
Yuti's Hub Library
June 13, 2025 at 07:23 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - २६.
दोन दिवस आनंदीचे पोशाखाच्या विचारात गेले. विचार करता करता तिला एक कल्पना सुचली. भुजला असताना गुजराती बायका जशा पातळ नेसत होत्या तसे नेसले तर पोटऱ्या झाकल्या जातात. डोक्यावर पदर येईल व थंडीपासून संरक्षण होईल. कल्पना पटली. फार मोठे कोडे सुटले. गोपाळरावांना कळवावे का? पटेल त्यांना? तिने ठरवले तुर्त कळवायचे नाही. पण नेसायला सुरुवात करायची.
फिलाडेल्फियाला जायला पंधरा दिवस उरले होते. मावशीला तिची काळजी वाटू लागली. कसे होणार? नुसते लुगडं गुंडाळून राहणार. उकडलेला भात भाजी खाणार. दुखले खुपले तर कोण मदत करणार? इतक्या दूरुन नेहमी जाणे शक्य नव्हते.
आनंदीला मात्र बरे वाटले. तीन महिने मावशीकडे फुकट खाण्याचे उपकाराचे ओझे वाटत होते. मावशी पैसे घेणे तर शक्यच नव्हते. तिने खरंच सख्या भाची सारखे सांभाळले होते. जायची वेळ जवळ आली. आनंदीचे मन उल्लासाने भरले होते.
रोसेलगावातून ठिकठिकाणाहून मेजवानीचे आमंत्रण येत होते. निघायला आठ दिवस बाकी असताना आनंदी म्हणाली, मावशी इथल्या सर्व मित्र-मैत्रिणींना जेवायला बोलवावे असे वाटते. अगं पण! तुला वासही सहन होत नाही. ती म्हणाली, इतके दिवस तुमचे पदार्थ झालेत. आता मी आमचे पदार्थ करेन. अग! कोण खाईल मांस नसलेले. त्याला ना चव ना ढब! बघाच तुम्ही! एकदा खाल्ले की मला पुन्हा पुन्हा करायला लावाल. मावशीला पटले नाही. पण तिला नाराज न करावे म्हणून रुकार दिला. संध्याकाळी हिंदुस्तानी पद्धतीची जेवण आहे असे मुद्दाम सांगून निमंत्रित करण्यात आले.
आदल्या दिवशी ती स्वयंपाकाची तयारी करीत असताना, पमिला धावत येऊन आनंदीला म्हणाली, तुला भेटायला कोणी इंडियन आले आहेत. आनंदीला नवल वाटले. ती मधल्या दारात येऊन उभी राहिली. बाहेरच्या हॉलमध्ये सुटेडबुटेड, काळसर चेहऱ्याचा एक माणूस उभा राहत इंग्रजीत म्हणाले, मी राजवाडे. पुण्याहून गोपाळरावांचे पत्र आले. आनंदी हॉलमध्ये खुर्चीवर येऊन बसली. नाव मराठी आणि बोलतात इंग्रजीतून. म्हणाले, मी इथे काचेचा धंदा शिकायला आलोय.
बरेच दिवसात मराठीचा जिभेला स्पर्श नाही. पण ती मराठीत म्हणाली, आपण आलात फार बरे वाटले. म्हणजे काय? यायलाच हवं! इट इज माय ड्युटी. राजवाडे इंग्रजीत म्हणाले. एका मराठी स्त्रीशी राजवाडे इंग्रजीत बोलत होते. दहा-पंधरा मिनिटेच बोलणे चालले पण त्यांच्या बोलण्यात अमेरिकन लोकांच्या चालीरीती, संस्कृतीची वारेमाप स्तुती केली. तेवढीच हिंदुस्थानाची निंदा केली. त्या घाणेरड्या देशात आपण परत जाणार नाही असे इंग्रजीत सांगितले. काय बोलावे तिला सुचत नव्हते. तोच पुढे म्हणाले, तुम्ही हिंदुस्थान सोडले फार बरे केले. तुम्ही आता इथल्या सारख्या रहा. पोशाख बदला. बाहेर हिंडा.
