Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 11, 2025 at 06:38 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - २०. गोपाळराव एकदम म्हणाले, आनंदी, आपण दोघेही इथे कुजत राहण्यापेक्षा, तू एकटीच अमेरिकेला गेलीस तर? एकटीच? होय! तू एकटीच पुढे जा. मी मागवून येतो. दोघांनी सोबत जायचे म्हटले तर आणखी दोन वर्ष जातील. तेवढ्या अवधीत तुझा अर्धा अधिक अभ्यास होईल. गोपाळराव विचार करत होते, कोडं सुटले होते. पण असे करणे बरोबर होईल का? ब्राह्मणांच्या बायका घरात समोरच्या रस्त्यावर देखील एकट्या जात नाही. आणि या सतरा वर्षाच्या मुलीला दूर पाताळात एकटे पाठवायचे? तिथे कसे कसे लोक असतील? काय काय प्रसंग येतील? हा कोवळा जीव हे सगळे सहन करील? ते आनंदी जवळ येऊन म्हणाले, तू एकटी जा. लोकांना आपल्या उदाहरणांनी दाखवून दे, स्री मधेही सामर्थ्य आहे. म्हणाले, परदेशात गेले म्हणजे आपलं सगळं सोडावं लागतं असं नाही. उलट तू अमेरिकेतल्या लोकांना आपल्या चाली रीतींची गोडी लाव. लोक नुसत्या मोठ्यापणाच्या गप्पा मारतात. सुधारणा व्हावे असे नुसतं म्हणतात. माझ्या हातून काहीच झाले नाही. विधवा विवाह करण्याची खटपट केली. तेही जमलं नाही. काहीच न जमणे माझ्या पत्रिकेतच आहे. तू जमवून दाखव.स्री काय करू शकते हे जगाला दाखवून दे. जाशील तू एकटी? जाईन. एवढे धैर्य तुझ्यात आहे? ते तुम्हीच दिलंय! तिथे संकटाची कल्पना आहे? होय! तरीही जाशील? होय! दोघांच्याही मनावर फार ताण पडला होता. तिच म्हणाली, मी सर्व संकटावर मात करून तुमचे स्वप्न साकार करीन. शिवाय तिथे कार्पेट मावशी आहेच. सर्व ठीक होईल. काळजी करू नका. पण मी तिथे नसणार. अहोऽ! " यथा काष्ठंच काष्ठंच !" हे तुम्हालाही माहित आहे. वियोग व्हायचं असेल तर, इथे होईल. इथला माणूस मरत नाही असं नाही. शांत, स्थिर आवाजात ती बोलत होती. गोपाळरावांना जणूं ती निराळीच स्री भासत होती. आपल्यापेक्षाही किती उंच झाली? काल-परवा तर हे बीज लावले. रोपटे लहान होते. वादळ, पावसात कसे जगेल याची काळजी होती. बघता बघता इतकी उंच गेली की, थेट आकाशाला भिडली. म्हणाली, पैशाची सोय झाली की तुम्ही या. आता वेळ न घालवता पैसा उभा करून माझ्या जाण्याची सोय करा. दुसऱ्या दिवशी आनंदीने या सर्व मजकुराचे कार्पेट मावशीला पत्र लिहिले. डिसेंबर जानेवारीस निघेल. आपण माझ्यासाठी एक-दोन खोल्या पाहून ठेवाव्यात. माझे जेवण मी हातानेच करेन. पुढचे दिवस अमेरिके विषयी माहिती गोळा करण्यात व खर्चाची तरतूद करण्यात गेले. कलकत्त्याहून थेट न्यूयॉर्कला जायचे ठरले. कलकत्त्याला डॉक्टर थोबर्न होते. त्यांची बायकोही डॉक्टर होती. त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली. फिलाडेल्फियाला "पेन्सिल्व्हानिया " हे स्त्रियांचे मेडिकल कॉलेज होते. आनंदी धड मॅट्रिकही नव्हती. मग कॉलेजमध्ये एकदम प्रवेश कसा मिळेल? तोही प्रश्न मिटला. पेन्सिल्व्हानिया कॉलेजमध्ये मॅट्रिक परीक्षेची सोय होती. ती उत्तीर्ण केल्यावर, कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळणार होता. डॉक्टर थोबर्नच्या ओळखीच्या दोन इंग्लिश स्त्रिया अमेरिकेत जाणार होत्या. त्यांची सोबत आनंदीला मिळणार होती. अनेकांनी अनेक मोडते घातले. पण शेवटी