Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 13, 2025 at 01:57 PM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग-६४* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   ‘‘याद आहे तुम्हाला? रानवाऱ्याशी बाशिंग बांधलंय आम्ही, असं म्हणाला होता एकदा तुम्ही.’’ राजे पाठमोरेच म्हणाले. पसरले पंख शांततेने अधिकच फुलविले. ‘‘जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं?’’ तो विषयच तोडावा म्हणून राजांनी विचारले. ‘‘जी.’’ रामराजे, ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदलासारख्या तीन मूर्ती डोळ्यांसमोर तरळल्याने येसूबाईंनी हुरुपाने दाद दिली. बराच वेळ राजे आणि येसूबाईंचे बोलणे चालले. महालात आलेले रोषणनाईक कोनाड्या-कोनाड्यांतील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले. असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठकमहालातील पलोते भकभकत होते. त्यांच्या उजेडात लोड-गिरद्यांच्या बैठकीवर बसलेले खेमसावंत, जलालखान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते. कसल्या? तर दौलतीतल्या चंदगड तरफेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या! आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली. खंडोजी, निळोपंत, चिमणगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळातही गावोगावच्या वतनदारांना खलिते पाठवीत होते. जे खाशा वकुबाचे होते, त्यांना शंकराजी, निळोपंत, खंडोजी कुणी ना कुणी सोबत घेऊन जातीने भेटत होते. साऱ्यांना पिळवटून सांगत होते, ‘‘दोन दिवसांचा गनीम, त्यासी साथ देते होऊ नका. जसा आमचा रामसेज झुंजला तसे हरगावकूस निकरानं लढते ठेवा.’’ येसाजी कंक, रूपाजी भोसले, बारदरमल, संताजी जगताप, जानराव, धनाजी यांच्या अटीतटीने चौफेर पांगलेल्या तळांना राजे भेट देत होते. विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्यचालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते. औरंगच्या टोळधाडीसमोर त्यांना ना मराठी मुलूख, ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता. परत आलेले सर्जेराव जेधे नेकीने चाकरीला लागले होते. पन्हाळा, खेळणा, राजापूर असा पट्टा धरून म्हलोजी, कुलेश, गंगाजी दादाजी सावधानगीत होते. पुरंदर, पुणे, वाई, सातारा भागात बाजी घोलप, विनायक उमाजी, येसाजी मल्हार, कोनेरे रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाकेठीक होते. अशाच एका थंडीच्या दिवशी येसूबाई आपल्या स्वारीच्या आवडीचे वाफारते, गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या. त्यांनी कटोरा चौरंगीवर ठेवला. त्यातून उफाळत्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले, ‘‘किती दिवस झाले नाही माडग्याला?’’ झटकन कटोरा उचलून स्वारीच्या हातात देत येसूबाई म्हणाल्या, ‘‘स्वारीचं ध्यान नसतं खाण्याकडं आताशा. बघावं चाखून जमलंय का.’’ राजांनी माडगे चाखले. हसून ते म्हणाले, ‘‘छान जमलंय.’’ आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले. ‘‘हे काय?’’ येसूबाईंनी नाराज होत विचारले. ‘‘नाही. आम्ही विचार करतो आहोत, कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं माडगं चाखत असताना. तुम्ही आम्हाला दिलं तसंच देत असतील माडगं आमच्या मासाहेब आबासाहेबांना. बोलताना बोलले असतील दोघेही केवढंतरी जिवाभावाचं!’’ ते ऐकताना आपल्या स्वारींच्या मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज ताडण्यासाठी येसूबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या. मोठे गमतीदार होते ते चित्र. हातच्या कटोऱ्यात आपले आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी. येवढ्यात राया-अंताच्या हातांना धरलेले बाळराजे आपल्या दोघा काकांना काहीतरी विचारीत महालात प्रवेशले. आल्या-आल्या त्यांनी तक्रारच गुदरली. ‘‘त्या काकामहाराजांच्या वाड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि दोन असामी असतात. आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात. का? आमचं येणं आवडत नाही त्यांना?’’ ती बाल-तक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले. ‘न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत? छे? कानी पडणाऱ्या फितव्यांच्या खबरांनी आपलं मनच कातर झालं आहे.’ मनी आला शक त्यांनी झटक्यात उडवूनही लावला. राया-अंताकडून बालराजांना आपल्या जवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले, ‘‘तुम्ही आपले आपल्या काकीसाहेबांनाच जाऊन भेटत चला. तिथं असणार नाहीत, कुणी अशी मोठी मंडळी.’’ ताराऊंच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मनी हंबीररावांची मुद्रा खडी ठाकली. वाईच्या लढाईत ते गेलेत असे अजून मन घेतच नव्हते. पेटल्या टेंभ्याच्या तेवत्या ज्योतीभोवती निळसर प्रकाश-कड थरथरताना दिसावी, तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्राच राजनेत्रांसमोर खडी ठाकली. तीच तिन्ही टाकं उचललेली लाल पिळाची डुईची घेरदार कंगणी पगडी, ओठांवरून फिरून गालावरच्या कानकल्ल्यात मिसळून गेलेले भरदार मिश्यांचे कंगोल, कपाळीचा गंधटिळा, कानातले चमकते सरलष्करपदाचे मानकरी डौलदार सोनचौकडे, मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दौडींनी रापलेली रातांब्यागत दिसणारी करडी, पण भाबडी मुद्रा. राजे हंबीररावांच्या आठवणीतच डुंबून गेले. बाळराजे त्यांना कितीतरी वेळ सांगत राहिले, ‘‘महाराजसाहेब – महाराजसाहेब, तुम्हाला नेलं होतं, थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं. खूपऽ दूर. तुम्ही नाही ना नेत कधी आम्हाला गडाखाली. आम्हाला स्वप्न पडलं होतं – ’’ बडबड्या बाळराजांना पुन्हा राया-अंताच्या हवाली करताना राजांनी विचारलं, ‘‘आमच्या धाराऊची छत्री कापूरहोळात उभी झाल्याचं कैकदा बोललात. पण दर्शन घ्यावं, ते जमलं नाही. एकदा जावं म्हणतो होळाकडं. कोण-कोण आहे तिकडं?’’ ‘‘जी. समदी हाईत. आम्हा दोघांचं कबिलं, म्हातारा, पोरंठोरं.’’ धाराऊच्या दुग्धाळ आठवणीने सारेच विचारगत झाले. कुतुबशाहीचे भागानगर पडून एक साल उलटले. बागलाण, खानदेश, वऱ्हाड, पुणे, सातारा, पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागजागी औरंगचे फौजबंद सरदार पांगले होते. आता त्याला आदिलशाहीचा सर्जाखान, फिराजजंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते. तरीही फितुरीने काही गडकोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. राजांच्या आरमारी फळीने टोपीकर, फिरंगी-हबशी आपल्या जरबेत ठेवले होते. औरंगजेब मनोमन ताडून होता की, जसा विसापूर, गोवळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रेटा देऊन ‘शिवा-संभा’चा हा मुलूख दस्त होणार नाही. दोन सालांपूर्वी त्याने याचा अनुभवच घेतला होता. त्यासाठी शहजादा आझमला धारेवर धरून तो बजावीत होता. ‘‘पिछा करो, चाहे जितने दिनार खर्च करो लेकिन मरहठोंका सुबेदार दस्त करो। जिंदा या मुर्दा पेश करो। यूँ उसका मुल्क गिर जायेगा।’’ राजांनीही हे मनोमन ताडले होते की, औरंगची ताकद माणसे फोडण्यात आहे. त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठीसुद्धा संबंधितांचा मरातब करत होते. चहूबाजूचे गाव अन् गाव अटीतटीने मोगल फौजांशी झुंजत होते. नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटल्यागत झाली होती. तरीही खंडोजी, निळोपंतांचे स्वार राने तुडवीत ठाण्याठाण्यांवर आज्ञापत्र पाठवीत होते. राजांनी आज्ञा केल्याप्रमाणे सुरनीस शंकराजी, कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्रपंत, मुजुमदार नारायण रघुनाथ अशा शेलक्यांनी गड जवळ केला. राया-अंताला सांगितल्याप्रमाणे हुजुरातीची शिबंदी घेऊन राजे रायगड उतरले. संगती खंडोजी, नारायण रघुनाथ आणि राया-अंता होते. वरंदा घाटाने सर्वांसह राजे कापूरहोळाकडे चालले. राया-अंताने खासे धनी येताहेत, अशी आगेवर्दी होळाकडे धाडली होती. चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धिम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले, ‘‘फिरंगाणाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला खंडोजी. तुम्ही कधी पालखीत मात्र बसलेले दिसला नाहीत ते?’’ ‘‘जी. स्वामींनी पालखी दिली पण – पण...’’ दौडते खंडोजी बोलताना रुकले. ‘‘पण काय?’’ ‘‘पण आमच्या पायाला भिंगरी बांधली आहे त्याचं काय?’’ खंडोजी हसत उत्तरले. पुरंदरचा शिखरटाक दिसू लागला. गाड्यांचे कापूरहोळ आले. राजे येणार म्हणून पुरंदरहून आलेले बाजी घोलप होळाच्या शिवेवर सामोरे आले. याच बाजींनी सर्जेराव जेध्यांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती. सर्वांसह राजे राया-अंताच्या वाड्याकडे चालले. राजांच्या मनात धाराऊच्या कैक मुद्रा फिरू लागल्या. गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेले आठवणीचे पळसपान फडफडले. राया-अंताच्या बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळश्या घेऊन बाहेर आल्या. सोनेरी तोडा असलेल्या राजांच्या चंद्रावताच्या खुरांवर त्या त्यांनी ओतल्या. राजे पायउतार झाले. धाराऊच्या सुनांनी त्यांना निरांजनांनी ओवाळले. त्यांच्या कपाळी कुंकुमटिळा भरला. आज राया-अंता भरून पावले होते. पाणथरल्या डोळ्यांनी आपल्या धन्यांना बघू लागले. कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या, कुणबाऊ, गाडेबंधूंची. आज ती पूर्ण होत होती. दोघाही भावांना वाटत होतं, ‘‘म्हातारी असाय पायजे हुती आज.’’ समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील रामलक्ष्मणागत दोघेही गाडेबंधू माणूसमेळात उभे होते. थोरल्या रायाला, राजांनी आपली हनुवटी छातीशी नेत मानेने बोलावले. रायाला प्रथम ते उमगलेच नाही. ‘‘रायाऽ’’ हलकी राजसाद आली. ‘‘जी’’ म्हणत राया पुढे झाला. ‘‘ढाल उतरा रायाजी, पाठीची.’’ शंभूबोल ऐकताच राया-अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्व जण चरकले. शंका आली साऱ्यांना की, ‘‘काय झाली आगळीक रायाची की त्याला शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी?’’ थरकलेला राया तर न राहवून पुटपुटला, ‘‘धनीऽ, पर...’’ त्याच्या हातातली ढाल थरारली. राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुनाथांकडे पाहिले. ते एका स्वारासह पुढेसे झाले. स्वाराच्या हातात सरपोसबंद तबक होते. रायगडाहूनच आणले होते ते. राजांनी चिमटीने सरपोस ओढून घेतला. तबकातील सोनमाया उन्हाच्या तिरपेत कशी झळाळून उठली. पुरे तबक सोनेरी होनांनी भरले होते. त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराऊ दिसू लागली. ती जशी म्हणत होती, ‘‘...माज्या दुदाच्या लेकरा.’’ राजांनी हातातले तबकच रायाने पसरलेल्या ढालीत ठेवले. ते घोगरले, ‘‘राया, आऊंच्या छत्रीवर एक घाट बसवून घ्या! रोज दुबार तिचे टोल होळात कानी पडू द्यात. चला तिकडे.’’ राया-अंता ढालीतल्या तबकाकडे बघतच राहिले. पुढे होत अंताने रायाला ठोसरले. राया त्याचा अचूक माग ताडत लगबगीने म्हणाला, ‘‘कशापायी हे धनी आम्हास्नी? नगं ह्ये.’’ शिवेवरून वाहत असलेल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केले. हातस्पर्शाने ते पुन्हा मागे लोटताना राजांच्या तर्जनीतला पुखरखडा किरणांत तळपून उठला. ओठांतून त्याहून तळपदार बोल सुटले, ‘‘राया-अंता, अंगची कातडी उतरवून तिच्या मोजड्या करून पायी घातल्या असत्या आऊच्या तरी नसती झाली भरपाई तिनं ओठाआड सोडलेल्या दूधधारांची. राहू द्या हे.’’ सर्वांसह राजांनी धाराऊच्या छत्रीचे दर्शन घेतले. तिच्यावरच्या पादुकांना माथा भिडविताना उगाच त्यांना वाटले, ‘पुरंदरापेक्षा लगतच्या ह्या कापूरहोळात उपजतो आम्ही तर किती ब्येस होतं!’ गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले. ‘‘बादशहा फौजेसह विजापूरहून हलला स्वामी. शहजादा आझमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूज जवळ करताहेत.” निळोपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली. ‘‘जिंजीहून हरजीराजांनी धाडलेले संताजी मुलखात पावले आहेत. पन्हाळ्यावर ते आपल्या जमावानिशी तळ टाकून आहेत.’’ खंडोजींनी हरजीराजांची हालचाल दिली. दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले. तो आझमच्या मदतीने मिरज कोल्हापूर मार्गे पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का? ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले, ‘‘चिटणीस, पन्हाळ्याला म्हलोजीबाबांना स्वार द्या – औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो. तुम्ही-संताजी बरे हुशारीनं असा.’’ ‘‘पंत, तुम्ही सोलापूर, अकलूज प्रांतात चलाखीचे नजरबाज पेरा, औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिलाकसूर आम्हास पावली पाहिजे.’’ पेशवे खंडोजी कानी पडणाऱ्या आज्ञा ध्यानपूर्वक ऐकत होते. कल्याण-भिवंडी भागातून आलेले येसाजी कंक राजांच्या भेटीस आले. वय झाले होते आता येसाजींचे. ते राजांना म्हणाले, ‘‘आम्हास्नी आता नवी जोखीम द्यावी एखांदी!’’ येसाजींना निरखून आवाजात हल्लक भरत राजे म्हणाले, “कंककाका खरे तर विश्रामाची उमर तुमची. तुम्ही – तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच. केव्हाही गड उतरावा लागतो आम्हास. तुमच्या जोगं जाणतं, वकुबाचं कोण आहे दुसरं?’’ म्हातारे कंक आपल्या छत्रपतींना ‘‘जी’’ म्हणून न्याहाळत राहिले. त्यांना थोरल्यांची सय झाली. त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारीत दौलतीच्या कामी आलाच होता. पोराच्या आठवणीला लिंपण घालून येसाजींनी ती बुजवूनही टाकली होती. महाराजांना शब्द देत ते म्हणाले, ‘‘थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज. लागली गरज तर बोरगाव तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीस्नी घेऊ बोलावून. खाशास्नी भिंगरीगत चौमुलूख तुडवा लागतो, हे जाणताव आम्ही.’’ ‘‘काका, हंबीरराव गेले तेव्हापासून, का कुणास ठाऊक खूप एकलं वाटतं आम्हास. केवढा डोंगराएवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास!’’ हंबीररावांच्या आठवणीने राजे-येसाजी दोघेही ढवळून निघाले. ‘‘खंडुबाची इच्छा त्येला कोन काय करनार? किती बघितलं या म्हाताऱ्या ध्यायीनं. अजून काय-काय बघा ऐकायची नौबत हाय कळत न्हाई.’’ येसाजी स्वत:शीच बोलल्यागत बोलले. ‘‘काका, पेशव्यांच्या संगती दफ्तरात जा. कृष्णाजींच्यासाठी इनामपत्रांचे कागद सिद्ध झाले आहेत. ते घेऊन जा. आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा.’’ राजांनी हातातील तर्जनीची अंगठी येसाजींच्या समोर धरली. रांगडे येसाजी गडबडून गेले. न राहवून म्हणाले, ‘‘हे आम्हास्नी नगं. घालायची कुनी ही बोटावर? आन् असतं कुनी तर हिंमत बी झाली नसती त्येची.’’ राजांनी अंगठी पुन्हा स्वत:च्या बोटात बसती केली. येसाजी, निळोपंत, खंडोजी निघून गेले. विचारगत झालेले राजे दरुणीदालनात आले. शिसवी मंचकावर बसून कुणाशीतरी बोलत असलेल्या येसूबाई वर्दी मिळताच चाललेले बोलणे तोडून, सावरून खड्या झाल्या होत्या. त्या बोलत होत्या कुलेशांच्या कबिल्याशी. राजे त्यांना बघून परत जायला निघाले. येसूबाई ते ताडून म्हणाल्या, ‘‘तसं खास नाही, सादिलच बोलतो आहोत आम्ही. स्वारीनं यावं.’’ तरीही राजे क्षणैक घोटाळले. येसूबाई तपशिलाने म्हणाल्या, ‘‘छंदोगामात्यांची वाजपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे. ते पन्हाळा- खेळणा फिरते राहून बरी नजर ठेवून आहेत शिर्काणावर.’’ महाराणी आणि राजे यांची बोलण्यात अडचण होऊ नये म्हणून कुलेशांचा कबिला येसूबाईंना, ‘‘चलते है हम।’’ म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला. थोडा वेळ शांतता पसरली. दोन्ही राजमनांत शिर्के, औरंगजेब, कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार, हंबीरराव यांचेच विचार फिरू लागले. ‘‘काय खबर आहे कुलेशांची शिर्काणाबाबत?’’ राजांनी समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडेला निरखत शांतता फोडली. ‘‘छंदोगामात्यांचे आणि शिर्क्यांचे काहीतरी बिनसलेलं दिसतंय, असं म्हणत होत्या बाई.’’ आज येसूबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख ‘शिर्के’ असा केला. राजांना तो जाणवला. ‘‘कोण वजेनं बिनसलंय?’’ राजांनी तपशील समजण्यासाठी विचारले. ‘‘ते नाही समजलं.’’ येसूबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या. त्यांची चर्चा चालली आहे, तो राजांना कसलीतरी याद होऊन ते म्हणाले, ‘‘कारभारी कुठं तुमचे? त्यांना सांगा येसाजी दाभाड्यांना वर्दी द्या म्हणावं, आम्ही रामराजांच्या भेटीस येतो आहोत.’’ रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने डहुळली. ‘‘का चाललीय स्वारी रामराजांकडं? कळलं नाही आम्हास,’’ येसूबाईंनी विचारले. राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला – ‘पन्हाळ्यावर आम्ही दस्त होतो तर? बसते रामराजे गादीवर तर?’ डोंगरकडे निरखणारी आपली नजर तोडत राजांनी येसूबाईंच्यावर जोडली. त्यांना जाब देण्याऐवजी उलटच विचारले, ‘‘काय वाटतं तुम्हास रामराजांबद्दल?’’ ‘‘समजलो नाही आम्ही.’’ येसूबाई गोंधळल्या. ‘‘आमच्या जागी रामराजे बसते तर? बसलो असतो, तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर?’’ ध्यानीमनी नसलेला सवाल राजांच्या तोंडूनच आलेला ऐकून येसूबाई चक्रावल्या. म्हणाल्या, ‘‘भलत्यावेळी हा कसला सवाल स्वारींच्या मनी?’’ येसूबाईंचे खासगीचे कारभारी आले. त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालता विषयच तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या, ‘‘मिरजेला ठाण झाला शहाजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खानामागून खान पेरतो आहे, अशी खबर आहे. कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हूल देण्याची खबर घ्यायला विसरू नये.’’ ते ऐकताना राजे हसले आणि म्हणाले, ‘‘किती काळजी करता आमची? एवढी तुमचे दादासाहेब दौलतीची करते, फलटणकर त्यांना साथ देते, अर्जुनजी-अचलाजी औरंगाबादेऐवजी गडाची वाट धरते तर – जाऊ द्या. आम्ही भेटून येतो रामराजांना.’’ बाहेर पडणाऱ्या राजांना रूपा कुणबीण व भवानीबाई यांच्यासह येताना बाळराजे दिसले. त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले, ‘‘येणार काकीसाहेबांच्याकडं? बाळराजांनी होकाराची मान डुलविताच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले. जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या, तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर फिरू लागला. मनात अनेक सवाल उठले, एकमेकांवर थडकू लागले. ‘कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका- काकूंशी? का वाटत नाही आम्हास फरक यांच्यात व रामराजांच्यात?’ रामराजांचा वाडा आला. येसाजी दाभाडे राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे वाड्याच्या बैठकी दालनात प्रवेशले. एका मंचकावर बसलेले रामराजे उठते झाले. पुढे येऊन त्यांनी आपल्या दादामहाराजांची पायधूळ मस्तकी घेत बाळराजांना राजांपासून आपल्याजवळ घेतले. लालसर गौर वर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या मासाहेबांची आठवण झाली. ‘काय ॠणानुबंध होता त्यांचा आमचा? केवढं घडू नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं? या रामराजांच्याबाबत मात्र काहीच का आलं नाही उणं-वावगं मनात? ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले यांच्याकडे तसंच आम्हीही नाही का बघितलं?’ ‘‘ताराऊंना घ्या बोलावून.’’ बाळराजांचे खांदे थोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले. ऐन बांड्या उमरीच्या रामराजांचे गाल लालावले. त्यांनी येसाजींना नजर दिली. येसाजी अंत:पुरी दालनात जाऊन ताराऊंच्यासह आले. ताराऊंनीही राजांची पायधूळ घेतली. हंबीररावांच्या आठवणीने हातचा पदरशेव तोंडात घेऊन ताराऊ हमसू लागल्या. दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली. ‘‘सुमार व्हा. आम्हीहून आलोत भेटीला ते खास बाबीनं. कोणी काही; कोणी काही सांगतील, तर उभयता तिकडं ध्यान देऊ नका. प्रसंग पडला तर याहून अधिक पणास लावावं लागेल तुम्हा आम्हाला. काही वावगं घडलं-खटकलं तर आमच्या श्रीसखींना हमेशा बिनासंकोच विचारत चला. आम्हाला केव्हाही गड उतरावा लागतो. गनीमफौजा चौफेर पांगल्या आहेत.’’ राजांचा शब्दन्शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवीत असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या. रामराजांच्या वाड्याबाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली. बाळराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे, रामराजे आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले. किल्ले खेळण्यावरून शिर्काणात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले. त्यांनी आपला खासगीचा कारभारी चार-पाच स्वारांसह गणोजींच्या भेटीसाठी गावात पाठविला. कुलेश राजांच्यावतीने शिर्क्यांशी रदबदली करायला आले होते. कसेही झाले तरी शिर्के मंडळी येसूबाईंच्या माहेरची माणसे होती. आपल्या कारभाऱ्याची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले. त्यांना माहीत होते, शिर्के औरंगजेबाचे मनसबदार झालेत. तरीही त्यांना भरोसा वाटत होता – वडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी, कान्होजींची समज पाडतील. अटीतटीच्या या बाक्या समयी अजूनही विचार करतील. राजांच्या पाठीशी राहतील. कुलेशांचे कारभारी शिर्क्यांच्या वाड्याच्या सदरेवर आले. ही तीच सदर होती. जिथली सुर्व्यांच्या गादी आबासाहेबांनी सिद्दी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुर्व्यांनी जोहरला मदत केली म्हणून, ‘वाडे-हुडे बांधतात. बसकणी तयार करून गनिमास सामील होतात’ म्हणत संतापाने लाथेच्या ठोकरीने उधळून लावली होती. याच सदरेवर सुर्व्यांच्यावतीने नेकीने लढणाऱ्या पिलाजी शिर्क्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते. याच वाड्यातून शिर्क्यांच्या येसूबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या. शिर्क्यांच्या कारभाऱ्याने आत जाऊन वर्दी दिली. आता उतारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले. त्यांना कुलेशांच्या कारभाऱ्याने आपण कोण, कशासाठी आलोत याचा तपशील दिला. पिलाजींच्या मनी केवढेतरी रामायण फिरून गेले. येसूबाईंच्या आठवणीने त्यांचे मन हेलावले. थोरल्या महाराजांची आठवण त्यांच्या मनी जागी झाली. ‘‘कसलं वतन? ही कोण इमानदारी की दोन दिसांचा मुगल त्याच्या पाठीशी व्हावं? एवढ्या बिकट समयाला पोरीचं कुंकुबळ एकलं टाकावं? कोण हुताव आम्ही? कुना गुणं एवढं तालेवारीचं झालाव?’’ ते निर्धाराने म्हणालेही, ‘‘वेशीवरच का थांबलं कब्जी? ह्यो वाडा काय परका न्हाई. मेळाजोळाचं काय असंल ते बोलू की बसून निवांत.’’ कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या मनी आशा पालवल्या. ते म्हणाले, ‘‘आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो.’’ ते जायला वळलेही. एवढ्यात मध्यम वयाचे, भरदार छाताडाचे गणोजी मुजरे घेत सदरेवर आले. त्यांच्या अंगी ईदलशाही माटाचा हिरवाकंच जामा होता. त्यांची मुद्रा येसूबाईंशी बरीचशी मिळतीजुळती होती. फरक एकच होता, येसूबाई देवमहालातील देव्हाऱ्याच्या तेवत्या निरांजनासारख्या दिसत, तर गणोजी मावळमाचीवर भकभकत पेटत्या पलोत्यासारखे! ते येताच सदरेवर जरब पसरली. ‘‘काय आबा, कुनास्नी आनतो म्हंत्यात हे?’’ गणोजींनी भुवई वाकडी करून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले. त्यांच्या चौकशीला शिर्क्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली. “काऽय? त्यो कब्जी पुरात? कशापायी बलवता त्येला वाड्यावर आबा? का घेतलं त्यानं तुमास्नीबी मुठीत?’’ गणोजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्यांकडे बघू लागले. म्हणाले, ‘‘सांगा तुमच्या धन्याला, हे शिरकान हाय म्हनावं, संगमेसुर न्हवं.’’ ‘‘छंदोगामात्य राजांकडून आलेत. काही खास निरोप आहे राजांचा. ऐकून घ्यावा तो.’’ कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले. ते ऐकताच गणोजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडले. ‘‘कोन राजे? ह्ये शिरकानं हाय, इथले राजे शिर्के. न्हाई चालत दुसऱ्या कुनाचं राजेपन हितं. सांग त्या कब्जीला, बऱ्या बोलानं आला तशी जनावरं मागं पिटाळा म्हनावं!’’ डोळे विस्फारलेल्या गणोजींना संतापाने धड बोलवेना. सदरेवरचे त्यांचेच चाकर चरकले. कुलेशाचे कारभारीही काय बोलावे, या विचारात पडले. कसेतरी म्हणाले, ‘‘असं भलतंच मानून कसं चालेल?’’ ‘‘भलतंच? इदलशाही, कुत्बशाही पाडणाऱ्या बादशांनीच केलंय नामजाद आम्हास्नी! काय पाड लागतो भोसल्यांचा त्येंच्या म्होर दिसलंच लौकर. तुमचा कब्जीच हाय आतल्या अंगानं बादशहाकडं! आम्हास्नी वरवरनं चाचपून बघायलाच आलाय!’’ कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरलेच. ‘‘निघतो आम्ही.’’ म्हणत मान खाली घालून बाहेर पडले. पिलाजी त्यांना थांबविण्यासाठी म्हणाले, ‘‘थांबा कारभारी थोडं.’’ ‘‘आबा, रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं? काय दिला होता जाब भोसल्यांनी शिरकानाबाबत हे तुम्ही इसरला असलात, तरी आम्ही न्हाई इसरलो.’’ गणोजी त्यांनाच रोखत म्हणाले. आता मात्र वडीलकीच्या अधिकाराने पिळवटलेले पिलाजी म्हणाले, ‘‘भोसले काय म्हणाले ते न्हाई मोलाचं. पोर दिलीया घराला त्या. कसं इसरायचं ते?’’ ‘‘त्या ‘पोर’ नाहीत तुमची. ‘रानीसाब’ हाईत दौलतीच्या! तुम्ही मानता पर त्या न्हाईत मानत तुम्हास्नी.’’ गणोजींनी पिलाजींचे बोलणेच खुंटते केले. आल्या कारभाऱ्याला जरब देत ते म्हणाले, ‘‘शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत न्हाई शिर्क्यांची, सांगा तुमच्या कब्जीला.’’ कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणोजींची करडी जरब पडली. सुन्न कारभारी मान डुलवीत कुलेशांच्याकडे जायला निघाले. हताश पिलाजी येसूबाईंना आठवत ‘वागजाईची इच्छा’ म्हणत सदर सोडून आत गेले. गणोजी सदरेवरच संतप्त पायफेर घेऊ लागले. बाहेर शिवारावर देख टाकून आलेले कान्होजी वाड्यात शिरले. त्यांना झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना बघताच, कारभाऱ्याकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेश पुरावर चालून येतील, या शंकेने गणोजी त्यांना पुन्हा बाहेर पिटाळत म्हणाले, ‘‘जो असंल त्यो घोडा घ्या पागेचा. कब्जी शिवेवर थांबलाय पुराच्या त्येला पिटाळा.’’ आणि स्वत:च गणोजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले. दोघा शिर्के बंधूंनी शिवेवर थांबल्या कुलेशांच्या फौजेच्या पाठलाग करून त्यांना शिरकाणाबाहेर हुसकावून लावले. खेळण्यावर परत येताच आपल्या चिटणिसाला कलमी सेवेवर घेत झाल्या प्रकाराची वार्ता राजांना कळविण्यासाठी संतप्त, अस्वस्थ, हैराण झालेले कुलेश कनोजी बोलीत मजकूर सांगू लागले - “राजश्रिया विराजित स्वामी के चरणोंपें – आज्ञापालक छंदोगामात्य दंडवत विशेष -’’ रायगडावर या वेळी देवमहालातील सांजारती झालेल्या कुलदेवतेला – वाघजाईला तळहाती पदरशेव घेऊन नमस्कार करताना ‘दौलतीच्या राणीसाब’ मनोमन नेहमीसारखे म्हणत होत्या – ‘‘पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव! वय झालंय आबांचं. एकदा घडव भेट त्यांची!’’ आणि कोल्हापूरच्या आझमशहाच्या तळावरून या वेळी ‘मरहट्टोंका राजा, मोजदा संभा पनालेपर है’ अशी खबर लागल्याने शेख निजाम दख्खनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते! कु लेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले – ‘‘शिरकाणात झाल्या बोलाचालीत गणोजी शिर्क्यांशी भांडण झाले. कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले. माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत. तवान्या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिर्क्यांची बाब उकलत नाही. मनचं बोलणं ते होत नाही. वाट बघतो आहोत.’’ इदल, कुत्बशाही डुबवून, त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चौवाटांनी औरंगच्या फौजा मुलखात उतरल्या होत्या. ‘काय करावं? रायगड या बाक्या समयास सोडावा? कुलेश लिहिताहेत तेही वाजवी आहे. तेच काय; पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिर्क्यांशी हातघाई करण्याची. हा अस्तनीतला सल निपटायला आम्ही आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात.’ गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निरखत विचार केला. ‘धाडावं खंडोजींना शिरकाणात? छेऽ –’ सदर सोडून ते अंत:पुराकडे चालले. हारीने उभ्या सात महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला. तो बघताच मासाहेब – पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले. ‘‘कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे.’’ अंत:पुर येताच राया-अंता बाहेरच रुकले. आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले. महाराज तो नजारा बघतच राहिले. स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईंनी बाळराजांना उतरून घेतले. ते बघून महाराज म्हणाले, ‘‘का उतरवलेत त्यांना? किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर?’’ बाळराजांना जवळ घेत शिर्क्यांची बाब येसूबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले. ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, ‘‘खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या! काय निवाडा आहे स्वारींचा?” ‘‘खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडे.’’ महाराजांनी निर्णय दिला. ‘‘आम्हास वाटतं... खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकाणात. ही घरची बाब. खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून!’’ येसूबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला. ‘‘श्रीसखी राज्ञी जयति।’’ या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईंकडे महाराज बघतच राहिले. क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
🙏 2

Comments