Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 12, 2025 at 06:39 AM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग-६३* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   कडक उनतापीचे दिवस सुरू झाले. गांगोलीच्या माळावर उष्म्याच्या लहलहत्या झळा उसळू लागल्या. आंबा, वडाच्या घेरांखाली तान्हेली गुरेढोरे ल्हापत सावली जवळ करू लागली. शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे ‘शक्ती’ला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर तर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या. राजांना आपण ‘राजे’ आहोत, हे परते ठेवून शक्तीचा ‘उपासक’ म्हणून तिला निकोप मनाने सादवायचे होते. ही उपासना धनदौलत, स्थावर, गडकोट, कब्जात आहे ते राखावे का वाढवावे, यासाठी नव्हती. होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी – फत्तेसाठी. जे-जे नागसर्पासारखे सळसळते आहे, ते- ते विधिपूर्वक देवीला अर्पण करायचे होते! या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहराव उतरून तबकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डुईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले. ‘केवढा काळ मागे हटला! त्या वेळी औरंगच्या आग्ऱ्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोहोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आम्हास. आता तोच औरंग, तीच भगवी वस्त्रे!!’ राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय! तीर्थ म्हणून दिले, ते मद्यही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोच्चारात पार पाडले जात होते. उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश, शिवयोग्यांसह राजे होडक्यात बसून शिवेजवळच्या डोहात पाणफेर घेत होते. या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या असामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वत: कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले, राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे-तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिर्क्यांच्या कानावर येत होते. दुर्वांच्या मुळ्यांसारख्याच भुमकाच भुमका जिकडे तिकडे पसरल्या – ‘‘कब्जी कलुशानं राजा मुठीत घ्येतला! ...राजं लई पेत्यात! कुणाची गाठभ्येट पडू देत न्हाई त्येंची बामन!” वळिवाच्या वावटळी उठून गेल्या. वळिवाचे एक-दोन पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगोलीच्या वाड्यात, सदरेलगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारीच सुरुदार खांबाजवळ उभ्या असलेल्या कुलेशांना त्यांनी विचारले, ‘‘कविराज, किती वळीव पडून गेले असतील या धरतीवर, तिच्या जन्मापासून! माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध?” कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, ‘‘हम सुनते है स्वामी, हमारे और आपके बारेमें कुछ शक सा पैदा हुआ है लोगोंमें। रिआया कहती है, आपको... हमने मुठ्ठीमें कब्ज किया है।” चोपाळ्याचा घेतला झोल राजांनी गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशांवर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, ‘‘खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ?” ‘‘क्या बोलते है, आप स्वामी?’’ ‘‘तुम्हा–आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्यांची कीव वाटते. एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब पण – मनाच्या उमाळीसरसे तीही फोडून गेलो आम्ही एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत पकडणारा दिलेर! पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला! यांचा वकूब तुमच्यात आहे, असे म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं? कुलेश, समुद्रमंथनातून आलेले विष ओठांआड करणारा शंकर जगाला ‘नीलकंठ’ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक ‘पार्वती’ असते, हे पटत नाही चटकन लोकांस.” येसूबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याचा थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले. मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊसकाळ तोंडावर आला की, राजे रायगड जवळ करीत असत. या वर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसूबाई, निळोपंत, येसाजी कंक, खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गांगोलीत सदरेवर याद घेतल्या कुलेशांनी जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले, ‘‘बारिश शुरू हुई है। रायगढ लौटना चाहिये। स्वामी, सब लोग राह देखते होंगे!” ‘‘कविराज, माणसं नसली तरी हा पाऊसकाळ पाठीशी उभा राहील आमच्या. खिळवून ठेवील तो औरंगच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा.’’ खरे सांगायचे तर राजांना रायगडी परतावेसेच वाटत नव्हते. घडी-घडी वाटत होते त्यांना की, असे तो फौजफाटा एकजाग करून थेट औरंगच्या छावणीवर चालून जावे. राजांचा विचार ऐकून कुलेशच चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचे व्रत बोलून गेलो असे त्यांना झाले. पण कशालाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशांनी आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली. राजाज्ञेने कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वराला जाऊन तिथेही पंथाच्या आणखी एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गांगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर व शिर्काण भागात शिर्क्यांनी तर आवईच उठवली की, ‘‘कलुशा औरंगजेबाचा हस्तक आहे! राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्यावतीनं फितुरी करतो आहे!’’ स्वत: कुलेश आता पेचात सापडल्यागत झाले होते. राजे आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते. तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकलेपण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय; पण कुलेशांनाही ते आपल्यासमोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगोली-संगमेश्वराचा रायगडाशी जसा संबंधच तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर, कौलावर दफ्तराचे, निवाड्याचे काम चालले होते. दोन महिने झाले. गडावरची माणसे हवालदिल झाली. आषाढाचे दिवस आले. राजांच्या फक्त खुशालीचे स्वार गडावर येत होते. गांगोली संगमेश्वरात पंथाची उपासना चालूच होती. शिवयोगी कुलेश राजांना ‘‘गडी चला – परतू या’’ म्हणून विनवून थकले होते. राजे कुणाचे काही ऐकत नव्हते. कुणाशीच बोलत नव्हते. शंभूदेहात राहून त्यांचा प्रलयंकर शिवाला ‘शक्तीच्या रूपात’ साद घालणारा भोसलाई आत्मा, खुद्द त्यांनासुद्धा जीवनाचे टोक हाताशी गवसू नये, अशा संवादात गुंतला होता. कसला संवाद? ‘पुरंदर! जिथं आम्ही जिंदगीचा पहिला श्वास घेतला. सासवडच्या कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या सोपानदेवांच्या समाधीलगतचा. केवढी फिरली ही पावलं पुरंदरावर आकार घेतल्यापासून! आमच्या जन्मदात्या मासाहेब आम्हास नीट याद येत नाहीत. त्यांची जागा घेतली थोरल्या आऊंनी, धाराऊनं. काय योग हे! शेवटच्या क्षणी आम्ही नाही भेटू शकलो आबासाहेबांना, धाराऊला. थोरल्या मासाहेब आमच्या समोरच पाचाडवाड्यात गेल्या. सती गेल्या मासाहेबांना तर आमच्या हातांनीच द्यावा लागला चूड आम्हास. खरंच! मथुरेहून त्रिमलांच्या सोबत मुलखाकडं यायला निघतानाच गवसतो आम्ही पेरल्या पहाऱ्यांच्या तावडीत तर? पन्हाळ्यावर आम्हाविरुद्ध रचलेला विषप्रयोगाचा कटाव सफल होता तर? करता जेरबंद दिलेरच आम्हास आपल्या गोटात तर? केवढ्या प्राणघाती कृष्णच्छायेतून गेली ही हयात! ‘गडकोट, जामदारखाने, खजिने यांची, रायगडाच्या सिंहासनावरची हवस वाटली आम्हास? उगाच सख्ख्या बहिणीला पाठमोर होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव? उगाच दिली त्यांनी आपली लाडकी ताराऊ आमच्या एका शब्दाखातर रामराजांना? का म्हणून आले शहजादा अकबर आणि दिलेरचा भाऊ मिरबातखान आम्हाकडं? समर्थ म्हणाले, ‘आबासाहेबांहून विशेष ते करावे.’ आम्ही ते मानलं का? नाही. का? आबासाहेब आकृती – आम्ही केवळ सावली, हे बरं समजून आहोत आम्ही.‘येता औरंगजेब फौजबंद होऊन आबासाहेबांच्या हयातीत दक्षिणेत, तर जाते त्यास शरण ते? कधीच नाही. दुर्गाबाईंच्या रूपे जो गुदरला तसा प्रसंग औरंगच्या बेट्यावरही कधी गुदरू नये, असेच का वाटत आले आम्हास? ‘हा औरंगचा आणि आबासाहेबांचा – आमचा खाजगीचा जंग आहे? नाही. दोन वृत्तींचा जंग आहे, असं एकल्या आम्हासच का वाटतं? पाण्यात ढेकळं विरघळावीत, तसं मी-मी म्हणणारे का होतायत या दौलतीस पारखे? की त्यांनाही वाटतं ही एकल्या भोसल्यांची दौलत आहे म्हणून? नवरात्रात जगदंबेचा गोंधळी तिला आळवताना ऐकलं आम्ही – ‘कुठवर पाहू वाट – माझ्या नेत्रा भरला ताट...’ ‘कशाच्या पाठबळावर जगत असतो, धडपडत असतो माणूस? का? आज तेच बळ कमी पडलं असं का वाटतं आहे? मामासाहेब हंबीरराव गेले म्हणून? लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या म्हणून? साऱ्यांनी एकजुटीनं कंबर कसली तर निभाव लागू नये, अशा औरंगसमोर आमचीच माणसं आम्हाला पारखी झाली म्हणून?’ सवालाचे शेपूट धरून सवाल खडे ठाकत होते. त्यांची उकल व्हावी, असा जाब मात्र गवसत नव्हता. बाहेर आषाढी पावसाखाली मावळमाती कशी झोडपून निघत होती. ‘‘तुम्ही छंदोगामात्य असाल, कुलएख्त्यार असाल, पण आम्ही महाराणी आहोत. गडावर पेशवे आहेत. पाऊसमाऱ्यातून गनीमफौजा मुलखात दौडताहेत. मोक्याच्या गडकोटांना घेर पडताहेत. आणि तुम्ही... तुम्ही स्वारींना गडाबाहेर काढून ऐषारामात! कोण मजाल ही?” रायगडाच्या दरुणीमहालात अनावर संतापाने लालेलाल झालेल्या येसूबाई उभ्या देही थरथर कापत होत्या. त्यांचे ते रूप बघून दिमतीच्या कुणबिणीही थरकून गेल्या. त्यांनी राणीसाहेबांना ‘असं’ कधीच नव्हतं बघितलं. समोर उभे कवी कुलेश ते राजबोल ऐकूनच लटलट कापू लागले. काय जाब द्यावा, हे न सुचल्यामुळे त्यांची गर्दन खाली गेली होती. खांद्यावरचे गुलाबकाठी उपरणे थरथर कापत होते. खास खबरगीर पाठवून येसूबाईंनी त्यांना संगमेश्वराहून तातडीने बोलावून घेतले होते. पेश येताच जबानीवर घेतले होते. ‘‘परंतु रानीसाब – हमारी सुनिये – हम.” कुलेश बोलू बघत होते. महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. स्वत:शी बोलाव्या तशा त्या कुलेशांना सुनावीत होत्या. बेलाग फडाफड बोलत होत्या. ‘‘पावली चंडी? झाला तिचा कृपाशीर्वाद? कधीच का केली नाही, अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी? केवढं होतं गुदरलं त्यांच्यावर? तुम्ही कवी म्हणवता – कसा शिरला कली तुमच्यात?” येसूबाईंच्या कानीही उठलेल्या आवया पडल्या होत्या. अंगाचा तिळपापड झाला होता त्यांचा, त्या ऐकून. मध्येच थांबवून त्या कवींना कुडीभर न्याहाळत होत्या; संशयाने. ‘‘कलुशा बादशहाचा हस्तक आहे!’’ ही कानी पडलेली जहरी बातमी तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश केकाटत होती. काय बोलावे – कसे बोलावे त्यांना समजेना. ‘‘आमच्या कानी आलंय तुमचं कर्तुक. बादशहाच्या वतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही. शरम कशी वाटली नाही तुम्हास स्वामींच्या खाल्ल्या अन्नाचे असे पांग फेडताना? त्यांच्याशी खेळ ही आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंदोगामात्य!’’ असह्य संतापाने, कोंडीने येसूबाईंना नीट बोलताही येईना. अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले. डुईवरचा पगडीघेर त्यांनी डुलविताच आसवांचे दोन थेंब त्यांच्या डोळ्यांतून उडाले. काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी? मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठविण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने, धोका पत्करून मदत केली होती. राजांच्यावतीने शहजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमवून तह साधला होता. जीव गलबलून उठला त्यांचा. झटकन पुढे होत त्यांनी राणीसाहेबांचे पायच धरले. त्यांनाही धड बोलवेना. ‘‘रानीसाऽब, चाहे तो गर्दन उडा देना हमारी। हम... कुलदेवताकी शपथ लेते है, चरणोंमे... हम – हम बेमान नहीं। कुछ भी कीजिये... हमारे राजासाब को, बडे स्वामीके इस दौलत को बचाइये।” लहान मुलासारखे छंदोगामात्य स्फुंदू लागले. येसूबाई सुन्न झाल्या ते ऐकताना. झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता. असता तर ते राणीसाहेबांच्या भेटीलाच आले नसते. ते आलेच नसते, तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत, खंडोजींना फौजबंदीने धाडून त्यांना जेरबंदच केले असते येसूबाईंनी. मग दोष होता तरी कुणाचा? राजांचा? एवढे बऱ्हाणपूर ते पणजी घोडे फेकणारे, प्रत्यक्ष औरंगलाच पिछाट घ्यायला लावणारे राजे. त्यांच्याबद्दल असे म्हणायची शामत तरी होती कुणाची? दोष असलाच तर होता, सभोवार पसरलेल्या असंख्यात कोत्या मनांचा. लालचावलेल्या कैक जिवांचा. हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणतेच छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा, असे सांगावे तशी गत झाली होती राजांची. कुणी केले होते हे! जगदंबेनेच. नाहीतर ‘आशीर्वादाचं बळ कमी पडतंय’ असे तरी का यावे त्यांच्या मनी? येसूबाई काहीच बोलल्या नाहीत. मनोमन काहीएक पक्का निर्णय घेऊन त्या दालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या, ‘‘आता आमच्या जागी तुम्ही आहात. सावलीसारखे स्वामींच्या पाठीशी असा. आजच गड सोडा.” कुलेश संगमेश्वरला येऊन पोहोचले. लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली. ‘‘तुम्ही टाकोटाक खेळण्यास दाखल व्हा. शिर्काणात काही गडबड दिसते. त्यावर ध्यान ठेवा. मामला घरचा आहे. प्रसंगी आम्हाला लिहा. आम्हीच सोडविला पाहिजे तो.” राजांच्या कानीही शिर्क्यांनी उठविलेल्या आवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या. बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेल्या शहजादा आझमला गणोजी, कान्होजी भेटत होते. घटकाघटका त्याच्याशी कसलातरी गुफ्तगू करीत होते. आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले. संगमेश्वर गांगोलीच्या वाड्यात समद्य शक्तीची पूजा चालूच होती. ती कधी थांबणार की नाही, असे भय निर्माण झाले. संगमेश्वरचे देसाई, गांगोलीचे कारभारी, खिदमतगार पुरुषा, एवढेच काय पंथाचे अधिकारी प्रत्यक्ष शिवयोगी; कुणीच राजांसमोर काही बोलू धजत नव्हते. कुलेशांची तर अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीगत अवस्था झाली होती. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. आवतीभोवती सेवा करणारे एक-दोन खिदमतगार सोडले, तर दुसऱ्या कुणाला थांबू, फिरकू देत नव्हते. त्यांच्या एकाच बाबीवर स्वत:शी खल चालला होता, ‘हे राज्य आम्हा एकल्याचंच आहे का? तसं नसताही तसं का वाटतं आहे?’ सवाल उठत होता, साद काही मिळत नव्हती. ऐन समोरची चंडी त्यांना नानारूपात दिसताना भासू लागली. कधी ती जगदंबेचे रूप घेत होती. कधी थोरल्या मासाहेब, धाराऊंचे रूप धारण करीत होती, कधी तिच्या डोळ्यांतूनच समर्थ आणि आबासाहेब रायगडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यागत दिसत होते. कधी तोफगोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्या होऊन आसमानात उडताना दिसत होत्या – हंबीररावांसारख्या!! वाहून-घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यांसमोर धावत होते. एरव्ही कुणाचेही काळीज चरकून जावे, असा तो पट होता. पण शेतकऱ्याने शिवाराकडे, बांधाकाठी राहून बघावे, तसेच राजे आपल्या उभ्या हयातीकडे तिऱ्हाईतपणाने बघत होते. न कचरता, मनाचा टवका उडू न देता. पुन: पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच एक मुद्रा – आबासाहेबांची! पन्हाळ्यावर अखेरची ऊरभेट घेताना, हात पसरते कवेत घेऊ बघताना म्हणणारी, “लेकरा, कुठं गेला होतास?” जामदारखान्याचा, अंबारखान्याचा तपास घ्यावा, तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते – ‘ज्या तडकाफडकी आम्ही दिलेरच्या गोटात जाऊन आबासाहेबांस पारखे झालो त्यानं – त्यानंच खचले ते. आबासाहेब, केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबीनं आमच्या हयातीवर. निघेल कधीकाळी तो धुऊन? मिळेल ती संधी?’ राजमनात कसली भिंगरी फिरते आहे, याची ना कुलेशांना, ना शिवयोग्यांना; एवढेच काय प्रत्यक्ष चंडीलाही कल्पना नव्हती! आता सरत्या पावसाळ्यावर श्रावणासरींचा खेळ सुरू झाला. पुरी कोकणपट्टी पिवळ्या, हिरव्या कुरणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली, क्षणात झाकाळून जाऊ लागली. या वेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती. भागानगरात देखणा, बांडा तानाशाहा आपल्या नेक सरदारांसह दोरखंडांनी जखडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता. रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा म्होरक्या नाईक बहिर्जी श्रावणसरी अंगावर घेत धापावत संगमेश्वरला देसायांच्या वाड्यात शिरला होता. जिवाची बाजी लावून त्याला दौलतीचा ताईत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता. महाराणींचा अतिमोलाचा कठोर, कडक तसाच एकदम खाजगतीचा खलिता त्याने संगती आणला होता. कुणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिर्जी खांद्यावरची कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालनात घुसला. यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून चरकून क्षणैक थांबला. केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा! श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आप्तेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश, शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकूनही न बघता न राहवून म्हणाला, “धनीऽ, गडास्नं आलुया पाऊसपान्याचं. ऊर फुटेतो. वळी दिलीया ही रानीसायबांनी. म्होरं घालून घेऊनच यायला सांगितलंय धन्यास्नी.’’ बहिर्जी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता. राजे बैठकीच्या व्याघ्रचर्मावरून उठले. यज्ञकुंडाजवळून बहिर्जीकडे चालले. शिवयोगी, कुलेश, शिष्य, पुरुषा एवढेच काय; प्रत्यक्ष चंडीचेही काळीज धडाडले. आता नायकाची खैर नाही, असेच सर्वांना वाटले. थोरल्यांपासून बहिर्जीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते. सुरतेपासून मद्रासपावेतो भुईचा चकता पायांखाली घेतला होता, बहिर्जींनी दौलतीच्या सेवेसाठी. येसूबाईंच्यासाठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिर्जीने. सख्ख्या भावाची. येसाजी कंकासारखी डुई, ओठांवरची केसावळ पांढरी झाली होती, बहिर्जी नाईकांची भोसल्यांच्या सेवेत. राजांना येताना बघून चरकले नाहीत, ते एकले बहिर्जीच. आता राजे काही बोलणार तोच सय झाल्या बहिर्जीने झटकन वाकून पायच धरले त्यांचे. डुईवरचे रामोशी पागोटे हालवून गदगदत म्हणाला तो, ‘‘आन हाय बिरूबाची. लय झाली ही ताकदीची पूजा. धनीच असं एकलं हुतो म्हणालं, तर मुलखाच्या आयाबापड्यांनी बघावं कुणाकडे? बास झाली ही चंडी, तकडं जगदंबा इदूळ धरनं वाट बगतीया. चला बघू आमासंगे. नायतर टाका या म्हाताऱ्याला ह्या कुंडात.” राजांच्या हातातली समिधांची छोटी जुडी गळून फरशीवर पडली. चंडी, कुंड, बहिर्जी असे