दिवस निश्चित झाला. १७ फेब्रुवारीला बोट कलकत्त्यावरून निघणार होती. गोपाळरावांचे अमेरिकेचे वेड लोक नुसते पहात होते. तो तसा वेडाच होता. व्यक्तिमत्व बिलकुल नव्हते. त्यांचे कुणी मित्र, नात्यागोत्यात लागेबांधे नव्हते. त्यांच्या डोक्यात स्त्री शिक्षणाचे वेड होते. विधवा विवाहाचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. मध्यंतरी आपल्याबरोबर आपल्या बायकोने नोकरी करावी असेही त्यांना वाटत होते. तसं पाहिलं तर काही ना काही वेड सगळ्यांनाच असते. पण ते नुसते वेडेच राहतात. याचे वेड वेगळेच होते. विधवा विवाहाचे जमले नाही. पण बायकोला शिकवण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही. कुणात मिसळले नाही. मैत्री नाही. हौस मौज नाही. गप्पागोष्टी नाही. सणवार नाही. हव्यास एकच. बायकोला शिकवणे. सारखे शिकवणे. जगापासून तिला अगदी तोडून टाकले होते. या शिक्षणाच्या वेडापाई कोल्हापूर, मुंबई, भुज, कलकत्त्याला बायकोला घेऊन गेले. आणि आता बायकोला एकटीला शिक्षणासाठी दूर पाताळात पाठवायला निघाले. ब्राह्मणाच्या बायका कधी एकट्या बाहेर पडायच्या नाहीत. बारा-पंधरा मैलावर माहेर असले तरी प्रथम तिकडून मूळ यायचे. मगच घराबाहेर पाऊल पडायचे. आणि हे सतरा वर्षाच्या बायकोला सर्व मर्यादा सोडून अमेरिकेत पाठवायला निघाले. तेही एकटीला. गोऱ्या लोकांच्या देशात एकट्या बाईचे पाऊल वाकडे पडणार नाही कशावरून? निघाला बायकोला शिकवायला... कसलं शिकवणे... आपल्या परंपरेवर, आपल्या धर्मावर, हिंदू स्त्रियांच्या विनयशीलतेर निखारे ठेवणारा हा चांडाळ आहे. आणि सतरा वर्षाची बया नवऱ्याला टाकून तिकडे जाणार. डॉक्टर होणार. या बयेला काय जमणार? तिकडे जाऊन एखाद्या साहेबाचा हात धरुन... प्रथम लोकांनी चेष्टेवारी नेले. पण निघण्याचा दिवस ठरल्याचे ऐकले आणि डोंब उसळला. कलकत्त्यात पाच पन्नास मराठी कुटुंबी होती. त्यांच्यात तर हाहाकारच उडाला. लोकांनी गोपाळरावांच्या घरी येऊन, रस्त्यात गाठून, धाकदपट्या दाखवून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण जमले नाही. रावसाहेब दांडेकरांच्या कानावर या सर्व गोष्टी आधीच आल्या होत्या. पण त्यांनी लक्ष दिले नाही. गोपाळरावही बरेच दिवसात रावसाहेबांकडे फिरकले नव्हते. एक दोनदा आनंदी जाऊन आली होती. बाईंनी तिला मुलगी मानली होती. तिच्या दुखण्यात त्यांनी तिची खूप शुश्रूषा केली होती. तरी या विषयावर काहीच बोलली नव्हती. बाईसाहेबांनाही विचारले नव्हते. त्या जुन्या चालीच्या धर्मनिष्ठ होत्या. देवधर्म उपासतापास, वचवैकल्य यातच त्या मग्न होत्या. अमेरिका नावाचा देश आहे हेही त्यांना माहित नव्हते. रावसाहेबांना दिवस निश्चित झाल्याची बातमी कळल्यावर ते हादरले होते. आनंदीवर त्यांचे मुलीप्रमाणे प्रेम होते. तिच्या लिहिण्या वाचण्याचे कौतुक होते. मराठी माणसांना त्याचा आधार होता. गोपाळराव चक्रम आहे. त्यांच्या आगीत आनंदी होरपळून जाईल याची भीती वाटायची. त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करीत. गोपाळावांबद्दलही त्यांचे मनात सूक्ष्म प्रेम होते. त्यांच्या अफाटपणाचे, सहासाचे त्यांना आकर्षण होते... क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
❤️ 👍 🙏 4

Comments