तिला राजवाड्याच्या डोळ्यात वेगळी छटा दिसली. म्हणाले, हे नऊवारी आणि बंडी इथे शोभत नाही. झगा घाला. आपण डान्सला जाऊ. इथल्या स्त्रिया मोकळ्या असतात. मी नेहमी त्यांच्याबरोबर नाटकाला जातो. आजही जाणार आहे. तुम्ही येणार का?
कपाळाला आठ्या घालून आनंदी उभी राहिली. त्यांच्याकडे तिरस्कारने पाहत करड्या स्वरात म्हणाली, तुम्ही आता जा. मला काम आहे. रात्री गाडी घेऊन येऊ?
आवाजात नापसंती उतरवत ती म्हणाली, मी परपुरुषाबरोबर नाटकाला जात नाही. मी अजून तरी हिंदू आहे. तुम्ही जावे हे बरे. तिने केलेला प्रहार राजवाड्याला समजण्याची पात्रता नव्हती. तो मोठ्याने हसून निघून गेला.
आनंदीला ती खोली अपवित्र झाल्यासारखी वाटली. ती नुसतीच उभी राहिली. आतून आलेल्या मावशीला आनंदी एकटीच उभी असलेली पाहून आश्चर्याने विचारले, ते कोण हिंदुस्तानी होते, गेले का? त्यांना आजच्या मेजवानीला बोलावले की नाही? ती म्हणाली, त्यांची लायकी नव्हती. रुध्द आवाजात म्हणाली, आज मला नाटकाला चल म्हणत होता. अग मग, जायचं की!
आनंदी काही बोलली नाही. मावशी बरोबर मेजवानीची तयारी करताना, तिने प्रौर्वात्य आणि पश्चिमात्य नीतिकल्पनातील फरक विशद करून म्हणाली, आमच्या हिंदू संस्कृतीनुसार परपुरुषाबरोबर कसे त्याज्य आहे हे समजावून सांगितले.
दुसऱ्या दिवशी रोसेलमधील १८-२० स्री पुरुष मावशीकडे जेवायला आले. काही वेगळ्या पध्दतीचे जेवण मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंदी नऊवारी लुगडे नेसले होती.नाकात नथ, हातात गोठ पाटला घातल्या होत्या. काही स्त्रियांनी नऊवारी नेसून बघण्याचा हट्ट धरला. त्या तरुण स्त्रिया नऊवारी नेसून अगदी वेगळ्या दिसू लागल्या. आनंदीने त्या सर्व बायकांना चांगले ठसठशीत कुंकू लावले. त्या अगदी लक्ष्मीसारख्या दिसू लागल्या.
आनंदीने जेवणाचा थाट वेगळाच केला होता. टेबल खुर्च्या हटवून जमिनीवर लाकडी पाठ मांडले होते. समोर बटनवुडची पाने, त्यावर निरनिराळे पदार्थ, प्रत्येक पानाभोवती शोभिवंत रांगोळी काढल्या होत्या. त्या अमेरिकन स्त्री-पुरुषांना रांगोळीचे फारच नवल वाटले. त्यांनी अनेक प्रश्न विचारल्यावर, आनंदीने रांगोळीचे प्रत्याक्षिक करून दाखवले. पाटावर बसताना तर सर्वांनाच सर्कस करावी लागली. पुरुषांनी मांडी घालून व स्त्रियांनी एक मांडी उभी एक मांडी घालून कसे बसायचे ते करून दाखवले. पण कुणाला जमेना. जेवणाला सुरुवात झाली. आनंदीने प्रत्येक पदार्थाचे नाव व करण्याची कृती सांगितली.
जेवायला सुरुवात करताना हिंदू लोक अन्नप्रोक्षण, चित्राहुती, अपौष्णीचा अर्थ वगैरे सांगितले. भात कालवणापूर्वी ओम तत्सम ब्रह्मर्पणमस्तु म्हटले. त्याचा अर्थही सांगितला. अशा प्रकारचे जेवण या लोकांना कधीच मिळाले नव्हते. सगळे पदार्थ त्यांना नावीन्यपूर्ण वाटले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
❤️
👍
7