ते टकमक बघू लागले. ते कमरेत वाकले. सर्वांना वाटले पडली मोळी उचलायला ते झुकलेत. पण त्यांनी आपल्या दोन्ही पायांवर डोके भिडवून ते डावे- उजवे डोलवीत स्फुंदणाऱ्या बहिर्जीच्या पाठीवर तळहात ठेवला. सूर्यबिंबातून किरण सुटावेत तसे तुटक बोल बहिर्जीच्या कानी पडले, ‘‘नाईक, कुचाचा सरंजाम ठेवा. तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी.” खांदे धरून त्यांनी बहिर्जीला उठते केले. त्याने दिलेली खलिता वळी स्वत:च खोलून त्यावर नजर फिरविली. डोळ्यांसमोर लिखावट फिरली त्यांच्या. श्रींच्या राज्यासाठी श्रीसखींनी रेखलेली – ‘‘– झाली तितुकी चंडीची भक्ती पूजा पुरे झाली. एक चंडी स्वारीस पाऊन शक्ती देते तर काय? अवघा मुलूख शक्तिपात झाल्यागत झाला आहे. देखतपत्र, स्वार होऊन नायकसमेत निघोन यावे. ना तर – ना तर आम्हीच निघोन येऊ. आबासाहेबांनी दिधली शिक्केकट्यार आणि श्रीसखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही पंथाचे भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ!” छत्रपतींनी हातचा खलिता मुठीतच आवळला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासातळ हालविण्याच्या तयारीला सगळे लागले. कुलेशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली. या वेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पढून आलेला औरंगजेब आपल्या वजीर असदखानाला सांगत होता – ‘‘हमने कसम ली है, आज नमाज पढते समय कुराने शरीफकी। सेवाके बच्चेका ये तख्त बिखोबुनियाद उखाड देंगे जैसा यहाँ, गोवलकोंडामें लगाया वैसा लगा देंगे चांदतारोंका निशान रायगढपे। शहजादे आझमको लिखो संबापर जासूद फेको, उसका पिछा जारी रखो।’’ बालेकिल्ल्याच्या तटबंदीबाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रेते चुपचाप कबरस्तानाकडे नेली जात होती. गांगोली-संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंथस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलविण्यात आल्या. व्याघ्रचर्माच्या वळ्या काखोटींना मारून शिष्यगणासह आले तसे शिवयोगी निघून गेले. पंथाचे एक प्रचंड वादळ राजजीवनात घोंघावत डोकावून सरकून ठेवून गेले. शंभूमनात शक्तिशाली शिवाचा भक्तिभाव जागा झाला होता, तो तसाच रेंगाळता ठेवून गेले. रायगडी आलेले राजे निळोपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते. पेशव्यांनी खालमानेने राजांच्या कानी घातले होते की, ‘‘होनगड हसनअलीखानानं आणि त्र्यंबकगड मातब्बरखानानं पाडला आहे.” मतलब साफ होता. मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती. जिकडे शिर्क्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते, त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुलतफितखान यांचे जोडतळ पडत होते. प्रचितगडावरच्या नेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता. निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता, त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हूल देत होता. किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मोगली सरदाराशी तो संधान बांधू बघत होता. भरपेट इनाम दिले, तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता. कानी पडणाऱ्या एका-एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते. त्यातच कुडाळचे देशाधिकारी नीळकंठ नारायण राजांच्या भेटीस आले. त्यांनी तर चक्क तह केला होता. कसला? तर आमचे कुडाळचे वतन ‘बादशहानी राखून चालवावे. आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूख जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत’ असा. गडी आल्यापासून महाराजांची येसूबाईंशी भेट झाली नव्हती. कशी व्हावी? पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता. हटता पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. विजापूरहून