Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 11, 2025 at 04:55 AM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग-६२* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   ‘‘चलावं.’’ हंबीरराव, म्हलोजी, खंडोजी, धनाजी राजांच्या पाठीशी झाले. ‘‘मामासाहेब, आता औरंगनं गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरलाय. आम्ही त्यासाठीच जिंजीला उतरतो आहोत.” जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखविली. ‘‘कळलंय आम्हास्नी ते. पन्हाळा आन बेळगाव मारायची लई झायली क्येली त्येच्या रणमस्त-रुहुल्लानी. पर आम्ही हाव, म्हलोजी हाईत. पार पिटाळलंय त्येस्नी.” ‘‘तुम्ही आहात म्हणूनच पन्हाळा-कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही आम्हास.” बोलता-बोलता मंडळी बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवपिंडीच्या घुमटीजवळ आली. दर्शनासाठी घुमटीत गेली. म्हलोजी, हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन, एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सूतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले. निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदाभेट दिली. न राहवून हंबीररावांनी विचारले, ‘‘रायगडाचा काय हालहवाल धनी?” तो सवाल आपल्या ताराऊसाठी हंबीररावांनी विचारला आहे, हे ताडूनच राजे म्हणाले, ‘‘सारं सुक्षेम आहे, आमच्या ताराऊ चखोट आहेत.” राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला. मजल-दरमजल करत फौज बेळगाव, धारवाड, गदग, चिक्कनहळ्ळी, चिक्कबाळापूर असे मुक्काम करत नंदीदुर्गाजवळ आली. नंदीदुर्गाचा कोट नजरटप्प्यात येताच राजांच्या आठवणींचे टाके डहुळले. याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते एकदा आले होते. कुणाबरोबर? दिलेरसंगती! त्या आठवणी गेल्या, तो दिलेर गेला. दोड्डबाळापूर, तिरुवनमलईमार्गे राजांची फौज जिंजीच्या वेशीत आली. वेशीत हरजीराजे आगवानीसाठी उभे होते. त्यांच्या डावे-उजवे केसो त्रिमल, संताजी, जैतजी काटकर, दादाजी काकडे, तिमाजी हणमंते अशा असामी उभ्या होत्या. चंद्रावतावरून राजे पायउतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली. नौबती झडल्या. पुढे होत राजांनी हरजींना खांदाभेट दिली. कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूसमेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले. त्यांच्या मनी आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्या. ‘केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी! कुठे रायगड, कुठे जिंजी? हे सारे त्यांनी उभे गेले. आग्ऱ्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर. ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार.’ सारे जिंजीकर गच्ची, माळवद धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते. औरंगजेबाला पिछाट घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते. सर्वांना त्या उमद्या, जवान रूपाचा अभिमान वाटत होता. राजे जिंजीच्या कोटात आले. बालेकिल्ल्यातील हरजींच्या खासेवाड्यातील हमचौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरांजनाचे तबक घेऊन सामोऱ्या आल्या. सोनमोहरांनी राजांचा सतका उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले. दोघा बहीण-भावांच्या डोळ्यांत, निरांजनांच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाझरताना दोघांनाही जाणवली – ‘मोगली कोठडीत खुलदाबादेला बंदिस्त पडलेल्या राणूआक्का आणि दुर्गाबाई यांची.’ ती परती सारत राजे पुढे होत झुकले. आपल्या आक्कासाहेबांच्या पायांना बोटे भिडवितानाच त्यांनी घोगरट विचारले, ‘‘बऱ्या आहात?” ‘‘जी. गोमट्या आहोत. आमच्या येसूबाई, बाळराजे कसे?’’ अंबिकाबाईंनी तबक दासीच्या हाती देत राजांना खांदे धरून उठते घेताना विचारले. किती वर्षांनंतरची भेट होती ही दोघा बहीणभावंडांची! दोघांनाही शेवटच्या समयीच्या आबासाहेबांची भेट घडली नव्हती! विचारायला सवाल कैक होते, दोन्ही मनांत. दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले. कर्नाटक व दौलतीच्या खाशा असामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या. सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसरले होते. कासवाच्या माटाची पानदाने मांडली होती. दक्षिणी तलम वाणाचे आडपडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते. हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हालहवाल विचारला. हरजींनी नुकताच गोवळकोंड्याचा कर्नाटकातील अकेरा, सोंदीपत्ती, कोतवारा असा मुलूख कब्ज केला होता, त्याची माहिती दिली. संताजी घोरपड्यांना हातरोख देत हरजी म्हणाले, ‘‘बाकी संताजी ही असामी फार मोलावकुबाची धाडली तुम्ही राजे.’’ ‘‘आणि आमचे केसोपंत?” राजांनी त्रिमलांकडे बघत विचारले. हरजी क्षणभर घोटाळले. तांबुलाच्या निमित्ताने समोरचे पानदान पुढे घेत त्यांनी सवालाला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला. ‘‘एवढी आदिलशाही जोरावारीची, पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं. आता गोवळकोंड्याचा मोहरा धरलाय त्यानं. तुम्हास काय वाटतं पुढचं राजे?” हरजींनी सवालाला बगल दिलेय, हे राजांनी जाणले. पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्त्वाचा होता म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले, ‘‘तुम्ही जमेल तेवढा इदल आणि कुत्बशाहीचा मुलूख आताच दस्त करून घ्या. उद्या त्याचेच निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर उतरतील. फार काळ नाही तग धरायचा आता गोवळकोंडा.” ते ऐकताना सारी सदर ताणावर पडली. तो सुमार करण्यासाठी हरजी म्हणाले, ‘‘कांजीवरमजवळ याचप्पा नायकाशी झाली आमची हातघाई वांदीवाशच्या मैदानात. हे संताजी होते संगती. पार पिटाळला आम्ही याचप्पाला म्हैसुराकडे. तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची. बेंगळूर भागात मोगलांचा कासमखान फिरतोय. त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा.” “चिक्कदेव असामी कशी?” राजांनी हरजींना विचारले. ‘‘जी. सुलुखाचे संबंध राखण्याजोगी नाही. राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्कदेवराय. पण त्यांचा बेंगळुरावर डोळा आहे.” बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली. ‘‘इथून बेंगळूर किती मजलांवर राजे?” छत्रपतींनी हरजींना विचारले. ‘‘जी. असेल की साताठ मजलांवर.” त्या सवालाचा नीट अंदाज न लागल्याने हरजी गोंधळले. ‘‘हेत काय राजांचा?” त्यांनी विचारले. ‘‘चला, जिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू.’’ बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले. सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरूजन्बुरूज पाहिला. किल्ला भक्कम तटबंद होता. बुरुजाबुरुजांवर मारगिरीची तोफभांडी नीट मांडली होती. चौक्या, पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता. त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना, अंबारकोठार, खजिना, दारूकोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हरजींना म्हणाले, ‘‘हा कोट गाठीचा आहे, असे आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरीच्या भेटीत म्हणाले होते. तुम्ही ही गाठ चावरसारखी खूब बंदिस्त आवळली आहे; राजे. आम्हास संतोष आहे.” दोन दिवस झाले. इक्केरीच्या राणी चन्नम्माचा, राजांना भेटण्यासाठी दूत आला. राणीचा नवरा वेडसर असल्याने तीच इक्केरीचा राज्यकारभार बघत होती. तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता. तसा चिक्कदेव पुरा धोरणी होता. थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलूख कब्ज केला, ही बाबच त्याला खटकत होती. तो आपल्या भोवतीच्या इक्केरी, रामनाड, मदुरा येथील नायकांचे प्रांत कुरतडत होता. एकोजीकाकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हलल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरच डोळा होता. चिक्कदेवाविरुद्ध हरजींना मदत करण्याची आज्ञा व्हावी, असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता. त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला. बाईमाणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नमाराणीला मदतीचा शब्द देऊन राजांनी तिला आदरपूर्वक फेरनजराणा पाठवून दिला. हरजींच्याकडून त्यांनी जिंजीभोवती असलेल्या मदुरा, म्हैसूर, रामनाड ह्या नायकांची काय-काय चाल आहे, याची माहिती घेतली. मोरस, तिगुड, कोडग, मलेय येथील दूतही येऊन राजांना भेटून गेले. त्यांना मरातब देऊ करून लवकरच आपण एक मोठी मोहीम खोलणार त्यात मदत करावी, असा त्या दूतांकरवी सर्व नायकांना राजांनी शब्द टाकला. दिवस उकाड्याचे होते. रात्रीच्या भोजनानंतर राजे हरजींच्यासह दिवाणीमहालात चोपाळ्यावर बसले होते. हरजींना राजांचा पुढचा बेत काय असावा, याचा साधारण अंदाज आला होता. पण मध्येच राजांनी बेंगळूरबद्दल एकदा विचारले असल्याने तो अंदाज पक्का झाला नव्हता. अचलोजीच्या फितव्याने संतापून ते बेंगळुरावर उतरतात की काय, अशी एक शंका हरजींना होती. चोपाळ्याच्या लोखंडी सळया कुरकुरत होत्या. जागोजाग टेंभ्याखाली हत्यारी पहारे उभे होते. राजांच्या मनचा हेतू जाहीर व्हावा म्हणून हरजींनी विचारले, ‘‘बेंगळूर किती मजलांवर आहे, असं विचारलं होतं राजांनी. अचलोजी पोरवयाचे. काकासाहेबांच्याकडं बघता आम्हांस वाटतं....” फिरता चोपाळा पायाने रोखत हरजींचा बोलत तोडत राजांनी विचारले, ‘‘आता श्रीरंगपट्टण किती मजलांवर ते सांगा.” हरजींनी बांधला होता, तोच अंदाज राजांच्या तोंडून बाहेर आला. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचे मातब्बर ठाणे असलेल्या श्रीरंगपट्टणची आता गय नाही, हे हरजींनी ताडले. ‘‘जी. तेही असेल सात-आठ मजलांवरच.” ‘‘आम्ही खासाच घ्यावं म्हणतो, चिक्कदेवाचं श्रीरंगपट्टण घेरात. तुमच्या दिमतीची निवडक लढाऊ असामी फौजसुद्धा द्या आमच्यासंगती. मोरस, तिगुड, कोडग व मलेयच्या नायकांना आम्ही घेर टाकताच श्रीरंगपट्टणवर चालून येण्यास हरकारे द्या. बेंगलूरवर डोळा ठेवणाऱ्या चिक्कदेवाचे त्याशिवाय नाही उघडायचे डोळे.” ‘‘हे बरं झालं. इतरांस नडतो, तसा हा चिक्कदेव आम्हालाही जागोजाग नडतोच आहे. आम्हीही येऊ तुमच्या संगती त्याच्या समाचारास.” हरजी हुरुपाने म्हणाले. ‘‘गरज नाही त्याची राजे. तुम्ही जिंजी राखून असा. कासम-रणमस्ताच्या फौजा दौडताहेत प्रांतात. मोहिमेच्या सिद्धतेला उद्याच लागा. प्रांताचे जाणकार खबरगीर मात्र द्या, तुमच्या फौजफळीबरोबर.” बराच वेळ राजे श्रीरंगपट्टणच्या घेराचा आराखडा मनाशी बांधत राहिले. हरजी मोहिमेच्या तयारीची आखणी करत राहिले. श्रीरंगपट्टणभोवती ‘हरहर महादेवा’च्या किलकाऱ्यांचा लोळ उठला. संताजी घोरपडे, त्रिंबकजी भोसले, दादाजी काकडे, केसो त्रिमल, धनाजी, खंडोजी अशा मर्दान्यांच्या संगती राजे श्रीरंगपट्टणला भिडले. चिक्कदेवरायाला या हमल्याची अगोदरच कुणकुण लागल्याने तो उगवतीच्या प्रदेशाकडे निसटला. तेथील रयतेकडून बळजोरीने खंडणी वसूल घेण्याचा त्याने सपाटा लावला. या जुलमाने हैराण झालेल्या त्याच्याच रयतेने आणि काही मंत्रिगणांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. रयतेने एकजाग होत आपल्यातीलच एक ‘वैष्णव’ आणि एक ‘शैव’ असे सेनाप्रमुख नामजाद करून दोन फळ्यांचे सैन्य उभे केले. त्यातील एक सत्यमंगलमवर चालून गेली. दुसरीने खुद्द म्हैसूरलाच घेर टाकून प्रत्यक्ष चिक्कदेवरायालाच त्यात कोंडले. राजांच्या फौजेने चिक्कदेवाचे श्रीरंगपट्टण लुटीवर घातले. मदुरेकडून त्याच्या कुमकेला जाणाऱ्या शिबंद्यांवर छापे मारून त्याला एकाकी पाडले. राजांच्या फौजेतील कर्नाटकची फळी श्रीरंगपट्टणच्या कोटाला घेर टाकून बसली. मराठी मुलखातून आलेली फळी म्हैसूर राज्यातील प्रदेश लुटत चालली. म्हैसूरच्या कोटात अडकलेल्या चिक्कदेवरायाला काय करावे सुचेना. आता त्याला शेजार सुचला! त्याने रामनाडच्या नायकाला मदत करण्यासाठी खलिता