याकडे. जे इथं अवघे राहणार आहात, ते आपापल्या जागी बरे नेटाक असा. औरंगच्या फौजा मुलखात घुसू म्हणतील त्यांना कुबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्थ करावी.’’
खलबतातल्या मंत्रिगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजे आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील. पण कुलेशांवर त्यांनी तिसरीच जोखीम सोपविली.
‘‘कुलेश, तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी सुलूख मोडून उचल खाऊ बघतील, त्यावर बरं ध्यान ठेवा.”
बराच वेळ खलबत चालले. अगदी बारीक-सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजांनी दिल्या. पुन्हा भंडारापरडी फिरली. खलबत उठले. पहाऱ्याच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिटल्या शिळेला आतून हत्यारमुठीचा सांकेतिक ठोका दिला. शिळा खोलली गेली. उजेड व वारा अंगावर घेत राजे शिळेबाहेर पडले. त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घोळू लागले. त्यांना कल्पनाही असायचे कारण नव्हते की, जिंजीला हरजीराजांच्या खासेवाड्यात केसो त्रिमल आणि हरजीराजे यांची, ऐकणाऱ्याचा थरकाप उडावा, अशी जंगी तोंडातोंडी जुंपली होती! कारण काय होते त्याचे?
सेंट जॉर्ज येथील टोपीकरांच्या वखारीवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमलेल्या गोपाळ दादाजींच्या जागी केसोपंतांनी आपल्या अखत्यारीत चिमाजी पंडितला नेमले होते. गोपाळ दादाजी कडक शिस्तीचे असल्याने टोपीकरांना मानवणारे नव्हते. त्यांची बदली करावी, म्हणून सेंट जॉर्जच्या वखारवाल्यांनी केसो त्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरविले होते. हा सारा घालमेलीचा करीणा हरजींच्या कानी पडला होता. केसो त्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते!!
कर्नाटकस्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस, कोडग, मलेय व तिगुड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली. या स्वारीत हरजींना पावलोपावली नडणाऱ्या म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला खिळते करून हरजींचा भार हलका करायचा होता. औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराणे पाठविल्याची बाब चिक्कदेवरायाला मुळीच पसंत नव्हती. आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशहाचेच आहोत, असे वरकरणी भासवत चिक्कदेवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलूख मारायचा होता.
रायगडावर कर्नाटकस्वारीची जय्यत तयारी झाली. हरजीराजांना आगेवर्दीचे खबरगीर धाडण्यात आले. स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी, रूपाजी, धनाजी, गोपाळ पंडित असा मेळ सिंहासनसदरेला एकवटला.
श्रीसखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले. घोटीव शिसवी देव्हाऱ्यात पूजलेल्या कुलदेवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला. देव्हाऱ्याशेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसूबाईंनी त्यांच्या हाततळव्यावर तीर्थजल दिले. ते ओठांआड करीत राजांनी पसरल्या हातांनी बाळराजांना जवळ घेत विचारले, ‘‘येता आमच्या संगती जिंजीला?” आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली.
‘‘प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं. पल्ला लांबचा आहे.” येसूबाई बाळराजांना पुन्हा आपल्याजवळ घेत म्हणाल्या. ‘‘आबासाहेब असेच स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले. जागोजागचं बदलतं पाणी त्यांना अधिक झालं. तशातच गडावर येताच सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली. आणि – विषम ज्वरानं बिछायतीला खिळून पडले ते....’’
‘‘स्वारीशिकारीची सवयच झाली आहे आम्हास. आमची नका काळजी करू. शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं, तरी कर्नाटकात दर्याही नाही. तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची. तुमच्या शिक्केमोर्तबावर अडीनडीचं सर्व चालवावं, असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना. येऊ आम्ही?” राजे जायला वळले.
‘‘थांबावं थोडं स्वारींनी.” पुढे होत येसूबाई राजांच्या तिवार पाया पडल्या.
‘‘एक मागणं आहे. आठवणीनं पुरं करावं स्वारीनं.” येसूबाई म्हणाल्या.
‘‘बोलावं श्रीसखींनी.”
‘‘बरेच दिवस मनी घोळणारं एक राहून गेलंय. आम्ही नाही निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं.’’ येसूबाई देव्हाऱ्याकडे बघत थांबल्या.
‘‘बोला. अशी कोणती बाब आम्ही असताना मनी रेंगाळती ठेवावी लागली?”
‘‘थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत होदिगेरीस आहे, असं नुसतं ऐकून आहोत आम्ही! कधी जाणं घडलं, तर स्वारींसह जोडीनं पाद्यपूजा करावी त्या छत्रीची असं कैकवेळा येऊन जातं मनी! स्वारी जातेच आहे. आठवणीनं पाद्यपूजा करावी.’’
राजे येसूबाईंच्याकडे बघतच राहिले. त्यांनी तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते. शहाजीराजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप यत्न केला. जमले नाही. ‘‘तुमचं मागणं नव्हे; ‘आज्ञा’ आम्ही बरी ध्यानी ठेवू. खरं तर तुम्हासच संगती नेलं असतं आम्ही. पण...” पुढे काहीच न बोलता राजे देवमहालाबाहेर पडले.
रामराजांच्या वाड्यात त्यांची वाजपूस करून, येसाजी दाभाड्यांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासनसदरेला आले.
महाडघाटाने तीस हजारांची घोडा व पावलोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली. इथे म्हलोजीबाबा आणि हंबीरराव राजांच्या आगवानीसाठी पाच दरवाजात उभे होते. फार दिवसांनी राजांची ही पन्हाळाभेट होती. पाच दरवाजातच चंद्रावतावरची मांड मोडून पायउतार होताच, ते म्हलोजींना व हंबीररावांना म्हणाले, ‘‘चला. प्रथम रंगरूपी शिवपिंडीचं दर्शन घेऊ सरलष्कर.”
क्रमशः
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍
🙏
3