औरंगजेबाचे शहजादा आझमला कोल्हापूर– मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते. हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजाद केलेले म्हलोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहजाद्याच्या चाली थोपवीत होते. खंडोजी, पेशवे, खबरगीर यांनी कानी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते. वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्रा तोडली. तो म्हणाला, ‘‘कल्याण प्रांतांचे सूर्याजी अन् बोपजी प्रभो आल्यात भेटाय.’’ चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभूबंधूंना भेटीस बोलावून घेतले. प्रभूंनी परगणे साक्से, पंचमहाल, पणे येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली. शांतपणे प्रभूबंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हादपंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले. पंत आले. बारकाव्याने पाहिले असते, तरच त्यांची मुद्रा कावरीबावरी आहे, हे कुणालाही कळून येते. ‘‘या प्रभूबंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश?’’ राजे कसल्यातरी विचारात असल्याने म्हणाले. प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी टाकला. ‘‘या. आम्हा सोबत दफ्तरात’’ असे प्रभूंना म्हणून प्रल्हादपंत जायला वळले. ‘‘वादळवाऱ्यातही झाडेपेडे डुलली तर चालतात, पण मुलखातले कडे थरकून नाही भागत, असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश. ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा.’’ राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले. ते ऐकून, ‘‘जी’’ म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हादपंतांच्या पापण्या फडफडल्या, डोळ्यांच्या बाहुल्या क्षणैक गरगरल्या. औरंगजेबाचा, त्याने पेरलेल्या खानांचा, फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा, फोंडा, कुडाळ, कारवार येथील देसाई, सावंत, दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबीण रूपा पेश होऊन म्हणाली, ‘‘रानीसाब येत्यात.’’ राजमन ढवळून गेले. किती विषय होते बोलायला! भाषा कोणती? किती आरोपसफाया होत्या! कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसूकच झरोक्याशी झाले. येसूबाई आल्या. त्यांनी महालभर नजर फिरविली. महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले. विचित्र शांतता दोन राजमनांत कुचमून पडली. गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले. ‘‘एक सांगण्यासाठी आलोत आम्ही.’’ येसूबाई घोगरल्या. राजांनी वळून नुसते श्रीसखींच्याकडे बघितले. मान डोलवीत येसूबाई म्हणाल्या, ‘‘ऐकावं आमचं. शरमिंद्या आहोत आम्ही. ज्या वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्याबाबत आवया उठविल्या, त्या कानी आल्या आहेत आमच्या.” “येसूऽ...” आभाळात वळीव भरून यावा, तसे शंभूनेत्र डवरले. पुन्हा शांततेने पंख फाकले. काय बोलावे दोघांनाही साधेना. डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही. ‘‘आमच्या गुणं खूप तापदरा झाली आहे तुम्हांस. बोलली शृंगारपूरची माणसं काही, तरी वाटत नाही त्याचं एवढं, तुम्हाकडं बघताना.” झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संथ, घोगरट म्हणाले. “तसं काही उणंदुणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा, आबांना स्वारींबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी, तसं झालं. घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडली आगऱ्यात त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यांनी मात्र ते फिरविलेत!’’ बोलल्या येसूबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या. क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍 1

Comments