धाडला. राजांनी हमल्यावर जातानाच जिंजीपासून श्रीरंगपट्टणपावेतो खबरगीर पेरले होते. ते खुद्द श्रीरंगपट्टणच्या घेरावर देख ठेवून होते. राजांची प्रांत गोवे, जंजिरा, बऱ्हाणपूर येथील कीरत ऐकून असलेला चिक्कदेव पुरता सटपटला होता. श्रीरंगपट्टण हातचे जाणार याची तर त्याने खूणगाठच बांधली होती. या घेराच्या खबरा ऐकून भोवतीचे नायकही हबकले होते. संताजी, धनाजी, खंडोजी यांच्या चपळ तुकड्या म्हैसूर राज्यात चौफेर पसरल्या. श्रीरंगपट्टणचा किल्लेदार निकराने कोट झुंजवीत होता. पण त्यानेही आशा सोडली होती. कोटाबाहेरच्या मैदानावर राजांसाठी खास डेरा उठवण्यात आला होता. म्हैसूरभर दौडणाऱ्या मावळी तुकड्या त्या डेऱ्यासमोर हररोज लुटीचा ऐवज आणून त्याची रास लावीत होत्या. घेरातील दोरबाज कोटाला लोखंडी गळांचे दोर टाकून तट पार करू बघत होते. आपल्या चंद्रावतावर मांड घेऊन राजे रोज तटाभोवती फेर टाकत होते. पण – हा पणच नडत आला होता, त्यांना हयातभर. एके दिवशी त्यांच्या डेऱ्यात शिरलेल्या खबरगिराने येऊन त्यांच्या कानी घातली ती कर्नाटकची नव्हती, मराठी मुलखाची खबर होती – ‘‘औरंगजेब थेट किल्ले पन्हाळ्याला वेढा देण्याच्या बेतात आहे!” पन्हाळा! पाखराच्या कोटरागत वाटणारा गड! आबासाहेबांची अखेरची भेट झाली ते ठिकाण! हंबीरराव – म्हलोजीबाबा – राजांच्या डोळ्यांसमोर ठकाठक चित्रे फिरली. त्यांनी संताजी, केसो त्रिमल यांना घेरातील फौज एकवट करण्याची आज्ञा दिली. आता कर्नाटकात आलेल्या राजांना तातडीने परतणेच भाग होते. तरीही त्यांनी हरजींच्या सोबत जिंजीभोवतीचा वांदीवाश, वृद्धाचलम, तिरुवनमलाई हा प्रदेश नजरेखाली घातला. परतीच्या प्रवासाला दोन दिवस असताना हरजींच्या खासेवाड्यात दिवाणी दालनात ते हरजींना प्रांतराखणीच्या महत्त्वाच्या सूचना देत होते. दालनात फक्त केसो त्रिमल आणि संताजी याच वरकड असामी होत्या. द्यायच्या त्या सर्व सूचना देऊन होताच राजांनी मनी रेंगाळणाऱ्या मुद्दयाच्या बाबीला तोंड फोडले. ‘‘तुमचा केसोपंतांचा काही गैरमेळ कानी येतोय राजे.’’ ते ऐकताच हरजी व केसो त्रिमलांनी गर्दनी टाकल्या. ‘‘कारण कोण याचं संताजी?” राजांनी घोरपड्यांना मध्येच घेतले. संताजींनी दोघांच्या बिनसण्याचे कारण बयाजीने सांगितले. ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, ‘‘मनाच्या गैरमेळानं काय-काय सोसावं लागतं, ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की, आपुलकीचा देठच खुंटतो. कार्यी लावायची ती मोठी कामे बगलेलाच पडतात, नको तिथं माणसाचं बळ खर्ची पडतं. तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो. तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून.’’ राजे क्षणैक थांबले. समर्थांच्या नुसत्या आठवणीनेही कातर झाले त्यांचे मन. ते हरजींच्याकडे बघत, स्वत:ला हरवल्यागत बोलले, ‘‘मागील अपराध क्षमावे। कारभारी हाती धरावे। सुखी करूनि सोडावे। कामाकडे।” ते ऐकून हरजी विचारगत झाले. बैठकीवरून उठत केसोपंतांजवळ जात राजांनी त्यांना हलक्या शब्दांत समज दिली, ‘‘केसोपंत, आबासाहेबांनी पहिले पेशवे शामराज यांना कोण धडा दिला, ते कानी असेल तुमच्या. खुद्द आम्हास काय-काय निवाडे घ्यावे लागले, ते याद करताना मनची घालमेल होते आमच्या. जगदंब करो तसा प्रसंग न येवो, तुमच्या आणि हरजींच्या मधे! बरे हुशारीने, राजांच्या एकविचारे असा.” केसोपंत, हरजी, संताजी भारावून राजांच्याकडे बघत राहिले. क्षणमात्र त्यांना थोरले महाराज तर समोर नाहीत ना, असा भास झाला. ‘‘झालं गेलं जनावराच्या टापेगत मागं टाकून तुम्ही दोघांनी एकमेकांस पक्क्या दिलजमाईची आमच्या सामने खांदाभेट द्या.” राजांनी हरजी व केसोपंतांवर आपली पुखरनजर फिरविली. क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पसरत्या हातांनी एकमेकांस स्वामींसमोर खांदाभेट दिली. ती बघताना राजांच्या मुखावर समाधानाची लकेर तरळून गेली. संताजी भरून पावले. दोन दिवस हरजी-अंबाक्कांचा पाहुणचार घेऊन राजांनी जिंजी सोडली. त्यांना सोबत करायला हरजी, संताजी-केसोपंतांसह संगती चालले. फौजा बेंगळूरच्या मार्गाला लावण्याची राजांची आज्ञा झाली. ती ऐकताच गोंधळलेल्या हरजींचा गैरसमज दूर करत राजे त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही जाणतो तुम्ही कसल्या विचारात पडलात ते. अर्जुनजीवर कसला राग नाही आमचा. बेंगळुरावर नाही चालून जात आम्ही. आम्ही चाललो आहोत होदिगेरीला! आमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या छत्रीचं दर्शन घ्यायला. पाद्यपूजा करायला. त्यांचे आशीर्वाद मागायला.” हरजींनी ते ऐकून सुस्कारा सोडला. मजला टाकत राजांची परतीची फौज बेंगळूरजवळ होदिगेरीच्या रानात आली. हरजी, खंडोजी, संताजी अशा निवडक असाम्या संगती घेऊन राजांचे घोडेपथक शहाजीराजांच्या छत्रीकडे चालले. शहाजीराजांच्या छत्रीचे ठिकाण आले. एकोजीकाकांनी इथे नित्यपूजेच्या पुजाऱ्यांची व्यवस्था केली होती. पायउतार होऊन राजे खाशामेळासह छत्रीसमोर आले. कैक विचारांनी मन भरून आले त्यांचे. पायीच्या मोजड्या उतरून, पुजाऱ्याने दिलेली फुल-ओंजळ आपल्या आजोबांची यादगीर झालेल्या पादुकांवर राजांनी वाहिली. शिवगंधी कपाळ त्या पादुकांना भिडविताना नाना विचार त्यांच्या मनात दाटून आले. ‘आमच्या मासाहेबांचा नाही तसाच तुमचा चेहराही नाही आठवत! कधी बालपणी दिसले असतील तेवढेच; तुमचे ओझरते पाय. निजामशाहीपासून आदिलशाहीपर्यंत फिरली तुमची पावले. आमच्या आबासाहेबांनी हे केवढं नव्हत्याचं होतं केलं! बागलाणपासून जिंजीपर्यंतच्या आबासाहेबांच्या या राजपादुका राखण्याची आम्ही शर्थ करतो आहोत. आशीर्वाद द्या आम्हास.’ राजांमागून सर्वांनी छत्रीचे दर्शन घेतले. हरजींचा निरोप घेण्यासाठी त्यांची खांदाभेट घेताना राजे त्यांना न राहवून म्हणाले, ‘‘हा कर्नाटक प्रांत ही गाठीची सबल जागा, बरी बांधून राखून असा ती. येतो आम्ही.” मराठी मुलखात पन्हाळ्यावर येताच राजांना म्हलोजींच्याकडून कळले की, पन्हाळ्यावर चालून येण्याची औरंगजेबाची हूल होती! त्याच्या मिरज, कऱ्हाड, बेळगाव भागात फिरत्या फौजांना रोखण्यासाठी हंबीरराव तिकडे गेले होते. पन्हाळ्यावर एक मुक्काम टाकून राजांनी म्हलोजींचा निरोप घेतला. ते महाडपाटाने रायगड चढून आले. गडाला जागजागी गवती झड्या लावल्या होत्या. मृग तोंडाशी आल्याने वाळवणाची धान्ये गोणी भरून अंबारखान्यात थप्यांनी रचली जात होती. गड चढून आलेल्या राजांना निळोपंतांनी मागील हालचालींचा तपशील दिला. कुलेश खेळण्यावर, रामचंद्रपंत कोकणात, हंबीरराव देशावर अशी नेमल्या जागी माणसे जागते फौजीतळ बांधून पावसाळ्यातही जागरूक होती. अंत:पुरात येसूबाईंच्या भेटीस आलेल्या राजांनी कर्नाटक स्वारीतले प्रसंग त्यांच्या कानी घातले. येसूबाईंना ऐकायची होती, ती छत्री-दर्शनाची बाब. ती सर्वांत शेवटी राजांनी त्यांना सांगितली. पेन्नर, तुंगभद्रा, कृष्णा अशा भरल्या नद्या पार करूनही हरजींच्या प्रांत कर्नाटकाच्या खबरा येत होत्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कासमखानाने एकोजीकाकांचे बेंगळूर मारून ते तीन लाख रुपयांना विकले होते! कुणाला? म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला! हातचे बेंगळूर हे मातब्बर ठाणे गेले, या धसक्याने एकोजीकाकांचा तंजावरला काळ झाला होता. श्रावणाचे दिवस सुरू झाले. मनी घोळणाऱ्या दोन बाबी मार्गी लावण्यासाठी राजांनी मोरेश्वर पंडितरावांना खासेवाड्यात याद घेतले. चिंचवडहून मोरयाबाबांचा एक शिष्य बाबांची तक्रार घेऊन नुकताच राजांना भेटून गेला होता. पुणे प्रांतातील लष्करी धामधुमीच्या काळात फौजेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या मठस्थानाला बेमुर्वत उपद्रव दिला होता. फेर घेणाऱ्या राजांनी विचारले, “पंडितराव, प्रांत पुण्याला सुभा कोण सध्यास?” ‘‘जी. विनायक उमाजी आहेत.’’ मोरेश्वर विचारात पडत उत्तरले. विनायकांचे नाव ऐकताच राजांना त्यांचे वडील उमाजींची आठवण झाली. उमाजींनी राजांना बालपणी पुराणग्रंथांची बारीक अर्थबर शिकवण दिली होती. ‘‘पंडितराव, विनायकांना फौजेच्या जुमलेदार, हवालदार, बारगीर, हशम, बाजेलष्कर हुजरात सर्वांस समज देण्यासाठी आज्ञापत्र तातडीनं धाडा. कलमात लिहा... तुम्ही अवघे मठाच्या रहदारीस नाहक दरफ्ती करता... उपद्रव देऊन धामधूमही करता. चिंचवडचा मठ मोरयाबाबांचा. कै. आबासाहेबांपासून बाबा चरणधूली घेण्याच्या अधिकाराचे. तुम्ही मठातर्फेच्या रयतेकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता, म्हणून कळो आले. तरी हे ढंग आम्हास कैसे मानो पाहतात? या उपरीही बदराह वर्तणूक केलिया तुमचा एकंदर तो मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्यास जीवेच मारले जाईल. बरे जाणून मौजे मजकुरास तसदी न देणे. ताकीद असे.’’ मोरेश्वर पंडितरावांनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकला. आज्ञापत्र कुणा स्वारामार्फत जोखमीने पाठवावे, याचा ते मनाशी मेळ मांडू लागले. आपल्याच विचारात फिरणाऱ्या राजांनी दुसऱ्या एका आज्ञापत्राच्या विषयाला तोंड फोडले. ‘‘जसे हे पाठवाल तसेच वाई प्रांतातील कसबे निंबच्या सदानंद गोसाव्यांच्या मठाबाबतही आज्ञापत्र द्या. मठास ऐवज देण्यास हयगय करीत आहे. त्यांना कलम द्या... पहिलेपासून मठाचे अन्नछत्र चालिले असता मध्येच ऐवजाबाबे कुसूर करावया गरज काये? याउपरी ऐवज पाववावया बाबे एवढी ती सुस्ती न करणे. पहिलेपासून मोईन असेल, तैसा पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे. धर्मकार्यास खलेल न करणे. उजूर न करणे. जाणिजे!’’ रिवाज भरून पंडितराव निघून गेले. राजांच्या मनात मात्र समर्थ आणि मोरयाबाबा यांची जोड ताडून बघणारे, न आकळणारे विचार फिरून गेले. गणेशचतुर्थीच्या सणाचे दिवस आले. गडावरची राउळे रंगाऱ्यांनी रंगोटीला घेतली. नुकताच पावसाळा उलगल्याने अधूनमधून उन्हाची किरणे गडमाथ्यावर उतरू लागली. गडवाटा मात्र अजूनही शेवाळलेल्याच होत्या. त्यावरून पुन:पुन्हा पाय घसरत असताही बरोबर दुभाष्या शेणवीला घेऊन मुंबईहून आलेले टोपीकरांच्या दरबाराचे दोन वकील गड चढून आले. त्यांची नावे होती जॉर्ज वेल्डन व रॉबर्ट ग्रॅहॅम. राजांनी नव्याने नामजाद केलेले दौलतीचे वकील त्र्यंबक गोपाळही त्यांच्याबरोबर होते. सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजांची कीरत ऐकून असलेले गोरे वकील, गोव्यात फिरंग्यांची दैना करणारे त्यांचे पुत्र – राजे कसे दिसत असतील, आपल्याशी कसे बोलतील याचाच विचार करीत होते. त्या चौघांना घेऊन प्रल्हादपंत राजांच्या भेटीसाठी सिंहासनसदरेला आले. गोऱ्या वकिलाने आणले नजराणे पेश केले. रिचर्ड केजविनला लंडनला परत जायला लावणाऱ्या उमद्या राजांना, दोघेही वकील टेकल्या गुडघ्याने रिवाज देऊन निरखू लागले. त्र्यंबक गोपाळांनी आपल्या स्वामींना त्यांचा परिचय करून दिला. ‘‘मुंबईजवळच्या कार्लास या बेटाच्या सुलुखासाठी आलेत हे गोरे हेजिब मुंबईहून.” प्रल्हादपंतांनी राजांना त्यांचा येण्याचा हेतू सांगितला. ‘‘काय तपशिली कलम आहे त्यांचे सुलुखाबाबत?” राजांनी दोन्ही गोऱ्यांना बारकाईने निरखत विचारले. ‘‘कार्लास बेटाचे हबश्यांपासून संरक्षण करण्यासाठी राजी आहेत टोपीकर. त्यासाठी ते आपली फौज बेटावर ठेवण्यासही तयार आहेत. पण त्यासाठी त्यांचं एक मागणं आहे आपल्या दरबारकडून.’’ त्र्यंबकपंतांनी राजांच्या कानी घातले. ‘‘कोण वजेचं मागणं?” राजांचे कपाळ आठ्याळ झाले. ते म्हणतात, ‘‘यासाठी आपल्या दरबारनं त्यांना दोन हजार मुदे भात व रुपये पन्नास हजार रोख द्यावेत!” ‘‘बस्स?’’ राजे आसनाला पाठ टेकत हसून म्हणाले. त्यांच्या मनी, गेली दोन वर्षे भाताच्या कणासाठी दुष्काळामुळे तळमळणारी मुलूखभराची प्रजा फिरून गेली. औरंगजेबाच्या फौजा परतवून लावण्यासाठी खर्ची पडलेला खजिना तरळून गेला. तरी पण त्यांनी विचारले, ‘‘तुमचं काय मत प्रल्हादपंत?” ‘‘घातल्या त्या दरबारनं अटी म्हणजे त्या मान्य केल्या, असं होत नाही. थोडं ओढून धरलं, तर भाताची आणि रोख रकमेची मागणी घटवतील टोपीकर.’’ प्रल्हादपंतांनी आपला सल्ला दिला. ‘‘तुम्हास काय वाटतं त्र्यंबकपंत या अटींबाबत?” त्यावर राजांनी आपल्या वकिलांना चाचपले. स्वामीच कौल देतील या आशेने बघणारे त्र्यंबकपंत गोंधळले. म्हणाले, ‘‘जी. मोगली फौजांचा ताण दौलतीवर आहे. निभत असेल ही बेटाची बाब परस्पर, तर सुलूख मान्य करावा.” ‘‘नवीन असलात तरी वकुबाचे आहात त्र्यंबकपंत!” राजांनी मध्येच त्र्यंबकपंतांना कौलच वाटावा असे हसत म्हटले, ‘‘न्यायाधीश, करावयाचाच तर ओढूनताणून सुलूख कशासाठी? यांना सांगा, आम्हास मान्य आहेत त्यांच्या अटी! त्यांनी तातडीनं बेटाच्या राखणदारीसाठी आपल्या फौजा पाठवून द्याव्या.” त्र्यंबकपंत आणि न्यायाधीश एवढ्या तडकाफडकी तह झाल्याचे आश्चर्य वाटून राजांकडे बघतच राहिले. ग्रॅहॅम आणि वेल्डन नजराणे मिळताच खूश झाले. आपला तह लवकर फते झाला हे आपल्या नव्या विजरईला सांगायला ते मोकळे होते. ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटकस्वारीच्या वेळी अबुल हसन तानाशाहाने आगवानी करून, त्यांना नजराणे देऊन मैत्रीची ऊरभेट दिली होती, त्याच भागानगरात तानाशाहाच्या दंडात औरंगजेबाच्या ‘शाही’ काढण्या पडल्या! आता विजापूर, गोवळकोंड्याच्या फौजाच दिमतीला घेऊन औरंग केव्हाही मराठी मुलखावर उतरणार हे साफ होते. कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. सारेच श्रींचे राज्य राखून कसे चालवावे, याच विचाराने घेरले होते. ‘‘आता कुणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कुणास फुरसत नाही. दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या. गनिमाचा डोळा तर पहिल्यापासून आम्हांवरच. बागलाण, खानदेश, कोकण, देश दौलतीच्या चहूबाजूंच्या सुभेदार, हवालदारांना साऱ्यांवर केवढी जोखीम पडते आहे, याचं कलम द्या. मिळेल तेवढी तवानी संचणी तातडीनं करण्यास लिहा. आम्ही चौलच्या नाडल्या रयतेला सवलती देण्यासाठी खासा चौलात उतरतो आहोत. कळवा तसं सुभेदार रायाजी सदक प्रभूंना.’’ कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती, पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते. आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले. कधी त्यांच्या प्राणावर, तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे बाके प्रसंग गुदरून गेले. आज नेमके काय केले असते त्यांनी? चारी कवाडांवर शंभूमन धडका घेऊ लागले. निळोपंत, येसाजी, रामचंद्रपंत सर्वांनी धीरा-इमानाचे वचन वाटावे, असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखविला. आपल्याच विचारात गढलेल्या राजांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळोपंतांना सांगितले, ‘‘पंत, कर्नाटकात हरजींना फौजा तयारीनं सीमेवर पेरण्याचा खलिता द्या, औरंग आहे तो! नेम नाही देता येत कुठं वळेल याचा.” ते ऐकताना पेशवे विचारात पडले. आज सर्वांना वाटून गेले की, ‘मुलूख थोडा जिकडे पुढा,’ म्हणत राज्य उठविणे एक वेळ केवढे सोपे, पण उठविले ते राखणे केवढे यातायातीचे! ‘‘तुम्ही सारे कदीम, जाणते आहात. मर्दानगीचे आहात. प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल, बागलाणपासून जिंजीपर्यंत पसरलेला हा मुलूखपट्टा राखायला. हे एकल्या आबासाहेबांचं नव्हतं, आमचं नाही, ते साऱ्यांचं जिवामोलाचं राज्य आहे. कुणीच कचदिल होऊ नका. एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्ऱ्याच्या कोठीत अडकून पडलो होतो. बऱ्या जाणतेपणी अवघे समजून घ्या, आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचं भय समोर आहे. चला आमच्यासह. मेळानं जगदीश्वराचं दर्शन घेऊ.” आपल्याच लयीत सिंहासनसदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही. सारे त्यांच्या पाठीशी चालले. फक्त एकले न्यायाधीश प्रल्हादपंत रामराजांच्या वाड्याकडे, कुणाला न कळेलसे वळले. कसला न्यायनिवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! स्नान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती. सकाळपासून मनाला नाकळेल अशी चुटपुट लागून राहिली होती. दुपारचा थाळा घेताना श्रीसखींना ते म्हणालेही होते, ‘‘कळत नाही, पण जिवाची उलघाल होते आहे आज. औरंगच्या फौजा हरजींच्या प्रांतात घुसल्या की काय; असा शक येतो आहे.” दिवस कलतीला लागला तसे राजे राया-अंता, पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले. इथून पायतळी गंगासागराचा तलाव दिसत होता. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या फांदीवर मान आखडती घेऊन बसलेला एक खंड्यापक्षी राजांना दिसला. निश्चल खड्या असलेल्या त्या पाखराला, राजे एकटक निरखू लागले. त्यांना काय होत आहे, ते कळले नाही. डोळ्यांचे पाते लवायच्या आत खंड्या उडाला. त्याने थेट पाण्यात सूरझेप घेतली. गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला. त्याच्या लांबट, काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली, तडफडती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरिपेत चांदवा उठवून क्षणात चोचीआड झाली. याच तलावाकाठी, असाच खंड्यापक्षी कधीकाळी पाहिल्याचे त्यांना आठवत होते. पण कधी? काही गवसत नव्हते. खंड्याच्या सूरझेपेने गंगावर्तावर पाणलहरी उठल्या तशा राजमनात विचारलहरी उठू लागल्या. मनाच्या काठाळीत विरू लागल्या. जगदीश्वराच्या मंदिराकडे सांजदर्शनासाठी चाललेल्या राजांना येसाजी कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. येसाजी-खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले. खंडोजी म्हणाले, ‘‘रामसेज – एवढी सालं निकरानं आपला रामसेज....” चालते राजे थांबले. खंडोजी चरकले. कसे बोलावे, विचारात पडले. ‘‘पडला... हेच ना चिटणीस?” राजांनीच त्यांना विचारले. ‘‘जी. लढून नाही. कपटी चालीनं. फितवा करून पाडला. एवढ्या ताकदीचा रामसेज, धनी.” क्षणभर खंडोजींनी गर्दन खाली घातली. लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटावा म्हणून ते म्हणाले, ‘‘पण हरजींची खबर आहे स्वामी, पडल्या गोवळकोंड्याचा शक्य तेवढा मुलूख कब्ज धरून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात.’’ खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते. मनाला न डुचमळता सांजवाऱ्यात मुरत होते. साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले. त्यांनाच कळली नाही, पण आज त्यांची नजर कशी कुणास ठाऊक समोरच्या गाभाऱ्यातल्या शिवपिंडीवरच्या अभिषेकपात्रावरच खिळून पडली. वाऱ्याने पात्र मंद डुलत होते. त्याबरोबर अभिषेकधारही डुलत होती. दर्शन करून सारे जण बालेकिल्ल्यात परतले. सूर्य आता डुबला. गडाच्या लहाना दरवाजात, महाद्वारात सांजनौबती दुडदुडल्या. पुरते सांजावून आले. नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले. ते दरवाजे पार करीत आलेला तळबीडचा एक स्वार पाच-सहा सोबत्यांसह महादरवाजा पार करून बालेकिल्ल्यात आला. त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते, चेहरा पार कळंजून गेला होता. देवडीवाल्यांना हातानेच थोपवत काही न सांगता तो कसेतरी दरवाजे मागे टाकत बालेकिल्ल्यावर आला. महाराज नुकतेच परतले होते. डुईचा टोप त्यांनी उतरून तबकात ठेवला होता. मुलूखभर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कसकसा करावा, याची कल्पना ते मुजुमदार हणमंत्यांना देत होते. येसाजी-खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते. ‘‘म्हाऽराजऽ, घात झाला.’’ राजांसह सर्वांचे काळीज थरकून उठावे, असे पिळवटते बोल वाड्याचे सदरीदालन चिरत गेले. गड चढून आलेला स्वार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायांवर देह टाकत गदगदू लागला. ते होते, तळबीडचे शंकराजी मोहिते. पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले. शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकराजींना विचारले, ‘‘काऽय झालं शंकराजी?” राजांच्या हातस्पर्शाने गदगदून गेल्या शंकराजींना काही क्षण बोलवेना. तुटक- तुटक बोल कसेतरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले, ‘‘आम्ही – आम्ही झालावंच पर हुबी दौलत पोरकी झाली. धनीऽ तुमचं... तुमचं मामासाहेब – समद्यांचं सरलष्कर – आमचं भाव...” असह्य-असह्य कढाने शंकराजींनी घट्ट मिटल्या डोळ्यांनी तगमगती गर्दन इकडे-तिकडे झटकली. त्यांच्या डुईची पगडी उडून रुजाम्यावर उतरली. ‘‘सरलष्कर ग्येलं धनीऽ!!” वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकून लावण्यासाठी झालेल्या हातघाईच्या लढाईत सरलष्कर हंबीररावांच्या भरदार छाताडावर तापला जडशीळ, लोखंडी तोफगोळा येऊन अचानक आदळला होता. त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे, तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून टाकली होती. भुईवर कोसळताना हंबीरराव जिवाच्या पिळाने ओरडले होते, ‘‘आमच्या ताराऊला सांबाळा धनीऽ. जै वागजाईऽ’’ आणि वाईच्या माळरानावरूनच त्यांनी अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता. फराशीच्या रुजाम्यावर पडल्या शंकराजींचे ‘गेले!’ हे बोल ऐकताच राजांनी आपले दोन्ही हातच कानांवर घेतले. ‘‘दिली आमची धरसोबा – ताराऊ रामराजास्नी’ म्हणणारे, आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचीत सापडलो तेव्हा ‘बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं’ म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे, आम्हास कैद करायला निघालेल्या सुरनीस-पेशव्यांनाच कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले, वऱ्हाड–बऱ्हाणपूर, भडोच तुडविणारे, चाकरीने सरलष्कर असलेले, पण ॠणानुबंधाने आम्हास आबासाहेबांच्या ठायीच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते!’ त्यांची रूपेच रूपे राजांच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. शंकराजींना उठते करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ते आपोआपच उठते व्हावेत, येसाजी– खंडोजी, राया-अंता, पुरुषा, पहारे सारेच चक्रावून जावेत असे, आपले तोंड ओंजळीत घेत राजे कुडीभर हलत मुसमुसु लागले. एवढे घनदाट प्रसंग कोसळले, छत्रपती कधीच नव्हते डोळ्यांवाटे फुटले. आज मात्र फुटले. ‘‘कुठं आहेत मामासाहेब? का गेले असे न बोलता, न भेटता? कुणाकडे पाहावे आम्ही?” भरून आल्या डोळ्यांनी राजे कसेतरीच पुटपुटले. एव्हाना बातमी गडभर पसरली होती. माणसे खासेवाड्याकडे लोटत होती. पोरवयाच्या ताराऊंना घेऊन येसूबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे, ताराऊंच्या जवळ गेले. काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे थोपटत श्रीसखींच्याकडे बघितले. मोठ्या निकराने डोळ्यांतले पाणथेंब रोखत राजे शंकराजींना म्हणाले, ‘‘चला, संगती या.” मशालधाऱ्यांनी वेढलेल्या पालखीत बसून येसाजी, निळोपंत, खंडोजी यांच्यासह राजे महाडघाटाकडे चालले. आणल्या जाणाऱ्या सरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी. हंबीररावांच्या देहाला अगीनडाग देण्यात आला. हंबीरमामा गेले आणि एका भयाण पोकळीने राजमन घेरले. ते कुणाशीच खुल्या मनी बोलेनात. रोजनेमाचे त्यांचे स्नान, स्फटिकपूजा, दफ्तर, गडदेख, थाळा हे चुकार होऊ लागले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. स्नानाला हमामखान्यात बसले, तर डुईवर पडणाऱ्या पाणधारेबरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या. सरशीने कपाळी शिवगंध रेखून घेताना छत्रपतींना ती सरशीच रक्तमाखल्या फरशीसारखी दिसू लागली. दफ्तरात खंडोजी, चिमणगावकर यांना खलित्याचा मजकूर सांगताना ते मध्येच म्हणू लागले, ‘‘राहू द्या. चिटणीस, कुणासच नका धाडू खलिता. बेतले असतील ते रद्द करा.” थाळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवडलेले राहू लागले. मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यावरून. विचार – विचार! नुसत्या विचारांनी मेंदूची निशाणकाठी थरथरू लागली त्यांच्या. “श्रींचे राज्य’ म्हणजे नेमके काय? कोण होते आबासाहेब? थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, समर्थ हे सारे कोण? कोंडाजी, कृष्णाजी, हंबीरमामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलंसुद्धा नाही ते लढायांत देह ठेवून गेलेले असंख्यात धारकरी, औरंगला तसलीम करून खिल्लत पांघरणारे शिर्के, निंबाळकर, अचलोजी, अर्जुनजी, बंडाळी करणारे कोकणपट्टीचे वतनदार. कसला शतरंज चालला आहे हा? का खेळतो आहोत आम्ही तो? कोण खेळेल आमच्या माघारी तो? रामराजे? आमचे बाळराजे? केवढा पाताळयंत्री, निर्दय औरंग! तख्तासाठी सख्ख्या भावांचे काटे काढणारा, बापाला विषमालिश करवून आईच्या कबरीलगत दफन करणारा. तगेल आबांची-आमची ही नवथर गादी त्याच्यासामने? की? जशी इदलशाही, कुत्बशाही पडली तसे हे राज्य...? नाऽही. नाऽही. जिवाचे चाळ करून बांधलेत त्यासाठी आम्ही पायांत. एकल्या आम्हालाच ही आच लागून काय कामाचे?’ रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भणभणू लागले. माणसे येत होती, नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती. हात उठवून त्यांना थोपते करीत राजे तुटक बोलत होते – ‘‘बस्स. थोडक्यात बोला. अमक्यातमक्यास भेटा.’’ असे तुटक बोल त्यांच्या तोंडून ऐकू आले की, माणूस चक्रावत होते. चालत्या हत्तीच्या पायांत रानवेलींचा चिवट गुंतवा अडकावा तसे झाले होते. भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले. एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना. एक दिवस दुपारचा थाळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहवून येसूबाईंनी अखेर विचारलेच, “स्वामींचं कशातच लक्ष नाही. हे कोण थाळा चिवडणं? किती दिस?” येसूबाईंना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थाळ्याला देत ते म्हणाले, ‘‘आम्हासच कळत नाही – असं का? तुम्ही एकदा म्हणाला होता – तुटलंय आमचं शृंगारपूर आजपासून. त्या वेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हास – आमचंही शृंगारपूरच तुटल्यागत!” बसल्या चौरंगीवरूनच झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे, दूरवरचे गडशिखरांचे टोक न्याहाळत राजे पुटपुटले. एवढ्या बोलक्या – साफ, तडक येसूबाई त्याही गुमान झाल्या ते ऐकताना. काय बोलणार होत्या त्या तरी? आबासाहेबांचे बागलाणपासून जिंजीपर्यंतचे ‘शृंगारपूर’ सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे, हे त्यांनाही फार जाणवले. मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजांनी रामचंद्रपंतांना याद घेतले. त्रस्त, कातावून गेलेली दिसत होती त्यांची चर्या. रामचंद्रपंत शंकराजींच्यासह भेटीस आले. शंकराजी थोडे कचरतच आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले, ‘‘देवरूखचा पिलाजी देसाई गडावर आला आहे स्वामी. त्याची... त्याची वतनाबाबत....” ‘‘बस्स शंकराजी, त्याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुम्हास वाटेल तो निवाडा करा! आमच्या... आमच्या सामनेसुद्धा आणू नका कुणाला – ” राजे तुटक बोलले. प्रत्येकाला कुचंबून ठेवणारी शांतता पसरली. ‘‘कोकणात केव्हा उतरणार रामचंद्रपंत तुम्ही?” राजांनी विचारले. ‘‘जी. आजच.” रामचंद्रपंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही. ‘‘जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा. तिथं कुलेश आहेत. आम्ही टाकोटाकीनं याद केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना!’’ ‘‘जी. आम्ही खासच जाऊ.” सदरेबाहेर पडणाऱ्या रामचंद्रपंतांना राजांच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे, याचा अंदाज आला नाही. त्यांना, शंकराजींना खासा राजांना कल्पना नव्हती की, मराठ्यांचा ‘सालार’ गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती. ‘‘सुबहान अल्लाऽ!” असं पुटपुटत त्यानं ही खूशखबर स्वीकारली होती. गोवळकोंड्याच्या जिंकलेल्या बंदिस्त कोटात बादशहाने मरातबाचा दरबार भरविला होता. कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना बादशहानं मन्सबी बक्ष केल्या, खिल्लती पांघरल्या. सर्वांत शेवटी आपला शहजादा मुहम्मद आझम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला, ‘‘शहजादे, लईम संभा को नेस्तनाबूत करने हम बडे उम्मीदसे तुमको नामजाद करते है। फते के खबर की राह ताकते है।” आपल्या आब्बाजानांच्या तलम जाम्याचे, गुडघे टेकून चुंबन घेत आझमने अदबीने त्याला दिलासा दिला – ‘‘बेफिक्र रहिये मेरे आब्बाजान। जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईमको कदमों के सामने।’’ आता औरंगच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या!! बेळगाव, सोलापूर, मिरज, अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या. मातब्बरखानाने तर मोठीच उचल खाऊन किल्ले पट्टागड कब्ज केला. बादशहाचे रुहुल्ला, शाबदी, झुल्फिकार, रणमस्त, नेकनाम असे वीस-एक खास जागोजाग पांगले. खिल्लत, मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावोगावच्या सरदारांना चुचकारू लागले. त्यांच्या पडेल खबरा येऊन रोज गडावर थडकू लागल्या. हुकुमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले. ते स्वत:च ‘का याद फर्मावलं असावं?’ याचा विचार करून थकले होते. दुपारच्या निवांत वेळी ते राजांना पेश झाले. ‘‘सालार की बात सुनी. हुक्म होते ही, सेवामें पेश आये स्वामी।” हंबीररावांच्या आठवणीने कुलेशही गंभीर झाले. ‘‘त्यासाठीच याद घेतलंय आम्ही तुम्हाला कविजी. आम्हास वाटतं... वाटतं.” आपल्याच विचारगुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकांवर घासत बराच वेळ नुसते फेरच घेत राहिले. ‘‘कुलेऽश –’’ बऱ्याच वेळाने राजे बोलले. ‘‘आम्हाला वाटतं – वाटतं कुठंतरी बळ कमी पडतंय आमचं. फौजांचं नाही. आशीर्वादाचं.” ते ऐकताना कुलेशही विचारात पडले. म्हणाले, “हुक्म क्या है, स्वामीका?” ‘‘पाठीशी दैवीशक्ती पाहिजे कुलेश. काळ बाका आहे. आम्ही आग्ऱ्यात होतो तसा.” ‘‘धर्मस्थल का तो अच्छा चलाते है, स्वामी। फिर भी हमें लगता है – कुछ कठोर उपासना की जरूरत है।” ‘‘कठोर? कसली? कोणतीही कठोर उपासना करावयास तयार आहोत आम्ही.” कुलेश विचारात पडले. रुकले. ‘‘बोला. कसली कठोर उपासना?’’ ‘‘जी. देवी की उपासना! शाक्त पंथ की धारणा... लेकिन...” कुलेश चाचपडले. ‘‘बोला काय अडचण?” राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले. ‘‘स्वामी का अभिषेक हुआ है। यह गड अभिषेकस्थळ है। छोडना पडेगा.” राजे विचारात पडले. मग म्हणाले, ‘‘ठीक आहे. सोडू रायगड. गांगोली आहे, संगमेश्वर आहे. तिकडे जाऊ. पण कठोर म्हणालात ती उपासना कसली?” ‘‘स्वामी इस उपासनासे रणचंडी को प्रसन्न किया जाता है। उसके लिये बली देना, उपोषण, पूजा आदि विधि रहते है – और – ” ‘‘आणि काय? बोला कुलेश. आम्ही काहीही करण्यास राजी आहोत.” ‘‘जो अन्य देव देवता का लेते है, वैसा जल का नहीं सोमरस का तीर्थ लेना पडता है, इस उपासनामें। राजासाब यह करेंगे तो गहजब होगा। इसलिये.” ‘‘कुलेश, तुम्ही म्हणता ती उपासना आम्ही करू! तुम्हाला माहीत नाही, पण दिलेरच्या गोटात गेल्यापासून – आमचा – आमचा कबिला मागे अडकून पडल्यापासून घेतो आम्ही कधी-कधी मद्य. त्यानं गहजब माजायचं कारण नाही. तुम्ही तयारीला लागा चंडी-उपासनेच्या – उद्याच गड उतरून गांगोलीला जाऊ.” ‘‘जी. इस उपासना के उपचार शृंगारपूरके शिवयोगी जानते है।” शृंगारपूर! राजांच्या कपाळी आठी धरली. तरीही ते म्हणाले, ‘‘बोलावून घ्या त्यांना. मनी आलं आहे, तर करून टाका उपासनेचं.” कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले. राजांच्या उघड्यापुखर डोळ्यांसमोर हाती शस्त्र पेललेली रणचंडीची मूर्ती फिरत राहिली. हरजीराजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांचा चांगला समाचार घेत होते. त्यांच्या आज्ञेने संताजी वीस हजार फौजबळाने कांजीवरमला उतरले. मद्रासजवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांशी जागोजाग गाठ पडत होती. वांदीवाशला तर मोठी लढाई जुंपली होती, दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची. भागानगरहून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापूरकराकडून कब्ज केला. जंग-जंग केले होते, तो राखण्यासाठी हंबीररावांनी. औरंगची चाल साफ प्रकट झाली. स्वत: विजापूर गोवळकोंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या. मराठी मुलखात आझम पेरून फोडाफोडीसाठी विसावर खान फेकले. गांगोलीला जायला कुलेशांसह राजे गड उतरले. राया-अंताला वाटले होते नेहमीसारखे आपणाला बरोबर घेतले जाईल. पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खासगी सेवेसाठी खिदमतगार पुरुषा घेण्यात आला. त्याच्याबरोबर कुलेशांच्या वाड्याकडचे निवडक वीस-एक सेवकही होते. पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या आऊंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाडवाड्याच्या सदरेवर आले. तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखा आतील टोल न दिसल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले, ‘‘हिरोजी, घाट रिकामी ठेवल्येय ती?” हिरोजी घाटेकडे बघत जाबाचे म्हणाले, ‘‘जी... तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून! दिसत न्हाई त्यो वरवरनं म्हून टोल उतरून ठिवलाय!” राजे आणि कुलेश ती लोंबकळती रिकामी घाट बघतच राहिले. राजांच्या मनी थोरल्या आऊंच्या कैक आठवणी घणघणून गेल्या. पाचाडच्या मंडळींचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशीबाहेर पडले. गडावर निलोपंत, येसाजी, मोरेश्वर, खंडोजी सर्वांना त्यांनी त्यांच्या-त्यांच्या खात्यांचा सर्व सूचना दिल्या होत्या. आपण कुठे जातो आहोत, हे मात्र ते कुणालाच बोलले नाहीत. येसूबाईंनासुद्धा! चांगोजी काटकरामार्फत गांगोलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता. कुलेशांनीही तसाच स्वार शृंगारपूरला शिवयोग्यांना पाठवून कळविले होते की, निरोप मिळताच शिष्यगणांसह गांगोली जवळ करावी. स्वाराबरोबर दिलेल्या पत्रात ‘कठोरउपासने’चा संकल्प कळविला होता. गांगोली नजरटप्प्यात आले. बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे, येसूबाईंचे प्यारे असे हे गावठाण, राजे येणार ह्या वर्दीने येथील खास वाडा चाकरांनी बयाजीने नेटका लावला होता. कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोहोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले. त्यांनी वाड्याच्या माजघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पूर्वाभिमुख ठेवली होती. तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते. जागजागी व्याघ्रचर्मे अंथरलेली होती. कारभारी, शिवयोगी, शिष्य, कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले. सदरेवर अंथरलेल्या खास बैठकीवर विसावले. शिवयोग्यांनी त्यांना चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, देवरूख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथाच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला. सूर्य मेघांनी घेरला. ‘‘हां-हूं’’ म्हणत राजे कुलेशांना, शिवयोग्यांना दाद देत होते. पण त्यांच्या मनी फिरत होता औरंग. मध्येच त्यात येसूबाई-धाराऊंच्या बाबतचे विचार मिसळत होते. धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसेन्तसे कानात घुमू लागले. ‘‘ल्हान हाईस. जाऊ द्ये मला होळाकडं. ज्या जागेला कूस उजावली त्या जागेला ध्याई ठेवण्यासारं सार्थिक न्हाई जल्माचं.” वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती. पुऱ्या वाड्याला नंग्या तेगींच्या निवडक धारकऱ्यांचे कडे त्याने टाकले होते. शिवयोगी मुहूर्त काढतील, त्या ‘शुभयोगा’वर कठोर उपासनेला सुरुवात होणार होती. मध्येच मलकापूरहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गांगोलीला आला. त्याने मलकापूरच्या तुळाजी देसाईविरुद्ध दिवाणी बाकीबद्दल तक्रार आणली होती. देसायाला द्यायचे ताकीदपत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाऱ्याला वाटेस लावले. ‘कमी पडलंय ते आशीर्वादाचं बळ,’ कसल्या रूपात ‘रणचंडी’ राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगोलीकडे डोळे लावून बसली होती! क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
❤️ 👍 😢 🙏 4

Comments